Warje Sahitya Katta | वारजे साहित्य कट्ट्यावर डॉ. रामचंद्र देखणे ग्रंथालयाचे उद्घाटन

Categories
Breaking News cultural पुणे महाराष्ट्र

वारजे साहित्य कट्ट्यावर डॉ. रामचंद्र देखणे ग्रंथालयाचे उद्घाटन

पुणे : आपण भौतिक सुखाच्या मागे धावत चाललोय. आपल्याकडे रस्तोरस्ती भरपूर खाऊगल्ल्या होतायत पण ग्रंथालय होत नाहीत. पण वारजे परिसरात ग्रंथालयाची निर्मिती होत असेल तर ती आनंदाची गोष्ट असून यामुळे परिसराचा वैचारिक विकास होणार आहे. असा विचार सर्व लोकप्रतिनिधींनी करणं गरजेचं असल्याचं मत साहित्यिक डॉ. संगीता बर्वे यांनी व्यक्त केलं.

माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्या प्रयत्नांतून पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती आणि वारजे साहित्यिक कट्टाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या साहित्यिक स्व.डॉ.रामचंद्र देखणे ग्रंथालयाचे उद्घाटन प्रसिद्ध बालसाहित्यिका डॉ. संगीता बर्वे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी माधवी वैद्य, दिपाली धुमाळ, माजी नगरसेवक व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, मलिक्कर्जून नवांदे , भावार्थ देखणे, पूजा देखणे, पद्मश्री देखणे, देखणे, धर्मराज महाराज हांडे, गणेश भगत, ज्योत्स्ना चांदगुडे, वी. दा. पिंगळे उपस्थित होते. यावेळी बर्वे यांचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्य कट्टा वारजेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

बर्वे म्हणाल्या जागोजागी ग्रंथालये झाली तर वैचारिक दृष्ट्यापरिपक्व महाराष्ट्र तयार होईल. ज्यांनी लोककलेच्या मध्येमातून समाजाला घडवण्याचं काम केलं त्या डॉ. रामचंद्र देखणे यांच्या नावाने हे ग्रंथालय सुरू होत आहे. देखणे सरांची आणि माझी पहिली भेट सांगलीतील एका कार्यक्रमात झाली. त्यांनी सादर केलेली लोककला पाहून मी भारावून गेले होते.

रोजच्या दिनक्रमातून बाजूला जाऊन ज्यावेळी वारकऱ्यांची वैद्यकीय सेवा करण्यासाठी वारीत सहभागी झाले होते. त्यावेळी पुन्हा सरांची भेट झाली. एका गावात झाडाच्या पारावर ते लोककलेच्या माध्यमातून प्रबोधन करत होते. या वारीतला अनुभव फार वेगळा होता. त्यावेळी सुचलेल्या ओळी मी सरांना दाखवल्या त्यावेळी त्यांनी ही कविता नसून अभंग आहे असे कैतुक केले.

देखणे सर आपल्यातून लवकर निघून जाणे समाजाची फार मोठी हाणी आहे. तहान भूक हरवून सरांसारखी लोक समाजासाठी काम करत असतात. अशा लोकांची काळजी समाजाने घेणं गरजेचं आहे.

या उद्घाटन सोहळ्यानंतर शब्दब्रम्ह या चार दिवसीय व्याख्यानमालेचा प्रारंभ करण्यात आला पहिल्या दिवशी महाराष्ट्राची लोककला या विषयावर डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे यांचे व्याख्यान झाले. प्रास्तविक बाबा धुमाळ यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन डी.के. जोशी यांनी केले.

Gangadhar Gadgil Literary Award | कवयित्री कथाकार प्रज्ञा दया पवार यांना ‘गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार’ जाहीर

Categories
Uncategorized

कवयित्री कथाकार प्रज्ञा दया पवार यांना ‘गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार’ जाहीर

वासंती गंगाधर गाडगीळ विश्वस्त निधीतर्फे दर तीन वर्षांनी दिला जाणारा ‘गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार’ या वर्षी मराठीतील सुप्रसिद्ध कवयित्री आणि कथाकार प्रज्ञा दया पवार यांना जाहीर झाला आहे.

मराठी साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या लेखकाच्या लेखनातली नावीन्य, मौलिकता लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी साहित्यिकाची निवड केली जाते. पंचवीस हजार रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मराठी समीक्षा क्षेत्रातले दिग्गज समीक्षक डॉ. सुधा जोशी आणि डॉ. हरिश्चंद्र थोरात यांनी एकमताने प्रज्ञा दया पवार यांची निवड या पुरस्कारासाठी केली. प्रज्ञा दया पवार यांनी आपल्या लेखनात, विशेषत्वाने कवितेत दाखवलेले नावीन्य आणि त्यांच्या लेखनाची मौलिकता लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

दि. १५ सप्टेंबर या गाडगीळांच्या स्मृतिदिनी या पुरस्काराची घोषणा पॉप्युलर प्रकाशनातर्फे करण्यात आली आहे.    गंगाधर गाडगीळांनी १९८३ साली ‘वासंती गंगाधर गाडगीळ विश्वस्त निधी’ सुरू केला होता. १९९३ साली त्यांच्या सत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या तिघा मुलांनी — कल्पना गटमन, अभिजित गाडगीळ आणि चित्रलेखा गाडगीळ यांनी — या विश्वस्त निधीत भर घालून ‘गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कारा’ची योजना तयार केली. १९९४ साली या पहिल्या पुरस्कारासाठी श्याम मनोहर यांची निवड करण्यात आली होती.

गंगाधर गाडगीळ हे पॉप्युलर प्रकाशनाचे पहिले लेखक. त्यांचे आणि रामदास भटकळ यांचे मैत्र लेखक-प्रकाशक नात्यापलीकडचे होते. त्यामुळेच हा पुरस्कार द्यायचे जेव्हा निश्चित झाले त्यावेळी त्याची जबाबदारी पॉप्युलर

प्रकाशनाने घ्यावी अशी इच्छा गाडगीळांनी व्यक्त केली. खरेतर तेव्हा गाडगीळ अनेक साहित्य संस्थांशी संबंधित होते. अशाच एखाद्या संस्थेकडे ही जबाबदारी सोपवणे योग्य ठरेल, असे त्यांना सांगण्याचा प्रयत्न भटकळांनी केला तेव्हा, “माझ्या दृष्टीने पॉप्युलर प्रकाशन ही देखील एक साहित्य संस्थाच आहे,” असे गौरवोद्गार गाडगीळांनी पॉप्युलरविषयी काढले होते.

गाडगीळांनी सोपवलेली ही जबाबदारी गेली अठ्ठावीस वर्षे पॉप्युलरने आनंदाने पार पाडली आहे. या अठ्ठावीस वर्षांत एकूण नऊ पुरस्कार दिले गेले. श्याम मनोहरांनंतर रत्नाकर मतकरी, विलास सारंग, वसंत आबाजी डहाके, नामदेव ढसाळ, मकरंद साठे, राजीव नाईक, जयंत पवार आणि प्रवीण बांदेकर या लेखकांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

प्रज्ञा दया पवार यांनी कथा, नाटक या वाङ्मयप्रकारांतही लेखन केले असले तरी त्या प्रामुख्याने कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी महाविद्यालयीन काळातच लेखनाला सुरुवात केली. ‘अंतस्थ’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह १९९३ साली प्रकाशित झाला होता. त्यानंतर ‘उत्कट जीवघेण्या धगीवर’, ‘मी भिडवू पाहतेय समग्राशी डोळा’, ‘आरपार लयीत प्राणांतिक’ आणि ‘दृश्यांचा ढोबळ समुद्र’ असे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्या शिवाय ‘धादांत खैरलांजी’ हे नाटक आणि ‘अफवा खरी ठरावी म्हणून’ हा कथासंग्रहही त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या ‘दृश्यांचा ढोबळ समुद्र’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन पॉप्युलर प्रकाशनाने केले आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक दया पवार यांच्या त्या कन्या आहेत.