‘Employment fair’ | पुण्यात १२ एप्रिलला ‘रोजगार मेळावा’ | दरमहा दुसऱ्या बुधवारी आयोजन

Categories
Breaking News Education social पुणे महाराष्ट्र

पुण्यात १२ एप्रिलला ‘रोजगार मेळावा’ | दरमहा दुसऱ्या बुधवारी आयोजन

पुणे|नोकरी इच्छुक युवक-युवतींना नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह यांच्या माध्यमातून उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने प्रत्येक महिन्याला रोजगार मेळावा अर्थात ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’चे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत २०२३-२४ मधील पहिला रोजगार मेळावा येत्या १२ एप्रिल २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हे कार्यालय वेळोवेळी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात रोजगार मेळावे आयोजित करुन, सर्व स्तरातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहे. याचाच एक पुढील टप्पा म्हणून आता प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी या कार्यालयामध्येच प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याप्रसंगी विविध पदांकरिता वेगवेगळ्या पात्रतेच्या उमेदवारांची तात्काळ नोकरभरती आवश्यक आहे अशा कंपन्यांच्या प्रतिनिधींना या कार्यालयात उमेदवारांच्या थेट प्रत्यक्ष मुलाखती घेण्याकरिता पाचारण करण्यात येणार आहे. या मुलाखतींना प्रत्यक्ष हजर राहून पात्र होतील अशा उमेदवारांना लगेच जागेवरच नोकरीची संधी मिळणार आहे.

पुणे जिल्ह्यातील नोकरीइच्छुक युवक-युवतींनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. नोंदणी नसल्यास प्रथम आपली नावनोंदणी करावी आणि होमपेजवरील नोकरीसाधक (जॉब सीकर) लॉगीन मधून आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे.

उमेदवारांनी लॉगीन केल्यानंतर डॅशबोर्ड मधील ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर’ या बटनावर क्लिक करुन प्रथम पुणे विभाग व नंतर पुणे जिल्हा निवडून त्यातील ‘1st PLACEMENT DRIVE-PUNE’ या रोजगार मेळाव्याची निवड करावी. उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती घ्यावी आणि आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन उचित असलेल्या रिक्तपदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंतीक्रम नोंदवावा.

ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी बुधवार १२ एप्रिल रोजी समक्ष जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे-११ येथे आपल्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहून या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या या महापर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्र. सहाय्यक आयुक्त सागर मोहिते यांनी केले आहे.
000

Employment Fair | बेरोजगार युवकांच्या हाताला मिळाले काम | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकारातून रोजगार मेळाव्याचे आयोजन

Categories
Breaking News Education Political social पुणे

बेरोजगार युवकांच्या हाताला मिळाले काम

| माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकारातून रोजगार मेळाव्याचे आयोजन

| 30 कंपन्यांचा सहभाग 200 युवकांनी दिल्या मुलाखती

पुणे महापालिकेच्या प्रभाग दोन मधील युवकांसह पुण्यातील अनेक बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळाले आहे. माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकारातून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. येरवडा येथील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड मधील त्रिरत्न बुद्ध विहारात पार पडलेल्या या रोजगार मेळाव्यात 30 कंपन्यांनी सहभाग घेतला होता. 500 जणांनी या मेळाव्याला भेट दिली. 200 जणांच्या मुलाखती झाल्या असून 125 बेरोजगार युवकांना जागेवरच रोजगार उपलब्ध झाला असल्याची माहिती डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिली.

डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने झालेल्या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी भाजपाचे पुणे शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, आरपीआय आठवले गटाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव बाळासाहेब जानराव, माजी नगरसेवक अशोक कांबळे, भाजपा प्रवक्ता मंगेश गोळे, सुभाष चव्हाण आदीसह विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

 

येरवडा परिसरात अनेक विविध नामांकित कंपनी, हॉस्पिटल, मॉल, हॉटेल, कुरियर कंपनी आयटी पार्क आदीसह विविध ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. मात्र युवकांना त्याबाबत कोणतीही कल्पना नसते अथवा त्यांच्यापर्यंत नोकरी उपलब्ध असल्याची माहिती पोहोचत नाही. त्यामुळे युवकांना रोजगार मिळत नाही. परिणामी युवकांमध्ये नैराश्याचे वातावरण पसरत आहे. या बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळावे, रोजगाराच्या संधीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकारातून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्याला युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

या वेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले की, युवक हा देशाच्या विकासाचा कणा आहे. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी युवक मोठे योगदान देत असतात. त्यामुळे त्यांना आर्थिक अंगाने सक्षम करणे ही जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे. याची जाणीव ठेवून युवकांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. त्याचा फायदा युवकांना झाला. अनेकांना जागेवरच रोजगाराची संधी प्राप्त झाली. तर काहींना येत्या काळात लवकरच या संधी उपलब्ध होणार आहे.

सहाय्यक पोलीस उपायुक्त किशोर जाधव म्हणाले की, अनेक कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात. मात्र युवकांनी तिथपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचणे गरजेचे असते. योग्य मार्ग पकडून गेल्यास रोजगार प्राप्त होतो, असे जाधव म्हणाले.

भाजपाचे पुणे शहराध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक म्हणाले की, रोजगार मेळाव्यातून एकाच वेळी अनेक कंपन्यांमध्ये असणाऱ्या संधीची माहिती मिळते. वर्ग 1 पासून ते वर्ग 4 पर्यंतच्या सर्व रिक्त जागांबाबत असणाऱ्या संधी समजतात. रोजगार मेळाव्यातून अशा संधी युवकांना प्राप्त करून घेता येतात. त्यामुळे हा रोजगार मेळावा युवकांसाठी उपयुक्त ठरलेला आहे.
——————————–

Pune NCP : Employment Fair : पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन 

Categories
Education Political पुणे

पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन

पुणे : शहर व परिसरातील तरुण तरुणींना रोजगार मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष  प्रशांत सुदामराव जगताप यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचा शुभारंभ झाला. यावेळी त्यांनी मुलाखतीसाठी आलेल्या सर्व युवक युवतींना शुभेच्छा दिल्या. युवा पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हातभार लागावा ही अत्यंत समाधानाची बाब असून अशाच विविध उपक्रमांतून हा प्रयत्न यापुढेही सुरू असेल हा विश्वास यावेळी श्री. प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला. या रोजगार मेळाव्यास शहरातील युवा वर्गाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. या अंतर्गत तब्बल २०४ युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. या रोजगार मेळाव्याच्या शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रतिनिधी प्रदीप देशमुख, शहर उपाध्यक्ष मिलिंद वालवडकर,  संदीप बालवडकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष  किशोर कांबळे, समन्वयक महेश हांडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.