Nalstop Double flyover : नळस्टॉप दुहेरी उड्डाणपूल कधीपासून होणार खुला ! : महापौरांनी दिली ही माहिती

Categories
Breaking News PMC Political पुणे

नळस्टॉप दुहेरी उड्डाणपूल रविवारपासून खुला

: महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे : पश्चिम पुण्याच्या वाहतुकीला वेग येण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या नळस्टॉप येथील शहरातील पहिल्या दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण येत्या रविवारी संध्याकाळी ६ वाजता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून कर्वे रस्ता आता वाहतूक कोंडीतून मोकळा श्वास घेणार आहे. मेट्रोकडून हा पूल महापालिकेच्या ताब्यात आल्यावर पुलाच्या विद्युत व्यवस्थेचेही काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे असताना महापालिकेच्या २०१७-१८ अंदाजपत्रकात या उड्डाणपुलाची संकल्पना मांडून त्यास निधी उपलब्ध करुन दिला होता. वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग प्रस्तावित झाल्यावर नळस्टॉप येथे दुमजली पूल साकारण्यासाठी महापौर मोहोळ यांनी पाठपुरावा करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे भूमिपूजन केले होते. जयपूर येथील साकारलेल्या दुमजली उड्डाणपुलाच्या पार्श्वभूमीवर ही संकल्पना महापौर मोहोळ यांनी मांडली होती. त्यास आता मूर्त रूप आले आहे.

दुमजली उड्डाणपुलाच्या लोकार्पणाबाबत महापौर मोहोळ म्हणाले, ‘डेक्कन परिसरातून पश्चिम पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीला या उड्डाणपुलामुळे चांगलीच गती मिळणार आहे. नळस्टॉप परिसरात येणाऱ्या रस्त्यांवरून दर तासाला ३५ ते ४० हजार वाहने जा-ये करत असल्याची नोंद होती. त्यामुळे या भागात तातडीने उड्डाणपूल उभारणे आवश्यक होते. त्यासाठी उड्डाणपुलाची संकल्पना मांडून त्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा केला. आता हा प्रकल्प सिद्धीस गेला आहे’.

‘नळस्टॉप येथील दुमजली उड्डाणपुलामुळे केवळ पश्चिम पुणेच नाही तर हवेली आणि मुळशी तालुक्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसही वेग येणार आहे. पुण्यातील हा पहिलाच दुमजली उड्डाणपूल असून याचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याकडे आपला कल होता आणि त्या दृष्टीने यशदेखील आले आहे. कोरोनाचे संकट असतानाही मेट्रोने हे काम वेगाने पूर्ण केले त्याबद्दल मेट्रोचे पुणेकरांच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद.

 

असा आहे पुण्यातील पहिला दुमजली उड्डाणपूल !

– महापौर मुरलीधर मोहोळ यांची संकल्पना आणि पाठपुरावा
– पुलाची एकूण लांबी ५५० मीटर
– पुलावरून ४ पदरी वाहतूक होणार
– पहिल्या मजल्यावरून वाहने, दुसऱ्या मजल्यावर मेट्रो
– मेट्रो आणि महापालिकेचा संयुक्त प्रकल्प

बाळासाहेब ठाकरे उद्यानाचेही रविवारी लोकार्पण

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बाळासाहेब ठाकरे उद्यानाचेही लोकार्पण येत्या रविवारी फडणवीस यांच्या हस्ते आणि पाटील यांच्या उपस्थितीत होत आहे, अशीही माहिती महापौर मोहोळ यांनी दिली.

Medical College of PMC : अखेर महापालिकेच्या मेडिकल कॉलेजला अंतिम मंजुरी!

Categories
Breaking News PMC देश/विदेश पुणे महाराष्ट्र

अखेर महापालिकेच्या मेडिकल कॉलेजला अंतिम मंजुरी!

– यंदाच्याच वर्षी १०० प्रवेश करण्यास मान्यता

– एनएमसीकडून अंतिम मंजुरीचे पत्र महापालिकेस प्राप्त

पुणे :  महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला (PMCs Medical College) प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठीची अंतिम मंजुरी एनएमसीकडून (NMC) प्राप्त झाली आहे. एनएमसीच्या मंजुरीनंतर यंदाच्या वर्षासाठी १०० प्रवेश देण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी दिली.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम मंजुरीसाठी नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय आणि आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची नवी दिल्लीतील आरोग्य मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली होती. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ही भेट झाली. या भेटीत सकारात्मक चर्चाही झाली होती. वैद्यकीय महाविद्यालयाने आजवर मंजुरीसंदर्भातील सर्व टप्पे पार केले असून आता प्रत्यक्ष परवानगी मिळाल्याने प्रवेश प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.

याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम मंजुरी मिळणे हा क्षण पुणे शहरासाठी जितका महत्वाचा आहे, तितकाच तो अभिमानाचाही. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या संकल्पनेपासून तर थेट अंतिम मंजुरीमिळेपर्यंतच्या विविध टप्प्यांमध्ये भूमिका निभावता आली, याचे मनस्वी समाधान आहे. आपल्या पाठपुराव्याला केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मोलाची साथ मिळाल्याने अंतिम मंजूरीपर्यंतचा प्रवास पूर्ण झाला. त्याबद्दल तिघांचेही समस्त पुणेकरांच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद’.

असा झाला वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रवास…

■ २८ ऑगस्ट, २०१९ : मुख्यसभेत ठराव मंजूर
■ २६ मे, २०२० : वैद्यकीय ट्रस्ट स्थापन करण्यास राज्य सरकारची मंजुरी
■ १३ ऑगस्ट, २०२० : वैद्यकीय ट्रस्टची नोंदणी
■ २८ नोव्हेंबर, २०२० : MUHS कडून Affiliations Consent प्राप्त
■ ७ मार्च, २०२२ : अंतिम मंजुरी

PM Modi PMC tour : पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नगरसेवकांना उपस्थित राहण्याची संधी  : 250 जणांना परवानगी 

Categories
Breaking News PMC Political पुणे

पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नगरसेवकांना उपस्थित राहण्याची संधी

: 250 जणांना परवानगी

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पतुळ्याचे अनावरण पुणे मनपा आवारात होत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्च रोजी महापालिका भवनात येणार आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव कार्यक्रमासाठी अवघ्या 25 ते 30 जणांनाच परवानगी देण्यात आली होती. त्यातही नगरसेवकांनाही या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आले होते. त्यावर त्यावरून वाद सुरू झाला होता. मात्र, या वादावर अखेर पडदा पडला आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे 200 ते 250 जणांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात येणार आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले. त्यामुळे नगरसेवकांसह अधिकारी तसेच कार्यक्रमाशी संबधित कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित राहू शकणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमासाठी महापालिकेत उपलब्ध असलेली जागा व पंतप्रधानांचा ताफा याचा विचार करता सुरक्षेच्या कारणास्तव मोजक्‍या उपस्थितांत हा कार्यक्रम घेण्याचे नियोजन होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांशी संबधित कार्यक्रम भाजप अल्प उपस्थितीत करत असल्याची टीका सुरू झाली होती. मात्र, अखेर सुरक्षा यंत्रणेशी चर्चा करून नगरसेवकांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू देण्याची परवानगी मिळाली आहे. तसेच महापालिकेचे व्यवस्थेतील अधिकारी, कार्यक्रमाच्या ठिकाणी स्पीकर, सजावट, मांडव यासह इतर कामासाठी असलेले कर्मचारी यांना पास दिले जाणार असल्याचे महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले.

PMP Bus : कात्रज ते विंझर बसमार्गाचा विस्तार वेल्हे-किल्ले तोरणापर्यंत 

Categories
Breaking News Political social पुणे

कात्रज ते विंझर बसमार्गाचा विस्तार वेल्हे-किल्ले तोरणापर्यंत

: कात्रज ते सासवड (मार्गे गराडे) नवीन बसमार्ग सुरू !

पुणे : पीएमपीएमएलकडून आजपासून मार्ग क्रमांक २९६ कात्रज ते विंझर या बसमार्गाचा विस्तार वेल्हे-किल्ले तोरणापर्यंत करण्यात आला. तसेच मार्ग क्रमांक २०९ ब कात्रज ते सासवड (मार्गे गराडे) हा नवीन बसमार्ग सुरू करण्यात आला. या दोन्ही मार्गांच्या बसला महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
कात्रज सर्पोद्यान स्थानक येथे या दोन्ही बससेवांचा शुभारंभ करण्यात आला. खडकवासला विधानसभा आमदार  भीमराव तापकीर, नगरसेविका राणीताई भोसले, नगरसेविका वर्षाताई तापकीर, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, माजी महापौर नगरसेवक दत्तात्रय धनकवडे, नगरसेवक प्रकाशशेठ कदम, नगरसेविका अमृताताई बाबर, नगरसेविका स्मिताताई कोंढरे, नगरसेवक   प्रसन्न जगताप, पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांच्यासह दोन्ही मार्गावरील ग्रामस्थांची उपस्थिती होती.
मार्ग क्रमांक २९६ – कात्रज ते वेल्हे-किल्ले तोरणा या बससेवेचा मार्ग कात्रज, खेड शिवापूर, नसरापूर, आंबवणे, विंझर, वेल्हे-किल्ले तोरणा असा असणार आहे. सध्या या मार्गावर ५ बसेसद्वारे साधारणपणे दर एका तासाने दिवसभरात एकूण ३२ फेऱ्या होणार आहेत.
मार्ग क्रमांक २०९ ब – कात्रज ते सासवड या बससेवेचा मार्ग कात्रज, येवलेवाडी, बोपदेव घाट, भिवरी, गराडे, कोडीत, सासवड असा असणार आहे. सध्या या मार्गावर १ बसद्वारे साधारणपणे अडीच तासाने दिवसभरात एकूण १२ फेऱ्या होणार आहेत.
गेल्या एक ते सव्वा वर्षात पुणे शहराला लागून असलेल्या तालुक्यांमधील विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार यांच्या सोयीसाठी पीएमपीएमएलच्या माध्यमातून ३५ नवीन बसमार्ग सुरू करण्यात आले. यामुळे नवीन बसमार्गांवरील ३५० ते ४०० गावे पुणे शहराला जोडली गेली आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांनी पीएमपीएमएलच्या बससेवेचा जास्तीत जास्त वापर करावा. मार्च महिन्यात पीएमपीएमएलच्या ताफ्यात नवीन १०० ई-बसेस दाखल होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ई-बसेसचे लोकार्पण होणार आहे.

PM Modi Pune Tour : Murlidhar Mohol : पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याची जय्यत तयारी!

Categories
Breaking News PMC Political देश/विदेश पुणे

पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याची जय्यत तयारी

– महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून अधिकाऱ्यांसह आढावा

– बैठक आणि प्रत्यक्ष पाहणी करत दौऱ्याचे नियोजन

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पुणे दौऱ्याची जय्यत तयारी सुरु असून महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी या दौऱ्याच्या नियोजनाची बैठक घेऊन प्रत्यक्ष जागांची पाहणी केली. येत्या ६ मार्च रोजी होणाऱ्या या दौऱ्यात पुणे महापालिका, गरवारे मेट्रो स्टेशन येथे पंतप्रधान मोदी भेट देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. याच सर्व ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी देऊन आढावा घेण्यात आला.(PM Modi will come pune On 6th March)

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या नियोजन बैठकीस पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, महामेट्रोचे महासंचालक ब्रिजेश दीक्षित, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, आयुक्त विक्रम कुमार, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर,पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, पीएमपीएमएल अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, कांॅग्रेस गटनेते आबा बागुल,सेनेचे गटनेते,पृथ्वीराज सुतार आदी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्याबाबत माहिती देताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘भूमिपूजन केलेल्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या लोकार्पणसाठीही पंतप्रधान मोदी शहरात येताहेत ही समस्त पुणेकरांसाठी आनंदाची बाब आहे. हा दौरा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात येत आहे. पुणे महापालिका आवारात साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ट पुतळा स्मारकाचे आणि पुणेकरांचे स्वप्न असणाऱ्या मेट्रोचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे. शिवाय पंतप्रधान मोदी मेट्रोच्या गरवारे स्थानकापासून आनंदनगर स्थानकापर्यंतचा प्रवास करणार असून जवळ असणाऱ्या मैदानावर पुणेकरांना जाहीर कार्यक्रमाद्वारे संबोधित करण्याचेही प्रस्तावित आहे. या दृष्टीने आढावा घेतला’.

‘पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यासंदर्भात महापालिका, विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालय, मेट्रो या सर्वांशी समनव्यय ठेऊन सूक्ष्म नियोजन केले जात आहे. आढावा बैठकीत सर्व ठिकाणांचा आढावा घेतला गेला असून याचा अहवाल शासकीय पातळीवर पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला जाणार आहे. याबाबत आढावा घेऊन पंतप्रधान कार्यालयाकडून अंतिम नियोजन जाहीर केले जाणार आहे’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.