Analysis | Kasba By-election | भाजपासाठी कसब्याची पोटनिवडणूक सोपी नाही, हे नक्की! 

Categories
Breaking News Political पुणे

भाजपासाठी कसब्याची पोटनिवडणूक सोपी नाही, हे नक्की!

पुणे | कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शहराचे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळते आहे. मात्र भाजपने टिळक परिवार सोडून दुसरा उमेदवार का दिला, याचे कोडे मात्र भाजपच्या लोकांना सुटलेले दिसत नाही. कारण मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक नाराज आहेत. तसेच मतदार संघातील ब्राम्हण समाजाने देखील नाराजी दाखवली आहे. तसेच वारंवार एकाच माणसाला वेगवेगळ्या पदावर संधी दिली जाते, म्हणूनही अंतर्गत कलह आहे. त्यातच महाविकास आघाडी देखील जोरदार तयारी करत आहे. रवींद्र धंगेकर सारखा तगडा उमेदवार आघाडीने दिला तर भाजप साठी ही निवडणूक त्यांना वाटते तेवढी सोपी नसणार हे नक्की मानले जात आहे.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला, पारंपारिक गड मानला जातो. राजकीय धुरंधर मानत होते कि या जागेवर दगड जरी उभा केला तरी भाजपच निवडून येईल. काही काळापूर्वी तशी परिस्थिती होती देखील. मात्र आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. या मतदारसंघावर खासदार गिरीश बापट यांचे वर्चस्व होते. मात्र आता भाजपनेच तीच परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे बापट मागे पडले होते. शिवाय बापटांना त्यांची तब्येत देखील आता साथ देत नाही. बापट यांना जनमानसातील नेता म्हणून ओळखले जायचे. बापट लोकांबरोबर वागायचे देखील तसेच. त्यामुळे कसबा पेठ फक्त भाजपचाच राहिला. बापट खासदार झाल्यामुळे मुक्ता टिळक यांना इथे संधी  मिळाली. त्यांनी संधीचं सोनं केलं. मात्र नियतीनं डाव टाकला आणि मुक्ता टिळक यांना हे सुख फार काळ लाभू दिले नाही. मुक्ता टिळक यांच्या निधनाने इथे पोटनिवडणूक घ्यावी लागत आहे.
पोटनिवडणुकीसाठी बऱ्याच इच्छुकांची नावे  चर्चेत होती. यामध्ये टिळक पिता पुत्र म्हणजे शैलेश टिळक आणि कुणाल टिळक, हेमंत रासने, गणेश बिडकर आणि धीरज घाटे यांचा समावेश होता. मात्र पक्षाने हेमंत रासने यांना संधी दिली आहे. त्यामुळे आता नाराजी वाढताना दिसून येत आहे. शैलेश टिळक यांनी फडणवीस यांच्याकडे ही नाराजी बोलून दाखवली आहे. साक्षात गिरीश महाजन याना टिळकांची मनधरणी करण्यासाठी केसरी वाड्यावर यावे लागले. मात्र एवढ्याने टिळकांचे समाधान होणार नाही. तसेच ब्राम्हण समाजाने देखील उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे. या मतदारसंघात अपेक्षित होते कि टिळक परिवारातील आणि ब्राम्हण समाजाचाच उमेदवार दिला जाईल. मात्र तसे न झाल्याने लोक नाराज झाले आहेत.
भाजपने कितीही नाकारले तरी भाजपने उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत जे केलं, तो प्रसंग विसरायला लोक तयार नाहीत. अजूनही त्यांच्याविषयी लोकांमध्ये सहानुभूती आहे. तसेच भाजपविषयी रोष देखील. तसेच भाजपमध्ये अंतर्गत कलह देखील आहे. कारण हेमंत रासने याना महापालिकेत 4 वेळा स्थायी समितीचा अध्यक्ष बनण्याची संधी देण्यात आली होती. त्यानंतर आता आमदारकी साठी देखील त्यांचेच नाव पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे हा रोष वाढतानाच दिसतो आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीने ही निवडणूक खूप गंभीरतेने घेतली आहे. कारण टिळक घराण्यातील जरी उमेदवार दिला असता तरी आघाडी ही निवडणूक बिनविरोध नकरता लढणारच होती. हे भाजपच्या गोटात कळायला उशीर लागला नाही. त्यामुळेच भाजपला देखील तशी तयारी करावी लागत आहे. कसबा मतदार संघात सर्व जाती धर्माचे लोक राहतात, फक्त ब्राम्हण समाज नाही. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा इथल्या लोकांशी चांगला संपर्क आहे. शिवाय महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष आणि कार्यकर्ते मानतात कि धंगेकर उमेदवार असतील तर आम्ही प्रामाणिकपणे काम करू. असं झालं तर महाविकास आघाडीचं पारडं जड होईल. भाजपासाठी सध्या तरी जमेच्या गोष्टी कमी आहेत. भाजपला काहीतरी चमत्कार करावा लागणार. तसा तो होऊही शकेल. मात्र पोटनिवडणूक सोपी नाही, हे नक्की आहे.