Prithviraj Sutar | क्ष-किरण तपासण्या ज्येष्ठ नागरिकांसाठी त्वरीत मोफत सुरू कराव्यात | अन्यथा आंदोलन करण्याचा पृथ्वीराज सुतार यांचा इशारा 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

क्ष-किरण तपासण्या ज्येष्ठ नागरिकांसाठी त्वरीत मोफत सुरू कराव्यात

| अन्यथा आंदोलन करण्याचा पृथ्वीराज सुतार यांचा इशारा

पुणे | पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या क्ष-किरण तपासण्या मोफत आरोग्य तपासणी योजनेअंतर्गत करण्यात येत होत्या. मात्र आरोग्य अधिकाऱ्यांच्या आदेशाने या तपासण्या मोफत करणे बंद करण्यात आले आहे. यामुळे जेष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे क्ष-किरण तपासण्या ज्येष्ठ नागरिकांसाठी त्वरीत मोफत सुरू कराव्यात, अशी मागणी शिवसेना माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी आरोग्य अधिकारी डॉ आशिष भारती यांच्याकडे केली आहे. तसे नाही झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील सुतार यांनी दिला आहे.

सुतार यांच्या पत्रानुसार पुणे मनपाच्या मार्फत क्रस्ना डायग्नोस्टीक्स कडून कमला नेहरू रूग्णालय व कै. जयाबाई सुतार दवाखाना कोथरूड येथे पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या क्ष-किरण तपासण्या मोफत आरोग्य तपासणी
योजनेअंतर्गत करण्यात येत होत्या, त्याचा फार मोठा फायदा पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाना होत होता. परंतु आरोग्य विभागा मार्फत  २० जून २०२२ रोजी लेखी पत्राद्वारे क्रस्ना डायग्नोस्टीक्स सेटरला कळविण्यात आले की आपण फक्त पॅथालॉजीच्या तपासण्या उदा. हिमोग्राम, युरीन, रक्त, इ या मोफत कराव्यात व क्ष-किरण तपासण्या मोफत करू नयेत. यामुळे ज्येष्ठ नागरिकांची मोठी अडचण व गैरसोय झाली असून, याबाबत ज्येष्ठ नागरिक मोठया प्रमाणावर तक्रार करीत आहेत. हा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकावरती अन्याय करणारा निर्णय आहे. आम्ही या पत्राद्वारे आपल्याकडे पूर्वीप्रमाणेच क्ष-किरण तपासण्या ज्येष्ठ नागरिकांसाठी त्वरीत मोफत सुरू कराव्यात अशी मागणी करीत असून, आपण त्वरीत मोफत तपासण्या सुरू केल्या नाहीत तर आमच्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकाच्या सहकार्याने तीव्र आंदोलन आपल्या दालनात करण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी आपली राहील, असे ही सुतार यांनी म्हटले आहे.

Required Doctors : महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेला आवश्यक डॉक्टरांचे ‘बूस्टर’ कधी मिळणार? : रिक्त पदांमुळे आणि काहींच्या सततच्या गैरहजेरीमुळे आरोग्य व्यवस्थेवर  ताण! 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेला आवश्यक डॉक्टरांचे ‘बूस्टर’ कधी मिळणार?

: रिक्त पदांमुळे आणि काहींच्या सततच्या गैरहजेरीमुळे आरोग्य व्यवस्थेवर  ताण!

पुणे : पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात आवश्यक डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. शिवाय जे लोक भरलेले आहेत, त्यांना वरिष्ठांचे सुरक्षा कवच असल्याने त्यातील काही सतत गैरहजर असतात. त्यामुळे महापालिकेच्या 65 हॉस्पिटल आणि 19 मॅटर्निटी हॉस्पिटल चा भार अवघ्या 104 डॉक्टरांवर आहे. जिथे 237 डॉक्टर ची गरज आहे, तिथे प्रत्यक्षात 104 डॉक्टर काम करतात. याचाच अर्थ आवश्यकतेपेक्षा निम्म्याहून कमी लोकांत काम चालले आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने परवानगी देऊनही आवश्यक डॉक्टरची भरती झालेली नाही. असे असेल तर पुणेकरांचे आरोग्य कसे सुधारणार? त्यामुळे आवश्यक डॉक्टर्स चा बूस्टर आरोग्य व्यवस्थेला कधी मिळणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

: प्रत्यक्ष कामासाठी खूप कमी डॉक्टर!

पुणे शहराची आरोग्य व्यवस्था चांगली राहावी, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रयत्न होतात, मात्र ते तोकडे पडताना दिसून येत आहेत. महापालिकेच्या वतीने शहरात 65 हॉस्पिटल आणि 19 मॅटर्निटी होम निर्माण करण्यात आली आहेत. या रुग्णालयात MBBS आणि BAMS डॉक्टर असणे आवश्यक आहे. त्यानुसार महापालिकेत MBBS डॉक्टर्स ची 216 पदे मान्य करण्यात आली आहेत. मात्र त्यापैकी 59 पदे रिक्त आहेत. सद्यस्थितीत 157 डॉक्टर्स भरती केलेले आहेत. त्यापैकी वर्ग 1 गटाचे 14 डॉक्टर्स आहेत; तर 19 लोक सतत गैरहजर असतात. दोन जणांना निलंबित करण्यात आले आहे. त्यानुसार उरतात 122 डॉक्टर्स. त्यापैकी 17 डॉक्टर्स हे zmo/wmo आहेत. TB विभागासाठी साठी 3 डॉक्टर्स तर PNDT विभागासाठी 2 डॉक्टर्स आहेत. CHS साठी 5 तर MOH दोन डॉक्टर आहेत. म्हणजेच रुग्णालयात प्रत्यक्ष कामासाठी फक्त 93 डॉक्टर उरतात.
तशीच काहीशी स्थिती BAMS डॉक्टर्सची आहे. मान्य पदे 21 आहेत. त्यापैकी फक्त 7 पदे भरण्यात आली आहेत. तर त्यातही 3 डॉक्टर्स हे zmo/wmo आहेत. म्हणजे प्रत्यक्ष कामासाठी 4 च डॉक्टर उपलब्ध आहेत. दरम्यान NUHM साठी 10 डॉक्टर देण्यात आले आहेत.  म्हणजेच एकूण 237 लोकांपैकी फक्त 104 च लोक दवाखान्यातील प्रत्यक्ष कामासाठी उपलब्ध आहेत.

: राज्य सरकारने परवानगी देऊनही पदे रिक्त

कोविड च्या कालावधीत आरोग्य व्यवस्थेवर ताण जाणवत होता म्हणून महापालिकेने राज्य सरकारकडे आवश्यक पदांची भरती करण्याची मागणी केली होती. राज्य सरकारने विशेष बाब म्हणून या भरतीला मंजुरी देखील दिली होती. महापालिका आरोग्य विभागाने फक्त विशेषज्ञ लोकांचीच भरती केली. त्यामुळे आवश्यक पदाकडे लक्ष गेलेच नाही. त्याचा ताण आता आरोग्य व्यवस्थेवर जाणवत आहे. परिणामी याचा फटका पुणेकरांना सहन करावा लागत आहे.
आता राज्य सरकारने भरती वरील बंदी उठवली आहे. सामान्य प्रशासन विभागाने देखील भरतीची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानुसार डॉक्टरांची ही रिक्त पदे भरून पुणेकरांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आरोग्य विभागाकडून व्यक्त केली जाते आहे.

Teleconsultation service : पुणे महापालिका 54 दवाखान्यात देणार टेलिकन्सल्टेशन सेवा! 

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणे महापालिका 54 दवाखान्यात देणार टेलिकन्सल्टेशन सेवा!

: विशेष तज्ज्ञाचे मार्गदर्शन घेतले जाणार

पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने महापालिकेच्या 54 दवाखान्यात आरोग्य वर्धिनी केंद्र स्थापन केली आहेत. या केंद्रात आता महापालिका टेलिकन्सल्टेशन सेवा देणार आहे. या माध्यमातून विशेष तज्ज्ञाचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. त्याचा उपयोग शहरातील नागरिकांना उपचार देताना होणार आहे. लवकरच ही सेवा सुरु केली जाणार आहे. अशी माहिती महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ वैशाली जाधव यांनी दिली.

नागरिकांच्या उपचारात होणार मदत

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरात विविध ठिकाणी दवाखान्यांची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये नागरिकांना नाममात्र दरात उपचार केले जातात. नागरिकांना चांगले उपचार मिळावेत यासाठी आरोग्य विभागाने अजून एक पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या 54 दवाखान्यात आरोग्य वर्धिनी केंद्र स्थापन केली आहेत. या केंद्रात आता महापालिका टेलिकन्सल्टेशन सेवा देणार आहे. या माध्यमातून विशेष तज्ज्ञाचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. त्याचा उपयोग शहरातील नागरिकांना उपचार देताना होणार आहे.
याबाबत माहिती देताना सहायक आरोग्य अधिकारी डॉ वैशाली जाधव यांनी सांगितले कि, टेलिकन्सल्टेशन या सेवेच्या माध्यमातून महापालिका दवाखान्यातील डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकारी विशेष तज्ज्ञाचे मार्गदर्शन घेतील. या मार्गदर्शनानुसार नागरिकांवर उपचार केले जातील. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारचे तीन हेल्थ मॅनेजर देखील  नियुक्त करण्यात आले आहेत. डॉ जाधव यांनी पुढे सांगितले कि यासाठी महापालिकेच्या 54 आरोग्य वर्धिनी केंद्रात साधन सामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार लवकरच ही सेवा सुरु केली जाणार आहे.

Cancer Hospital : Hemant Rasane : Multispeciality Hospital : बाणेर आणि वारजेत होणार १००० कोटींची महापालिकेची रुग्णालये

Categories
Breaking News PMC पुणे

बाणेर आणि वारजेत होणार १००० कोटींची महापालिकेची रुग्णालये

: मल्टिस्पेशालिटी आणि कर्करोगाच्या रुग्णालयांच्या प्रस्तावाला मान्यता

 

पुणे : बाणेर येथे ७०० कोटी रुपयांचे कर्करोग रुग्णालय आणि वारजे येथे ३५० कोटी रुपयांचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली असल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, महापालिकेच्या अंदाजपत्रकात कॅन्सर रुग्णालय आणि मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. खासगी संस्थांच्या सहकार्यातून ही दोन रुग्णालये डिझाइन-बिल्ट-फायनान्स-ऑपरेट-ट्रान्सफर (डीबीएफओटी) तत्वावर उभारण्यात येणार आहेत. त्यानुसार आज स्थायी समितीत प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.

रासने म्हणाले, वारजे येथे सध्याच्या प्रभाग क्रमांक ३० मध्ये मल्टिस्पेशालिटी रुग्णालयासाठी आर सेव्हन अंतर्गत जागा आरक्षित करण्यात आली आहे. या ठिकाणी १० हजार ५६४ चौरस मीटर इतकी जागा उपलब्ध आहे. डीबीएफओटी तत्वावर हे रुग्णालय संबंधित संस्थेला तीस वर्षांसाठी चालविण्यासाठी देण्यात येणार आहे. संबंधित संस्था रुग्णालय उभारणे आणि त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ पुरविण्यासाठी निधी पुरविणार आहे. या ठिकाणचे काही बेड मोफत, काही बेड सीजीएचएस दराने आणि काही बेड खासगी दराने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यातून महापालिका उत्पन्नही मिळणार आहे. प्रकल्पासाठी निविदाधारकाला कर्ज घेता येणार आहे. या कर्जाची परतफेड करण्याची हमी महापालिका संबंधित वित्त संस्थेला देणार आहे. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे.

रासने पुढे म्हणाले, मुंबईतील टाटा रुग्णालयाच्या धर्तीवर कर्करोग या आजारावर उपचार करणारे एकही स्वतंत्र रुग्णालय पुणे शहर किंवा पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये नाही. कर्करोगाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अशाप्रकारचे रुग्णालय उभारणे आवश्यक आहे. सध्या देशात एक लाख लोकसंख्येमागे ९० कर्करोगाचे रुग्ण आहेत. या आजारावरील उपचार खूपच खर्चिक आणि दीर्घकालीन असतात. सर्वसामान्य गरीब नागरिकांना हा खर्च परवडत नाही. महापालिकेतर्फे अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय उभे केल्यास नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. प्लॅन, डिझाइन, बिल्ट, इक्विप, फायनान्स (पीडीबीआईएफ) या तत्वावर खासगी संस्थेमार्फत या रुग्णालयाची उभारणी करण्यात येणार आहे. संबंधित संस्था कर्ज घेऊ शकते. महापालिका या कर्जफेडीची हमी घेणार आहे. कर्करोग रुग्णालयासाठी बाणेर परिसरात जागा उपलब्ध आहे. या प्रकल्पासाठी ७०० कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे.