Pune Metro | पुणे मेट्रो धावली रुबी हॉल मेट्रो स्थानकापर्यंत

Categories
Breaking News social पुणे

पुणे मेट्रो धावली रुबी हॉल मेट्रो स्थानकापर्यंत

– रुबी हॉल स्थानकापर्यंत मेट्रोची चाचणी घेण्यात आली

– मंगळवार पेठ (RTO), पुणे रेल्वे स्थानक ही ठिकाणे लवकरच मेट्रोद्वारे जोडली जाणार
आज पुणे मेट्रोची सिव्हिल कोर्ट स्थानक ते रुबी हॉल स्थानक ही चाचणी घेण्यात आली. ठीक ३.५० मिनिटांनी सिव्हिल कोर्ट स्थानक येथून मेट्रो ट्रेन निघाली. ४.०७ मिनिटांनी रुबी हॉल स्थानक येथे ट्रेन पोहोचली. ट्रेनचा वेग १० किमी प्रति तास असा होता. मुळा-मुठा संगम पूल पार करून ट्रेन मंगळवार पेठ (RTO) स्थानक येथे पोहोचली. तेथून पुणे रेल्वे स्थानक पार करून रुबी हॉल स्थानकात नियोजित वेळेनुसार पोचली. चाचणी दरम्यान ठरलेली उद्दिष्ट पार पडले. चाचणी अत्यंत व्यवस्थित पार पडली. अशी माहिती पुणे मेट्रोच्या वतीने देण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक ही १२ किमीची मार्गिका २०२२ मध्ये प्रवाशांसाठी सुरू केल्यानंतर आता लवकरच फुगेवाडी स्थानक- सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि गरवारे कॉलेज स्थानक – सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक – रुबी हॉल स्थानक  या एकूण १२ किमीची मार्गिका लवकरच प्रवाश्यांसाठी सुरू करण्यात येतील.
गरवारे स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक या मार्गीकेवर मेट्रो रेल्वेची चाचणी दिनांक २५/११/२०२२ रोजी घेण्यात आली. त्याचप्रमाणे फुगेवाडी स्थानक  ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक मार्गावर चाचणी दिनांक ३१/१२/२०२२ रोजी घेण्यात आली. आज दिनांक २७/०३/२०२३रोजी सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक- मंगळवार पेठ (RTO) – पुणे रेल्वे स्थानक – रुबी हॉल स्थानक या मार्गावर चाचणी घेण्यात आली. या तिन्ही मार्गीकेवरील कामे जवळपास संपुष्टात आली आहेत. उर्वरित कामे येत्या आठ ते दहा दिवसात पूर्ण झाल्यावर या मार्गीकांचे सी एम आर एस निरीक्षण करण्यासाठी रेलवे सुरक्षा आयुक्त यांना बोलावण्यात  येईल आणि लवकरच सी एम आर एस यांची मान्यता प्राप्त झाल्यानंतर प्रवासी सेवा या मार्गावर सुरू करण्यात येईल.
सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते रुबी हॉल स्थानक या मार्गीकेवर  मंगळवार पेठ (RTO), पुणे रेल्वे स्थानक,  रुबी हॉल स्थानक ही महत्त्वाची स्थानके आहेत.  यामुळे आरटीओ कार्यालय, पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल, जहांगीर हॉस्पिटल, वाडिया कॉलेज जोडले जाणार आहेत.  यामुळे मोठ्या प्रमाणावर पुण्याच्या नागरिकांना या भागात येणे-जाणे सोयीचे होणार आहे.  पुणे रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाला मेट्रोच्या कॉनकोर्स मजल्याशी जोडण्यात आल्यामुळे रेल्वे आणि मेट्रो प्रवाशांना थेट एकमेकांच्या सेवांचा लाभ घेणे सोईचे होणार आहे.  मेट्रो स्थानकावरून रेल्वेच्या सर्व फलाटांवर जाणे सहज शक्य होईल. मंगळवार पेठ स्थानक (RTO) हे अत्यंत गजबिल्या ठिकाणी आहे.  आरटीओ कार्यालयात येणाऱ्या असंख्य नागरिकांना याचा फायदा होईल. तसेच या भागात शाळा इंजिनिअरिंग कॉलेज, नायडू हॉस्पिटल ही महत्वाची ठिकाणे आहेत. या मार्गावर रोज प्रवास करणाऱ्या तीन ते चार हजार विद्यार्थ्यांना या मेट्रो स्थानकामुळे फायदा होणार आहे.
या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हटले आहे की, “आज घेण्यात आलेली चाचणी नियोजित उद्दिष्ठानुसार पार पडली. लवकरच पुणे रेल्वे स्थानक, RTO व रुबी हॉल मेट्रो नेटवर्क द्वारा जोडले जाईल”.

Pune Metro | जमिनीच्या १०८ फूट खाली साकारतेय सिव्हिल कोर्ट भूमिगत मेट्रो स्थानक

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

जमिनीच्या १०८ फूट खाली साकारतेय सिव्हिल कोर्ट भूमिगत मेट्रो स्थानक

सिव्हिल कोर्ट भूमिगत मेट्रो स्थानकाचे (Civil court metro station) 95 टक्के काम पूर्ण झाले असून, मेट्रो रेल्वे सुरक्षा समितीकडून पुढील दोन महिन्यांत या मार्गाची तपासणी केली जाणार आहे. मार्च अखेरपर्यंत पीसीएमसी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी अशा दोन मार्गिका सुरू केल्या जातील, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली. (pune metro)

पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते स्वारगेट (17 किमी) आणि वनाज ते रामवाडी (16 किमी) अशा दोन मार्गिका आहेत. दोन्ही मार्गिका सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक येथे एकमेकांना छेदतात आणि त्यामुळे सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक एक महत्वाचे स्थानक म्हणून उभारण्यात येत आहे. सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकामध्ये पीसीएमसी ते स्वारगेट मार्गिकेवरील भूमिगत स्थानक आणि वनाज ते रामवाडी या मार्गिकेवरील उन्नत स्थानक आहे. भूमिगत स्थानक ते उन्नत स्थानक यांना एस्किलेटर आणि लिफ्ट यांनी जोडले आहे. सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाचा एकूण परिसर 11.17 एकर असून, या स्थानकाला येण्या-जाण्यासाठी एकूण सात एन्ट्री पॉइंट असणार आहेत. प्रवाशांची संख्या लक्षात घेता या स्थानकात मोठ्या प्रमाणावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या स्थानकात 8 लिफ्ट आणि 18 एस्किलेटर बसविण्यात येत आहेत. सिव्हिल कोर्ट ते हिंजवडी ही पुण्यात बांधण्यात येणारी तिसरी मेट्रो मार्गिका देखील पादचारी पुलाने या स्थानकाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानक हे मध्यवर्ती स्थानक म्हणून नावारूपाला येईल.

सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकात मेट्रो भवनचे काम करण्यात येणार आहे. संपूर्ण पुणे मेट्रोवर येथून नियंत्रण केले जाईल. मेट्रो भवनची इमारत खइउ प्लॅटिनम मानांकनानुसार बांधण्यात येणार असून, मल्टी मोडल इंटिग्रेशनसाठी पीएमपीएमएलचा थांबा असणार आहे. या संपूर्ण परिसराचे लॅंडस्केप अत्यंत आकर्षक करण्यात येणार आहे. ज्यामध्ये कारंजे, विविध झाडे, हरित पट्टे, आकर्षक झाडी लावण्यात येणार आहे.

सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानकाची खोली 33.1 मीटर (108.59 फूट) असून, हे भारतातील सर्वांत खोल मेट्रो स्थानक असणार आहे. या भूमिगत स्थानकाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या भूमिगत स्थानकाचे छत 95 फूट उंच असून, देखील तेथे थेट सूर्यप्रकाश पोहचेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. इतक्‍या खोल स्थानकावर सूर्यप्रकाश पोहचणारे हे एकमेव भूमिगत मेट्रो स्थानक असणार आहे.

 
दोन महिन्यांत फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट या मार्गिकांचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नुकतेच या दोन्ही मार्गांवर चाचणी घेण्यात आली आहे. हे मार्ग प्रवाशांसाठी खुले झाल्यावर पुणे व पिंपरी-चिंचवड शहरे मेट्रोसारख्या मास ट्रान्झिट वाहतूक व्यवस्थेने जोडली जाणार आहेत. पीसीएमसी ते वनाज या 22 किमीचा प्रवास केवळ 31 मिनिटांमध्ये पार करणे शक्‍य होणार आहे.

Pune Metro | Guardian Minister | पुणे मेट्रोचा संपूर्ण पहिला टप्पा मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होण्याचा पालकमंत्र्यांना विश्वास

Categories
Breaking News Political पुणे

पुणे मेट्रोचा संपूर्ण पहिला टप्पा मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होण्याचा पालकमंत्र्यांना विश्वास

| पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी  पुणे मेट्रो प्रकल्पाला भेट दिली. प्रारंभी शिवाजीनगर येथील भूमिगत मेट्रो स्थानकाची पाहणी केली. नंतर गरवारे कॉलेज मेट्रो स्थानक येथे पाहणी करुन तिकीट घेत वनाज स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला.

यावेळी आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित आदी उपस्थित होते.

पाहणीप्रसंगी श्री. पाटील म्हणाले, शहराची वाढती गरज पाहता आपण रस्ते, उड्डाणपूल आदी प्रकल्प करत आहोत. परंतु, मेट्रोचे काम पूर्ण झाल्यावर शहरातील गर्दी मेट्रोमध्ये स्थलांतरीत होईल. पुणे मेट्रोचे काम गतीने सुरू असून ३३ कि.मी.चा पूर्ण एक टप्पा मार्च २०२३ पर्यंत महामेट्रोकडून पूर्ण करण्यात येईल.

पुढच्या तीन टप्प्यांनाही गती देण्यात येईल. त्यातील २ टप्प्यांचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेले असून त्याचा स्वत: पाठपुरावा करू असे त्यांनी सांगितले. तसेच तिसऱ्या टप्प्यातील ८५ कि.मी. लांबीच्या मेट्रोचा प्रकल्प अहवाल महानगरपालिका करत आहे. त्यामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत खूप मोठा सकारात्मक बदल होईल, असेही ते म्हणाले.

प्रवासी वाहतूक गतीने होण्याचे उद्दिष्ट असतानाच प्रत्येक स्टेशन वेगवेगळ्या संकल्पनेनुसार डिझाईन करण्यात आले असल्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणातही भर पडेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवाजीनगर भूमिगत मेट्रो स्थानकाची पाहणी केल्यानंतर पालकमंत्र्यांसमोर डॉ. दीक्षित यांच्यासह पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचे संगणकीय सादरीकरण केले.

शिवाजीनगर एसटी बस स्थानकाखाली हे मल्टीमॉडेल एकिकृत भूमिगत स्थानक बनवण्यात आले असून एसटी, रेल्वे स्थानक, पीएमपीएल आणि हिंजेवाडी मेट्रो लाईनशी जोडणी होणार असल्याने प्रवाशांना सर्व वाहतूक सुविधांचा उपयोग घेता येणार आहे. शिवाजीनगर मेट्रो स्थानकाला भेट दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आपल्यासमोर उभा राहील अशा संकल्पनेनुसार या स्थानकाचे डिझाईन करण्यात आले आहे. ऐतिहासिक बांधकामांच्या प्रतिकृतीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण संरचना या बांधकामात वापरण्यात आल्या आहेत, असे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्र्यांना या स्थानकातील प्लॅटफॉर्म, मेट्रो लाईन तसेच विविध सब-वे च्या कामांची प्रगती दर्शवण्यात आली. नंतर श्री. पाटील यांनी गरवारे कॉलेज मेट्रो स्थानकाची पाहणी करुन तिकीट घेऊन वनाज स्थानकापर्यंत मेट्रोतून प्रवास केला.

मेट्रोच्या प्रगतीचा आढावा घेतल्यानंतर आपण स्वप्नात आहोत असे वाटते, कल्पनेतील मेट्रो व्यवहारात आली असा अभिप्राय त्यांनी वनाज स्थानकावरील नोंदवहीत नोंदवला.

Pune metro rail project | पुणे मेट्रोला निरंतर वीजपुरवठा मिळत राहील असे नियोजन

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र

पुणे मेट्रोला निरंतर वीजपुरवठा मिळत राहील असे नियोजन

पुणे मेट्रोसाठी लागणारी वीजपुरवठा (Power Supply & Tration) विषयक कामे पूर्ण

पुणे मेट्रोसाठी जागतिक दर्जाच्या ट्रकशन आणि पॉवर सप्लाय यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुणे मेट्रोला निरंतर वीजपुरवठा मिळत राहील असे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.

मेट्रो ट्रेन हि विजेवर चालते आणि त्यामुळे हि पर्यावरण पूरक अशी शहरी वाहतूक व्यवस्था आहे. मेट्रो ट्रेन चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विजेची गरज पडते. मेट्रोसाठी विनाव्यत्यय वीजपुरवठा संबंधी संरचनात्मक कामे करणे हे एक आव्हानात्मक काम आहे. येत्या काही काळात मोठ्याप्रमाणावर प्रवासी मेट्रोने प्रवास करतील त्यामुळे सतरा ते आठरा तास मेट्रो सेवेसाठी निरंतर वीजपुरवठा करणे व त्यासंबंधीच्या उपकारणांची उभारणी करणे हे अत्यंत्य महत्वाचे काम आहे.

नुकतेच पुणेमेट्रोने संपूर्ण ३३ किमी मार्गावर मेट्रो चालवण्यासाठी आवश्यक असलेले वीजपुरवठ्याचे काम पूर्ण केले आहे. निरंतर वीजपुरवठा करण्यासाठी मेट्रोने म.रा.वि.वि.क. (महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी) यांच्याकडून तीन ग्रीड मधून वीजपुरवठा घेतला आहे. त्याला रिसीव्हींग सब स्टेशन (RSS) असे म्हणतात. पिंपरी-चिंचवड स्थानक येथील रिसीव्हींग सब स्टेशनसाठी चिंचवड ग्रीड, रेंजहील रिसीव्हींग सब स्टेशनसाठी गणेशखिंड ग्रीड आणि वनाझ रिसीव्हींग सब स्टेशनसाठी पर्वती ग्रीड मधून वीजपुरवठा घेण्यात आला आहे. यासाठी ५ ते ६ किमी लांबीच्या १३३ KV क्षमतेच्या विद्युत केबल अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून टाकण्यात आल्या आहेत. यामुळे एक ग्रीडमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास दुसऱ्या ग्रीड मधून विद्युत पुरवठा देऊन मेट्रोची सेवा चालू ठेवणे शक्य होणार आहे. रेंजहील येथील रिसीव्हींग सब स्टेशन हे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांना (कॉरिडॉर) एकाचवेळी विद्युत पुरवठा करूशकेल अश्या क्षमतेचे बांधण्यात आले आहे.

प्रत्येक रिसीव्हींग सब स्टेशनमध्ये चार रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) लावण्यात आले असून १३२ kv विद्युत पुरवठ्याचे २५ kv, २५ kv, ३३ kv, ३३ kv अश्या प्रकारे स्टेपडाऊन करण्यात आले आहे. २५ kv वीजपुरवठा हा ट्रॅक्शनसाठी वापरण्यात येतो व त्याची फीड ट्रेनच्या वरील विद्युत तारांमध्ये (OHE) सोडण्यात आली आहे. तर ३३ kv चा विद्युत पुरवठा सर्व मेट्रो स्थानकांना देण्यात आला आहे. त्यासाठी संपूर्ण ३३ किमी मार्गावर ३३ kv क्षमतेच्या विद्युत केबल टाकण्यात आल्या आहेत. प्रत्येक स्थानकात एक ऑग्झ्यालरी सब स्टेशन (ASS) बांधण्यात आलेले आहे. ऑग्झ्यालरी सब स्टेशनद्वारा उद्वाहक (लिफ्ट), सरकते जिने (एस्किलेटर), वातानुकूलित यंत्रणा (AC) आणि स्थानकातील विद्युत यंत्रणा यासाठी हा विद्युत पुरवठा करण्यात येतो.

पुणे मेट्रोने मोठ्या प्रमाणावर सोलर वीजनिर्मीती करण्याचे नियोजित केले आहे. प्रत्येक स्थानकाच्या छतावर आणि इमारतींच्या छतावर सोलर वीजनिर्मिती संच बसविण्यात आले आहेत. याद्वारे ११ मेगा वॅट इतकी सौर वीजनिर्मिती करणे शक्य होणार आहे. सौर निर्मित ऊर्जेचे इंटिग्रेशन पावर सप्लाय सिस्टमशी करण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची बचत होणार आहे.

सर्व रिसीव्हींग सब स्टेशन, ऑग्झ्यालरी सब स्टेशन आणि OHE यांच्या नियंत्रणासाठी SCADA प्रणाली बसविण्यात आली आहे. या SCADA प्रणालीद्वारे संपूर्ण ट्रकशन आणि पॉवर सप्लाय प्रणालीचे नियंत्रण करता येते. SCADA प्रणालीचा मुख्य संगणक हा रेंजहील येथील OCC येथे स्थापित करण्यात आला आहे. OCC येथील डिस्प्ले वर संपूर्ण ट्रकशन आणि पॉवर सप्लायच्या संबंधीची माहिती ऑनलाईन दिसत असते. त्यामुळे त्याचे नियंत्रण करणे सहज शक्य होते.