Voter List | मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र
Spread the love

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित

पुणे|  भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

पूर्व पुनरिक्षण उपक्रमांतर्गत ४ ऑगस्ट ते २४ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत मतदान केंद्राचे सूसुत्रीकरण, प्रमाणिकरण करणे, दुबार, समान नोंदी, एका पेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा, विभाग/भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करुन मतदान केंद्राच्या सीमांच्या पूनर्रचना करून मतदान केंद्राच्या यादीला मान्यता, आणि तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबद्ध योजना आखण्यात येईल. २५ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित प्रारुप यादी तयार करण्यात येईल.

एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ आहे. दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीमध्ये राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या दोन शनिवार आणि रविवारी विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहे. तर २६ डिसेंबर २०२२ पर्यंत दावे व हरकती निकालात काढले जाणार आहेत. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी २०२३ रोजी करण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी नियम १९६० मध्ये केलेल्या सुधारणेनुसार १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै व १ ऑक्टोबर असे अर्हता दिनांक उपलब्ध झाले आहेत. प्रारुप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर १ जानेवारी या अर्हता दिनांकावर नोंदणीसाठी पात्र असलेले अर्जदार आणि त्यापुढील १ एप्रिल, १ जुलै, १ ऑक्टोबर या अर्हता दिनांकावर नोंदणीसाठी पात्र असलेले अर्जदार आगाऊ अर्ज सादर करु शकतील. १ जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारित पात्र मतदारांच्या अर्जावर वरील नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार कार्यवाही करुन अंतिम प्रकाशनासह मतदार यादी अद्यावत करण्यात येईल.

पुढील तीन अर्हता दिनांकावर विशेष पुनरिक्षण कार्यक्रम कालावधीत आणि निरंतर पुनरिक्षणच्या काळामध्ये आगाऊ प्राप्त झालेल्या अर्जावर निरंतर पुनरिक्षणच्या काळात मतदार नोंदणी अधिकारी यांच्याद्वारा संबंधित तिमाहीमध्ये शक्यतो तिमाहीच्या पहिल्या महिन्यात कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली आहे.