Prashant Jagtap | PMC Election 2022 | कारभार कसा करू नये, याचे उत्तम उदाहरण म्हणजे भाजप 

Categories
Breaking News PMC Political पुणे

कारभार कसा करू नये, याचे उत्तम उदाहरण म्हणजे भाजप

: राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची टीका

पुणे : २०१७ ते २०२२ या पाच वर्षांत महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाचा गैरकारभार आम्ही वेळोवेळी चव्हाट्यावर आणला. विविध माध्यमांतून पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या भाजपचा आम्ही विविध आंदोलनांतून पर्दाफाश केला. या पाच वर्षांत कारभार कसा करू नये, याचे उत्तम उदाहरण पुणेकरांनी भाजपच्या कारभारातून पाहिले आहे. अशी टीका राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.

जगताप म्हणाले,  पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२२ साठीची अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर आपण ज्या प्रभाग आरक्षणांची वाट पाहात होतो, ते आरक्षण मंगळवार, दि. ३१ मे २०२२ रोजी जाहीर झाले. राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक शाखेने पुणे महानगरपालिकेसह राज्यातील १४ महानगरपालिकांचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर केले आहे. या सोडतीचे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पुणे शहराध्यक्ष या नात्याने स्वागत करतो.

पुणे महानगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सदस्य महापौरपदी विराजमान व्हावा, यासाठी मागील काही महिन्यांपासून आम्ही सर्व सहकारी व पदाधिकारी जिद्दीने कार्यरत आहोत. २०१७ ते २०२२ या पाच वर्षांत महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाचा गैरकारभार आम्ही वेळोवेळी चव्हाट्यावर आणला. विविध माध्यमांतून पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या भाजपचा आम्ही विविध आंदोलनांतून पर्दाफाश केला. या पाच वर्षांत कारभार कसा करू नये, याचे उत्तम उदाहरण पुणेकरांनी भाजपच्या कारभारातून पाहिले आहे. त्यामुळे, या पाच वर्षांत काहीही ठोस कामगिरी करता न आलेला आणि आत्मविश्वास गमावलेला भाजप आमच्याविरोधात निवडणुकीत असणार आहे. या निवडणुकीत तमाम पुणेकरांच्या आशीर्वादाने व सहकार्याने आम्ही निश्चितच चांगली कामगिरी करू शकू, असा विश्वास आहे.

प्रभागनिहाय जे आरक्षण जाहीर झाले आहेत, त्यानुसार सक्षम व ताकदीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे निश्चितच जड आहे. पक्षाचे उत्तम संघटन व आमचे मार्गदर्शक, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचे नेतृत्व यांमुळे या महानगरपालिका निवडणुकीनंतर पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच महापौर विराजमान होईल, अशी ग्वाही मी शहराध्यक्ष या नात्याने देतो. असे ही जगताप म्हणाले.

Rajya sabha Election | राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा | महाराष्ट्रातून या दोन नेत्यांना संधी

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा

: महाराष्ट्रातून पीयूष गोयल, अनिल बोंडे यांना संधी

नवी दिल्ली – पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये भाजप कडून महाराष्ट्रातील दोन उमेदवारांच्या नावांचीही घोषणा करण्यात आली आहे. त्यामधील एक नाव हे सध्या केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेल्या पीयूष गोयल यांचे आहे. तर दुसरे उमेदवार म्हणून डॉ. अनिल बोन्डे  यांच्या नावाची घोषणा झाली आहे.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल हे महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले होते. दरम्यान, यावेळी त्यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. तर भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेसाठी दुसरे उमेदवार म्हणून डॉ. अनिल बोन्डे नावाची घोषणा केली आहे. अनिल बोंडे हे फडवीस सरकारमध्ये मंत्री होते. तसेच गेल्या काही काळापासून ते राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत.

Sanjay Raut Vs Devendra Fadanvis | संभाजीराजे छत्रपती उमेदवारीवरून राऊत-फडणवीस आमने सामने 

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

संभाजीराजे छत्रपती उमेदवारीवरून राऊत-फडणवीस आमने सामने

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही असा आरोप केला होता. त्यावर श्रीमंत शाहू महाराज यांनी राज्यसभा निवडणूक लढवणे हा संभाजीराजेंचा व्यक्तिगत निर्णय होता. त्यात छत्रपती घराण्याचा अपमान होण्याचा मुद्दा येत नाही असं स्पष्ट मत मांडल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. यानंतर पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी किडक्या डोक्याच्या लोकांनी महाराजांना स्क्रिप्ट तयार करुन दिल्याचा आऱोप केला आहे. त्यांच्या या आरोपाला शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे.

संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर असून यावेळी ते शाहू महाराजांच्या भेटीसाठी ते न्यू पॅलेसमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत संभाजीराजेंच्या जागी उमेदवारी मिळालेले संजय पवारदेखील उपस्थित होते. या भेटीदरम्यान तसंच नंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे आणि शाहू महाराजांमध्ये फोनवर चर्चा झाली असून कोल्हापूरला आपण भेटीला येऊ असं आश्वासन त्यांनी दिल्याचं सांगितलं आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “मी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो. मी बऱ्याच वर्षांनी आज कोल्हापुरात आलो. उद्धव ठाकरेंनी सकाळी मला फोन करुन कोल्हापुरात आहात तर महाराजांचे आशीर्वाद घ्या आणि मलाही त्यांच्याशी बोलायचं आहे असं सांगितलं. ठाकरे कुटुंब आणि महाराजांचं एक नातं आहे. याठिकाणी उद्धव ठाकरे, बाळासाहेब आले होते. उद्धव ठाकरेंनी महाराजांना फोनवर मी स्वत: कोल्हापुरात येईन असं सांगितलं आहे. महाराष्ट्रातील आमच्या सामाजिक कार्यात आपल्या शुभेच्छा, आशीर्वाद राहू देत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली”.

पुढे ते म्हणाले की, “आम्ही इथे एका आत्मीयतेने आलो आहोत. वयाने आम्ही त्यांच्यापेक्षा फार लहान आहोत. पण या घराण्याविषयी, कुटुंबाविषयी, शाहू महाराजांविषयी प्रबोधनकारांपासून एक नातं आहे, त्या नात्यानं आम्ही इथे येतो. याच्यात कोणतंही राजकारण नाही एवढंच सांगतो”.

भेटीनंतर बाहेर आल्यानंतर संजय राऊतांना फडणीवसांनी केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, “शाहू महाराजांना कोण चुकीची माहिती देणार? छत्रपती आहेत ते..छत्रपतींचा असा अपमान करु नका. चुकीच्या माहितीवर ते बोलणार नाहीत, ते फार ज्येष्ठ आहेत. ज्या घराण्याचा वारसा पुढे घेऊन ते चालले आहेत तिथे चुकीच्या माहितीच्या आधारे वक्तव्यं केली जात नाहीत”.

फडणवीस काय म्हणाले ?

“शाहू महाराज आमचे छत्रपती आहेत त्यामुळे त्यांनी कोणतेही मत व्यक्त केले असले तरी त्या संदर्भात मी बोलणार नाही. त्या संदर्भात संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टपणे ट्विट करुन सांगितले आहे की, मी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून सांगतो मी जे बोललो ते सत्य बोललो. मला असं वाटतं की प्रतिक्रिया बोलकी आहे. मला एकाच गोष्टीचे दुःख आहे की काही किडक्या डोक्याच्या लोकांनी महाराजांना स्क्रिप्ट तयार करुन चुकीची माहिती दिली आहे. त्या लोकांना समजत नाही की अशी माहिती महाराजांना देऊन ते संभाजीराजेंना खोटं ठरवतं आहेत. दुसरीकडे शाहू महाराज आणि संभाजीराजेंमध्ये काहीतरी अंतर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. असं काम करणाऱ्यांबद्दल मला प्रचंड दुःख आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

संभाजीराजेंचे निर्णय व्यक्तिगत; श्रीमंत शाहू महाराजांचे स्पष्टीकरण

संभाजीराजे छत्रपती हे राजकारणात घेत असलेले सर्व निर्णय हे त्यांचे वैयक्तिक स्वरूपाचे आहेत. याचा छत्रपती घराण्याशी काहीही संबंध नाही. तरीही ते अशाप्रकारे चुकीचा संबंध जोडत असतील तर ते चुकीचे असल्याचा निर्वाळा श्रीमंत शाहू महाराज यांनी दिला आहे. तसंच शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यात काही मुद्दय़ावर राज्यसभेच्या उमेदवारीबाबत ठरले होते. यातूनच ही उमेदवारी काही कारणांनी ते देऊ शकले नसतील तर त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शब्द न पाळल्याची टीका होणेदेखील चुकीचे असल्याचे मत शाहू महाराजांनी व्यक्त केलं आहे.

सत्यच बोललो – संभाजीराजेंचा पवित्रा

राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडीवरून श्रीमंत शाहू महाराज यांचे विधान चर्चेत असताना संभाजीराजे छत्रपती यांनी यावर समाज माध्यमातून प्रतिक्रिया नोंदवताना ‘ मी सत्यच बोललो आहे’ असे म्हणत आपले विधान खरे असल्याचा दावा केला आहे.

Anurag Thakur | BJP | राजकारणा बरोबर अन्य क्षेत्रांत संपर्क वाढवा | अनुराग ठाकूर

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

राजकारणा बरोबर अन्य क्षेत्रांत संपर्क वाढवा | अनुराग ठाकूर

स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी राजकारणाबरोबर कार्यकर्त्यांनी अन्य क्षेत्रांत संपर्क वाढवला पाहिजे,असे मत केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले.

ठाकूर विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने पुणे दौऱ्यावर होते. त्या वेळी सर्किट हाऊस येथे भाजपच्या कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत होते.

भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, प्रभारी. धीरज घाटे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, सरचिटणीस गणेश घोष, दीपक नागपुरे, राजेश येनपुरे, दीपक पोटे, अर्चना पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

ठाकूर म्हणाले, राज्यात भाजपला काम करण्यासाठी चांगली परिस्थिती आहे. कोणत्याही पदावर भाजपचा पदाधिकारी असला तरी त्याने राजकारण करीत असताना त्याने खेलासारख्या अन्य क्षेत्रात ही काम करावे, ज्यामुळे पक्षाचा पाया व्यापक होऊन जनाधार वाढण्यास मदत होईल.

मुळीक यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले, पांडे यांनी परिचय आणि सूत्रसंचालन आणि पोटे यांनी आभार मानले.

Pune | Modi Government | Congress | मोदी सरकारची आठ वर्षे | पुण्याच्या पदरी शून्यच

Categories
Breaking News PMC Political देश/विदेश पुणे

मोदी सरकारची आठ वर्षे | पुण्याच्या पदरी शून्यच

– माजी आमदार मोहन जोशी

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या आठ वर्षांच्या कारकिर्दीत पुण्यासाठी मोठमोठ्या योजना जाहीर झाल्या प्रत्यक्षात मात्र, पुणेकरांच्या पदरी शून्यच विकासकामे पडली, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

स्मार्ट सिटी ते नदी सुधार प्रकल्प अशा अनेक योजनांमध्ये घोळ घालण्यात आले. खासदार गिरीश बापट, माजी मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपचे १०० नगरसेवक यांची अकार्यक्षमता आणि अनास्था पुण्याच्या विकासाला बाधा ठरले आहेत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

पंतप्रधानांनी गाजावाजा केलेल्या स्मार्ट सिटी योजनेचा पुण्यात पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे. ही योजनाच आता गुंडाळली जाईल. शिवाजीनगर ते हिंजेवाडी या मेट्रोच्या कामाला दिरंगाई झाली. भाजपच्या खासदारानेच निदर्शने केली, इतका सावळा गोंधळ यांच्या कारभारात आहे. निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलावून, त्यांच्या हस्ते वनाज ते गरवारे कॉलेज या मेट्रो मार्गाचे उदघाटन झाले. पण, नंतरचे काम पुढेच सरकलेले नाही. त्यामुळे मेट्रोला प्रवासीच मिळेना अशी अवस्था झालेली आहे. केंद्र सरकारने निधी मंजूर करुनही भाजपचे स्थानिक खासदार आणि नगरसेवक यांच्या निष्क्रियतेमुळे नदी सुधार प्रकल्प सुरु करण्यास सहा वर्षें दिरंगाई झाली. नंतर महापालिका निवडणुका जवळ येताच प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न झाला. पण, पुणेकरांनाच हा प्रकल्प मान्य झाला नाही आणि काम अडकून पडले. कोविड साथीच्या काळात अदर पूनावाला मोफत लस देऊ इच्छित होते. परंतु, भाजपचे स्थानिक खासदार आणि माजी महापौरांनी उदासीनता दाखवली आणि एक संधी हुकली. पुरंदर विमानतळाचा घोळही अजून मिटलेला नाही. ही सर्व अनास्थेची लक्षणे आहेत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

नोटाबंदीतून ज्यांचे धंदे उखडले गेले ते अजून सावरलेले नाहीत. महागाईमुळे सर्वसामान्य जनता हवालदिल आहे. मध्यमवर्गीयांचे हाल वाढले, बेकार तरुणांना चांगल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध होत नाहीत. मोदी सरकारच्या आठ वर्षांच्या काळात अर्थव्यवस्था ढासळली, असा आरोप मोहन जोशी यांनी पत्रकात केला आहे.

काँग्रेस सरकारच्या काळात पुण्याच्या विकासासाठी जवाहरलाल नेहरु नागरी पुनर्निर्माण योजना राबविण्यात आली. त्यातून पुणे शहरात दीड हजार कोटीहून अधिक रकमेची कामे झाली. काँग्रेसच्या काळात केंद्र सरकारच्या अनेक आस्थापना, संस्था पुण्यात उभ्या राहिल्या. मोदी सरकारच्या काळात भरीव प्रकल्प, संस्था पुण्यात उभी राहिलेली नाही, असेही मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

yuvraj sambhajiraje chhatrapati | माघार घेणार की लढणार? | संभाजीराजे छत्रपती आपली भूमिका उद्या स्पष्ट करणार

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

माघार घेणार की लढणार?

: संभाजीराजे छत्रपती आपली भूमिका उद्या स्पष्ट करणार

 संभाजीराजे छत्रपती राज्यसभेची निवडणूक लढणार की त्यातून माघार घेणार, हे उद्या स्पष्ट होणार आहे. संभाजीराजे छत्रपती उद्या (२७ मे) आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. उद्या सकाळी ११ वाजता संभाजीराजे छत्रपती यांची मुंबईतील मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद होणार आहे.

संभाजीराजेंना राज्यसभा निवडणूक लढायचीच झाली तर त्यांच्याशी पाठिंब्यासाठी मोठी आर्थिक उलाढाल करावी लागेल, शिवाय विजयाची हमी नसताना अर्ज भरण्यातही काहीच हशील नाही. त्यामुळे एकतरी शिवसेनेचा पर्याय स्वीकारणे किंवा लढतीतून बाजूला होणे हेच दोनच पर्याय आजच्या घडीला त्यांच्यापुढे आहेत. त्यामुळे उद्या पत्रकार परिषदेत संभाजीराजे नेमकी कोणती भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

विधानसभेच्या २८८ सदस्यांमधून राज्यसभेत निवडून द्यायच्या सहा जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होत आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार तर भाजपचे दोन सदस्य राज्यसभेवर जाऊ शकतात. राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊत यांनीही माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि मी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, त्यांनी कितीही प्रयत्न करू द्या, विजय आमचाच होणार, असा विश्वास व्यक्त करत संजय राऊत यांनी भाजपला फटकारले आहे. तसेच,  शिवसेनेच्या उमेदवारांना संपूर्ण महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे, त्यामुळे विजय निश्चित असल्याचे संजय राऊत म्हणाले.

‘महाराज…तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय’-

शिवसेनेने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर संभाजीराजे यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आज त्यांनी ट्विट करुन आपलं मत स्पष्ट केलं आहे. महाराज… तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय… मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी… मी बांधील असेन तो फक्त जनतेशी…, अशी भावना संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे.

Girish Bapat Vs Shreenath Bhimale | श्रीनाथ भिमाले यांच्यावर कारवाई करा 

Categories
Breaking News Political social पुणे

श्रीनाथ भिमाले यांच्यावर कारवाई करा

: गिरीश बापट यांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी

पुणे : सॅलिसबरी पार्कमधील उद्यानाच्या नामांतर प्रकरणावरून भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.  स्थानिक रहिवाशांच्या भावनांची दखल न घेतल्याबद्दल माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी खासदार गिरीश बापट यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. आता हा वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

सॅलिसबरी पार्कमध्ये महापालिकेने उभारलेल्या उद्यानाला सॅलिसबरी पार्क उद्यान असे नाव द्यावे, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यासाठी सॅलिसबरी पार्क रेसिडेंट असोसिएशन गेल्या दीड महिन्यांपासून आंदोलन करीत आहे. रहिवाशांनी याबाबत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनाही साकडं घातलं आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे श्रमिक पत्रकार संघात एका पत्रकार परिषदेनंतर खासदार बापट म्हणाले , ”सॅलिसबरी पार्क मधील रहिवासी गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन करीत आहेत. महापालिकेच्या विकास कामांना कुटुंबीयांची नावे देण्याची भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही, ते योग्य नाही. त्यामुळे रहिवाशांच्या भावनांची दखल घ्यावी असे मी भिमाले यांना सांगितले आहे. परंतु त्यांनी त्याबाबत कार्यवाही न केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडे केली आहे.

”लोकप्रतिनिधी म्हणून मी गेल्या पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळ शहरात कार्यरत आहे. परंतु कुठेही माझ्या कुटुंबातील लोकांची नावे महापालिकेच्या पैशाचे उभारलेल्या विकासकामांना दिलेली नाहीत. एखाद्या व्यक्तीचे समाजासाठी योगदान असेल तर त्यांची दखल घेणे, हा भाग वेगळा. परंतु, कुटुंबीयांची नावे विकासकामांना देणे योग्य नाही. भारतीय जनता पक्ष सदैव नागरिकांनी सोबतच असतो आणि या पुढील काळातही त्यांच्या बरोबरच राहील’

 

गिरीश बापट, खासदार

 

Rajya sabha seats | राज्यसभेच्या 57 जगासाठी निवडणूक : महाराष्ट्रातून 6 उमेदवार निवडले जाणार

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

राज्यसभेच्या 57 जगासाठी निवडणूक

: महाराष्ट्रातून  6 उमेदवार निवडले जाणार

नवी दिल्ली – राज्यसभेच्या १५ राज्यांतील ५७ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरवात झाली.  राज्यसभेतील २४५ जागांपैकी यंदाच्या वर्षभरात ९५ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यापैकी आता येत्या १० जूनला सर्वाधिक ५७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचा थेट परिणाम आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर होणार आहे.

महाराष्ट्रातील ६ पैकी २ जागा भाजप हमखास जिंकणार आहे. मात्र तिसऱ्या जागेसाठीही पक्षाने सक्रिय प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेना आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यातील ताणाताणीत भाजप ही जागा पदरात पाडून घेण्यासाठी ‘धक्कातंत्र” वापरू शकते, अशी दिल्लीत चर्चा आहे. सहाव्या जागेसाठी संभाजीराजे अपक्ष म्हणून उभे राहिलेच तर वेळप्रसंगी त्यांना पाठिंबा द्यावा काय, याबाबतही पक्षात खल सुरू असून विरोधी नेते देवेंद्र फडणवीस याबाबतचा ‘अंतिम” निर्णय घेतील, असे पक्षसूत्रांनी स्पष्ट केले. राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याची ३१ मे ही अंतिम मुदत आहे. १० जून रोजी राज्यसभेसाठी मतदान होईल व त्याच दिवशी मतमोजणीही होईल. राज्यसभेच्या २४५ पैकी भाजपकडे सध्या ९५ खासदार आहेत तरी पक्षाचे येथे स्पष्ट बहुमत अजूनही नाही. वरिष्ठ सभागृहात उत्तर प्रदेशचे सर्वाधिक ३४ खासदार असून त्यातील ११ जणांचा कार्यकाळ संपत आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र-तमिळनाडूतील प्रत्येकी ६ सदस्य निवृत्त होत आहेत. तमिळनाडूतून भाजपला काही आशा नाही. एकूण चित्र पाहता या निवडणुकीनंतर भाजपची राज्यसभेतील सदस्य संख्या कमी होण्याची चिन्हे आहेत.

विरोधी मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेठी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २५ जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे भाजपने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठीच्या ‘इलेक्ट्रोरल कॉलेज” चे वर्तमान स्वरूप पाहिले तर भाजप आघाडीकडे ४८.९ टक्के हक्काची मते आहेत. कॉंग्रेस व विरोधी पक्षांकडे साधारणतः ५१.१ टक्के मते आहेत. तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर राव यांनी विरोधकांच्या एकीसाठी कंबर कसली असून विविध विरोधीपक्षीय मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशीही ते लवकरच चर्चा करणार आहेत. भाजपने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नितीशकुमार यांच्याशी चर्चा करण्यास पाटण्यात पाठविले होते. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यामार्फत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या संपर्कात भाजप नेतृत्व आहे. आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी संपर्क साधण्यासाठी भाजप नेत्याला सांगण्यात आले आहे.

Raj Thackeray | अयोध्या दौऱ्याला विरोध हा ट्रॅप; राज ठाकरेंचा रोख कुणाकडे? | मुख्यमंत्री, संजय राऊत, आदित्य ठाकरे बद्दल काय म्हणाले राज ठाकरे? 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

अयोध्या दौऱ्याला विरोध हा ट्रॅप; राज ठाकरेंचा रोख कुणाकडे? 

: मुख्यमंत्री, संजय राऊत, आदित्य ठाकरे बद्दल काय म्हणाले राज ठाकरे? 

पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरेंची आज पुण्यात सभा झाली. यावेळी त्यांनी अयोध्या दौरा का रद्द केला? याचं कारण सांगितलं. तसेच त्यांच्या अयोध्या दौऱ्यावरून ज्या घडामोडी घडल्या त्याला महाराष्ट्रातून रसद पुरविण्यात आल्याचा आरोप देखील त्यांनी केला. इतकंच नाहीतर मुख्यमंत्र्यांवर, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यावर  देखील जोरदार टीका केली. 

.औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवून जातात.

अफजल खानाच्या कबरीचा विस्तार किती झालाय? त्याच्या कबरीसाठी फंड येतो कुठून? औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवून जातात. तरीही महाराष्ट्र थंड आहे. आम्हाला काहीही वाटत नाही. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सकाळची अजान बंद झाली. अजानचा आवाज हळूहळू वाढणार. भोंग्यांचा विषय सुरू झाला तर एकदा तुकडा पाडून टाका. हे आंदोलन आहे. २८ हजार मनसे कार्यकर्त्यांना नोटीस आली. जे कायद्यानुसार वागतात त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार का? जे कायदे पाळत नाहीत त्यांच्यासोबत चर्चा करणार का? आंदोलने होत राहणार आहे. आमची टीम तयार आहे. हे आंदोलन सुरू ठेवायचं आहे. त्यासाठी एक पत्र देणार आहे आणि ते प्रत्येक हिंदू बांधवांच्या घरी पोहोचवायची आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

”पवारांनी बाळासाहेबांची विश्वासार्हता घालवली” – 

”औरंगाबादेत बघता बघता एमआयएमचा खासदार झाला. कोणीतरी येतं आणि औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवतं? तुम्ही काय करता? एमआयएमच्या अवलादी हे औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्त होतात. याचं शिवसेनेला काहीच वाटत नाही. कारण शिवसेनेसाठी सत्ता महत्वाची आहे. औरंगजेब हा शरद पवारांना सुफी संत वाटतो का? शरद पवार बाळासाहेबांची विश्वासार्हता घालवत आहेत. तरीही शिवसेना पवारांसोबत आहे”, असा टोलाही पवारांनी लगावला.

तुम्ही कोण? महात्मा गांधी कि वल्लभभाई पटेल?

”राज ठाकरे आंदोलन अर्धवट सोडतो, असं म्हणतात. पण, मला एक आंदोलन दाखवा जे अर्धवट सोडलं. टोल नाक्यापासून सर्वच आंदोलन यशस्वी झाले. तुमच्या अंगावर एकतरी आंदोलन केल्याचा गुन्हा आहे का? हे उद्धव ठाकरेंनी सांगावं. भूमिका कुठलीच घ्यायची नाही. संभाजीनगरचं नामकरण झालं की नाही झालं काय फरक पडतो असं म्हणतात. मी आहे असं सांगतात. पण तू कोण आहे ? वल्लभभाई पटेल की महात्मा गांधी?” अशी जोरदार टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली.

राऊत-राणा एकत्र जेवतात 

राणा दाम्पत्य आणि शिवसेनेत इतका राडा झाला. त्यानंतर संजय राऊत आणि रवी राणा हे लेहमध्ये जेवण करताना दिसले. मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचण्यासाठी आलेल्यांसोबत तुम्ही फिरताय. हे सर्व ढोंगी आहेत. यांचं हिंदूत्व फक्त बोलण्यापुरतं आहे. त्यादिवशी मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय पोरकटपणा लावलाय? यांचं हिंदूत्व खोटं आणि आमचं खरं असं सांगतात, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

राज ठाकरेंचा रोख कोणाकडे? –

कारसेवकांना ठार करून शरयू नदीत मृतदेह सोडले होते. त्या ठिकाणाचं देखील दर्शन मला घ्यायचं होतं. पण, राजकारणात अनेकांना भावना समजत नाही. अयोध्येत काही झालं असतं तर आपले कार्यकर्ते त्यांच्यावर धावून गेले असते. तुमच्यावर गुन्हे दाखल करून तुम्हाला तुरुंगात टाकलं असतं. आपल्या कार्यकर्त्यांची मला काळजी आहे. आता आठवलं का? राज ठाकरेंनी माफी मागावी? आतापर्यंत कुठे गेले होते? विषय माफी मागण्याचा आहे ना? गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर नावाची व्यक्त आहे. त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना मारलं होतं. त्यांना गुजरातमधून हाकलण्यात आलं. तिथून कोण माफी मागणार का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

अयोध्या दौऱ्याला विरोध हा ट्रॅप, महाराष्ट्रातून रसद पुरविली – राज ठाकरे 

पायाचं दुखणं वाढलं आहे. कंबरेला त्रास होतो. त्यामुळे येत्या १ जूनला शस्त्रक्रिया करणार आहे. अयोध्या दौरा तात्पुरता स्थगित केल्यानंतर अनेकांना वाईट वाटलं. अनेकजण कुत्सितपणे बोलायला लागेल. पण, मुद्दाम त्यांना बोलण्यासाठी दोन दिवस वेळ दिला आणि आज भूमिका सांगण्यासाठी सभा घेतली. माझ्या अयोध्या दौऱ्याच्या घोषणेनंतर ज्या काही राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या तो एक ट्रॅप होता. त्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरविण्यात आली. अयोध्या वारी खुपणाऱ्यांनी हे काम केलं आहे., असा आरोप देखील राज ठाकरेंनी केला.

भाषणाच्या सुरुवातीला पवारांना टोला –

निवडणुका नाही, उगाच कशाला पावसात भिजत भाषण करायचं, असं म्हणत भाषणाच्या सुरुवातीलाच शरद पवारांना टोला लगावला.

अंध विद्यार्थ्यांना मंचावर स्थान –

पुण्यातील अंध विद्यार्थ्यांची राज ठाकरेंच्या सभेला उपस्थिती लावली आहे. त्यांना व्यासपीठावर बोलावून राज ठाकरेंनी त्यांचा सन्मान केला. त्यांना मंचावर स्थान देण्यात आले.

OBC Reservation | BJP | ओबीसी मंत्र्यांनी आता तरी सत्तेची लाचारी सोडावी

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

ओबीसी मंत्र्यांनी आता तरी सत्तेची लाचारी सोडावी : योगेश टिळेकर

पुणे : मध्य प्रदेशमधील भाजप सरकारच्या यशानंतर महाविकास आघाडी सरकारचे अपयश पुन्हा स्पष्ट झाले आहे. या सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी आता तरी सत्तेची लाचारी सोडावी आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची हिंमत दाखवावी. असे आवाहन ओबीसी प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी केले.

दोन वर्षांत घरात बसूनही सरकारला अभ्यास करता येत नसेल तर त्यांनी मध्य प्रदेशमधील भाजप सरकारची कॉपी करावी आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळवून द्यावे अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका घेण्यासाठी मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्रातही ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी शहर भाजपच्या वतीने अध्यक्ष जगदीश मुळीक आणि ओबीसी प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. त्या वेळी मुळीक बोलत होते.

ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, सरचिटणीस राजेश येनपुरे, दत्ताभाऊ खाडे, संदीप लोणकर सुशिल मेंगडे, धनंजय जाधव, गायत्री खडके, आरती कोंढरे, मनिषा लडकत, प्रशांत हरसुले, प्रतिक देसरडा, दीपक माने, नंदकुमार गोसावी, राजेश धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुळीक पुढे म्हणाले, राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गमवावे लागले नसून, राज्य सरकारने ते पद्धतशीरपणे घालवले आहे. आरक्षण हातचे जात असताना छगन भुजबळ, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड हे ओबीसींचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री केंद्र सरकारकडे बोट दाखवित निमूटपणे बसून राहिले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला वेळोवेळी सूचना केल्या, मात्र ठाकरे सरकारने त्या सुचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा आदेश दिला. याउलट मध्य प्रदेश सरकारने र्नयायालयाने सांगितलेली ट्रिपल टेस्ट पूर्ण केल्याने त्यांना आरक्षण मिळाले. आरक्षण गमविण्यासाठी पूर्णपणे ठाकरे सरकार जबाबदार आहे. आता तरी जागे व्हावे आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्राला ओबीसींचे आरक्षण मिळवून द्यावे.

टिळेकर म्हणाले, ओबीसींना राजकीय आरक्षण देताना ते किती प्रमाणात द्यावे हा प्रश्न आहे. त्यासाठी समर्पित आयोगामार्फत एंपिरिकल डेटा अर्थात ओबीसींची वस्तुस्थितीनुसार आकडेवारी गोळा करून प्रमाण ठरवणे आणि एकूण आरक्षण पन्नास टक्क्यांच्या मर्यादेत ठेवणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च २०२१ रोजी महाराष्ट्रातील राजकीय आरक्षण स्थगित करतानाच ते पुन्हा लागू करण्यासाठी तिहेरी चाचणी पूर्ण करण्यास सांगितले होते. महाविकास आघाडी सरकारने नेमके हेच काम केले नसल्याने राज्यातील ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा लागू झाले नाही. दुसरीकडे मध्य प्रदशेने न्यायालयाच्या आदेशानंतर ताबडतोब डेटा गोळा करून चाचणी पूर्ण केली आणि ओबीसी आरक्षण पुन्हा मिळविले. मध्य प्रदेशमधील भाजप सरकारच्या यशानंतर महाविकास आघाडी सरकारचे अपयश पुन्हा स्पष्ट झाले आहे. या सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी आता तरी सत्तेची लाचारी सोडावी आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची हिंमत दाखवावी.