Compensationb to farmers | सततच्या पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास मिळणार भरपाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेती क्षेत्रासाठी जाहीर केले महत्वपूर्ण निर्णय

Categories
Breaking News Political महाराष्ट्र शेती

सततच्या पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास मिळणार भरपाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेती क्षेत्रासाठी जाहीर केले महत्वपूर्ण निर्णय

मुंबई| सततच्या पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार असून, नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणारी मदतीची रक्कम बाधितांना देण्यासाठी होणारा विलंब कमी टाळण्यासाठी यापुढे पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

सन २०२२ च्या माहे जुलै व ऑगस्ट महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टीबाबत विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेत सर्वश्री विरोधी पक्ष नेते अजित पवार, अशोक चव्हाण, समीर कुणावार, संजय गायकवाड, भास्करराव जाधव, छगन भुजबळ, नाना पटोले, बच्चू कडू, राजेश पवार, चंद्रकांत नवघरे, सुरेश वरपूडकर, कैलास पाटील, धर्मरावबाबा आत्राम, प्राजक्त तनपुरे, ॲड. आशिष जयस्वाल, नरेंद्र भोंडे, राजेश टोपे, किशोर जोरगेवार, हिरामण खोसकर, हरीश पिंपळे, अनिल पाटील यासह मान्यवर सदस्यांनी आपली मत मांडून विविध मागण्या मांडल्या होत्या.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, अतिवृष्टीमुळे (६५ मिमि पेक्षा जास्त) नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देण्यात येते. मात्र, आजपर्यंत मागणी लक्षात घेता, सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल.

पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर
नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणारी मदतीची रक्कम बाधितांना देण्यासाठी होणारा विलंब कमी करण्यासाठी यापुढे पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करण्यात येईल. लवकरच मोबाईल अॅप्लीकेशनद्वारे ई-पंचनामा करणे, त्यासाठी आवश्यक निधीची मागणी करणे व संबंधितांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट पैसे जमा करणे अशा प्रकारची प्रणाली नव्याने विकसित करण्यात येत आहे. यामध्ये रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा (सॅटेलाइट इमेज) वापर करण्यात येणार आहे. तसेच ड्रोन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येणार असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.

किडीमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीसाठी देखील मदत
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, गोगलगायी, यलो मोझॅक यासारख्या कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊन होणारे नुकसान याबाबतही पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून अशाप्रकारच्या किडीमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीसाठी देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल. झालेल्या पावसाचे व इतर हवामान विषयक बाबीचे मोजमाप करण्यासाठी यापूर्वी प्रत्येक २४०० महसूल मंडळात एक स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आलेले आहे. ही संख्या अपुरी असल्यामुळे स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढविण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळेल व विमा दावे वेगाने निकाली काढता येतील. पीक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीला सूचना देण्यात येतात. तसेच कृषि कार्यालय, तहसिल कार्यालय किंवा ज्या बँकेत विमा भरलेला आहे अशा ठिकाणी नुकसानीची सूचना/अर्ज स्वीकारले जातील व हे अर्ज ग्राह्य धरले जातील अशा लेखी सूचना विमा कंपन्यांना देण्यात येतील.नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५०,०००/- (रुपये पन्नास हजार मात्र) प्रोत्साहन अनुदान वाटप सप्टेंबर महिन्यात सुरु केले जाईल, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.

आपत्तीप्रवण क्षेत्राच्या पुनर्वसनाबाबत लवकरच धोरण
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, राज्यात ज्या ज्या क्षेत्रांमध्ये दरड कोसळणे किंवा वारंवार पूर येणे इत्यादी आपत्तीप्रवण क्षेत्र आहे तिथे लोकांना सतत धोकादायक स्थितीमध्ये रहावे लागते. अशा नागरिकांच्या पुनर्वसनाचे कोणतेही धोरण नाही. अशा क्षेत्राच्या पुनर्वसनाबाबत लवकरच धोरण निश्चित करण्यात येत आहे. यामुळे होणारी संभाव्य जिवित हानी मोठ्या प्रमाणावर टाळता येईल.

मूल्य साखळी विकसित करणार
डिजिटल शेती अभियानामध्ये बियाणांची ट्रेसेबिलिटी, ब्लॉक चेन मॉडेल, आर्टिफिशियल इन्टलिजन्स, को-ऑपरेटीव्ह सोसायटी व किसान उत्पादक समूहांचे (FPO) संगणकीकरण इत्यादी कार्ये हाती घेतली जातील. यामुळे उच्च दर्जाचे बियाणे व खते शेतकऱ्यांना योग्य दरात मिळून त्यांचे उत्पन्न वाढेल. आधुनिक शेतीमध्ये ड्रोन टेक्नॉलॉजी, नॅनो युरीया, इरिगेशन ऑटोमायझेशन, कंट्रोल कल्टिव्हेशन ह्या टेक्नॉलॉजीच्या वापरास प्रोत्साहन दिले जाईल. पीक विविधीकरणा (Crop Diversification) अंतर्गत “तेलबिया, डाळवर्गीय पिके व फलोत्पादन” यावर विशेष भर देण्यात येऊन मूल्य साखळी विकसित करण्यात येईल. उच्च मूल्य दर्जाची पिके व फलोत्पादक पिके यांना प्रोत्साहन देण्यासाठी इको सिस्टिम तयार केली जाईल. कृषी क्षेत्रामध्ये सुगंधीत व औषधी वनस्पती लागवड व उत्पादन करण्यासाठी त्यांना योग्य त्या सुविधा व केंद्रासमवेत सहकार्य साधण्याचे कार्य प्रभावी पध्दतीने हाती घेतले जाईल. असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वकष कृती आराखडा
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, केंद्राच्या योजनांची सुयोग्य अंमलबजावणी करण्यासाठी सुनियोजित पध्दतीने कार्य केले जाईल. “अॅग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये प्रोजेक्ट मॉनिटरींग युनिट सक्षम करुन जलद गतीने दिशा देण्याचे काम केले जाईल. जैविक शेती व नैसर्गिक शेतीसंदर्भात केंद्राच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील जेणेकरुन आपली शेती विषमुक्त होईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी शेत शिवार ते बाजारपेठेपर्यंत असणारी संपूर्ण दर्जात्मक साखळी तयार करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील. किसान उत्पादक समूहास प्रोत्साहन देण्यासाठी कार्य केले जाईल. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वकष कृती आराखडा शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयाने तयार करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबतचे सर्वंकष धोरण लवकरच जाहीर केले जाईल. असेही श्री.शिंदे म्हणाले.

आपत्ती परिस्थितीत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन काम

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, अतिवृष्टी, पूर परिस्थिती, चक्रीवादळे, अवेळी पाऊस, बेमोसमी पाऊस, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तींना महाराष्ट्र दरवर्षी तोंड देत आहे.पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात आढावा घेण्यात आला. मुंबई व कोकणात मोठ्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात झाली. कार्यभार घेतल्यानंतर राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासंदर्भात बैठक घेतली आणि कोणत्याही परिस्थितीत आपत्तींमध्ये जीवितहानी होणार नाही हे पाहण्याचे, त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करण्याचे निर्देश दिले. सातत्याने दररोज सकाळी विशेषत: कोकणातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे होते आहे. वेगवेगळ्या नद्यांना पूर आले. काही नद्यांचे पाणी इशारा पातळीवरून वाहत होते. राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या (एसडीआरएफ) ११ तुकड्या त्यावेळी तैनात करण्यात आल्या होत्या. तसेच बेस स्टेशनवर ‘एनडीआरएफ’च्या ९ आणि ‘एसडीआरएफ’च्या ४ अशा एकूण १३ तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील चांदूरबाजार आणि मोर्शी येथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. तेथील गावातील लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याच्या कामावरही लक्ष ठेवले. ठाणे जिल्हा आपत्ती निवारण व्यवस्थापनाबाबत बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापन कामांबाबत माहिती घेतली व सूचना केल्या. आपण आणि उपमुख्यमंत्री दोघांनी पूरग्रस्त गडचिरोलीला भेट दिली, पूरग्रस्तांना धीर दिला. दक्षिण गडचिरोलीत भामरागड, अहेरी व सिरोंचा येथे कित्येक रस्ते पावसाच्या पाण्यामुळे बंद होते. खराब हवामानामुळे नागपूर येथून हवाई मार्गाने जाणे व पाहणी करणे शक्य झाले नाही म्हणून रस्ते मार्गाने जावून पाहणी केली.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात अतिवृष्टी, सततचा पाऊस, पूर यामुळे 18 लाख 21 हजार हेक्टर जमीन बाधित झाली आहे. यामध्ये जिरायतीखालील 17 लाख 59 हजार 633, बागायतीखालील 25 हजार 476 ,फळपीक 36 हजार 294 हेक्टर क्षेत्र आहे.आतापर्यंत पूर बाधित 21 हजार व्यक्तींना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यांत आले आहे. मृत जनावरांच्या नुकसानीपोटी रु. 1 कोटी 52 लक्ष इतका निधी देत आहोत. घरे, झोपड्या व गोठ्यांच्या नुकसानीपोटी रु. 4 कोटी 70 लक्ष इतका निधी देत आहोत.शेत जमिन खरडून झालेल्या नुकसानीपोटी रु. 5 कोटी 78 लक्ष इतका निधी देण्यात येत आहे. ठिबक संच, तुषार संचांचे नुकसान राज्यात 212 ठिबक संच आणि 469 तुषार संचांचे नुकसान झाले आहे.केंद्राच्या सूचनेनुसार एखाद्या लाभार्थीस 7 वर्षांनंतरच सूक्ष्म सिंचन घटकाचा लाभ घेता येतो कारण 7 वर्षे हे त्या संचाचे आयुष्य निर्धारित केले आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

शेती पिकांच्या नुकसानीकरिता वाढीव दराने मदत
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, जुलै – 2022 मध्ये शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून (SDRF) सुधारित दराप्रमाणे मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मदत प्रती हेक्टरी वाढीव मदत असून पूर्वी दोन हेक्टर मर्यादेत मदत केली जायची आता ती तीन हेक्टर इतकी वाढवली आहे. आपत्तीमध्ये तत्काळ देण्यात येणारी मदत ही पाच हजार रूपयांवरून १५ हजार रूपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे अवघ्या महिना सव्वा महिन्यात सर्व बाधित क्षेत्रांचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत. कुणीही अतिवृष्टीग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही. मदत वाटपाबाबत एकही तक्रार येता कामा नये अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. एनडीआरएफचे नुकसानीबाबतचे निकष बदलण्याबाबत पंतप्रधान अनुकुल आहेत. त्यांचा शेती आणि शेतकरी हाच प्राधान्याचा विषय असल्याचेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.

VAT on petrol and diesel | पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय | शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निश्चय | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र शेती

शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निश्चय | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

| पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय

मुंबई| शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निश्चय राज्य सरकारने केला असून राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावानंतर अभिनंदनाच्या प्रस्तावावर भाषणाच्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,रायगड पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. या निधीतून हिरकणी गावाचा सर्वांगीण विकास साधला जाईल. केंद्र सरकारने काही दिवसांपुर्वी इंधनावरील कपात केली त्याच धर्तीवर राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.

आगामी कालावधीत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्यात येतील. महाराष्ट्र् राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून साकारत असलेल्या समृध्दी महामार्गातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होवून राज्याच्या विकासाला चालना मिळेल.मुंबईतील मेट्रो प्रकल्पाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल.मेट्रो प्रकल्प गतीने पूर्ण करण्याकडे राज्य शासनाचे प्राधान्य असेल.राज्यातील सर्व प्रलंबित प्रकल्पांच्या कामांनी गती देणार आहोत.तसेच शासनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारे एकांगी निर्णय न घेता सर्वांच्या हितासाठी शासन प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी दिली.

राज्य शासन सर्वांना बरोबर घेवून सर्वधर्मीयांना समन्यायाने वागणूक देणार असून सर्वांच्या विकासासाठी हे शासन काम करेल.राज्यातील सर्व प्रलंबित प्रकल्पांची कामे मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचा सच्चा सैनिक म्हणून मी काम करणार आहे.जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी तत्काळ निर्णय घेवून सर्वसामान्यांची कामे लवकर होण्यासाठी आमचे सरकार भर देणार असून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहोत.

Monsoon | यंदा पाऊस चांगला | पण जून मध्ये पेरणीसाठी घाई करू नका

Categories
Breaking News social देश/विदेश महाराष्ट्र शेती

यंदा पाऊस चांगला | पण जून मध्ये पेरणीसाठी घाई करू नका

यंदा वाऱ्याचा वेग कमी राहिल्याने, जूनमध्ये पावसात खंड राहणार असून, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असा सल्ला हवामानतज्ज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी दिला आहे. मात्र, त्यानंतर चांगला पाऊस असून, संपूर्ण मान्सून काळात यंदा पाऊस १०१ टक्के होणार आहे, तसेच दुष्काळी पट्ट्यात चांगला पाऊस होणार, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्याचा अंदाज जाहीर केला. त्यात देशात यंदा १०३ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे, तसेच जूनमध्ये राज्याच्या दक्षिण कोकण, मुंबई, तसेच पश्चिम विदर्भाच्या काही जिल्ह्यांत कमी पावसाची शक्यता आहे. त्यानुसार, साबळे यांनी त्यांच्या मॉडेलचा अंदाज जाहीर केला, त्यात राज्यात १०१ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यासाठी त्यांनी राज्यातील ८४ ठिकाणी नोंदविण्यात आलेल्या कमाल व किमान तापमान सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग व सूर्यप्रकाशाचा कालावाधी या घटकांचा अभ्यास केला. त्यानुसार, राज्यात १०१ टक्के पावसाचा शक्यता त्यांनी वर्तविली आहे. मात्र, यंदा वाऱ्याचा ताशी वेग कमी आढळल्याने जून महिन्यात पावसात खंड पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानंतर, जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पेरणीची घाई करू नये

जूनमध्ये पावसात खंड पडणार असल्याने, शेतकऱ्यांनी जमिनीत ६५ मिलिमीटर म्हणजेच अडीच ते तीन फूट ओलावा असल्याशिवाय पेरणीला घाई करू नये, असा सल्ला साबळे यांनी दिला आहे. त्यामुळे खान्देश, विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सिंचनाची सोय असल्याशिवाय कापूस व सोयाबीनची लागवड करण्याची घाई करू नये. जिरायती शेतकऱ्यांनी कडधान्य पिकांची लागवड करावी, असेही ते म्हणाले.

हवामान बदलाचा परिणाम

राज्यात गेल्या काही वर्षांपासून जूनमध्ये पावसात खंड पडत आहे. त्याचा परिणाम पीक उत्पादनावर होत आहे. गेली दोन वर्षे सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत महापूर आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रही आता हवामान बदलाला प्रवण राज्य झाले आहे. त्या दृष्टीने पीक बदल करायला हवा व नियोजन करावे, असेही ते म्हणाले.

PM Kisan | EKYC | ‘पीएम-किसान’ योजनेअंतर्गत ‘ई-केवायसी’ करण्यास ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ

Categories
Breaking News देश/विदेश महाराष्ट्र शेती

‘पीएम-किसान’ योजनेअंतर्गत ‘ई-केवायसी’ करण्यास ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ

पुणे –  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाचा लाभ सहजरित्या अदा करता यावा म्हणून केंद्र शासनाने  योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांची ओळख  पडताळणी (ई-केवायसी) पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने  ३१ जुलै २०२२ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी  योजनेअंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) २ हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे ३ हप्त्यात ६००० रुपये प्रती वर्षी लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत आहे. आज अखेर या योजने अंतर्गत राज्यातील १ कोटी ९ लाख ४६ हजार  लाभार्थ्यांना एकूण १८ हजार १५१ कोटी ७० लाख रुपये  लाभ अदा करण्यात आलेला आहे.

लाभार्थ्यास स्वतः पीएम किसान पोर्टलवर https://pmkisan.gov.in/ या लिंक आधारे किंवा सामाईक सुविधा केंद्रामार्फत ई-केवायसी पडताळणी करण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या दोनपैकी स्वत:च्या सोईनुसार एका सुविधेच्या आधारे लाभार्थ्यास त्याची ई-केवायसी पडताळणी करता येईल. यापूर्वी ई-केवायसी ३१ मे २०२२ पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

पीएम किसान पोर्टलवरील लिंकद्वारे  लाभार्थ्यास त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न केलेल्या मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीच्या आधारे स्वत:ची ई-केवायसी पडताळणी करता येईल. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यासाठी सामाईक सुविधा केंद्राकडून रक्कम १५ रुपये प्रती लाभार्थी शुल्क आकारण्यात  येईल.

राज्यात २६ मे २०२२ अखेर एकुण ५२ लाख ८२ हजार लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरीत लाभार्थ्यांनी स्वत: अथवा सामाईक सुविधा केंद्रच्या माध्यमातून त्यांची ई-केवायसी पडताळणी केंद्र शासनाने दिलेल्या ३१ जुलै २०२२ च्या मुदतीपूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन उपआयुक्त (कृषि गणना) तथा पथक प्रमुख, पी.एम.किसान विनयकुमार आवटे यांनी केले आहे.