NCP pune Against Inflation | राष्ट्रवादी काँग्रेसने भरवला मोदी महागाई बाजार

Categories
Breaking News Political पुणे
Spread the love

महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोदी महागाई बाजार उभारुन आंदोलन

पुणे : देशात महागाईने उच्चांक गाठला असून यावर्षी महागाईचा उच्चांक मोडीत काढला असून या आठवड्यात घाऊक महागाई दर १५.८८ वर गेला आहे. हा गेल्या ९ वर्षांतील उच्चांक असून केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही कठिण परिस्थिती देशावर ओढावली आहे. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यात मोदी महागाई बाजार भरविण्यात आला होता.

पुणे शहरात अनेक ठिकाणी आठवडे बाजार भरतात. याशिवाय काही बाजारपेठा देखील सुरू झाल्या आहेत. पण आज पुण्यातील जंगली महाराज रोड परिसरात उभारण्यात आलेल्या भाजीपाला , फळे , फुलविक्रेता ,पुस्तक विक्रेता , शालेय साहीत्य , किराणा, चहा , वडापाव विक्रेता याचबरोबर मासळी बाजारासह “मोदी महागाई बाजार पेठची” चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. यामध्ये बाजारपेठ उभी करून महागाई विरोधात आगळे वेगळे आंदोलन करण्यात आले. मोदीजी, महागाईचा बाजार उठवा नाहीतर जनता तुमचा बाजार उठविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या आंदोलनातून देण्यात आला.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोदी सरकारच्यावतीने अत्यावश्यक सेवे सह जीवनावश्यक वस्तूत देखील मोठ्या प्रमाणत वाढ करण्यात आली आहे.याचा फटका सर्वसामान्य जनतेसह किरकोळ विक्रेत्यांना देखील बसला आहे.जनता दिवसेंदिवस महागाईच्या ओझ्याखाली पिचली जात असून आता व्यापारी आणि विक्रेत्यांवरही महागाईची ही संक्रांत ओढावली आहे.
लक्षात घेण्याची बाब म्हणजे मे महिन्यात भाजीपाल्याच्या किमतीचा दर ५६.३६ टक्के, तर गव्हाच्या दर १०.५५ टक्के आणि अंडी, मांस आणि मासळीच्या भाववाढीचा दर ७.७८ टक्के होता. तर उत्पादित उत्पादने आणि तेलबियांमध्ये ती अनुक्रमे १०.११ टक्के आणि ७.८ टक्के होता. कच्च्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूच्या महागाईचा दर ७९.५० टक्के होता. मे महिन्यात किरकोळ महागाई दर ७.४ टक्के होता.

केंद्रातील मोदी सरकारला महागाईवर अंकुश ठेवण्यात सपशेल अपयश आले असून याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे व प्रदीप देशमुख , उदय महाले, वनराज आंदेकर, अजिंक्य पालकर, वैशाली थोपटे, सदानंद शेट्टी , मूणालीनी वाणी मोनाली गोडसे, राखी इंगळे, रोहन पायगुडे, सुशांत साबळे,सौरभ गुंजाळ, लक्ष्मण आरडे , रूपाली ठोंबरे , मनिषा होले ,योगेश पवार ,दिलशाद अत्तार हे पदाधिकारी व मोठ्या प्रमाणावर नागरीकही उपस्थीत होते