journalist Nikhil Wagle | पत्रकारितेचे लोकशाहीकरण करण्यात डिजिटल माध्यमाचा महत्वाचा हात | ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांचे मत 

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

पत्रकारितेचे लोकशाहीकरण करण्यात डिजिटल माध्यमाचा महत्वाचा हात

| ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांचे मत

पुणे – पत्रकारितेचे लोकशाहीकरण करण्यात डिजिटल माध्यमाचा महत्वाचा हात आहे. गोदी मीडियाने पत्रकारितेचा घात केला आहे. पत्रकारितेला या गोदी मीडियापासून वाचविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी पुन्हा एकदा एल्गार करण्याची गरज निर्माण झाली आहे. याउलट डिजिटल माध्यमांमुळे पत्रकारितेचे लोकशाहीकरण होत आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी  व्यक्त केले. दिवंगत ज्येष्ठ पत्रकार वरुणराज भिडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे आज वागळे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
त्यावेळी ते बोलत होते.
 यावेळी पत्रकार वरुणराज भिडे मित्र मंडळाचे अध्यक्ष उल्हास पवार, पुरस्कारार्थी सकाळच्या पुणे आवृत्तीचे सहयोगी संपादक सुरेंद्र पाटसकर, ‘एबीपी माझा’चे अभिजित कारंडे, पुढारीच्या बातमीदार सुषमा नेहरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. वागळे पुढे म्हणाले, ‘‘मराठी पत्रकारिता बदलत आहे. ही पत्रकारिता आता उच्चवर्णियांपुरती मर्यादित राहिली नसून, ती आता बहुजनांकडे सरकत आहे. पत्रकारिता म्हणजे केवळ मुद्रित (प्रिंट) नाही.आता दूरदर्शन (टी.व्ही.), डिजिटल पत्रकारिता आहे. त्यामुळे सध्याच्या काळातील पत्रकारिता ही मल्टिमीडिया झाली आहे. त्यामुळे ही सर्व माध्यमे ही एकमेकांशी पूरक आहेत. सध्या डिजिटल माध्यमांचे लोकशाहीकरण होत आहे.

 

त्यामुळे डिजिटल पत्रकारितेमुळे ट्रोलिंग होत असले तरी ट्रोलिंग हा गाळ आहे. अगदी सुरवातीच्या काळात वाहत्या पाण्यातूनसुद्धा असा गाळ येतच असतो. आजची पत्रकारिता हा गोदी मीडिया झाला आहे. या गोदी मीडियानेच पत्रकारितेचा मोठा घात केला आहे. माध्यम संस्था या जाहिरातीच्या आमिषाने विकल्या जात आहेत. काही पत्रकार सत्ताधाऱ्यांच्या आमिषाला बळी पडून पत्रकारितेचे स्वातंत्र्य गमावून बसले आहेत. यामुळे सध्याची पत्रकारिता अर्धमेली झाली आहे. यासाठी आपणच जबाबदार आहोत.’’

प्रास्ताविक उल्हास पवार यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी पुरस्कारांमागची भूमिका विशद केली. पुरस्कारार्थी चैत्राली चांदोरकर यांच्या अनुपस्थितीत पती नीलेश यांनी पुरस्कार स्वीकारला. पुरस्कारार्थी पाटसकर, कारंडे, नेहरकर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. शैलेश गुजर आणि अंकुश काकडे यांनी सूत्रसंचालन केले. सूर्यकांत पाठक यांनी आभार मानले. यावेळी विश्‍वस्त वि.अ. जोशी,डॉ. सतीश देसाई, चारुचंद्र भिडे, प्रकाश भोंडे आदी उपस्थित होते.
विद्यापीठात वरुणराज भिडे अध्यासन ः डॉ. गोऱ्हे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पत्रकार वरुणराज भिडे यांच्या नावाने अध्यासन असावे, अशी इच्छा होती. यानुसार हे अध्यासन करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्र दिले होते. या पत्रानुसार पाटील यांनी ही मागणी मान्य केली असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना सांगितले.
राज्यात वाचकांचे दबावगट निर्माण व्हावेत’
सध्या पत्रकार आणि संपादकांना स्वातंत्र्य मिळण्याची गरज आहे. यासाठी ज्याप्रमाणे युरोपिय देशांमध्ये जसे वाचकांचे दबावगट आहेत. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातही वाचकांचे दबावगट निर्माण होण्याची गरज आहे. वाचक आणि प्रेक्षक हेसुद्धा माध्यमांचे स्टेक होल्डर (भागधारक) असतात. यामुळे पत्रकारांना स्वातंत्र्य मिळून त्यांना वाचक आणि संविधानाकडे अधिक लक्ष देता येईल, असे मत निखिल वागळे यांनी यावेळी व्यक्त केले.

Dr Kumar Saptarshi | ‘मातुःश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान’ डॉ.कुमार सप्तर्षी यांना प्रदान

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

 

‘मातुःश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान’
डॉ.कुमार सप्तर्षी यांना प्रदान

| इतरांवर मत न लादणं हे डॉ. सप्तर्षी यांचं वैशिष्टय : डॉ.मोहन आगाशे

| लोकांनी सत्यातील रस सोडू नये | डॉ.कुमार सप्तर्षी

पुणे : नांदेड येथील प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या ‘मातुःश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मान ‘ विचारवंत, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, युवक क्रांती दलाचे अध्यक्ष ,ज्येष्ठ लेखक डॉ. कुमार सप्तर्षी यांना प्रदान करण्यात आला . मराठी भाषेतील उत्कृष्ट पुस्तकाकरीता असलेल्या ‘प्रसाद बन वाङ्मय पुरस्कारा’साठी पोपट श्रीराम काळे यांना ‘काजवा’ या आत्मकथनासाठी प्रदान करण्यात आला. प्रत्येकी रुपये ११ हजार रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप होते

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ . मोहन आगाशे यांच्या हस्ते शनिवार ,दि. १ एप्रिल रोजी ,सायंकाळी साडे पाच वाजता कोथरूड येथील गांधी भवनच्या सभागृहात डॉ. कुमार सप्तर्षी आणि पोपट काळे यांना हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठान(नांदेड)च्या वाङ्मय पुरस्कारांचे हे २२ वे वर्ष असून यंदा पहिल्यांदाच पुण्यात हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. खा. सुप्रिया सुळे यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाआधी डॉ. सप्तर्षी यांना शुभेच्छा दिल्या.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन, वाङ्मय पुरस्कार समितीचे निमंत्रक डॉ. सुरेश सावंत आणि अभंग पुस्तकालय चे संजीव कुळकर्णी, डॉ. उर्मिला सप्तर्षी, अन्वर राजन,संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, काँटिनेंटल प्रकाशनच्या अमृता कुलकर्णी, लिज्जतचे मार्गदर्शक सुरेश कोते आदी मान्यवर उपस्थित होते.हा सोहळा गांधी भवनच्या दुस-या मजल्यावरील सभागृहात झाला.

डॉ.मोहन आगाशे म्हणाले, ‘सप्तर्षी यांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ते कुणावरही आपले मत लादत नाहीत, तर एखाद्या विषयाच्या अनुषंगाने त्याच्या सर्व बाजू अभ्यासपूर्ण आणि विश्लेषण करून मांडतात, समजावून सांगतात, त्यामुळेच त्यांचे मुद्दे ऐकणाऱ्याला पटतात, त्यामुळेच त्यांचे कडे अनेक अनुयायी आकर्षित होतात.दर्जेदार साहित्य हाच शिक्षणाचा मुलभूत पाया असतो. पाठ्यपुस्तकापेक्षाही आपल्याला ही जीवनानुभव देणारी पुस्तके अधिक समुद्र, आणि संस्कारक्षम बनवतात.त्यामुळे मला असे वाटते की लेखक आणि कवींच्या संगतीत राहिल्याने आपले जीवन नक्कीच अधिक समृद्ध आणि सृजनशील होवू शकते, अशी संधी ज्याने त्याने शोधली पाहिजे!

डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘लोकशाहीत लोकांना स्वतःच शहाणं व्हावे लागते, हे खरं असलं तरी काही वेळा लोकांना थापा ऐकण्याची इतकी सवय झालेली असते की, अदानी बद्दल केजरीवाल यांनी कितीही प्रश्न विचारले तरी पंतप्रधान मोदी उत्तरच देत नाहीत, उलट वेगवेगळ्या थापाच मारतात! आणि लोकांना त्या ऐकण्यात मजा वाटते. लोकांना सत्य ऐकण्यात रस नाही.मोदी यांना पुन्हा निवडून दिल्यास सत्य बोलणारे तुरुंगात दिसतील आणि खोटं बोलणारे बाहेर किंवा सत्तेत असतील.सत्ता हे भ्रष्टाचाराचं स्थान आहे असं आपल्याला खोटं सांगितलं जातं, खरंतर ज्या आमदारांच्या मनात भ्रष्टाचार करायची भावना असते तेच भ्रष्टाचार करतात, ज्याला इमानदारीने राहायचे तो सत्तेतही इमानदार राहू शकतो.पूर्वी फक्त काही मोजके लोक लेखन करीत असत, आता सोशल मीडिया मुळे ही संधी सर्व सामान्य लोकांना मिळू लागली आहे, ही अमूल्य संधी मानून, सर्वांनी आपल्या मनातील भावना, जीवनानुभव लिहिण्याची आवश्यकता आहे. युरोपीय देशांत अगदी पूर्वीपासून अगदी छोट्या छोट्या अनुभवांवर प्रचंड लेखन होते, आणि त्याची पुस्तकेही प्रकाशित होतात.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सुरेश सावंत यांनी केले तर प्रास्ताविक डॉ.अच्युत बन यांनी केले. संजीव कुलकर्णी यांनी सप्तर्षी कारकिर्दीचा यावेळी आढावा घेतला.

 

Maharashtra Bhushan Award | महाराष्ट्र भूषण पुरस्कार आता २५ लाख रुपयांचा

Categories
Breaking News cultural Political social महाराष्ट्र

महाराष्ट्र भूषण पुरस्कार आता २५ लाख रुपयांचा

| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

महाराष्ट्र शासनाच्यावतीने (Maharashtra Government) देण्यात येणाऱ्या सन्मानदर्शक महाराष्ट्र भूषण पुरस्काराची (Maharashtra Bhushan Award) रक्कम दहा लाखांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. तसेच हा पुरस्कार नव्या स्वरुपात, आणखी दिमाखदार ठरावा यासाठी प्रय़त्न व्हावेत असा निर्णय घेण्यात आला.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या अनुषंगाने बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच पुरस्कार समितीचे सदस्य ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ विधीज्ज्ञ अँड. उज्ज्वल निकम, प्रा. शशिकला वंजारी, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत आदी दृकश्राव्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

बैठकीत पुरस्काराच्या स्वरुपाबाबत तपशीलवार चर्चा झाली. पुरस्कारासाठी सुमारे २७ नावांचा प्रस्ताव सरकारकडे आला होती, त्याबाबतही चर्चा झाली. काहींनी आणखी नवी नावेही सुचविली. त्यांचाही नव्याने विचार करण्याच ठरले. तसेच पुरस्कारच्या रक्कमेत भरीव वाढ करण्याच्या सूचनेवरही चर्चा झाली. आतापर्यंत पुरस्कारात दहा लाख रुपये देण्यात येत होते. या पुरस्काराच्या रक्कमेत वाढ करून ती २५ लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा पुरस्कार आणखी दिमाखदार ठरावा, यासाठी नव्या स्वरुपातील नियमावली निश्चित करण्यात यावी असेही ठरले. महाराष्ट्रात अनेक कर्तबगार व्यक्तिमत्व आहेत. अनेकांनी विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. अशा अनेक व्यक्तिमत्वांच्या या पुरस्कारासाठी विचार व्हावा. याकरिता सर्वंकष अशी नियमावली करण्याचे निर्देश देण्यात आले. (Maharashtra Bhushan Award)