Dhol Tasha | MP Girish Bapat | Anurag Thakur | खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे केली ‘ही’ मागणी

Categories
Breaking News Political Sport देश/विदेश पुणे महाराष्ट्र
Spread the love

ढोल ताशा खेळाला इतर खेळाप्रमाणे शासन मान्यता द्या

| खासदार गिरीश बापट यांची केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडे मागणी

पुणे  : ढोल ताशा खेळाला इतर खेळाप्रमाणे शासन मान्यता द्यावी अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री  अनुराग ठाकूर हे काल पुणे दौऱ्यावर आले असता त्यांना केली.

यावेळी खासदार बापट यांनी सांगितले महाराष्ट्र राज्यामध्ये ढोल-ताशा या खेळाला आगळे महत्त्व आहे. जसा पंजाबचा भांगडा, गुजरातचा गरबा, तसा महाराष्ट्राचा ढोल-ताशा कोणताही उत्सव असो वा देवकार्य, मंगलकार्य वा मिरवणूक त्यासमोर ढोल-ताशांचे वादन हे अपरिहार्यच अगदी कुस्तीच्या मैदानात देखील पैलवान मंडळींमध्ये जोश निर्माण करण्यासाठी हलगीचे वादन केले जाते. पुरातन काळापासून ढोल-ताशा हे रणवाद्य तसेच मंगलवाद्य म्हणून अनेक ठिकाणी त्याचे वादन केले जाते. सैन्यांमध्ये जोश आणि उत्साह निर्माण करण्याची ताकद या वाद्यांमध्ये आहे. तसेच स्थानिक उत्सवामध्ये देवादिकांच्या मिरवणुकांमध्ये मंगलमय वातावरण निर्माण करण्यासाठी ढोल-ताशाचे वादन केले जाते. ढोल-ताशा या वाद्यांना पुरातन संदर्भ आहेत. ढोल, ताशा, शिंग, दुंदुभी वाद्य ऐतिहासिक कालापासून वापरात आहेत. याचा शोध घ्यायचा झाल्यास नेमका निर्मितीचा काळ निश्चित करता येत नाही.
आपल्या सर्व देवादिकांच्या हातामध्ये शस्त्रा बरोबर वाद्यांचा देखील समावेश आहे. सरस्वतीची विना, कृष्णाचा शंख, आणि बासरी, शंकराचा डमरू अशी उदाहरणे आपल्या समोर आहेत. ढोल-ताशा ही लोकवाद्य या प्रकारात मोडतात. महाराष्ट्रात घराघरात मंगलकार्य असेल तर तसा पुरणा-वरणाचा नैवद्य दाखवला जातो. तव्दत मंगल कार्यासाठी ढोल-ताशांचे वादन केले जाते. संपूर्ण महाराष्ट्रात ढोल-ताशांची माहिती असे नाही, तर आता गुजरात, गोवा, सेलवासा, आंध्र प्रदेश अशा राज्यातून देखील ढोल ताशा खेळाचा प्रकार आणि प्रसार होतो आहे. आपल्या देशाचे कर्तुत्ववान पंतप्रधान माननीय नरेंद्र जी मोदी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले असता, त्यांचे स्वागत देखील ढोल-ताशा खेळाने झाले आणि माननीय पंतप्रधानांनी स्वतः ढोल वादनाचा आनंद घेतला.

2019 साली अमेरिकेमध्ये डल्लास येथे BMM Convocation ढोल ताशा खेळांची स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये सुमारे ६ संघातील १०० वादकांनी सहभाग घेतला होता. त्याचे परीक्षण पुण्यातून ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्रातर्फे करण्यात आले होते. आता या ढोल ताशा खेळाची व्याप्ती केवळ भारतापुरती मर्यादित राहिली नसून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या ठिकाणी देखील लोकप्रिय होत आहे. पुण्यनगरीत सुमारे २०० ढोल-ताशांचे संघ असून सुमारे 25००० वादक आपली वादन कला याद्वारे लोकांपुढे सादर करतात. नाशिक, मुंबई, ठाणे, अमरावती, नागपूर, कोल्हापूर येथील ढोल-ताशा खेळ विशेष प्रसिद्ध आहे.

ढोल-ताशां खेळाला अद्यापि खेळ म्हणून राज मान्यता मिळाली नाही ही सर्व वादकांची खंत आहे. हे संपूर्ण चराचरात मंगलमांगल्य निर्माण करण्याचे काम ही ढोल-ताशा खेळाची वादक मंडळी आपल्या वादनातून करत असतात. अनेक समारंभात जाण निर्माण करण्याची ताकद या खेळा आहे. ढोल-ताशा वादनासाठी झांजा, ध्वज, लेझीम वाचविण्यासाठी प्रचंड ताकदीची उत्साहाची आणि एनर्जीची आवश्यकता असते. ७ ते ८ तास न थांबता, न थकता आणि घामाने वादन करणे हे कुठल्याही खेळाशी म्हणजेच क्रिकेट, फुटबॉल, हॉकी खेळातील दमणुकीशी साधणारे आहे. याव्यतिरिक्त अबालवृद्धांना या ढोल-ताशा वादनाने मिळणारा आनंद अवर्णनीय आहे. काही मंडळी वादनाचा आनंद घेतात, काही मंडळी या तालावर थिरकण्याचा, नाचण्याचा आनंद घेतात, तर उर्वरित मंडळी यातून निर्माण होणाऱ्या कर्णमधुर लोकसंगीताचा आनंद घेतात. यामुळे महाराष्ट्रातील लोकप्रिय अशा लोक संगीताशी संबंधित ढोल-ताशा या खेळास खेळ म्हणून सरकार दरबारी मान्यता मिळावी, अशी विनंती खासदार बापट यांनी केली.

Leave a Reply