Mahabudget | ‘पंचामृत’ ध्येयाचा पहिला फटका होर्डिंग धारकांना! | बजेट ची जाहिरात करणे बंधनकारक

Categories
Breaking News PMC Political social पुणे महाराष्ट्र

‘पंचामृत’ ध्येयाचा पहिला फटका होर्डिंग धारकांना!

| बजेट ची जाहिरात करणे बंधनकारक

पुणे | राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प (budget) सादर केला आहे. अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित आहे. असे त्याचे वर्णन केले जात आहे. दरम्यान या पंचामृत चा  फटका मात्र होर्डिंग धारकांना बसणार आहे. कारण सरकारने सादर केलेल्या बजेट ची माहिती लोकांना देण्यासाठी त्याचे बॅनर लावणे होर्डिंग धारकांना बंधनकारक केले आहे. मात्र याला पुण्यातून विरोध होतो आहे. होर्डिंग असोसिएशन ने याला कडाडून विरोध केला आहे.
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेट च्या माध्यमातून खूप योजना दिल्या आहेत. यातून शेतकरी, महिला, शहरी वर्ग, बारा बलुतेदार, अलुतेदार अशा सर्वांनाच खुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित आहे, असे त्याचे वर्णन केले आहे. त्यानुसार आता याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी राज्यातील महापालिकांना कामाला लावण्यात आले आहे. या बजेटची जाहिरात करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार आकाशचिन्ह विभागाच्या उपायुक्तांनी क्षेत्रीय कार्यालयातील परवाना निरीक्षकांना तसे आदेश दिले आहेत. त्यानुसार परवाना निरीक्षक आपल्या हद्दीतील होर्डिंग धारकांना तात्काळ बजेट चे 40 फूट बाय 20 फूट चे फ्लेक्स लावण्याचे आदेश देत आहेत.
मात्र यामुळे होर्डिंग धारक हवालदिल झाले आहेत. अशी जाहिरात करण्याला त्यांनी सक्त विरोध केला आहे. महापालिकेने आधी आमचे प्रश्न सोडवावेत त्यानंतर आम्ही महापालिकेला मदत करू, अशी भूमिका होर्डिंग धारकांनी घेतली आहे.
महापालिकेने आम्हांला असे आदेश दिले असले तरी कुठल्याही मोबदल्याविना अशी जाहिरात करण्यास आमचा विरोध आहे. महापालिकेने आधी आमचे प्रश्न सोडवावेत. त्यानंतर आम्ही याबाबत भूमिका घेऊ.
– बाळासाहेब गांजवे, अध्यक्ष, होर्डिंग असोसिएशन 

Budget | Maharashtra | राज्याच्या विकासासाठी ‘पंचामृतावर’ आधारित सर्वसमावेशक अर्थसंकल्प | उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस

Categories
Breaking News Commerce cultural Political social पुणे महाराष्ट्र

राज्याच्या विकासासाठी ‘पंचामृतावर’ आधारित सर्वसमावेशक अर्थसंकल्प

|  उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस

| ५ लाख ४७ हजार ४५० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

 

राज्याचा २०२३-२४ या वर्षाचा ५ लाख ४७ हजार ४५० कोटींचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत आज सादर केला. या अर्थसंकल्पानुसार महसुली जमा ४ लाख ४९ हजार ५२२ कोटी तर महसूली खर्च ४ लाख ६५ हजार ६४५ कोटी आहे. महसूली तूट १६ हजार ११२ कोटी तर राजकोषीय तूट ९५ हजार पाचशे कोटी ८० लाख रुपये इतकी आहे.

यावेळी वित्तमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, देशाच्या अमृतकाळातील पंचामृतावर आधारित अर्थसंकल्पात ‘शाश्वत शेती- समृद्ध शेतकरी’ या घटकासाठी २९ हजार १६३ कोटी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांच्या सर्वसमावेशक विकासासाठी ४३ हजार ३६ कोटी तरतूद आहे. भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी ५३ हजार ५८ कोटी ५५ लाख तरतूद, रोजगार निर्मिती, सक्षम, कुशल- रोजगारक्षम युवा यासाठी ११ हजार ६५८ कोटी, तर पर्यावरणपूरक विकास या घटकासाठी १३ हजार ४३७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

शेतकरी कल्याणासाठी शेतीच्या विकासासाठी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासन राज्यातील १ कोटी १५ लाख कुटुंबांसाठी ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना’ राबवणार असल्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली. या योजनेतंर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केंद्र आणि राज्यामार्फत 12,000 रुपयांचा सन्माननिधी प्रतिवर्षी मिळणार आहे, त्यासाठी २०२३-२४ मध्ये ६ हजार ९०० कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयांत पीक विमा

या योजनेत आधी विमा हप्त्याच्या दोन टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून घेण्यात येत होती, त्यात आता सुधारणा करण्यात येत असून आता शेतकऱ्यांवर कोणताच भार असणार नाही. राज्य सरकार शेतक-यांचा हप्ता भरणार असल्याने शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांत पीक विमा सुविधा उपलब्ध असणार आहे. त्यासाठी 3 हजार 312 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महा कृषी विकास अभियान

राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी महा कृषी विकास अभियान राबविण्यात येणार असून यामध्ये पीक, फळ पीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत प्रक्रिया तसेच तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार आहे. त्यासाठी पाच वर्षांत 3 हजार कोटी रुपये शासन उपलब्ध करून देईल.

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा आता व्यापक विस्तार

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा आता व्यापक विस्तार करण्यात आला असून आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण, मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर उपलब्ध होणार आहेत. या योजनेवर शासन एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

काजू बोंडावर प्रक्रिया केंद्र, काजू फळ विकास योजना

200 कोटी रुपयांच्या भांडवलासह कोकणासाठी काजू बोर्डची निर्मिती करण्यात आली असून काजू बोंडापेक्षा प्रक्रिया केलेल्या काजू बोंडाला सात पट अधिक भाव आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी कोकणात काजू बोंड प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. कोकण, चंदगड तसेच आजरा (कोल्हापूर) येथे काजू फळ विकास योजना राबविणार असून त्यासाठी येत्या 5 वर्षांसाठी 1 हजार 325 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून राबवण्यात येणार असून आता दोन लाख रुपयांपर्यंत लाभ मिळेल. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त महाराष्ट्रात ‘श्री अन्न अभियान’ राबविण्यात येणार आहे,त्यासाठी 200 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद असून सोलापुरात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.

नागपूर येथे कृषी सुविधा केंद्र, विदर्भात संत्रा प्रक्रिया केंद्र

नागपूरमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करणार असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार हा त्याचा उद्देश आहे. या केंद्रासाठी २२७ कोटी ४६ लाख रुपये देणार आहे. नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल, कळमेश्वर, अमरावती जिल्ह्यात मोर्शी व बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रासाठी 20 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांतील केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत देण्यात येणार आहे. अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट त्यांच्या आधार बँक खात्यात प्रतिवर्ष, प्रति शेतकरी 1800 रुपये देण्यात येणार आहे.

शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना निवारा-भोजन

कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारण्यात येणार असून जेवणासाठी शिवभोजन थाळी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

महिलांसाठी विविध सुविधा

‘मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना राबविण्यात येणार असून पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना याचा लाभ मिळणार आहे. जन्मानंतर मुलीला 5 हजार रुपये, पहिलीत चार हजार रुपये, सहावीत 6 हजार रुपये, तर अकरावीत 8 हजार रुपये या टप्प्याने मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये मिळणार आहेत.

नोकरी करणाऱ्या महिलांना सध्या मासिक १० हजार रुपयांपेक्षा अधिक वेतन असल्यास व्यवसाय कर भरावा लागतो. महिलांची क्रयशक्ती वाढविण्यासाठी ही मर्यादा वाढवून २५ हजार रूपये करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामुळे मासिक २५ हजार रुपयांपर्यंत वेतन असलेल्या महिलांना कोणताही व्यवसाय कर भरावा लागणार नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेत तिकिट दरात महिलांना 50 टक्के सवलत असणार आहे. तसेच शासन लवकरच चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर, तर कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर तसेच मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना करण्यात येईल. त्यासोबतच महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रित पर्यटन धोरण तयार करण्यात येईल.

‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार केले जाणार आहेत. अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना राबविण्यात येईल.

या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा दिल्या जातील. या योजनेत 50 नवीन ‘शक्तीसदन’ निर्माण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदी आवास घरकुल योजना

इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरांची ‘मोदी आवास घरकुल योजना’सुरु करण्यात येईल. यासाठी येत्या तीन वर्षात 12 हजार कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येतील. यापैकी या योजनेत यावर्षी 3 लाख घरे बांधणार असून त्यासाठी 3600 कोटी रुपये खर्च होणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेत 4 लाख घरे बांधण्यात येणार असून त्यातील 2.5 लाख घरे अनुसूचित जाती-जमातीसाठी, तर 1.5 लाख इतर प्रवर्गासाठी असतील. रमाई आवास योजनेत 1.5 लाख घरांसाठी 1800 कोटी रुपयाची तरतूद असून यातील किमान 25 हजार घरे मातंग समाजासाठी असतील. शबरी, पारधी, आदिम आवास अंतर्गत 1 लाख घरे 1200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येतील.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहती अंतर्गत 50,000 घरांसाठी 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये 25 हजार घरे विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी, तर धनगर समाजासाठी 25 हजार घरे असतील.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद असून यामध्ये आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यानासाठी 50 कोटी, मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिव चरित्रावरील उद्यानासाठी 250 कोटी रुपये, शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवन चरित्रावर संग्रहालय उभारण्यात येईल. शिवकालिन किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी राज्याचा स्वत:च्या कर महसूलाचा सुधारित अंदाज रूपये दोन लाख ७५ हजार ७८६ कोटी आहे. यामध्ये वस्तू व सेवाकर, मूल्यवर्धित कर, मुद्रांक शुल्क व नोंदणी फी, राज्य उत्पादन शुल्क या करांचा वाटा दोन लाख ४३ हजार ४११ कोटी आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी राज्याचे स्वत:च्या कर महसूलाचे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट रूपये दोन लाख ९८ हजार १८१ कोटी एवढे निश्चित करण्यात आले आहे. राज्य शासनातर्फे प्रस्तावित असलेल्या विविध आर्थिक उपाययोजनांमुळे हे उद्दिष्ट पूर्ण होईल,असे श्री.फडणवीस म्हणाले.

व्यवसाय कर अधिनियमामध्ये ‘दिव्यांग व्यक्तीची’ व्याख्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार सुधारित करण्याचे प्रस्तावित आहे. या सुधारणेमुळे व्यवसाय कर सुटीसाठी पात्र ठरणाऱ्या दिव्यांग व्यक्तींच्या संख्येत वाढ होईल. तसेच व्यवसाय करातून सूट देण्याची प्रक्रिया सोपी होईल. हवाई वाहतुकीला प्रोत्साहन आणि आर्थिक विकासाला गती देण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका आणि रायगड जिल्हा या भौगोलिक क्षेत्रांत विमान चालन चक्की इंधनावरील (ATF) मूल्यवर्धित कराचा दर मूल्यवर्धित २५ टक्के वरून बंगळूर व गोव्याच्या समकक्ष १८ टक्के करण्याचे प्रस्तावित केले आहे.

वस्तू व सेवा कर कायदा लागू होण्यापूर्वी राज्य कर विभागातर्फे राबविण्यात आलेल्या विविध कायद्यांच्या संदर्भात ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती व विलंब शुल्क योजना यांच्या थकबाकीची तडजोड योजना – २०२३’ ही अभय योजना जाहीर करण्यात आली असून या अभय योजनेचा कालावधी दिनांक ०१ मे, २०२३ ते दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ असेल. दिनांक ०१ मे, २०२३ रोजी प्रलंबित असलेल्या थकबाकीसाठी ही योजना लागू राहील. वैधानिक आदेशानुसार कोणत्याही वर्षासाठीची, व्यापाऱ्याची थकबाकी रुपये दोन लाखांपर्यंत असल्यास, ही रक्कम त्या वर्षासाठी पूर्णपणे माफ करण्याचे प्रस्तावित आहे. या अभय योजनेचा लाभ लहान व्यापाऱ्यांना अंदाजे एक लाख प्रकरणांत होईल. कोणत्याही वैधानिक आदेशानुसार व्यापाऱ्यांची थकबाकी रुपये ५० लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा प्रकरणात एकूण थकबाकीच्या २० टक्के रक्कम भरल्यास उर्वरित ८० टक्के रकमेस माफी देण्यात येईल. लहान व मध्यम व्यापाऱ्यांना याचा लाभ अंदाजे ऐंशी हजार प्रकरणांत होईल, असे वित्तमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

CM Eknath Shinde | प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा, विकासाचे चक्र गतिमान करणारा अर्थसंकल्प | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा, विकासाचे चक्र गतिमान करणारा अर्थसंकल्प  | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गेल्या दोन अडीच वर्षातले राज्याच्या प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा आणि महाराष्ट्राला देशात एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अर्थसंकल्पातील “पंचामृत” महाराष्ट्राच्या विकासाचे चक्र गतिमान करणारे आहे. गोरगरीब,शेतकरी, महिला यांना न्याय देतांना उद्योग , पायाभूत सुविधांना वेग देणारा हा गेल्या दहा वर्षातील सर्वोत्कृष्ट अर्थसंकल्प असल्याचे ते म्हणाले.

राज्याच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, उत्तम अर्थतज्ञ, विकासाची दूरदृष्टी असलेल्या उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प राज्याला निश्चितपणे एक ट्रीलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी मार्ग सुकर करेल .

समाजातील सगळ्या घटकांवर विकासाच्या रंगांची उधळण करणारा हा अर्थसंकल्प घामाला दाम, कष्टाला मान, विकासाचे चोफेर भान देणारा असून तो शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसणारा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

*शेतीसाठी भरीव तरतूद*

नमो शेतकरी महासन्मान निधीचा दीड कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार असून महाकृषी विकास अभियान योजनेमुळे राज्यात क्रांती होणार आहे. केवळ एक रुपयात पिक विमा घेता येणार असल्याने मोठा दिलासा शेतकऱ्याला मिळणार आहे. मागेल त्याला शेततळेचा विस्तार वाढविणे असो किंवा विदर्भ, मराठवाड्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम देणे असो, ५००० गावांत जलयुक्त शिवार, सिंचनाचे विविध प्रकल्प पूर्ण करणे यासाठी या अर्थसंकल्पात केलेली तरतूद निश्चितच भरीव आहे.

*महिलांचे सक्षमीकरण होणार*

चौथ्या सर्वसमावेशक महिला धोरणाची अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय नोकरदार महिलांसाठी केंद्राच्या मदतीने ५० वसतिगृहे, निराधार व निराश्रित महिलांसाठी नवीन ५० शक्ती सदन, एसटी बस प्रवासात सरसकट ५० टक्के सूट, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ, महिला खरेदीदाराला स्टॅम्प ड्युटीमध्ये एक टक्का सवलत दिल्याने तसेच लेक लाडकी योजना पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींना लागू केल्याने महिला सक्षमीकरण होणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

*दुर्लक्षित घटकांना न्याय*

अर्थसंकल्पात दुर्लक्षित घटकांना सुद्धा न्याय देण्यात आला आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, धनगर समाजाला १ हजार कोटी, ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ देणे, ज्येष्ठांसाठी प्रत्येक पालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्र, महात्मा जोतिराव फुले जनारोग्य योजनेत उपचाराची मर्यादा ५ लाखापर्यंत वाढविणे, निराधारांना अर्थसहाय वाढविणे, यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रकल्पबाधित मासेमारांना नुकसानभरपाईसाठी धोरण राबविण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. विविध असंघटित कामगार, विविध दुर्लक्षित समाजांसाठी महामंडळे स्थापल्यामुळे ते मुख्य प्रवाहात येतील. आदिवासी आश्रमशाळांनाआदर्श बनविण्याचा निर्णय, ही महत्वाचा आहे.

*सर्वांसाठी घरे*

यावर्षी १० लाख घरांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आखण्यात येत असून इतर मागासवर्गीयांसाठी ३ वर्षात १० लाख घरांची “मोदी आवास घरकुल योजना” सुरु केल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर घरांचे बांधकाम होऊन हक्काचा निवारा मिळेल.

*पायाभूत सुविधांनी राज्यात बदल*

राज्यात महामार्गांचा विस्तार, नवीन रस्ते मेट्रो प्रकल्प, बसस्थानकांचे आधुनिकीकरण, विमानतळांचा विकास, यामुळे राज्यात बदल दिसून यायला सुरुवात होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

*रोजगारक्षम युवा शक्ती*

उद्योगांना कुशल मनुष्यबळासाठी १० उत्कृष्टता केंद्रे , आयटीआयचे आधुनिकीकरण, ७५ हजार शासकीय पद भरती, स्टार्टअपसाठी नवी मुंबईत कळंबोली येथे निवासी प्रशिक्षण संशोधन संस्था तसेच राज्यात ६ प्रमुख शहरांत सर्क्युलर इकॉनॉमी पार्क उभारणे यासारख्या योजनांमुळे विशेषत: तरुणांना लाभ होईल आणि त्यांच्या करियरला मदत होईल, अशीही प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.

*मुंबईचा सर्वांगीण विकास*

मुंबईच्या सुशोभिकरणासाठी १७२९ कोटींचा खर्च अर्थसंकल्पात केल्याने मुंबईचे रूप बदलेल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, इंदू मिल येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक तसेच हिंदुह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे यांच्या स्मारकाला त्याचप्रमाणे राज्यातील इतरही स्मारकांना वाढीव निधी देऊन गती देण्यात येंत आहे.

*पर्यटनाला देखील चालना*

श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्मृत्यर्थ आष्टी, वर्धा येथे स्मारक, धार्मिक क्षेत्रांचा विकास यामुळे महाराष्ट्राचे वैभव वाढेल. राज्याच्या पर्यटन आराखड्यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे. विकास करतांना तो पर्यावरणपूरक असेल याची देखील काळजी घेण्यात आली आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी कर, व्याज, शास्ती, व विलंब शुल्क थकबाकीची तडजोड योजना व्यावसायिकांना दिलासा देणारी असेल असे सांगितले.

Mahabudget | राज्याच्या अर्थसंकल्पाबद्दल विरोधी पक्षांना काय वाटते?

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

 विरोधी पक्षांना बजेट बद्दल काय वाटते?

राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला. याबाबत विरोधी पक्षांनी जोरदार टीकेची झोड उठवली आहे.

मुंबई पाठोपाठ राज्यातील सर्वाधिक महसूल पुणे शहरातून जमा होतो. मात्र, राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहे. विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पुरंदर विमानतळ, रिंग रोड, पुणे मेट्रोतील नवीन मार्ग यांनाही पुरेशा निधीची तरतूद न करता केवळ वाटण्याच्या अक्षता दाखविन्याचे काम शिंदे- फडणवीस सरकारने केले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गत वर्षी सादर केलेल्या अनेक योजनांची नावे बदलून त्या मांडण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुणेकरावर अन्यायकारक असा अर्थसंकल्प आहे.

– सुनील टिंगरे, आमदार, वडगाव शेरी.

—— 

“पुणेकरांना गृहीत धरत, त्यांना ठेंगा दाखविण्याचे काम या बजेट ने केले आहे”

राज्याचे अर्थमंत्री म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडलेले हे पहिलेच बजेट आहे. पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्यासाठी बंडखोर आमदारांचा विचार करून मांडलेले हे बजेट आहे.

या बजेट मधून राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील जनतेला काहीही मिळालेले नाही. पुणे शहर व पुणे जिल्ह्याचा विचार करता पुणेकरांना गृहीत धरत, त्यांना ठेंगा दाखवण्याचे काम देवेंद्रजी फडणवीस यांनी केले आहे. आज झालेले बजेट पाहता, नुकत्याच कसबा विधानसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवातून देखील देवेंद्रजी फडणवीस यांनी काहीही बोध घेतलेला नाही असे यातून दिसून येते.

– प्रशांत सुदामराव जगताप.
अध्यक्ष, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.

——-

अंगणवाडी ताईंच्या मानधनात तुटपुंजी वाढ, एस. टी महामंडळाच्या दुरावास्थेकडे सपसेल दुर्लक्ष, जुनी पेन्शन योजना लागू करण्यास नकार, वाढत्या महागाईने जनता होरपळत असताना पेट्रोल, डिझेल, गॅस वरील टॅक्स मध्ये एक छदाम ही या सरकारने कमी केलेला नाही. पुणे शहराच्या गरजा लक्षात घेऊन या सरकारने या शहरातील विविध विकास कामांना प्राधान्य द्यायला हवे होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसबा पोटनिवडणूकीत प्रचाराला येऊन मोठं मोठ्या घोषणा केल्या होत्या त्या सर्व घोषणाचा अर्थसंकल्पात सरकारला सोईस्कर विसर पडलेला दिसतोय. हे सरकार पडतंय कां टिकतंय हे या सरकारलाच माहित नसल्यामुळे निव्वळ घोषणांचा पाऊस पण प्रत्यक्ष लोकांना कोणताच दिलासा नाही असा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर झाला.

– सोनाली मारणे, सचिव.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.


राज्याचा अर्थसंकल्प फक्त आकडेवारी देऊन फुगा तयार करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न होता या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले कुठलीही भरीव मदत शेतकरी बांधवांना मिळालेली नाही तसेच जुन्या पेन्शन योजनेचा गंभीर मुद्दा दुर्लक्षित करण्यात आला या अर्थसंकल्पात उत्तर महाराष्ट्राला झुकते माप दिलेले नाही शेतकऱ्यांना कुठलीही भरीव मदत झालेली नाही दत्तक घेतलेल्या नाशिकला अर्थमंत्र्यांनी दुर्लक्षित ठेवले हे अत्यंत दुर्दैवी आहे.

– *आकाश छाजेड*
अध्यक्ष, महाराष्ट्र एस.टी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) आणि
अध्यक्ष, नाशिक शहर काँग्रेस कमिटी


बोलाचाच भात अन बोलाचीच कडी…

शिंदे – फडणवीस सरकारने शेती आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा अर्थसंकल्प आज सादर केला आहॆ. नमो शेतकरी सन्मान योजनेच्या थातूर मातूर मलम पट्टीमुळे शेतकऱ्यांच्या विज बिल माफिबद्दलचे देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन लोकं विसरतील ही यांची अपेक्षा दिसतेय. शेतकरी विज बिलाबद्दल अवाक्षर ही नाही. शेतकऱ्यांना लुटून खाजगी कंपन्याची तुंबडी भरणाऱ्या पंतप्रधान पिक विमा योजनेतून या कंपन्यांपुढेच या अर्थसंकल्पात सरकारने लोटांगण घेतलं आहॆ. नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याबद्दल सरकार मूग गिळून गप्प आहॆ. 75 हजार नोकर भरतीबद्दल या अर्थसंकल्पात साधा उल्लेख ही नाही, बेरोजगार युवकांना वाऱ्यावर सोडणाऱ्या या सरकारचा मी निषेध करतो.

– हनुमंत पवार, प्रवक्ता.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.


असंघटित कामगारांसाठी महामंडळ तयार करण्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती परंतु त्याचे अंमलबजावणी झालेली नव्हती आता नव्याने पुन्हा एकदा सरकारने त्याचीच घोषणा केली आहे निधी मात्र कोणत्याही त्यासाठी जाहीर केलं नाही कशा पद्धतीची निर्मिती असणार या संदर्भातही काही भाष्य सरकारने केलेले नाही सध्या अस्तित्वात असलेले घरेलू कामगार कल्याण मंडळ निधी अभावी 2014 सालापासून आजपर्यंत त्याचे कामकाज पूर्णपणे थांबले आहे त्याचबरोबर माथाडी मंडळ राज्यामध्ये विविध ठिकाणी आहेत त्या मंडळातील कर्मचारी स्टाफ हा उपलब्ध नाही त्यामुळे तिथले काम अतिशय मंद गतीने चालू आहे त्यासाठी नोकर भरतीची घोषणा गरजेचं होतं परंतु त्या संदर्भातली कुठली घोषणा नाही एकंदरीतच सगळी नव्याने उदयास येत असलेल्या खूप मोठ्या प्रमाणावरच काम क्षेत्र आहे ज्या कामगार क्षेत्राला कोणताही कामगार कायदा लागू नाही त्यांची उपेक्षाच या सरकारने केली आहे

– सुनील शिंदे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेस

——

राज्याला दिशाभूल करणारा अर्थसंकल्प – पृथ्वीराज चव्हाण

: शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज विधानसभेत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला. अर्थसंकल्पातून रोजगार निर्मिती नाही. शेतीसाठी ठोस तरतूद नाही, आरोग्य, शिक्षणाकडेही अपेक्षित फोकस नाही त्यामुळे अत्यंत निराशाजनक व दिशाभूल करणारा हा अर्थसंकल्प आहे, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर व्यक्त केले.

यापुढे बोलताना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, काल सादर केलेला आर्थिक पाहणी अहवाल एक चिंताजनक स्थिती प्रस्तुत करतो. महाराष्ट्राचा आर्थिक विकासदर हा पहिल्यांदाच देशाच्या आर्थिक विकासदराच्या खाली गेलेला आहे. आतापर्यंतची परंपरा आहे कि, आपला राज्याचा आर्थिक विकासदर हा देशाच्या आर्थिक विकसदरापेक्षा ४ ते ५ टक्के तरी अधिक असतो. जर आपण महाराष्ट्राला देशाचं आर्थिक इंजिन मानतो तर आज महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न पाचव्या क्रमांकावर गेलेलं आहे, हि चिंताजनक बाब आहे. तेलंगणा, कर्नाटक, हरियाणा, तामिळनाडू हि राज्ये आपल्या पुढे गेलेली आहेत. ती परिस्थिती बदलण्याकरिता काहीही उपाययोजना नाहीत.

आज शेतकऱ्यांना सरकारकडून दोनच महत्वाच्या अपेक्षा असतात एक म्हणजे पिकवलेल्या धान्याला किफायतशीर मोबदला व हमीभावाचा शाश्वती आणि दुसरा नैसर्गिक आपत्तीमध्ये सरकारकडून योग्य ती भरपाई. पण या दोन्हीबाबतीत सरकारचे जैसे थे धोरण आहे. राज्यातला शेतकरी सरकारकडे आसा लावून बसला आहे. कारण दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत कोणतेही घोषणा आज सरकाकडून झालेली नाही. सरकारच्या या वेळकाढू धोरणामुळे शेतकरी हवालदिल होत आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी नुसार शेतकऱ्याला खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन केंद्राने दिले होते. परंतु त्याबद्दल राज्य सरकारकडून कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसून येत नाही.

कालच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार कृषी व उद्योग आर्थिक विकासदर हा मंदावलेला दिसतो. राज्य सरकार फक्त सामंजस्य कराराची यादी जाहीर करते पण त्या कंपन्या राज्यात आल्या कि नाही याबाबत कोणतेही भाष्य केले जात नाही. अनेक मोठे उद्योग शेजारच्या राज्यात हायजॅक केले आहेत. त्याचबरोबर केंद्राच्या PLI योजनेअंतर्गत किती हायटेक नवीन उद्योग आपल्या राज्यात आले?

केंद्र सरकारच्या एका अहवालानुसार गेल्या ४५ वर्षात सर्वात मोठी बेरोजगारी आपल्या देशात आहे म्हणजे ती परिस्थिती आपल्या राज्यात सुद्धा आहे. याबाबत राज्य सरकारने कोणतेही धोरण स्पष्ट केलेले नाही. आज राज्य सरकारमध्ये २ लाख ३० हजार पदे रिक्त आहेत पण सरकारने आज पुन्हा ७५ हजार पद भरतीची घोषणा केलेली आहे. त्या कधी पूर्ण करणार आहेत याचे ठोस नियोजन दिसत नाही.

उद्योगांच्या बाबतीत सामंजस्य कराराबाबत सरकार सांगत आहे पण त्यामधील किती उद्योग आपल्याकडे गुंतवणूक खरंच करणार आहेत याची कोणतीही स्पष्टता दिलेली नाही, किंवा जे उद्योग आपल्या राज्याला सोडून बाहेरच्या राज्यात जात आहेत त्याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिसत नाही. त्यामुळे माझा चिंतेचा विषय आहे कि, महाराष्ट्राला पुन्हा नंबर एक वर आणण्यासाठी कोणतेही ठोस उपाय या सरकारने राबविलेले दिसत नाहीत.

मुंबईचे महत्व कमी होत आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरात ला पळविले गेले, याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण सरकारने दिलेले नाही.

आजच्या अर्थसंकल्पात बऱ्याच लोकप्रिय घोषणा अर्थमंत्र्यांनी केलेल्या आहेत पण त्या सर्व घोषणा फसव्या आहेत कारण देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०२७ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर होईल अशी घोषणा केली आहे. हि अत्यंत फसवी आणि बोगस घोषणा आहे. कारण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत ५०० बिलियन म्हणजे अर्धा ट्रिलियन करू अशी घोषणा केली होती आणि आता १ ट्रिलियन डॉलर ची घोषणा. महाराष्ट्राची अर्थव्यवस्थेची वाढ फक्त वार्षिक ६.८% इतकी असेल तर आपली अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर होण्यासाठी किती कालावधी जाईल ? मग ती २०२७ पर्यंतच करायची असेल तर आपला विकासदर किती हवा ?

या सरकार बद्दल राज्याच्या जनतेत जी प्रचंड नाराजी आहे त्याचे पडसाद त्यांना गेल्या काही महिन्यात झालेल्या विधानसभा-विधानपरिषद निवडणुकांवरून समजून आलेले आहे ते वातावरण बदलायचं हा प्रयत्न आहे. प्रत्येक समाज घटकाला खुश करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे, परंतु हा प्रयत्न अत्यंत फसवा आहे हे जेव्हा जनतेला समजेल तेव्हा जनता या सरकारचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही. महापुरुषांची स्मारके करण्याच्या घोषणेला नक्कीच टाळ्या मिळाल्या असतील पण अशा स्मारकांकरिता जागा, समिती, त्याचे डिझाईन या सर्व गोष्टी पूर्ण व्हायला किमान २ वर्षाचा वेळ लागतो. शिवछत्रपतींचे व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकाची घोषणा होऊन १० वर्षे झाली तरी त्याची एक वीट रचलेली आपल्याला दिसत नाही. यामुळे राज्यातील जनतेला फसव्या आणि दिशाभूल घोषणांपेक्षा ठोस आणि जनहिताचे निर्णय सरकारकडून अपेक्षित होते.

Nana Bhangire | पुणे शहराला गतिमान करणारा अर्थसंकल्प | शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे | शिवसेना भवन येथे पेढे वाटून आनंद केला साजरा

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

पुणे शहराला गतिमान करणारा अर्थसंकल्प | शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे

| शिवसेना भवन येथे पेढे वाटून आनंद केला साजरा

पुणे | राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा पुणे शहराला गतिमान करणारा आहे. यातून सर्वच घटकाला न्याय मिळणार आहे. अशा भावना शिवसेनना शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी व्यक्त केल्या. दरम्यान बजेट मधून दिलेल्या योजनेमधून लोकांचे हित पाहिले गेले आहे. त्यामुळे शिवसेना भवन येथे जल्लोष करण्यात आला. तसेच नागरिकांना पेढे देखील वाटण्यात आले.

नाना भानगिरे म्हणाले, मेट्रोच्या कामाला वेग देण्याबरोबर स्वारगेट-कात्रज आणि पिंपरी-निगडी मेट्रो या मार्गिकांवर मेट्रो विस्तारणार आहे. मेट्रोअंतर्गत ८ हजार ३१३ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. पुणे रिंगरोड, पुणे-मुंबई मिसिंग लिंकसाठी भरीव निधी देण्यात आला आहे. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे, पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुण्यात सर्क्युलर इकॉनॉमी पार्क उभारण्यात येणार आहे. पुण्यातील भिडेवाडा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे.

भानगिरे पुढे म्हणाले, पुणे मेट्रोचा विस्तार, पुणे रिंगरोड, पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ, नाशिक-पुणे रेल्वे या प्रकल्पांमुळे शहराच्या विकासाला गती मिळेल, तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्‍वास वाटतो. समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. भानगिरे म्हणाले यातील बऱ्याच गोष्टी साठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करत होतो. आमच्या मागण्याची दखल घेतल्याबद्दल आम्ही अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो.

Mahabudget | शाश्‍वत, गतीमान विकासाबरोबर सर्व समाजघटकांचे हित साधणारा अर्थसंकल्प | भाजपकडून अर्थसंकल्पाचे कौतुक

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

शाश्‍वत, गतीमान विकासाबरोबर सर्व समाजघटकांचे हित साधणारा अर्थसंकल्प

| आमदार माधुरी मिसाळ

पुण्याच्या शाश्‍वत व गतीमान विकासाबरोबर शहराचे सांस्कृतिक वैभव जपणारा आणि सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक प्रगती करणारा अर्थसंकल्प उपमु‘यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याच्या भावना आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केल्या. या अर्थसंकल्पामुळे गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांच्या विकासाला चालना मिळणार असून, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, इतरमागासवर्गीय, मागासवर्गीय, अल्पसं‘यांक, व्यापारी यांचा हित साधणारा अर्थसंकल्प आहे.

मिसाळ म्हणाल्या, पुणे मेट्रोच्या कामाला वेग देण्याबरोबर स्वारगेट-कात्रज आणि पिंपरी-निगडी मेट्रो या मार्गिकांवर मेट्रो विस्तारणार आहे. मेट्रोअंतर्गत ८ हजार ३१३ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत.पुणे रिंगरोड, पुणे-मुंबई मिसिंग लिंकसाठी भरीव निधी देण्यात आला आहे. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे, पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुण्यात सर्क्युलर इकॉनॉमी पार्क उभारण्यात येणार आहे.

मिसाळ म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षांचे औचित्य साधून या महोत्सवासाठी ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग‘हालय, शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन यासाठी ३०० कोटी रुपये आणि आंबेगाव येथील शिवाजी महाराज संकल्पना उद्यानासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्याच्या वार्षिक महोत्सव आराखड्यात शिवजन्मोत्सव शिवनेरीचा समावेश करण्यात आला आहे. वढू आणि तुळापूर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक आणि पुण्यातील भिडेवाडा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे. जिल्ह्यातील भीमाशंकर, ज्योतिबा या तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येणार आहे.

मिसाळ म्हणाल्या, लेक लाडकी योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारकांना मिळणार असून १८ व्या वर्षी मुलीला ७५ हजार रुपये मिळणार आहेत. महिलांना एसटी प्रवासात सरसकट ५० टक्के सूट देण्यात आली आहे. आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आली आहे. शहरी भागात नोकरी करणार्‍या महिलांसाठी ५० वसतीगृहे बांधण्यात येणार असून, पीडीत महिलांसाठी आश्रय, विधी सेवा, आरोग्य सेवा, समुपदेशन आणि ५० शक्तीसदन निर्माण केली जाणार आहेत. महिलांना मासीक २५ हजार रुपयांचे उत्पन्न व्यवसाय करमुक्त करण्यात आले आहे.

मिसाळ पुढे म्हणाल्या, पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती पाच पटीने वाढविण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी आठवी पर्यंत मोफत गणवेश आणि शालेय स्तरावर कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शिक्षणसेवकांना १० हजार रुपयांची मानधनात वाढ केली आहे. डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्थेला मोठे अनुदान दिले जाणार आहे. पुण्यात मानसिक अस्वास्थ्य आणि व्यसनाधीनतेची समस्या कमी करण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे. बालेवाडी येथे स्पोर्टस सायन्य सेंटर उभारण्यात येणार आहे.

मिसाळ पुढे म्हणाल्या, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत विमा संरक्षण दीड लाखांहून पाच लाख रुपये करण्यात येणार असून, राज्यात ७०० स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उभारण्यात येतील. संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेतील अनुदान एक हजार रुपयांहून दीड हजारांपर्यंत वाढविले जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी महापालिका क्षेत्रांत विरंगुळा केंद्र आणि राष्ट्रीय वयोश्री योजनेचा विस्तार केला जाणार आहे. नवीन महामंडळांची स्थापना करून विविध समाजघटकांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. अल्पसं‘याक महिलांसाठी १५ जिल्ह्यात तीन हजार बचत गट स्थापन केले जाणार आहेत.

मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत तीन वर्षांत दहा लाख घरे बांधण्यात येणार असून, ऑटोरिक्षा चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन केले जाणार आहे. व्यापार्‍यांची दोन लाख रुपयांपर्यंतची थकबाकी पूर्णपणे माफ करण्यात येणार असून, ५० लाख किंवा त्यापेक्षा कमी थकबाकी असणार्‍या व्यापार्‍यांनी २० टक्के थकबाकी भरल्यास उर्वरित ८० टक्के रक्कम माफ करण्यात येणार असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.

पुण्याच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प | जगदीश मुळीक

महाविकास आघाडीच्या कार्यकाळात ठप्प झालेल्या पुण्याच्या विकासाला गती देणारा राज्याचा अर्थसंकल्प उपमु‘यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांनी सादर केला असून, मी त्याचे स्वागत करतो, असे मत भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केले. पुणे मेट्रोचा विस्तार, पुणे रिंगरोड, पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ, नाशिक-पुणे रेल्वे या प्रकल्पांमुळे शहराच्या विकासाला गती मिळेल, तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्‍वास वाटतो. समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, कृषी, उद्योग, सांस्कृतिक क्षेत्रासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. राज्याच्या विकासाला गती देण्याचे काम हा अर्थसंकल्प करेल असा विश्‍वास वाटतो.