Jyotiraditya Shinde | देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय कार्गोची सोय पुणे विमानतळावर कार्यान्वित करणार | केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची घोषणा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय कार्गोची सोय पुणे विमानतळावर कार्यान्वित करणार

केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची घोषणा

पुणेः  देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय कार्गोची सोय पुणे विमानतळावरून (Pune Airport) कार्यान्वित करणार असल्याची घोषणा केंद्रीय हवाई वाहतूक व पोलाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) येथे केली. लोहगाव विमानतळ येथील बहुप्रतिक्षित व बहुचर्चित असलेल्या मल्टिलेव्हल अत्याधुनिक पार्किंगची (Multilevel Parking) सुविधा देणाऱ्या ‘ एरोमाॅल’ चे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील, लोकसभा आमदार समितीचे अध्यक्ष व खासदार गिरीश बापट, राज्यसभेतील खासदार वंदना चव्हाण, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे, एअरपोर्ट अॅथाॅरिटी आॅफ इंडियाचे दिल्लीचे कार्यकारी संचालक अनिल गुप्ता, पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
“कार्गोची ही सेवा मुंबईपाठोपाठ पुणे विमानतळावरून उपलब्ध होणार आहे. पुण्याचा विस्तार हा मोठ्या प्रमाणात होत आहे. कला, संस्कृती, व्यापार, औद्योगिकनगरी अशी या शहराची क्षमता व गुणवैशिष्ट्य आहे. पुण्याचा नावलौकिक केवळ देशाच्याच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचविण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. यासाठी आवश्यक त्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे,” शिंदे यांनी सांगितले.
१२ नोव्हेंबरपासून बँकाॅकची थेट विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. पाठोपाठ आता १ डिसेंबरपासून सिंगापूरलाही थेट विमान सेवा सुरू होईल असे मी आश्वस्त करतो. आयटी व अन्य उद्योगव्यवसायाच्या विस्तारासाठी देशांतर्गतसह आंतरराष्ट्रीय कार्गोची सोय पुणे विमानतळावर कार्यान्वित करणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
पुणे विमानतळावर नवीन टर्मिनलचा विस्तार मे २०२३ पर्यंत करण्याचा आमचा मानस आहे. यासाठी ५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुण्यात आवश्यक असलेल्या सुविधा व प्रकल्पांसाठी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून आम्ही नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे व यापुढेही देऊ अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. विमानतळ परिसरात देखील याचा प्रत्यय मला आला. त्या अनुषंगाने एरोमाॅलची ही सुविधा पुणेकरांना समर्पित करताना मला विशेष आनंद होतो आहे, असेही शिंदे म्हणाले.
दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरवातीला शिंदे यांचा सत्कार गिरीश बापट यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, शाल व पुष्पगुच्छ देऊन हा सत्कार करण्यात आला. त्यानंतर एएआयचे कार्यकारी संचालक अनिल गुप्ता यांनी खासदार बापट यांचे स्वागत केले.  ‘पेबल्स’ इन्फ्राटेक लिमिटेडचे संचालक रवी जैन यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा सत्कार केला. खासदार वंदना चव्हाण यांचा सत्कार एएआयचे प्रादेशिक कार्यकारी संचालक जे टी राधाकृष्णन यांनी केला व आमदार सुनील टिंगरे यांचा सत्कार ‘ पेबल्स’ चे संचालक सुनील नहार यांनी केला. अनिल गुप्ता यांचा सत्कार पेबल्सचे संचालक अभिजित कोतकर यांनी केला.
खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, लोहगाव विमानतळावर अत्याधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत याचा आनंदच आहे. शहरात नवीन विमानतळ येण्याच्या दृष्टीने आता आवश्यक ती पावले उचलून ती पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
आमदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, नवीन विमानतळाचे काम पूर्ण होण्यास अद्याप अवकाश आहे. त्यामुळे उपलब्ध विमानतळांवर अत्याधुनिक व प्रवाशांच्या सोयीसाठी सुविधा देण्यास आमचे प्राधान्य व प्रयत्न आहे.
खासदार बापट म्हणाले, शिंदे यांनी पुणेकर नागरिकांच्या मागण्यांचा नेहमीच सकारात्मक विचार केला आहे. विमानतळावरील नवीन टर्मिनलसह कार्गो सुविधेबाबतही त्यांनी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दाखविली आहे. कार्गो सुविधेच्या उद्घाटनासाठीही शिंदे यांनीच यावे अशी आमची इच्छा आहे.
पुणे रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने डॉ. शैलेश गुजर व रामदास मारणे यांनी आणलेल्या शिंदेशाही पगडीने ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते खासदार गिरीश बापट यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा काशीकर यांनी केले. रवी जैन यांनी आभार मानले.
————

Aeromall | वाहतूक नियोजनाबाबत आदर्श ठरणाऱ्या मल्टीलेवल पार्किंग (एरोमॉलचे ) आज उद्घाटन | केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांच्या हस्ते होणार उदघाटन

Categories
Breaking News देश/विदेश पुणे

वाहतूक नियोजनाबाबत आदर्श ठरणाऱ्या मल्टीलेवल पार्किंग (एरोमॉलचे ) आज  उद्घाटन

| केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतीरादित्य शिंदे  यांच्या हस्ते होणार उदघाटन

– पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार गिरीश बापट, खासदार वंदना चव्हाण, आमदार सुनील टिंगरे यांची प्रमुख उपस्थिती.
पुणे |  प्रवाशांसाठी बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत असलेल्या मल्टीलेव्हल व  चारचाकी व दुचाकीसाठी अत्याधुनिक पार्किंगची (Multilevel parking) सुविधा देणाऱ्या एरोमॉलचे शुक्रवार, २५ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पालकमंत्री  चंद्रकांत दादा पाटील, खासदार  गिरीश बापट, खासदार वंदना चव्हाण, आमदार  सुनील टिंगरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशी माहिती पुणे विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी दिली. (Pune airport)
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने २०२० साली पेबल्स इन्फ्राटेक प्रायव्हेट लि. च्या सहयोगाने मल्टीलेव्हल पार्किंग प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला.
नव्या मल्टीलेव्हल पार्किंगमुळे पुणे विमानतळावरील पार्किंगचा मोठा प्रश्न सुटणार आहे. १२० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या पाच मजली एरोमॉलमध्ये सुमारे १ हजार चारचाकी व दुचाकींच्या पार्किंगची सोय असणार आहे. केवळ कार पार्किंगच नाही तर येथे प्रवाशांच्या सुविधांसाठी दालने, फुडकोर्ट अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
विमानांची आवागमन स्थिती दर्शविणारे डिस्प्लेज् पार्किंग इमारतींच्या सर्व मजल्यांवर लावण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना विमानांच्या वेळा समजण्यास मदत होणार आहे.
प्रवाशांना मिळणार या सुविधा :
१. मोबाईलअॅप वरून स्लॉट बुक करण्याची सुविधा :
वाहनधारकांना पाच मजली पार्किंग इमारतीमधील पार्किंगची जागा (स्लॉट) निवडणे शक्य असणार आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून घरबसल्या पार्किंगचा स्लॉट बुक करता येणार आहे. हे  अॅप येत्या महिनाभरात सुरू होईल. या अॅपच्या सुविधेमुळे प्रवाशांची गैरसोय थांबणार आहे. प्रवाशांना सुविधा देताना नव्या संकल्पनांचा विचार करण्यात आला आहे.
पेमेंटसाठी अनेकविध पर्याय – प्रवाशांना फास्टस्टॅग, क्रेडिट कार्ड, पे ऑन फूट, मोबाईल अॅप व्दारे पेमेंट करता येईल.
ज्यामुळे प्रवाशांची सोय व इमारतीतून लवकर बाहेर पडण्यास मदत होणार आहे. तसेच ‘फाईंड माय कार’ तंत्रज्ञान सुविधेच्या माध्यमातून आपली कार कोणत्या मजल्यावर पार्क आहे हे जाणता येणार आहे.
३. गोल्फ कारची सुविधा : विमानतळावर येण्या-जाणाऱ्या प्रवाशांना लिफ्ट, फुट ओव्हर ब्रीज, स्वयंचलित जिन्यांची पुरेशा संख्येने सुविधा आहेतच, त्यासोबतच विमानतळ ते कार पार्किंग दरम्यान जाण्या – येण्यासाठी वृद्धांसाठी पर्यावरणपूरक गोल्फ कार्टची (कार) व्यवस्था करण्यात आली आहे. ही सुविधा पूर्णपणे मोफत असणार आहे.
५. प्रवाशांना सोडण्यासाठी बाहेरून येणाऱ्या चालकांना विश्रांतीसाठी येथे खास विश्रांती कक्षाची स्थापन करण्यात आली आहे. तेथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था असणार आहे.
..
२४ तास सेवा
प्रवासी व अन्य नागरिकांकरिता हे पार्किंग बिल्डिंग (एरोमॉल) २४ तास सुरू असणार आहे. येथे त्यांना २४ तास पार्किंग सुविधेसह चांगल्या दर्जाच्या खाद्यपदार्थची चव चाखता येणार आहे. तसेच दुसऱ्या मजल्यावर छोट्या व तातडीच्या व्यावसायिक मिटिंग्जसाठी सशुल्क जागा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
..
ही आहेत वैशिष्ट्ये :
१) ४ लाख ५० हजार स्केअर फूट एवढ्या भव्य पार्किंग इमारतीची (एरोमॉल) निर्मिती.
२) ३ लाख स्केअर फूट जागेचा वापर केवळ पार्किंगसाठी
३) उर्वरित १ लाख ५० हजार स्केअर फूट जागेचा व्यावसायिक वापर.
४) दुसऱ्या मजल्यावरून थेट टर्मिनल क्रमांक एक जवळील प्रस्थान गेट क्रमांक एकवर येता येईल.
५) प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच येथे दोन ट्रॅव्हलेटर फुट ओव्हर ब्रीजवर बसविण्यात येणार आहे.
६) इलेक्ट्रिक वाहनांसाठी पार्किंगमध्येच चार्जिंगची व्यवस्था.
७) इमारतीच्या छतावर सौर ऊर्जेचे पॅनल बसविण्यात आले असून ज्यामाध्यमातून निर्माण होणाऱ्या ग्रीन एनर्जीचा वापर इमारतीसाठी होणार आहे. ज्यातून पर्यावरण संरक्षणासाठीचे प्रयत्न केला गेलेला आहे.
८) २४×७ सेक्युरिटी व सीसीटीव्ही कॅमेरे.
९) सशुल्क ‘वॅले’ कार पार्किंग : पुणे विमानतळावर पहिल्यांदाच प्रवाशांना सशुल्क ‘वॅले’ कार पार्किंग ची सुविधा उपलब्ध असणार आहे.