Pune Rain | BJP Vs NCP | राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या गैरकारभाराची पुणेकरांना शिक्षा | भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा आरोप

Categories
Breaking News PMC Political social पुणे
Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या गैरकारभाराची पुणेकरांना शिक्षा

| भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा आरोप

मुळा-मुठा नद्यांना 58 वेगवेगळ्या भागांत मिळणार्‍या ओढे-नाल्यांपैकी 32 ठिकाणच्या ओढे-नाल्यांचे प्रवाह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पन्नास वर्षांच्या सत्ताकाळात बुजविण्यात आले. त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या या गैरकारभाराची शिक्षा पुणेकरांना भोगावी लागत असून, शहरात पावसाच्या अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे, असा आरोप भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला.

काल झालेल्या अतिवृष्टीमुळे शहराच्या विविध भागांतील रस्त्यांना ओढ्या-नाल्यांचे स्वरूप आले होते, वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. घरांमध्ये आणि मोठमोठ्या इमारतींमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची गैरसोय झाली. याबाबत चर्चा करण्यासाठी मुळीक यांच्या नेतृत्वाखाली शहर भाजपच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. त्यानंतर मुळीक पत्रकारांशी बोलत होते. सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक पोटे, योगेश मुळीक, धनंजय जाधव, रवी साळेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुळीक म्हणाले, “14 मार्च 2022 रोजी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने महापालिकेत प्रशासक म्हणून आयुक्तांची नियुक्ती केली. महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपला बदनाम करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रशासकावर दबाव आणून पावसाळापूर्व कामे रोखून धरली. ही कामे वेळेत पूर्ण करावीत यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने वारंवार आयुक्तांच्या भेटी घेतल्या आणि सूचना केल्या. परंतु महाविकास आघाडी सरकारने केलेल्या राजकारणामुळे पुणेकरांना पूरसदृश्य परिस्थितीमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.”

मुळीक म्हणाले, “मेट्रो, स्मार्ट सिटी, समान पाणीपुरवठा अशी विविध विकासकामे शहरात सुरू आहेत. या कामांमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे का? त्याची माहिती घेण्यासाठी स्वतंत्र संस्थेची नियुक्ती करावी. आपत्कालीन कक्षामधील कर्मचार्‍यांची संख्या वाढवावी, या कक्षासाठी पूर्णवेळ अधिकारी उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. त्याला मान्यता देऊन तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी प्रशासनाला दिले.”