Covid | कोविड च्या पार्श्वभूमीवर मुंबई पुण्यासह दहा जिल्ह्यांवर विशेष लक्ष

Categories
Breaking News social आरोग्य पुणे महाराष्ट्र

कोविड च्या पार्श्वभूमीवर मुंबई पुण्यासह दहा जिल्ह्यांवर विशेष लक्ष

| आरोग्य मंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांच्या सूचना

| पुनर्रचित कोविड टास्क फोर्सची बैठक

पुणे | मुंबई, पुणे आणि ठाणेसह दहा अति जोखमीच्या जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्यात यावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत.
कोविड-१९ च्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी उपाययोजनांबाबत आयोजित केलेल्या विशेष कार्यदलाच्या बैठकीत ते बोलत होते.
 पुनर्रचित टास्क  फोर्स सदस्यांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते.  पुणे येथील आरोग्य सेवा संचालनालय कार्यालयातून डॉ. सावंत यांनी सदस्यांशी संवाद साधला. यावेळी संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, अतिरिक्त संचालक तथा टास्क फोर्सचे सदस्य सचिव डॉ. रघुनाथ भोये उपस्थित होते. टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके, सदस्य लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर, डॉ. रमण गंगाखेडकर, डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. हर्षद ठाकूर, आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
डॉ. सावंत म्हणाले, कोविड-१९ चाचण्यांची संख्या वाढवावी. आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या मॉकड्रीलमध्ये आढळलेल्या त्रुटींचे तत्काळ निराकरण करावे. मास्कचा वापर करण्याबाबत जनतेला आवाहन करण्यात यावे. जत्रा, मॉल, थिएटर, बाजार अशा गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरण्याबाबत आवाहन करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
कोविड बाधितांना मेटाफॉर्मिन गोळीचा फायदा दिसून येतो. पण या गोळीचा प्रोटोकॉलमध्ये समावेश नाही, असे यावेळी डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितले. यावर या गोळीचा रुग्ण बरे होण्यासाठी मदत होत असल्यास त्याबाबतचे संशोधन टास्क फोर्सच्या सदस्यांना उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून त्याबाबत पुढील कार्यवाही करता येईल, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
कोविडच्या सध्याच्या व्हेरियंटची लागण झाल्यावर रुग्णांना ऑक्सिजनची विशेष गरज भासत नाही. पण संसर्ग पाहता कोविडची लागण झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना मास्क वापरणे बंधनकारक करावे, असे डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले.
कोविड चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळा कार्यान्वित आहेत का याची खात्री करावी, नियमित पर्यवेक्षण करावे, प्रयोगशाळांची क्षमता वाढवावी, अशा सूचना डॉ. सावंत यांनी दिल्या.
कोविडच्या सध्याच्या व्हेरियंटची लागण जास्त जोखमीची नाही. लक्षणे सौम्य स्वरूपाची आहेत. हा संसर्ग पंधरा मेपासून कमी होऊ लागेल, असे सर्व सदस्यांनी बैठकीत सांगितले.

Minister of Higher and Technical Education | कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांच्या “पूर्णशुल्क माफी” निर्णयाची अंमलबजावणी करावी |  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांचे निर्देश

Categories
Breaking News Education Political social महाराष्ट्र

कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांच्या “पूर्णशुल्क माफी” निर्णयाची अंमलबजावणी करावी

|  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांचे निर्देश

 

कोविड काळात ज्या विद्यार्थ्यांचे आई, वडील, पालकांचा मृत्यू झाला आहे, अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तर शिक्षण अर्धवट राहू नये किंवा ते विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांची संपूर्ण फी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्या निर्णयाची यावर्षीही काटेकोरपणे अमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

विद्यार्थी हीत लक्षात घेता अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये, किंवा त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विद्यापीठ, अनुदानित महाविद्यालय यांनी याकडे विशेष लक्ष द्यावे, असेही उच्च शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.