PMC commissioner | Budget | समान पाणीपुरवठा आणि आवास योजना पूर्ण करण्याचे लक्ष्य | आयुक्तांनी बजेट मध्ये केली भरीव तरतूद

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

समान पाणीपुरवठा आणि आवास योजना पूर्ण करण्याचे लक्ष्य

| आयुक्तांनी बजेट मध्ये केली भरीव तरतूद

पंतप्रधान आवास योजना आणि समान पाणीपुरवठा या दोन योजना नव्या आर्थिक वर्षात पूर्ण होतील. मात्र, समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलमापक बसविणे, पाण्याच्या टाक्यांची उभारणी, जलवाहिन्या टाकणे ही कामे पूर्ण होणार असून जलमापकाप्रमाणे पाणीपट्टी वसुली पुढील आर्थिक वर्षापासून करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी स्पष्ट केले.

आगामी आर्थिक वर्षासाठी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी शुक्रवारी अंदाजपत्रक सादर केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. समान पाणीपुरवठा योजनेत प्रामुख्याने टाक्या बांधणे, मुख्य दाब नलिका टाकणे, अस्तित्वातील वितरण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे, पंपिंग स्थानके बांधणे, तसेच नागरिकांच्या नळजोडणीवर जलमापक बसविणे अशी कामे प्रस्तावित आहेत. पाण्याच्या साठवण टाक्या बांधणे, मुख्यदाब नलिका टाकणे यांसाठी प्रत्येकी एक, तर शहराच्या जलशुद्धीकरण केंद्रनिहाय पाच अशी सात निविदांची प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

नव्या आर्थिक वर्षात पाणीपुरवठ्यासाठी जादा तरतूद करण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२४ पर्यंत समान पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पुढील आर्थिक वर्षात जलमापकाप्रमाणे पाणीपट्टी वसूल केली जाईल. तसेच पंतप्रधान आवास योजनांतर्गत सर्व प्रकल्प लवकरच पूर्ण केले जातील, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले.

शहरात समान पाणी पुरवठा करण्याबरोबराच समाविष्ट गावातील पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात यंदा पाणी पुरवठ्यासाठी एक हजार ३२१ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून या वर्षी समान पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्याचा मनोदय प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

शहरातील समान पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिकेने सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी २४ बाय ७ पाणी पुरवठा योजनेचे काम हाती घेतले आहे. मध्यंतरी कोविडमुळे या प्रकल्पाला विलंब झाला आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षात या प्रकल्पाचा गती देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मार्च २०२४ पर्यंत या प्रकल्पातंर्गत ७० पाणी साठवण टाक्या कार्यान्वित करणे, त्याशिवाय ३५० किलोमीटर लांबीची नवीन वितरण व्यवस्था निर्माण करणे आणि दीड लाख जलमापक मीटर बसवण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. तर पाणी पुरवठ्या करण्यासाठी नियोजित करण्यात आलेल्या शहरातील १४१ झोनपैकी ६५ झोनचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
या शिवाय समाविष्ट ३४ गावांत ही योजना राबविण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात बावधन बुद्रुक, सुस, म्हाळुंगे गावांच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये बावधन बुद्रुक येथे पाच टाक्यांचे बांधकाम व सुमारे ३५ किलोमीटरलांबीची पाण्याची लाइन विकसित करण्यात येणार आहे. तर सुस व म्हाळुंगे येथे सहा टाक्या व ७७ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहे.