kasbapeth Bypoll | कसबा पेठ पोटनिवडणूक | अखेर ठरलं | रासने विरुद्ध धंगेकर 

Categories
Breaking News PMC Political पुणे संपादकीय
Spread the love

कसबा पेठ पोटनिवडणूक | अखेर ठरलं | रासने विरुद्ध धंगेकर

पुणे | कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी अखेर काँग्रेस ने आपला उमेदवार जाहीर केला आहे. रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानुसार आता पोटनिवडणुकीच्या ही लढाई हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर होईल. मुख्य लढत आता हीच असणार आहे. दोन्ही पक्षासाठी ही लढाई प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची असणार आहे.
भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रासने यांना बराच विरोध सुरु झाला होता. टिळक कुटुंबातील एखादा उमेदवार दिला जाईल, अशी सगळ्यांना अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही. त्यामुळे ब्राम्हण समाज नाराज झाल्याची चर्चा आहे. मात्र भाजपचा सर्वे सांगतो कि कसब्यात रासने याना पसंती आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली गेली. मात्र त्यामुळे नाराजी पसरली आहे, हे नक्की. असं असलं तरी भाजपने ही लढाई आपली संघटना म्हणून प्रतिष्ठेची केली आहे. भाजपकडून संदेश गेला आहे कि कसब्यात कमळ निवडून आणायचे आहे. त्यानुसार नाराज कार्यकर्त्या सहित सर्वांनी कमळ निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. किमान आपल्या मोबाईलचे तसे स्टेटस ठेवले आहेत. असं असलं तरीही भाजपचे संघटन मजबूत आहे, हे सर्वच जाणतात. त्यामुळे संघटन म्हणून काम केल्यांनतर भाजपसाठी सोपे काम होणार आहे.
काँग्रेस कडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्यांनतर तसा फारसा कुणाचा विरोध झाला नाही. बागवे पिता पुत्र नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र ते वेगळ्याच कारणासाठी. धंगेकर यांना उमेदवारी दिली जावी, ही महाविकास आघाडीतील सर्वच छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांची भावना होती. नेहमीसारखे धक्के न देता काँग्रेसने ही धंगेकर यांना उमेदवारी दिली. या पोटनिवडणुकीत धंगेकर हे एकदम तगडा उमेदवार मानले जातात. गिरीश बापट यांना देखील धंगेकर यांनी टस्सल दिली होती. पूर्वी ते मनसेत होते. ते कुठेही असले तरी लोकांच्या कामासाठी ते नेहमीच धावून जातात, असे म्हटले जाते. जनमानसात त्यांची प्रतिमा ‘आपला माणूस’ अशी आहे. त्याचा फायदा काँग्रेस आणि महाविकास आघाडीला होणार आहे. कसंही असो धंगेकर उमेदवार असल्यामुळे निवडणुकीत रंगत येणार आहे. याबाबत मात्र सगळ्यांचे एकमत आहे.