Abhay Yojana : Hemant Rasne : १ कोटी पर्यंतच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना : दंडाच्या रकमेत ७५ टक्के सवलत 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

१ कोटी पर्यंतच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना

: दंडाच्या रकमेत ७५ टक्के सवलत

पुणे : १ कोटी पर्यंतच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. यामध्ये रहिवासी आणि व्यावसायिक अशा दोघांना ही सवलत मिळणार आहे. अशी माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

२० डिसेंबर ते २६ जानेवारी २०२२ या कालावधीसाठी योजना

रासने म्हणाले, ज्या मिळकतकरधारकांची मूळ मिळकतकर आणि २ टक्के शास्ती अशी एकूण थकबाकी १ डिसेंबर २०२१ रोजी एक कोटी रुपयांपेक्षा कमी आहे अशांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे. मोबार्इल टॉवरच्या थकबाकीसाठी ही योजना लागू होणार नाही. थकबाकीदाराला २० डिसेंबर ते २६ जानेवारी २०२२ या कालावधीत एकरकमी थकबाकी भरावी लागणार आहे. त्या थकबाकीदारांना शास्तीच्या रकमेत ७५ टक्के सवलत देण्यात येणार आहे.

रासने पुढे म्हणाले, सद्यस्थितीत मिळकतकराची थकबाकी सात हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यामध्ये चक्रवाढ व्याजाने दोन टक्के शास्तीची रक्कम मूळ मागणीपेक्षा जास्त म्हणजेच चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मागील वर्षी २ ऑक्‍टोबर ते २६ जानेवारी या कालावधीत अक्षय योजना पन्नास लाख रुपयांपर्यंत थकबाकी असणार्यांसाठी अभय योजना राबविण्यात आली होती. या योजनेत एक लाख एकोणपन्नास हजार मिळकतधारकांनी सहभागी होत ४८५ कोटी रुपयांचा कर महापालिकेकडे जमा केला. तथापी अद्याप थकबाकी असलेल्या मिळकतधारकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नव्याने अभय योजना राबविण्यात येत आहे.

Leave a Reply