Governor Ramesh Bais | रमेश बैस महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल | मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ

Categories
Breaking News महाराष्ट्र

रमेश बैस महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल | मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ

 

मुंबई| मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय वि. गंगापुरवाला यांनी रमेश बैस यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली.  बैस हे 20 वे राज्यपाल असून त्यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली. (Ramesh Bais 20th Governor of Maharashtra )

शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या या समारंभास राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, लोकायुक्त विद्यासागर कानडे, राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्या. (नि.) के के तातेड, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी व निमंत्रित नागरिक उपस्थित होते.

सुरुवातीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी राज्यपालांच्या नियुक्तीबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेल्या अधिसूचनेचे वाचन केले. राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात व सांगता झाली. शपथविधी सोहळ्यानंतर भारतीय नौदलातर्फे राज्यपालांना मानवंदना देण्यात आली.

 

राज्यपाल रमेश बैस यांचा परिचय

राज्यपाल रमेश बैस हे पूर्वीचे मध्यप्रदेश व सध्याच्या छत्तीसगड राज्याच्या तसेच राष्ट्रीय राजकारणातील एक आदरणीय नाव आहे.

संसदीय राजकारण, समाजकारण तसेच संघटन कार्याचा तब्बल पाच दशकांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्री. बैस यांनी सार्वजनिक जीवनात नगरसेवक पदापासून केंद्रीय राज्यमंत्री व राज्यपाल पदापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडलेल्या आहेत.

दिनांक 2 ऑगस्ट 1947 रोजी रायपूर (छत्तीसगड) येथे जन्मलेले श्री. बैस यांचे शिक्षण रायपूर येथे झाले.

सन 1978 साली ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सन 1980 ते 1985 या कालावधीत ते मध्यप्रदेश विधान परिषदेचे सदस्य होते. याकाळात त्यांनी मध्यप्रदेश विधानमंडळाच्या अंदाजपत्रक समितीचे तसेच त्यानंतर ग्रंथालय समितीचे सदस्य म्हणून काम केले. सन 1982 ते 1988 या कालावधीत ते मध्यप्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मंत्री देखील होते.

सन 1989 साली श्री. बैस रायपूर येथून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर तब्बल सहा वेळा, म्हणजे एकूण सात वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत.

सन 1998 साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात श्री. बैस यांची पोलाद व खाण मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली.

सन 1999 ते 2004 या कालावधीत त्यांनी रसायने व खते व त्यानंतर माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पहिले.

सन 2003 साली श्री. बैस यांना केंद्रीय खाण मंत्रालयामध्ये राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला व त्यानंतर काही काळ ते केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयात राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) होते.

आपल्या प्रदीर्घ संसदीय जीवनात श्री. बैस यांनी पेट्रोलियम व नैसर्गिक वायु विषयक संसदीय समिती, लोकलेखा समिती, ऊर्जा मंत्रालय सल्लागार समिती, कोळसा आणि खाण मंत्रालयाची हिंदी सल्लागार समिती, नियम समिती आदी समित्यांचे सदस्य म्हणूनही कामकाज पाहिलेले आहे.

सन 2009 ते 2014 या काळात श्री. बैस हे भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद होते. सन 2014 ते 2019 या काळात 16 व्या लोकसभेचे सदस्य असताना ते सामाजिक न्याय व सक्षमीकरण विषयावरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष होते. श्री बैस यांनी दिव्यांग व्यक्ती तसेच तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) व्यक्ती अधिकार सुरक्षा विधेयकासंदर्भात व्यापक संशोधन व अध्ययन केले आहे.

सन 2019 साली श्री. बैस यांची राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली. दिनांक 29 जुलै 2019 ते 13 जुलै 2021 या काळात ते त्रिपुराचे राज्यपाल होते. त्यानंतर दिनांक 14 जुलै 2021 रोजी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली.

नवनियुक्त राज्यपाल श्री. बैस यांना समाजसेवेची आवड असून त्यांनी अनेकदा आरोग्य शिबिरे, नेत्र तपासणी शिबिर, तसेच ग्रामीण भागांमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. श्री. बैस यांनी छत्तीसगड धनुर्विद्या ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे. मध्यप्रदेश बीज व कृषी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.

Girish Gurnani | अखेर केंद्र सरकारला शहाणपण सुचले | गिरीश गुरनानी

Categories
Breaking News Political पुणे

अखेर केंद्र सरकारला शहाणपण सुचले | गिरीश गुरनानी

आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोशियारी यांचा राजीनामा केंद्र सरकारने मंजूर केल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला…नागरिकांना पेढे वाटून,फटाके आणि हलगी वाजवून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. असे कोथरूड विधानसभा युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अवमान राज्यपालांनी केला होता. खरतर तात्काळ त्यांचा राजीनामा घेणं गरजेचं होतं पण नवीन राज्यपाल आधीच्या महोदयांप्रमाणे भाजपच्या हातचे बाहुले बनणार नाहीत, अशी आशा करूयात असे गुरनानी म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा- सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो ! या वेळी शहर युवक अध्यक्ष किशोर कांबळे,कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर,मनोज पाचपुते,ज्योती सूर्यवंशी,समीर उत्तरकर, स्वप्नील जोशी,रोहन पायगुडे,केतन ओरसे,अमोल गायकवाड,अमित खाणेकर,शेखर तांबे,मधुकर भगत, अजू शेख,आरव दिघे,आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

NCP Vs Governor | Video | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून राज्यपालांना शिवरायांची पुस्तके भेट | राज्यपालांना काळे झेंडे ही दाखवले

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून राज्यपालांना शिवरायांची पुस्तके भेट | राज्यपालांना काळे झेंडे ही दाखवले

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांचा अवमान केल्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी (Governor Bhagatsingh koshyari)  हे पहिल्यांदाच पुणे शहरात आले असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (NCP Pune) सर्जिकल स्ट्राइक करत त्यांच्या ताफ्यास काळे झेंडे दाखवत निषेदाच्या व मुर्दाबादच्या घोषणा दिल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाकडून राज्यपालांना छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित पुस्तके (Books) भेट देण्यात आली.  (NCP agitation against Governor)

याबाबत बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की , “छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असणाऱ्या पुणे जिल्ह्यात व कर्मभूमी असणाऱ्या पुणे शहरात महाराजांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांचा विना -निषेध विना- धिक्कार वावर होणे हे आम्हा शिवछत्रपतींच्या मावळ्यांना रुचणारे नव्हते. त्यामुळेच आज त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजभवनाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्याचा इशारा राजभवनास आम्ही दिलेला होता.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आमचे आंदोलन दडण्यासाठी कलम १४९ अन्वये आम्हास नोटीस बजावली होती. तसेच सुमारे शंभर ते दीडशे पोलिसांचा फौज फाटा सकाळी ०७.०० वाजताच माझ्या वानवडीतील निवासस्थानी व जनसंपर्क कार्यालयाबाहेर तैनात करण्यात आला होता. मला ताब्यात घेण्याचा किंवा स्थानबद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न होता परंतु आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असल्याने ही संभाव्य परिस्थिती ओळखून सकाळी साडेसहा वाजताच गनिमी काव्याने मी घर सोडले होते.
राजभवनाला दिलेल्या इशाऱ्यानुसार दुपारी ठीक साडेबारा वाजता आम्ही राजभवनाच्या बाहेर दाखल झालो, राजभवनाच्या गेट जवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते- पदाधिकारी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आंदोलनाचे व्यापक स्वरूप व आक्रमकता पाहता पुणे शहर पोलिसांनी आम्हास विनंती केली , त्यानुसार आमच्यापैकी काही प्रतिनिधींना राजभवनात राज्यपालांना भेटण्यासाठी सोडण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वारंवार अवमानास्पद विधाने करणाऱ्या राज्यपालांना आम्ही इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराजांची काही पुस्तके भेट देण्यासाठी घेऊन गेलो. राज्यपालांची भेट झाल्यानंतर आम्ही ती पुस्तके देत शिवाजी महाराज कोण होते..? , याबाबतची माहिती घेऊन त्यांच्या बाबतचा खरा इतिहास वाचूनच इथून पुढे महाराजांबद्दल वक्तव्य करावे अशी सूचना केली.यावेळी राजभवनात झालेल्या वीस मिनिटांच्या बैठकीत राज्यपालांनी त्यांच्याकडून छत्रपती शिवरायांबद्दल झालेल्या चुकीच्या स्टेटमेंट बद्दल जवळपास चार ते पाच वेळेस दिलगिरी व्यक्त केली. तसेच पुन्हा त्यांच्याकडून अशी चूक होणार नाही याची ग्वाही देखील त्यांनी दिली. आम्ही देखील राज्यपालांना स्पष्ट शब्दात सांगितले की,” केवळ आपल्या घटनात्मक पदाचा व वयाचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निषेधाचे आंदोलन करत आहे. जर पुन्हा अशा प्रकारचे कृत्य आपल्याकडून झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यापेक्षा अधिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरेल”, असा इशारा शहराध्यक्ष प्रशांत जगताप व त्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना दिला.


पुणे शहर ही छत्रपती शिवरायांची भूमी असणाऱ्या पावन शहरात राज्यपालांचा हा उन्माद खपवून घेतला जाणार नाही असा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यपालांना व त्यांना पाठीशी घालणाऱ्या भारतीय जनता पार्टीला आम्ही दिला, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यांनी व्यक्त केले.

या आंदोलनासाठी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, रवींद्र माळवदकर, मृणालिनी वाणी, रुपाली पाटील,किशोर कांबळे, सुषमा सातपुते,संदीप बालवडकर,महेश हांडे, दीपक कामठे,रोहन पायगुडे, ॲड.विवेक भरगुडे, स्वप्निल जोशी, कुलदीप शर्मा आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Congress Vs Governor | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिमेस काँग्रेसचे जोडो मारो आंदोलन 

Categories
Breaking News Political पुणे

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिमेस काँग्रेसचे जोडो मारो आंदोलन

      महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat singh koshyari) भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी (sudhanshu trivedi)  यांच्या विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे (pune city president Arvind Shinde) यांच्य नेतृत्वाखाली बालगंधर्व चौक, झाशीची राणी पुतळा येथे जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी भगतसिंग कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (Congress Vs Governor Bhagat Singh koshyari)

यावेळी बोलताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘महाराष्ट्राचे राज्यपाल हे महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान व त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने नेहमीच करीत असून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा व भाजपाचा छुपा अजेंडा या संविधानिक पदावर बसून राबवित आहेत. त्याचप्रमाणे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी हे इतिहासात नोंद नसलेल्या गोष्टींचा खोटा दाखला देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करीत आहे. सावरकरांबद्दल बोलल्यावर  छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी जाणून बुजून केली जाते याच बरोबर काँग्रेसचे नेते मा. खासदार राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील प्रचंड प्रतिसादालादेखील भारतीय जनता पार्टी घाबरली असून या यात्रेमुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रातील कोणीही व्यक्ती सहन करणार नसून आगामी काळामध्ये महाराष्ट्रातील जनता यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.’’

यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस संजय बालगुडे यांनी ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्यावर सडकून टिका केली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर, वीरेंद्र किराड, रफिक शेख, अजित दरेकर, संगीता तिवारी, बाळासाहेब दाभेकर, कमल व्यवहारे, सोनाली मारणे, मेहबुब नदाफ, शेखर कपोते, द. स. पोळेकर, राजेंद्र शिरसाट, सुजित यादव, सचिन आडेकर, विजय खळदकर, रमेश सकट, अजित जाधव, राजेंद्र भुतडा, रमेश सोनकांबळे, सतिश पवार, सुनिल शिंदे, सौरभ अमराळे, शिवराज भोकरे, संजय खडसे, अक्षय माने, हेमंत राजभोज, रोहन सुरवसे, रवि आरडे, राहुल तायडे, बंडू नलावडे, राजू साठे, वैशाली रेड्डी, ज्योती परदेशी, रेखा घलोत, प्राची दुधाणे, छाया जाधव, विकी खन्ना, अरूण वाघमारे, इंद्रजीत भालेराव, दिलीप लोळगे, लतेंद्र भिंगारे, फैय्याज शेख, संदिप मोरे, विनोद रणपिसे, अविनाश अडसूळ, भगवान कडू, राजू साठे आदीसह असंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

12 MLAs appointed to Legislative Council | राज्यपालांच्या निर्णयाविरोधात याचिका

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

राज्यपालांच्या निर्णयाविरोधात याचिका

विधान परिषदेवर नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न

महाविकास आघाडी सरकारने दिलेली राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नावे रद्दबातल करण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी बारा जणांच्या नावाची शिफारस राज्यपालांना केली होती. यामध्ये साहित्य, शैक्षणिक, संशोधन, कलाकार अशा विविध क्षेत्रांतील गुणी व्यक्तींचा समावेश होता. मात्र राज्यपालांनी वर्ष होऊनही यावर निर्णय घेतला नाही. तसेच संबंधित यादी प्रलंबित ठेवली. आता राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. अशा वेळी पुन्हा नव्याने ही यादी तयार करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेला ॲड. नितीन सातपुते यांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले आहे.

राज्यपालांनी पहिल्या बारा जणांची यादी पूर्ववत ठेवावी, नवीन यादी करण्यासाठी शिंदे सरकारला मनाई करावी, इत्यादी मागण्या याचिकेत करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबाबत याचिका प्रलंबित आहेत, तसेच घटनापीठाकडे संबंधित मुद्यांवर सुनावणी प्रलंबित आहे. अशावेळी अन्य कोणतेही निर्णय घेण्यासाठी शिंदे सरकारला मनाई करावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. याचिकेवर नियमित न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Expansion of the State Cabinet | राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार

राज्यपालांनी 18 नवनियुक्त मंत्र्यांना दिली पद व गोपनीयतेची शपथ

मुंबई |  राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी 18 नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राजभवनातील दरबार हॉल येथे शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

या समारंभास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर उपस्थित होते.

शपथविधी सोहळ्यास सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास प्रारंभ झाला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, डॉ. विजयकुमार गावित, गिरीष महाजन, गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, प्रा.तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा यांना
पद व गोपनीयतेची शपथ दिली.

 

राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात आणि सांगता झाली. या सोहळ्याला नवनियुक्त मंत्र्यांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

Arvind Shinde | Governor | महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी करणाऱ्या सूर्याजी पिसाळ उर्फ भगतसिंह कोश्यारी यांचा जाहिर निषेध | अरविंद शिंदे

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी करणाऱ्या सूर्याजी पिसाळ उर्फ भगतसिंह कोश्यारी यांचा जाहिर निषेध | अरविंद शिंदे

      छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ ज्ञानेश्र्वर महाराज यांच्या आशिर्वादाने पावन झालेली तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारीत ही पावन भूमी असून १०८ हुतात्म्यांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या बलिदानानंतर उभी राहिलेली ही भूमी याचा अपमान राज्याचे बाहेरून आलेले राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी आपल्या भाजपा प्रेमापोटी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. याचा मी सर्वप्रथम निषेध करतो. असे पुणे शहर कॉंग्रेस चे प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले.

   शिंदे पुढे म्हणाले,   ‘‘गुजराती व राजस्थानमधील व्‍यापारी लोकांमुळे मुंबई महाराष्ट्र आहे जर ते नसते तर ही राजधानी आर्थिक राजधानी सुध्दा राहिली नसती.’’ अशा पध्दतीचे वक्तव्य हे निषेधार्य आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून मुंबईमध्ये गुजराती, राजस्थानी अनेक राज्यांतून आलेल्या सर्वांचे मराठी माणसाने मनमोकळ्या पणाने व मोठ्या मनाने स्वागत केले आहे. भाजपाचे राज्यपाल फक्त मतांचे द्रुवीकरण करण्यासाठी असे वक्तव्य करतात याचे आश्चर्य तर वाटतेच परंतु भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील एकाही नेत्याला वाईट वाटू नये याची खंत आहे आणि याबद्दल येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील जनता तुम्हाला जाब विचारल्या शिवाय राहणार नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये १०८ हुतात्म्यांवर कोणी गोळी चालविण्यास लावली हे महाराष्ट्र विसरलेले नाही.

      भाजपाचे राज्यपाल यांनी केलेल्या वक्तव्‍याचा निषेध वास्तविक पाहता मुंबईमध्ये राहणाऱ्या गुजराती व राजस्थानी व्‍यापाऱ्यांनी करायला पाहिजे कारण अनेक राज्यातून आलेल्या लोकांना मराठी माणासांनी साथ दिली नसती तर तेही व्‍यापारी मोठे झाले नसते. खर तर गुजराथी संघटनांनी व राजस्थानी संघटनांनी या वक्तव्‍याचे खंडण आगोदर केले पाहिजे. असे ही शिंदे म्हणाले.

Mumbai Samachar | मराठी – गुजराती हे नाते अधिक दृढ व्हावे | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Categories
Breaking News Political social देश/विदेश महाराष्ट्र

मराठी – गुजराती हे नाते अधिक दृढ व्हावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

| मुंबई समाचार वृत्तपत्राच्या द्विशताब्दी महोत्सवास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित

मुंबई | गेल्या २ वर्षात कोरोना काळात ज्याप्रकारे सर्वच भाषेतल्या पत्रकारांनी, दैनिकांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देत काम केले ते नेहमीच स्मरणात राहील. भारतातील प्रसारमाध्यमांच्या सकारात्मक योगदानामुळेच भारताला शंभर वर्षातील सर्वात मोठ्या आपत्तीला तोंड देण्यास मदत झाली. येणाऱ्या काळात सुद्धा वृत्तपत्र आणि पत्रकारांकडून सकारात्मक पत्रकारिता दिसेल अशी अपेक्षा यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. आजच्या काळात मराठी आणि गुजराती एकमेकांमध्ये दुधात साखरेप्रमाणे विरघळून गेले आहेत, त्यामुळे मराठी – गुजराती हे नाते अधिक दृढ व्हावे हीच माझी सदिच्छा आहे असेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

भारतातील सर्वांत जुने वर्तमानपत्र अशी ओळख असणाऱ्या मुंबई समाचार वृत्तपत्राचा द्विशताब्दी महोत्सव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत वांद्रे कुर्ला संकुल येथे पार पडला. द्विशताब्दी महोत्सव कार्यक्रमाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, मुंबई समाचारचे संचालक होर्मसजी कामा यांच्यासह मुंबई समाचार वृत्तपत्राचे प्रमुख यावेळी मंचावर उपस्थित होते.

मुंबई समाचार वृत्तपत्राचे अभिनंदन करून मोदी आपल्या भाषणात म्हणाले, महाराष्ट्रात एक गुजराती वृत्तपत्र २०० वर्ष पूर्ण करत आहे याचा आनंद आहे. भाषेचे माध्यम जरी गुजराती असले तरी वृत्तपत्राचे उद्दिष्ट राष्ट्रीयत्व जपणे हेच होते. मुंबई समाचार केवळ बातम्यांचे माध्यम नाही तर तो एक समाजाचा वारसा आहे.मुंबई समाचार वृत्तपत्रातून भारताचे दर्शन घडते.अनेक संकटाना तोंड देत भारत कशा प्रकारे अढळ राहिला, याचे दर्शन आपल्याला मुंबई समाचारमधूनही मिळते. येणाऱ्या काळात मुंबई समाचार आपली ही परंपरा टिकवून ठेवेल असा विश्वास वाटतो.समाजाला दिशा देणाऱ्या बातम्या देण्याचे, बातम्यांमधून लोकशिक्षण करण्याचे, समाज आणि सरकारमध्ये काही उणीवा असतील तर त्या वाचकांसमोर आणण्याचे काम वृत्तपत्रांचे आणि प्रसारमाध्यमांचे आहे.

गेली २०० वर्ष सातत्त्याने प्रकाशित होत असलेले मुंबई समाचार हे एक गुजराती वृत्तपत्र असले तरी सर्वसामान्य वाचकांशी त्यांची नाळ जोडली गेली आहे याचा आनंद आहे. मुंबई समाचारने स्वातंत्र्यचळवळीला आवाज दिला आणि नंतर स्वतंत्र भारताची प्रगती देखील वाचकांपर्यंत पोहोचवली;भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि मुंबई समाचार वृत्तपत्राची २०० वर्षे एकाच वर्षी साजरा होणे हे आपल्यासाठी अभिमानाचे आहे. येणाऱ्या काळात मुंबई समाचार वृत्तपत्राने आपला इतिहास वेगवेगळ्या स्वरूपात जगासमोर आणावा जेणेकरून आजच्या पिढीला भारताचा इतिहास समजण्यास मदत होईल, असेही श्री. मोदी यावेळी आपल्या भाषणात म्हणाले.

मुंबई समाचार वृत्तपत्रास शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, मला गुजराती कळते पण बोलता येत नाही. १८२२ पासून सुरू झालेले मुंबई समाचार जगातील आणि देशातील अनेक घटनांचे साक्षीदार आहे.मुंबई समाचारने या सगळ्या ऐतिहासिक घटनांचा आणि पारतंत्र्यातल्या लढ्याच्या त्या वेळच्या बातम्या आणि छायाचित्रांचा संग्रह जतन करावा.

आजच्या काळात वृत्तपत्र चालवणे कठीण आहे.वृत्तपत्र कोण कुठे चुकतंय ते त्यांना दाखवून देणं, पत्रकारांचे कर्तव्य असतं आणि मुंबई समाचार हे कर्तव्य पार पाडत आहे.काही वृत्तपत्र ही स्वातंत्र्य चळवळीमध्ये उभी राहिली आणि टिकली. आज लोकमान्यांच्या केसरी या वृत्तपत्राला देखील १४१ वर्ष झाली आहेत.मुंबई समाचार किंवा लोकमान्यांचा केसरी, आचार्य अत्रे यांचे मराठा असो, हे इतिहासाचे साक्षीदार आहेत. मुंबई समाचारला दोनशे वर्षे पूर्ण झाली आहेत. यापुढे देखील आणखी शंभर, दोनशे वर्ष या वृत्तपत्राने पत्रकारितेचे कार्य करावे आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले.

मुंबई समाचारचे संचालक होर्मसजी कामा यांनी सांगितले की,सर्वात जुने वर्तमानपत्र अशी ओळख असलेले मुंबई समाचार २०० व्या वर्षात पर्दापण करीत आहे.१८२२ मध्ये बॉम्बे समाचार या नावाने साप्ताहिक पेपर म्हणून या वृत्तपत्राची सुरुवात झाली होती.दक्षिण मुंबईतील फोर्ट संकुलाच्या मध्यभागी असलेल्या रेड हाऊस नावाच्या एका गडद लाल इमारतीमध्ये असलेले देशातील सर्वात जुने गुजराती वृत्तपत्र अथा्र्त मुंबई समाचार २०० वर्षाचा टप्पा गाठत आहे.

सलग २०० वर्षे प्रकाशित होणाऱ्या मुंबई समाचारच्या द्विशतकपूर्ती सोहळ्यानिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते एका स्मृती तिकिटाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.

Agricultural awards : कृषी पुरस्कारांच्या रकमेत पाचपटीने वाढ!

Categories
Breaking News cultural महाराष्ट्र शेती

आर्थिक राजधानीसोबत कृषी राजधानी म्हणून महाराष्ट्राची व्हावी नवी ओळख

    : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 :शेतकऱ्यांचा सन्मान हा शासनाचा बहुमान ; कृषी पुरस्कारांच्या रकमेत करणार वाढ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नाशिक : शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल होऊ शकत नाही, असे असले तरी कृषी पुरस्कारांच्या रकमेत वाढ करणार. तसेच संपूर्ण विश्वात जो युगानुयुगे अन्नदाता म्हणून आपले कर्तव्य निभावतोय त्यांचा सन्मान म्हणजे शासनाचा खऱ्या अर्थाने बहुमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शेतकऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

एकीकडे अत्यंत प्रगत तर दुसरीकडे अत्यंत प्राथमिक अवस्थेत असणारी शेती आपल्याला दिसते. हे चित्र बदलायचे असेल तर कृषी विद्यापींठांमधील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून ते मातीत अवतरायला हवे. तसेच देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्राची देशाच्या कृषी क्षेत्राची राजधानी म्हणून नवीन ओळख निर्माण करा, असे आवाहन आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे. ते आज नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते.

 

विद्यापीठाच्या  धन्वंतरी सभागृह शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनी  येथे आयोजित वर्ष सन 2017, 2018 व 2019 च्या या राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (दूरदृश्य प्रणालीद्वारे) उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादाजी भुसे, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, रोजगार हमी फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार सर्वश्री हिरामण खोसकर, दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, नितीन पवार, पद्मश्री पुरस्कार प्राप्त राहीबाई पोपेरे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषि विभागाचे आयुक्त धीरज कुमार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड व इतर अधिकारी उपस्थित होते.

 

 

यावेळी बोलताना राज्यपाल  कोश्यारी म्हणाले, हा देश अनादी काळापासून शेतीप्रधान आहे. इथल्या शेतकऱ्याची भारताचाच नाही तर देशाबाहेरही अन्नदाता म्हणून ओळख आहे. त्यामुळे हा देश सदैव शेतकऱ्यांच्या ऋणात आहे. महाराष्ट्रात शेतीचे नवनवीन प्रयोग होत आहेत. काही प्रयोगांना जी.आय. टॅगिंगही मिळाले आहे. सेंद्रिय शेती व बाजाराच्या मागणीप्रमाणे पीकपद्धतीचा अवलंब केल्याने चारपटीने उत्पन्नात वाढ झाल्याची, शेतीमाल अमेरिका, ब्रिटन सारख्या देशात प्रत्यक्ष निर्यात झाल्याची उदाहरणं मी पाहिली आहेत. एवढच नाही तर हे प्रयोग पाहण्यासाठी उत्तराखंड येथील शेतकऱ्यांनाही आपण आमंत्रित केल्याचे यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सांगितले. उद्योगांनी इथल्या गरीब शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन करताना राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, ज्या शेतकऱ्यांना आज पुरस्कार मिळाले आहेत, त्यांनी आपल्यासोबतचे अनुभव, ज्ञान इतर शेतकरी बांधवांना द्यायला हवे. आपल्यासोबत इतरांनाही पुढे नेत घरात जसे नव्या जन्माचा आनंद आपण घेतो तसा आनंदोत्सव अनुभवावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांना केले.

 

यंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान हा नव्या शेतीचा खरा मुलमंत्र असून ते आत्मसात करण्याबरोबरच शेजारी गुजरात व देशात काही ठिकाणी सुरू असलेल्या नैसर्गिक (प्राकृतिक) शेतीचे प्रयोगही आपण पहायला हवेत. तसेच नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी मधील कमीत कमी जमीनीत करता येण्यासारखा आत्याधुनिक व्हर्टीकल फार्मिंगचा प्रयोगही शेतकऱ्यांना मार्गदर्शक आहे.

 

कोरोनाकाळात संपूर्ण देशाला वाचवण्याचं कार्य आमच्या अन्नदाता शेतकरी बांधवांनी केले आहे. साखर कारखान्यांसाठी इथेनॉल निर्मिती फायदेशीर व अधिक लाभाची असल्याचे सांगत शेतकऱ्यांसाठी राज्य शासन व केंद्र सरकार खूप योजना राबवत आहेत, त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी होते, राहील अशी ग्वाही यावेळी राज्यपाल  कोश्यारी यांनी दिली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आपल्या देशाची ओळख कृषीप्रधान देश म्हणून आहे. त्यामुळे देशातील अन्नदाता शेतकरी राजाच हा देशाचे खरे वैभव आहे. या वैभवाचं मोल एखाद्या पुरस्काराच्या रकमेतून होवू शकत नाही याची आपणा सर्वांना जाणीव आहे, या पुरस्कारांची रचना दशकभरापूर्वीची आहे, आता त्यात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी कृषी विभागास करतांना मुख्यमंत्री म्हणाले, कोविड कालखंडातून जग अजूनही बाहेर पडलेले नाही. परंतु कितीही संकटे आली आणि गेली, मात्र आमचा शेतकरी राजा मात्र ताठ कण्याने उभा होता, तो थांबला नाही, कोरोनात कोलमडणारा संपूर्ण विश्वाचा डोलारा या अन्नदात्याने आपल्या खांद्यावर घेतला. आपल्या सरकारनेही त्याला भक्कम पाठबळ दिले. शहरी लोकांसाठी शेतकरी जीवनाची कल्पना करणे अवघड आहे, गेल्या दोन वर्षांच्या संकटकाळात संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम काम करत होते. शेतकरी मात्र वर्क फ्रॉम होम काम करत असता तर? या प्रश्नांची कल्पनाच आपल्याला जेव्हा असह्य करून सोडते, तेव्हा अपोआपच अन्नदात्याचे महत्व अधोरेखित होते.

 

संपूर्ण लॉकडाऊनमध्ये अहोरात्र शेतात संपूर्ण कुटुंबासह जर कुणी अनलॉक राहिला असेल तर तो आमचा अन्नदाता शेतकरी राजा होता. त्यानेच प्रत्येकाच्या घरांपर्यंत अन्नधान्य, भाजीपाला, फळे पोहचवली आहेत. त्यामुळे जेव्हा संकटं उभी ठाकतात तेव्हा आमचा शेतकरी न डगमगता संकटांशी दोन हात करतो, जिंकतो. मी जेव्हा केव्हा राज्यात दौऱ्यावर जातो तेव्हा आपल्या शेतकरी बांधवांना आवर्जून भेटत असतो. त्यात मोठ्या प्रमाणात महिला शेतकरी मला दिसतात. आजीपासून नातीपर्यंतची पिढी शेतात काम करतांना दिसते. आपण सर्वजण भविष्याचे नियोजन करत असतो. पण शेतात काम करणाऱ्या आजीला नेहमीच नातीच्या रात्रीच्या जेवणाची भ्रांत असते. अशा परिस्थितीतही पद्मश्री राहीबाई पोपेरे सारख्या काही महिला शेतकरी चाकोरीबद्ध शेतीची जीवनशैली बाजुला सारून बीज बॅंकांची संकल्पना आत्मसात करतात. नवनवे प्रयोग करतात, तेव्हा कौतुकाची संकल्पनाही त्यांच्या या कार्यासमोर तोकडी वाटायला लागते, असेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले. ते म्हणाले, शेतीत नवनवे प्रयोग करत असताना आपण परदेशी वाणावर अवलंबून होतो. थोडं पुढे आल्यानंतर पुन्हा आपल्याला मागे वळून पाहताना ‘जुनं तेच सोनं’ म्हणायची वेळ आलीय. असे म्हणतात शेती ही शेतकऱ्यालाच समजते, पण आम्हाला त्यांचे अश्रु नक्कीच समजतात. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर नागपूर अधिवेशनात शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमुक्त केले. त्यानंतर लगेचच कोरोनाचे संकट आले. आता हळूहळू अर्थचक्र पूर्वपदावर येत आहे व नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. महामार्गांच्या विस्तारीकरणातून शेतीचे अर्थकारण थेट पाणंद रस्त्यांपर्यंत विकसित करण्याचा मानस आहे.  ‘विकेल ते पिकेल’ ही संकल्पना आम्ही बाजार संशोधनातून अधिक सक्षम करणार आहोत. शेतकरी सुखात रहायला हवा, त्याचे जगणे सुसह्य करणे हे शासन म्हणून आमचे कर्तव्य तर आहेच, तसेच त्यासाठी वचनबद्ध असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 

अर्थक्षेत्राला कृषीक्षेत्रामुळे लाभली स्थिरता :उपमुख्यमंत्री अजित पवार

 

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, गेल्या दोन वर्षातील कोरोनाच्या संकटकाळात सर्वच क्षेत्रांचे अस्थिरतेचे सावट असताना कृषी क्षेत्राचे नुकासान मर्यादित राहिले, त्यामुळे सर्वच क्षेत्रांची व्यवस्था कोलमडत असताना कृषीक्षेत्राने अर्थक्षेत्राला स्थिरता दिली. शेती आणि श्रमाची प्रतिष्ठा पुन्हा वाढली असून ती भविष्यातही अशीच वाढत राहील. शासनाने कर्जमुक्ती केली. टप्याटप्याने भविष्यात प्रोत्साहनपर योजनांचाही विचार आहे. परंतु सर्वी सोंगं आणता येतात पैशांचे आणता येत नाही, त्यामुळे प्रत्येकाने आता स्वत:ला आर्थिक शिस्त लावायला हवी. 10 टक्के व्याजदराने सावकारी कर्ज घेण्यापेक्षा शुन्य टक्के व्याजदराने कर्ज घेवून सरकारी योजनांची लाभ घ्यायला हवा. जे विकेल तेच पिकवायला हवे. पूर्वी दुसऱ्या देशातून शेतीमालाची आयात आपण करत होतो आज आपण स्वयंपूर्ण आहोत. आपल्या शेतीमालाला आता परदेशातून मोठ्या प्रमाणावर मागणी होतेय.  असे सांगून ते म्हणाले कमी वेळेत कमी पाण्यावर, रोगाला बळी न पडणारे वाण आता आपण विकसित करायला हवे. त्यासाठी राज्यातील 50 वर्षे पूर्ण करणाऱ्या दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांना 50 कोटी संशोधनासाठी शासनामार्फत दिले जाणार आहेत.

 

शेती शाश्वत होण्यासाठी पुरक व्यवसाय करण्याचे आवाहन करत उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, आपण उत्पादित करत असलेले धान्य हे रसायनमुक्त असायला हवे, त्यासाठी लक्ष द्यावे लागेल. सेंद्रिय औषधांची निर्मितीसाठी संशोधन व त्याचा वापरही आपल्याला वाढवावा लागेल. ऊसाची शेती किफायतशीर होण्यासाठी शेतातील ऊस संपेपर्यंत कारखाने चालू ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला असून कारखान्यांना त्यासाठी किलोमीटरप्रमाणे सबसिडी दिली जाणार आहे. तसेच मदत म्हणून 200 टनापर्यंत रिकव्हरी लॉस ची योजना आणली आहे. येणाऱ्या काळात साखर कारखाने चालवायचे असतील तर इथेनॉल निर्मितीशिवाय पर्याय नसल्याचे सांगून कोळश्याच्या संकटामुळे भारनियमन टाळण्यासाठी सोलर उर्जेचा अंगिकार आपण करायवसास हवा. पुण्यात लवकरच अत्याधुनिक सेवा सुविधांनीयुक्त कृषी भवनच्या जुन्या इमारतीची नवनिर्मिती केली जाणार असून त्यामध्यमातून शेती, मातीची दैनंदिन अद्ययावत माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.  शेतकरी जगला तर राज्य जगेल तो मोडला सर्वच मोडेल म्हणून शेतकऱ्यांसाठी शासन मागे होणार नाही, असा विश्वासही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला.

 

 कृषी पुरस्कारांच्या रकमेत पाचपटीने वाढ

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनांचा धागा पकडत राज्याच्या कृषी पुरस्कारांमध्ये पाचपटीने वाढ करण्याची घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली, ते म्हणाले

 

तीन वर्षांच्या पुरस्कारासाठी 51 लाखांची तरतूद करावी लागली परंतु यापुढे या पुरस्कारासाठी पाचपट वाढीव तरतूद केली जाईल. तसेच मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेतून शेतीच्या मुल्यवर्धनावरही भर दिला जाईल. शेतीच्या बाजारपेठेला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यावर शासनाचा भर आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात हवामानाचा अचूक अंदाज शेतकऱ्यांना थेट बांधावर उपलब्ध करून देणार असल्याचेही यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

 

 

95th All India Marathi Literary Conference : साहित्य संमेलनात राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध  : जेम्स लेन च्या निषेधासह 20 ठराव 

Categories
Breaking News cultural महाराष्ट्र

साहित्य संमेलनात राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध 

: जेम्स लेन च्या निषेधासह 20 ठराव 

उदगीर : ब्रिटिश लेखक जेम्स लेन याने ‘शिवाजी – हिंदू किंग इन मुस्लिम इंडिया’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि मातोश्री जिजामाता यांच्याबद्दल हेतुतः बदनामीकारक लेखन केल्याबद्दल त्याचा निषेध करण्याचा ठराव ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सत्रात मांडण्यात आला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे निषेध करण्यात आला. उदगीरला जिल्ह्याचा दर्जा द्यावा, यासह एकूण वीस ठराव झाले.

अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीत निश्चित झालेल्या वीस ठरावांचे वाचन महामंडळाचे कार्यवाह दादा गोरे यांनी संमेलनाच्या समारोप सत्रात केले. २००४ मध्ये वादंगाचे कारण ठरलेल्या जेम्स लेन या ब्रिटिश लेखकाचा निषेध करणारा ठराव महामंडळाने यानिमित्ताने अठरा वर्षांनी केला. तसेच, ‘छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, मातोश्री जिजाबाई आणि शाहू महाराज यांच्याविषयी बदनामीपर लेखन करणाऱ्या किंवा व्यक्तिगत पातळीवर सभा-संमेलनात जाहीरपणे विकृत बुद्धीने बोलणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तींचा हे संमेलन तीव्र निषेध करीत आहे’, असा ठराव मांडत महामंडळाने राज्यपाल कोश्यारी यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
.सीमाप्रश्न निकाली काढावागोव्यात मराठी भाषिक बहुसंख्य असतानाही मराठीला डावलून कोकणी राजभाषा केल्याचा वाद संमेलनाच्या निमित्ताने उफाळून आला होता. त्या अनुषंगाने गोव्यात मराठी राजभाषा करावी, अशी मागणी करणारा ठरावही मांडण्यात आला. या संमेलनाच्या निमित्ताने सीमाभागाचा मुद्दाही चर्चेच्या केंद्रस्थानी होता. सीमावर्ती भागातील लोकांचे प्रश्नही चर्चेला आले होते. त्यामुळे सीमाभागाच्या वादाचे प्रकरण महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पूर्ण शक्तीनिशी लढवावे, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न तातडीने निकाली काढावा, असा ठरावही मांडण्यात आला.
अन्य ठराव असे
उदगीरला जिल्ह्याचा दर्जा द्यावा
केंद्राने लवकरात लवकर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा
 मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडणार नाहीत यासाठी कृती कार्यक्रम आखावेत
बोलीभाषा, आदिवासी भाषांच्या संवर्धनासाठी ‘बोलीभाषा अकादमी’ स्थापन करावी
सीमाभागातील मराठी शाळा, महाविद्यालयांना आर्थिक मदत करावी
 मराठी भाषा व मराठी भाषिकांवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारचा निषेध
 बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषेसाठी स्वतंत्र मराठी विभाग स्थापन करावा
महाराष्ट्र परिचय केंद्रांची स्थापना करावी
 स्वतंत्र मराठी विद्यापीठाचे स्वरूप ठरविण्यासाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या समितीवर साहित्‍य महामंडळाचा प्रतिनिधी घ्यावा
दूरदर्शन, आकाशवाणीवरून साहित्य संमेलनाचे प्रक्षेपण निःशुल्क करावे
 मराठी भाषा धोरण त्वरित मंजूर करावे
 केंद्र- राज्य सरकारने कोरोनाग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी
 उदगीर येथे पशुवैद्यकीय विद्यापीठ स्थापन करावे
उदगीर किल्ला, हत्तीबेट पर्यटनस्थळाला पर्यटन क्षेत्राचा ‘अ’ दर्जा द्यावा.