10th, 12th Students Scholarship : 2777 विद्यार्थ्यांना आस शिष्यवृत्ती मिळण्याची! : तरतूद संपल्याने अद्याप शिष्यवृत्ती मिळालेली नाही

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

2777 विद्यार्थ्यांना आस शिष्यवृत्ती मिळण्याची!

: तरतूद संपल्याने अद्याप शिष्यवृत्ती मिळालेली नाही

पुणे: महापालिकेतर्फे इयत्ता १०वी,१२वीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीची २० कोटी रुपयांची तरतूद संपल्याने २ हजार ७७७ विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती मिळालेली नाही. यासाठी ६ कोटी रुपयांची गरज असल्याने हा निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आणखी काही दिवस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची वाट पहावी लागणार आहे. दरम्यान लवकरच ही तरतूद उपलब्ध करून दिली जाईल. अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली.

महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांना भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसाहाय्य योजनेतंर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी दहावी व बारावीमध्ये खुल्या गटातील विद्यार्थ्यांनी ८० टक्केपेक्षा जास्त गुण असणे आवश्‍यक आहेत आणि महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, मागासवर्गीय विद्यार्थी आणि ४० टक्के अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना ६५ टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले तर १०वीच्या विद्यार्थ्यांना १५ हजार आणि १२वीसाठी २५ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

२०२०-२१ साठी महापालिकेकडे इयत्ता १०वीचे ७ हजार ८७८ आणि इयत्ता १२वीचे ८ हजार ९६ असे १५ हजार ९७४ विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. पडताळणीनंतर १३ हजार ३१ अर्ज पात्र ठरले आहेत. तर २ हजार ९४३ जणांचे अर्ज अपात्र ठरले.

पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम ३१ मार्च पूर्वी थेट बँक खात्यात जमा केली जाणार होती. १०वीच्या ५ हजार ५५३ जणांच्या बँक खात्यात ८ कोटी ३२ लाख ९५ हजार रुपये तर १२वी च्या ४ हजार ७०१ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ११ कोटी ७५ लाख २५ हजार रुपये जमा केले.

इयत्ता १०वीच्या ७९८ तर इयत्ता १२वीच्या १ हजार ९७९ विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती मिळालेली नाही. महापालिकेकडून या विद्यार्थ्यांना तुमचा शिष्यवृत्तीचा अर्ज मंजूर झाला आहे, शिष्यवृत्ती जमा केली जाईल असे मेसेज मोबाईलवर गेले आहेत. पण एप्रिल महिना संपत आला तरी पैसे जमा न झाल्याने पालक, विद्यार्थ्यांकडून याची चौकशी सुरू आहे. २०२०-२१ च्या अंदाजपत्रकातील शिष्यवृत्तीची २० कोटीची तरतूद संपली आहे. उर्वरित २ हजार ७७७ जणांच्या शिष्यवृत्तीसाठी ६ कोटी १४ लाख ४५ हजार रुपयांची गरज आहे. हा निधी मिळावा यासाठी समाज विकास विभागाकडून पाठपुरावा सुरू आहे.

‘‘पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात आहे, आत्तापर्यंत १० हजार २५४ जणांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर लवकरच पैसे जमा होतील.

ज्ञानेश्वर मोळक,  अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Leave a Reply