Chikharde-Gormale road | चिखर्डे-गोरमाळे रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत बांधकाम विभागाकडे तक्रार  | 8 दिवसांत रस्ता नियमानुसार न केल्यास आंदोलनाचा इशारा 

Categories
Breaking News social महाराष्ट्र शेती
Spread the love

चिखर्डे-गोरमाळे रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत बांधकाम विभागाकडे तक्रार

| 8 दिवसांत रस्ता नियमानुसार न केल्यास आंदोलनाचा इशारा

बार्शी | तालुक्यातील ग्रामीण भागात (Barshi Rural Area) विविध ठिकाणी रस्त्यांची कामे (Road works) चालू आहेत. मात्र याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. चिखर्डे-गोरमाळे रस्त्याच्या (Chikharde-Gormale Road) कामाच्या दर्जाबाबत देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) तक्रार दाखल करण्यात आली आहे. गोरमाळेचे शेतकरी दत्तात्रय शिंदे (Farmer Dattatray Shinde) यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले आहे. 8 दिवसात नियमानुसार रस्ता न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा (Warning of Agitation) निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही याची दखल घेण्यात येत नव्हती. याने अपघाताचे देखील प्रमाण वाढले आहे. उशिरा का होईना प्रशासनाला जाग आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराकडून मात्र रस्त्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली वरवरची मलमपट्टी केली जात असल्याचे उघडकीस येत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी प्राप्त होत आहेत.
चिखर्डे-गोरमाळे रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत गोरमाळेचे शेतकरी दत्तात्रय शिंदे यांनी ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले कि, माझ्या शेताच्या जवळून चिखर्डे-गोरमाळे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु आहे. जवळपास 3 किमी पर्यंत रस्त्याची डागडुजी केली आहे. मात्र कामाचा दर्जा हा निकृष्ट प्रकारचा आहे. त्यामुळे मी काही दिवस हे काम अडवून देखील धरले होते. कारण आतापर्यंत झालेले काम व्यवस्थित करण्यात आले नाही. याबाबत संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांनी आश्वस्त केले कि इथून पुढे चांगले काम केले जाईल. मात्र माझी मागणी मागील रस्त्याबाबत देखील आहे. त्यामुळे रस्ता उकरून नियमाप्रमाणे काम करण्याची मागणी मी केली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देखील देण्यात आले आहे. यामध्ये 8 दिवसांत रस्ता व्यवस्थित न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
चिखर्डे-गोरमाळे रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे. याची तक्रार मी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. आतापर्यंत झालेला रस्ता उकरून व्यवस्थित करून देण्याची आणि या पुढील रस्ता देखील नियमानुसार करण्याची मागणी केली आहे. अन्यथा 8 दिवसांत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
दत्तात्रय शिंदे, शेतकरी, गोरमाळे