Cloth Bag Vending Machine | सार्वजनिक ठिकाणी पुणेकरांना उपलब्ध होणार कापडी पिशव्या! | महापालिका बसवणार व्हेंडिंग मशीन

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

सार्वजनिक ठिकाणी पुणेकरांना उपलब्ध होणार कापडी पिशव्या!

| महापालिका बसवणार व्हेंडिंग मशीन

पुणे | प्लास्टिक निर्मूलनासाठी महापालिकेकडून गंभीरपणे पावले उचलली असून त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आता महापालिका पुणेकरांना कापडी पिशव्या वापरण्यास प्रोत्साहन देणार आहे. त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी व्हेंडिंग मशीन बसवण्यात येणार आहेत. या मशीनचा वापर करून नागरिक कॉइन टाकून पिशवी सहजासहजी उपलब्ध करून घेऊ शकतात. लवकरच ही सेवा उपलब्ध केली जाणार आहे. अशी माहिती महापालिका घनकचरा विभागाच्या वतीने देण्यात आली.
महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने प्लास्टिक वापरास प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. यात नागरिकांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिक प्लास्टिकचा सर्रास वापर करताना दिसून येतात. हे टाळण्यासाठी त्यांना कापडी पिशव्या वापरण्याचा पर्याय देण्यात येणार आहे. त्यासाठी शहरात सार्वजनिक ठिकाणी व्हेंडिंग मशीन बसवण्यात येणार आहेत. बस स्टेशन, रेल्वे स्टेशन, मॉल, विमानतळ, मल्टिप्लेक्स अशा ठिकाणी या मशीन बसवता येतात.
महापालिका घनकचरा विभागाच्या माहितीनुसार सीएसआर च्या माध्यमातून महापालिकेला अशा 8 मशीन मंगळवारी मिळणार आहेत. त्यांनतर त्या विविध ठिकाणी बसवण्यात येणार आहेत. एका मशीनमध्ये 150 कापडी पिशव्या बसू शकतात. नागरिकांना 10 रुपये पासून 20 रुपये पर्यंतचे कॉइन टाकून पिशव्या उपलब्ध होतील. या पिशव्या तयार करण्याचे काम महापालिका बचत गटांना देणार आहे. त्यातून मिळणारे पैसे गटांना दिले जातील. लवकरच ही सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. असे घनकचरा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.