cVIGIL | निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या करा तक्रारी

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या करा तक्रारी

| ॲपवर तक्रारी नोंदविण्याची सुविधा

पुणे| निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणताही आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर मतदार संघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नागरिकांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. (code of conduct violations)

जिल्ह्यातील २०५- चिंचवड व २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन, अवैध जाहिरात फलक, मतदारांना पैसे वाटप, दारु वाटप, भेट वस्तू किंवा आमिष दाखवणे, कोणत्याही प्रकारचे शस्त्र दाखवून धमकावणे आदी प्रकारच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने करता येतील. यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन ‘सी-व्हिजिल’ (cVIGIL) ॲप मोफत डाऊनलोड करता येते.

ॲप सुरु करुन त्यामध्ये छायाचित्र, व्हिडीओ किंवा ऑडिओ तयार करुन पोस्ट केल्यांनतर तक्रारीची नोंद होते. तक्रार नोंदवल्यानंतर पाच मिनीटामध्ये ही माहिती भरारी पथकाला पाठवली जाते. भरारी पथकाकडून तातडीने याबाबत चौकशी करून निवडणूक निर्णय अधिकारी यांना अहवाल सादर केला जातो आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तातडीने त्याच्यावर कारवाई करतात तक्रारीचे स्वरुप व संख्येनुसार हा वेळ कमी-अधिक होतो.

तक्रारीचे निरसन झाल्यानंतर तक्रारदारास ॲपद्वारे संदेश जातो. याशिवाय आचारसंहिता कक्षाकडे देखील आचारसंहिता भंगा बाबत तक्रारी दाखल केल्या जाऊ शकतात, अशी माहिती उप जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली

पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून नोंद झालेल्या ५२ तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे, अशी माहितीही श्री. इथापे यांनी दिली.

By-Election | विधानसभा पोट निवडणूक मतदानाच्या तारखेत बदल | २६ फेब्रुवारी रोजी होणार मतदान

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

विधानसभा पोट निवडणूक मतदानाच्या तारखेत बदल

| २६ फेब्रुवारी रोजी होणार मतदान

पुणे |  भारत निवडणूक आयोगाने पुणे जिल्ह्यातील २१५- कसबा पेठ व २०५- चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाच्या तारखेत बदल केला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार २७ फेब्रुवारीऐवजी रविवार २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

आमदार मुक्ता शैलेश टिळक यांच्या निधनामुळे कसबा पेठची, तर आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने १८ जानेवारी रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामध्ये बदल करण्यात आलेले प्रसिद्धीपत्रक २५ जानेवारी रोजी जारी करण्यात आले आहे.

सुधारित कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. या पोटनिवडणुकीसाठी मंगळवार ३१ जानेवारी २०२३ रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३ उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असेल. प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी बुधवार ८ फेब्रुवारी २०२३ रोजी होईल. शुक्रवार १० फेब्रुवारी २०२३ उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. त्यानंतर रविवार २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होईल. गुरुवार २ मार्च २०२३ रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती प्र. उप जिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी दिली आहे.
०००००

By-election | Chinchwad | चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार! | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार!

| पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केले. तसेच भारतीय जनता पक्ष जगताप कुटुंबियांच्या पाठिशी सदैव खंबीर उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजपाची पूर्वतयारी आढावा बैठक आज झाली. या बैठकीला शहर अध्यक्ष महेशदादा लांडगे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, भाजपा नेते शंकरभाऊ जगताप, लक्ष्मभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, आ. उमाताई खापरे, माजी महापौर माई ढोरे यांच्यासह पिंपरी चिंचवड मधील भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पूर्वतयारी आढावा बैठकीनंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नामदार पाटील म्हणाले की, “लक्ष्मणभाऊ जगताप हे जनमानसात अतिशय लोकप्रिय होते. आपल्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांनी जनमानसात आपलं वेगळं स्थान कायमस्वरूपी निर्माण केलं आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सर्वांचीच इच्छा आहे. मात्र तरीही गाफिल न राहता, पक्षाने ‘थिंक इन अँडव्हान्स थिंक इन डिटेल’मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला असून, त्याअनुषंगाने काम सुरू केले आहे.”

नामदार पाटील पुढे म्हणाले की, “चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीसाठी पक्षाने तीन समिती स्थापन केल्या असून, त्यात संघटनात्मक कामांसाठी ‌पक्षाचे शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांच्या नेतृत्वात एक समिती काम करेल. तसेच पोटनिवडणुकीच्या व्यवस्थेसाठी व्यवस्थापक प्रमुख म्हणून बापू काटे यांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नामदेव ढाके हे त्यांना साहाय्यक म्हणून काम करतील. त्यासोबतच महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वात एक राजकीय समिती स्थापन केली असून, महेशदादांच्या नेतृत्वात चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तसेच कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ हे निवडणूक प्रमुख म्हणून काम पाहतील.

ते पुढे म्हणाले की, लक्ष्मणभाऊंच्या निधनानंतर ही भाऊंच्या कुटुंबावर सर्वांचे प्रेम कायम आहे. शंकरभाऊ आणि वहिनीं यांनीही इथल्या जनतेसोबतचं आपलं नातं अतुट ठेवलं आहे. भारतीय जनता पक्ष जगताप कुटुंबियांच्या पाठिशी खंबीर उभा आहे‌. तसेच पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराचे नाव पक्षाची कार्यसमिती निश्चित करते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Shailesh Tilak | शैलेश टिळक यांनी भूमिका केली स्पष्ट| आता भाजप काय निर्णय घेणार?

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

शैलेश टिळक यांनी भूमिका केली स्पष्ट| आता भाजप काय निर्णय घेणार?

कसबा विधानसभा पोट निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष कोणाला उमेदवारी देणार, यावरून चर्चा सुरू झाली असतानाच कसबा विधानसभा मतदारसंघाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी प्रथमच जाहीरपणे उमेदवारीचा दावा केला आहे. पोटनिवडणुकीसाठी टिळक कुटुंबीयांचा विचार व्हावा, अशी स्पष्ट भूमिका शैलेश टिळक यांनी घेतली आहे. निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे पक्षाच्या नेतृत्वाला लवकरच कळविण्यात येईल, असे शैलेश यांनी स्पष्ट केले असून, त्यांच्या जाहीर भूमिकेमुळे भाजप नेतृत्व काय निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. (kasba constituency byelections)

पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या मतदारसंघातून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृहनेता गणेश बीडकर आणि धीरज घाटे यांच्याबरोबरच पुण्याचे खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर टिळक कुटुंबीयांपैकी एकाला उमेदवारी द्यावी, असा मतप्रवाही पक्षाच्या एका गटाचा होता. मात्र, शैलेश टिळक यांनी मात्र त्याबाबत कोणतीही जाहीर भूमिका घेतली नव्हती.

‘मुक्ता यांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी टिळक कुटुंबीयांपैकी एकाला उमेदवारी द्यावी, अशी भावना आहे. मीही उमेदवारीसाठी इच्छुक असून चिरंजीव कुणाल याचेही वेगळ्या माध्यमातून जनसंपर्काचे काम सुरू आहे. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीसाठी टिळक कुटुंबीयांचा प्राधान्याने विचार करावा. पक्षाच्या नेत्यांशी अद्याप या संदर्भात चर्चा झालेली नाही. मात्र, ही भावना लवकरच नेत्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल. उमेदवारी कोणाला द्यायची, याचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, असे शैलेश यांनी स्पष्ट केले. उमेदवारीबाबत शैलेश यांनी प्रथमच जाहीर भूमिका घेतल्याने पक्षाचे नेतृत्व यासंदर्भात कोणता निर्णय घेतात, याबाबत भारतीय जनता पक्षाच्या वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. (shailesh Tilak)

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे कर्करोगाशी झुंज देत असताना काही दिवसांपूर्वी निधन झाले. या रिक्त जागेसाठीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. काँग्रेसने निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केल्याने निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडूनही निवडणुकीसाठी दंड थोपटण्यात आले आहेत. त्यामुळे, पोटनिवडणूक बिनविरोध करायची की, कोणत्या पक्षाचा उमेदवार द्यायचा याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत एकमताने घेतला जाणार आहे. (Mukta Tilak)

By election | विधानसभेच्या कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर | २७ फेब्रुवारी रोजी मतदान

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

विधानसभेच्या कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

| २७ फेब्रुवारी रोजी मतदान

पुणे| भारत निवडणूक आयोगाने पुणे जिल्ह्यातील २१५- कसबा पेठ व २०५- चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे.

आमदार मुक्ता शैलेश टिळक यांच्या निधनामुळे कसबा पेठची, तर आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या मतदारसंघांमध्ये तत्काळ प्रभावाने निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी मंगळवार ३१ जानेवारी २०२३ रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३ उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असेल. प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी बुधवार ८ फेब्रुवारी २०२३ रोजी होईल. शुक्रवार १० फेब्रुवारी २०२३ उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. त्यानंतर सोमवार २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होईल. गुरुवार २ मार्च २०२३ रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती प्र. उप जिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी दिली आहे.