CM Eknath Shinde | महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना अजून एक सवलत | राज्य सरकारची घोषणा

Categories
Breaking News Education Political social महाराष्ट्र

महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात २५ टक्के सवलत

| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई |मुंबई मेट्रोमधून (Mumbai Metro) आता ज्येष्ठ नागरिक (senior Citizens), दिव्यांग (Divyang) तसेच विद्यार्थ्यांना (Students) सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. एक मे महाराष्ट्र दिनापासून (Maharashtra Day) २५ टक्के सवलत त्यांना मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांनी केली आहे. मुंबई 1 नॅशनल कॉमन मोबिलिटी (Mumbai one national common mobility card) कार्ड वापरणाऱ्या या श्रेणीतील हजारो प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे.

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एमएमआरडीए (MMRDA)  यांच्यातफे महाराष्ट्र दिनाची ही भेट असणार आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना ४५ ट्रिप किंवा ६० ट्रिपसाठी मुंबई-1 पासावर ही सवलत मिळेल.

यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांच्या गरजा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही मुंबई मेट्रो नेटवर्क तयार केले आहे, त्यामुळे त्यांना या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ मिळणे आवश्यक आहे. आम्ही यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत केला आहे तर महिलांना सुद्धा एसटी बसेसमधून ५० टक्के प्रवास सवलती दिली आहे. सामाजिक भावनेतून हे निर्णय आम्ही घेतले असून मेट्रो प्रवासातील या सवलतीमुळे देखील अधिक संख्येने लोक यातून प्रवास करतील अशी मला आशा आहे.

कोणाला सवलत मिळेल?

ही सुविधा ६५ वर्षांवरील वरिष्ठ नागरिक, इयत्ता १२ वी पर्यंत शिकणारे विद्यार्थी आणि कायमस्वरूपी दिव्यांग लोकांसाठी आहे. या ३ श्रेणीतील प्रवाशांना सवलतीसाठी काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. दिव्यांगांसाठी सरकारी/वैद्यकीय संघटनेचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा आणि विद्यार्थ्यांसाठी पॅन (विद्यार्थी किंवा पालक पॅन) सोबत शाळा ओळखपत्र यासारखी वैध कागदपत्रे आवश्यक आहेत.

या सर्व सवलती मेट्रो लाइन २ ए आणि ७ च्या मेट्रो स्टेशनवरील कोणत्याही तिकीट खिडकीत आवश्यक कागदपत्र दिल्यावर मिळू शकतील. नवीन आणि पूर्वी खरेदी केलेल्या मुंबई-1 कार्डवर देखील सवलत असेल तसेच याला ३० दिवसांची वैधता राहील. मुंबई 1 कार्ड रिटेल स्टोअर, पेट्रोल पंप आणि बेस्ट बस प्रवासादरम्यान देखील वापरले जाऊ शकते व रिचार्जही करता येईल.

Pune Metro | पुणे मेट्रो धावली रुबी हॉल मेट्रो स्थानकापर्यंत

Categories
Breaking News social पुणे

पुणे मेट्रो धावली रुबी हॉल मेट्रो स्थानकापर्यंत

– रुबी हॉल स्थानकापर्यंत मेट्रोची चाचणी घेण्यात आली

– मंगळवार पेठ (RTO), पुणे रेल्वे स्थानक ही ठिकाणे लवकरच मेट्रोद्वारे जोडली जाणार
आज पुणे मेट्रोची सिव्हिल कोर्ट स्थानक ते रुबी हॉल स्थानक ही चाचणी घेण्यात आली. ठीक ३.५० मिनिटांनी सिव्हिल कोर्ट स्थानक येथून मेट्रो ट्रेन निघाली. ४.०७ मिनिटांनी रुबी हॉल स्थानक येथे ट्रेन पोहोचली. ट्रेनचा वेग १० किमी प्रति तास असा होता. मुळा-मुठा संगम पूल पार करून ट्रेन मंगळवार पेठ (RTO) स्थानक येथे पोहोचली. तेथून पुणे रेल्वे स्थानक पार करून रुबी हॉल स्थानकात नियोजित वेळेनुसार पोचली. चाचणी दरम्यान ठरलेली उद्दिष्ट पार पडले. चाचणी अत्यंत व्यवस्थित पार पडली. अशी माहिती पुणे मेट्रोच्या वतीने देण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक ही १२ किमीची मार्गिका २०२२ मध्ये प्रवाशांसाठी सुरू केल्यानंतर आता लवकरच फुगेवाडी स्थानक- सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि गरवारे कॉलेज स्थानक – सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक – रुबी हॉल स्थानक  या एकूण १२ किमीची मार्गिका लवकरच प्रवाश्यांसाठी सुरू करण्यात येतील.
गरवारे स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक या मार्गीकेवर मेट्रो रेल्वेची चाचणी दिनांक २५/११/२०२२ रोजी घेण्यात आली. त्याचप्रमाणे फुगेवाडी स्थानक  ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक मार्गावर चाचणी दिनांक ३१/१२/२०२२ रोजी घेण्यात आली. आज दिनांक २७/०३/२०२३रोजी सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक- मंगळवार पेठ (RTO) – पुणे रेल्वे स्थानक – रुबी हॉल स्थानक या मार्गावर चाचणी घेण्यात आली. या तिन्ही मार्गीकेवरील कामे जवळपास संपुष्टात आली आहेत. उर्वरित कामे येत्या आठ ते दहा दिवसात पूर्ण झाल्यावर या मार्गीकांचे सी एम आर एस निरीक्षण करण्यासाठी रेलवे सुरक्षा आयुक्त यांना बोलावण्यात  येईल आणि लवकरच सी एम आर एस यांची मान्यता प्राप्त झाल्यानंतर प्रवासी सेवा या मार्गावर सुरू करण्यात येईल.
सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते रुबी हॉल स्थानक या मार्गीकेवर  मंगळवार पेठ (RTO), पुणे रेल्वे स्थानक,  रुबी हॉल स्थानक ही महत्त्वाची स्थानके आहेत.  यामुळे आरटीओ कार्यालय, पुणे रेल्वे स्थानक, रुबी हॉल, जहांगीर हॉस्पिटल, वाडिया कॉलेज जोडले जाणार आहेत.  यामुळे मोठ्या प्रमाणावर पुण्याच्या नागरिकांना या भागात येणे-जाणे सोयीचे होणार आहे.  पुणे रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाला मेट्रोच्या कॉनकोर्स मजल्याशी जोडण्यात आल्यामुळे रेल्वे आणि मेट्रो प्रवाशांना थेट एकमेकांच्या सेवांचा लाभ घेणे सोईचे होणार आहे.  मेट्रो स्थानकावरून रेल्वेच्या सर्व फलाटांवर जाणे सहज शक्य होईल. मंगळवार पेठ स्थानक (RTO) हे अत्यंत गजबिल्या ठिकाणी आहे.  आरटीओ कार्यालयात येणाऱ्या असंख्य नागरिकांना याचा फायदा होईल. तसेच या भागात शाळा इंजिनिअरिंग कॉलेज, नायडू हॉस्पिटल ही महत्वाची ठिकाणे आहेत. या मार्गावर रोज प्रवास करणाऱ्या तीन ते चार हजार विद्यार्थ्यांना या मेट्रो स्थानकामुळे फायदा होणार आहे.
या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हटले आहे की, “आज घेण्यात आलेली चाचणी नियोजित उद्दिष्ठानुसार पार पडली. लवकरच पुणे रेल्वे स्थानक, RTO व रुबी हॉल मेट्रो नेटवर्क द्वारा जोडले जाईल”.

Mohan Joshi Vs Chandrkant Patil | चंद्रकांतदादा, क्या हुआ तुम्हारा वादा ? | मोहन जोशी यांचा सवाल

Categories
Breaking News PMC Political पुणे

चंद्रकांतदादा, क्या हुआ तुम्हारा वादा ?

– मोहन जोशी यांचा सवाल

पुणे | पुण्याची मेट्रो कधी पूर्ण होणार या प्रश्नावर ‘तारीख पे तारीख’ असेच उत्तर भाजपाने तयार ठेवले आहे. याचे कारण म्हणजे गरवारे महाविद्यालय ते न्यायालय आणि फुगेवाडी ते न्यायालय या मार्गावरील मेट्रोचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचा नवा वायदा पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. आता २६ जानेवारी हा दिवस उलटून गेला. म्हणूनच यावर असे विचारावेसे वाटते की, चंद्रकांतदादा, क्या तुम्हारा वादा ? प्रदेश काँग्रेस चे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी हा सवाल केला आहे.

जोशी म्हणाले, आता म्हणे मार्च महिन्याचा वायदा करण्यात येत आहे. जनतेला वायदे करायचे, आश्वासने द्यायची आणि ती पूर्ण करायची नाहीत ही त्या भाजपची नीती बनली आहे. ‘अच्छे दिन लायेंगे’, ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार’, ‘गॅस, पेट्रोल, ‘डीझेल दरवाढ कमी करणार’ , ‘महागाई कमी करणार’, ‘दरवर्षी २ कोटी नवे रोजगार निर्माण करणार…’ असे असंख्य वायदे भाजपच्या मोदी सरकारने केले. मुख्य म्हणजे असे अनेक वायदे करताना जनतेला आपण बांधील आहोत असे ते मानत नाहीत. त्यांचे वायदे ‘हेडलाईन मॅनेजमेंट’पुरतेच असतात. आदरणीय चंद्रकांतदादा पाटीलदेखील याच मुशीत घडले आहेत. त्यामुळे पुण्याच्या मेट्रोबाबत प्रत्येकवेळी नवीन वायदे करताना त्यांना ना खंत ना खेद! ‘हेडलाईन छापून येण्यापुरताच त्यांचा पुण्याच्या विकासाशी संबंध आहे. त्यामुळेच आता नवा वायदा करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या खात्यांमध्ये ‘वायदामंत्री’ हे नवे खातेदेखील स्वीकारावे. सुज्ञास अधिक सांगणे न लागे !

जोशी पुढे म्हणाले, दीर्घकालीन पाठ्पुराव्यानंतर काँग्रेस पक्षाने पुण्याॉत मेट्रो प्रकल्प आणला. मात्र भाजप राजवटीत काम रेंगाळले व अखेरीस मागीलवर्षी मार्च महिन्यात जेमतेम १२ किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाले. आताही गरवारे महाविद्यालय ते न्यायालय आणि फुगेवाडी ते न्यायालय या मेट्रो मार्गाचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याचे पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. आता २६ जानेवारी दिवस उजाडला. आता नवा वायदा मार्च महिन्याचा ! तसेच, पुण्यातील ३३ किलोमीटर लांबीचे दोन्ही मेट्रो मार्ग मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले होते.

 

Rehabilitation | Pune Metro | PMC | मेट्रो बाधित कुटुंबाचे पुनर्वसन झाशीची राणी शाळेत!   | महामेट्रोला 30 वर्षासाठी शाळा दिली जाणार भाड्याने 

Categories
Breaking News PMC social पुणे

मेट्रो बाधित कुटुंबाचे पुनर्वसन झाशीची राणी शाळेत!

| महामेट्रोला 30 वर्षासाठी शाळा दिली जाणार भाड्याने

पुणे | पुणे शहरात राबविण्यात येणाऱ्या पुणे महामेट्रो प्रकल्पांतर्गत महात्मा फुले मंडई येथील भुयारी मेट्रो  स्टेशनच्या कामामुळे बाधित होणाऱ्या लंके वाडा, शुक्रवार पेठ, सि.स.नं. ९ या जागेतील निवासी कुटुंबाचे पुनर्वसन करणेसाठी पुणे मनपाच्या सदाशिव पेठ येथील कवठे अड्डा किंवा झाशीची राणी शाळेची जागा तात्काळ मंजूर करून जागेचा ताबा पुणे मेट्रो रेल प्रकल्पास हस्तांतरण करण्याची वारंवार मागणी करण्यात येत होती. त्यानुसार झाशीची राणी शाळा महामेट्रोला 30 वर्षासाठी भाड्याने दिली जाणार आहे. त्यासाठी 6 कोटीचे प्रीमियम आकारून प्रत्येक वर्षी  1 रुपया भाडे घेतले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मनपा प्रशासनाकडून शहर सुधारणा  समिती समोर ठेवण्यात आला आहे.

समितीच्या प्रस्तावानुसार  महामेट्रोने केलेल्या मागणीच्या अनुषंगाने सदाशिव पेठ येथील कवठे अड्डा आणि झाशीची राणी शाळेच्या जागेची संयुक्त पाहणी करण्यात आलेली आहे. तथापि, सदर ठिकाणी सन २०१७ च्या मान्य विकास आराखड्यानुसार अनुक्रमे चिल्ड्रन प्ले-ग्राऊंड (सी.पी.जी) आणि पब्लिक-सेमी पब्लिक (पी.एस.पी. झोन) दर्शविले आहेत. सदर जागेवर पुणे मनपामार्फत क्रिडा संकुल आणि झाशीची राणी शाळा उभारण्यात आली आहे. सदर दोन्ही जागा हस्तांतरीत करण्यासाठी स्थानिक नागरीक व सभासद यांनी विरोध दर्शविला आहे. तसेच, सी.पी.जी आरक्षणाच्या जागेबाबत न्यायालयीन वाद सुरू आहे. तथापि,  महापालिका आयुक्त यांच्या समवेत वेळोवेळी झालेल्या बैठकिच्या अनुषंगाने सदाशिव पेठ सि.स.नं. ७८९ झाशीची राणी शाळेची जागा उपलब्ध करून देणेबाबतचा निर्णय झालेला आहे.

सदाशिव पेठ सि.स.नं. ७८९ झाशीची राणी शाळा ही पब्लिक-सेमी पब्लिक (पी.एस.पी.झोन) दर्शविण्यात आली असून पी.एस.पी. झोनमधील सर्व वापर अनुज्ञेय असलेबाबत कळविले आहे. त्यामुळे सदर ठिकाणी निवासी इमारत उभारणेसाठी आरक्षण बदल अथवा जागा वापर बदल करणे बंधनकारक होणार आहे. खात्याकडील उपलब्ध रेकॉर्डनुसार सदर जागा ही मुलींची शाळा क्र. ४ या करीता दि. १३/०५/१९२१ रोजी तडजोडीने पुणे मनपाच्या ताब्यात आल्याचे दिसून येत आहे. मिळकतपत्रिकेनुसार जागेचे क्षेत्रफळ हे १५२२.६० चौ.मी इतके आहे. सदर जागेमधील काही क्षेत्र हे रस्तारूंदीमध्ये गेले आहे. तथापी, महामेट्रोने जागेची मोजणी करून त्याची प्रत या विभागास सादर केलेली आहे. त्यानुसार जागेवर सुमारे १२३४.८५ चौ.मी इतके क्षेत्रफळ आहे. सन २०२२-२३ च्या शिघ्रसिध्दगणकानुसार जागेची किंमत ही
र.रू.६,६२,९९,०९७/-इतकी होत आहे.

 शाळेची संपूर्ण इमारत ही सद्यस्थितीत कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालयाच्या ताब्यात असून सदर ठिकाणी त्यांचे कामकाज चालू आहे. तसेच, पुढील मोकळ्या जागेमध्ये अतिक्रमण विभागाने कारवाई केलेल्या हातगाड्या तसेच, इतर साहित्य ठेवण्यासाठी वापरत असल्याचे निदर्शनास येते. दुमजली इमारत ही दगडी असून सुस्थितीत आहे. जागेची चालू बाजारभावानुसार होणारी जागेची किंमत र.रु. ६२,९९,०९७/- मेट्रोकडून वसूल करण्यात यावी व सदर जागेवरील आरक्षण बदल करण्याची कार्यवाही ही मेट्रोने स्वतः करून सद्यस्थितीत शाळेच्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या कार्यालयांची पर्यायी व्यवस्था ही मेट्रोने करावी असे ठरले आहे. मेट्रोच्या कामकाजाकरीता झाशीची राणी शाळेची जागा तात्काळ रिकामी करून मेट्रोसाठी दिर्घ कालावधीकरीता हस्तांतरीत करावी लागणार आहे. त्यानुसार  झाशीची राणी शाळेची सुमारे १२३४.८५ चौ.मी जागेचा ताबा प्रिमियम रक्कम रू.६,६२,९९,०९७/- इतकी महामेट्रोकडून आकारून ३० वर्षे कालावधीकरीता पुणे मनपाच्या स्वामित्वापोटी दरवर्षी र.रू.१/- या दराने महामेट्रोस हस्तांतरीत केली जाईल.

Pune metro rail project | पुणे मेट्रोला निरंतर वीजपुरवठा मिळत राहील असे नियोजन

Categories
Breaking News पुणे महाराष्ट्र

पुणे मेट्रोला निरंतर वीजपुरवठा मिळत राहील असे नियोजन

पुणे मेट्रोसाठी लागणारी वीजपुरवठा (Power Supply & Tration) विषयक कामे पूर्ण

पुणे मेट्रोसाठी जागतिक दर्जाच्या ट्रकशन आणि पॉवर सप्लाय यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुणे मेट्रोला निरंतर वीजपुरवठा मिळत राहील असे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.

मेट्रो ट्रेन हि विजेवर चालते आणि त्यामुळे हि पर्यावरण पूरक अशी शहरी वाहतूक व्यवस्था आहे. मेट्रो ट्रेन चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विजेची गरज पडते. मेट्रोसाठी विनाव्यत्यय वीजपुरवठा संबंधी संरचनात्मक कामे करणे हे एक आव्हानात्मक काम आहे. येत्या काही काळात मोठ्याप्रमाणावर प्रवासी मेट्रोने प्रवास करतील त्यामुळे सतरा ते आठरा तास मेट्रो सेवेसाठी निरंतर वीजपुरवठा करणे व त्यासंबंधीच्या उपकारणांची उभारणी करणे हे अत्यंत्य महत्वाचे काम आहे.

नुकतेच पुणेमेट्रोने संपूर्ण ३३ किमी मार्गावर मेट्रो चालवण्यासाठी आवश्यक असलेले वीजपुरवठ्याचे काम पूर्ण केले आहे. निरंतर वीजपुरवठा करण्यासाठी मेट्रोने म.रा.वि.वि.क. (महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी) यांच्याकडून तीन ग्रीड मधून वीजपुरवठा घेतला आहे. त्याला रिसीव्हींग सब स्टेशन (RSS) असे म्हणतात. पिंपरी-चिंचवड स्थानक येथील रिसीव्हींग सब स्टेशनसाठी चिंचवड ग्रीड, रेंजहील रिसीव्हींग सब स्टेशनसाठी गणेशखिंड ग्रीड आणि वनाझ रिसीव्हींग सब स्टेशनसाठी पर्वती ग्रीड मधून वीजपुरवठा घेण्यात आला आहे. यासाठी ५ ते ६ किमी लांबीच्या १३३ KV क्षमतेच्या विद्युत केबल अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून टाकण्यात आल्या आहेत. यामुळे एक ग्रीडमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास दुसऱ्या ग्रीड मधून विद्युत पुरवठा देऊन मेट्रोची सेवा चालू ठेवणे शक्य होणार आहे. रेंजहील येथील रिसीव्हींग सब स्टेशन हे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांना (कॉरिडॉर) एकाचवेळी विद्युत पुरवठा करूशकेल अश्या क्षमतेचे बांधण्यात आले आहे.

प्रत्येक रिसीव्हींग सब स्टेशनमध्ये चार रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) लावण्यात आले असून १३२ kv विद्युत पुरवठ्याचे २५ kv, २५ kv, ३३ kv, ३३ kv अश्या प्रकारे स्टेपडाऊन करण्यात आले आहे. २५ kv वीजपुरवठा हा ट्रॅक्शनसाठी वापरण्यात येतो व त्याची फीड ट्रेनच्या वरील विद्युत तारांमध्ये (OHE) सोडण्यात आली आहे. तर ३३ kv चा विद्युत पुरवठा सर्व मेट्रो स्थानकांना देण्यात आला आहे. त्यासाठी संपूर्ण ३३ किमी मार्गावर ३३ kv क्षमतेच्या विद्युत केबल टाकण्यात आल्या आहेत. प्रत्येक स्थानकात एक ऑग्झ्यालरी सब स्टेशन (ASS) बांधण्यात आलेले आहे. ऑग्झ्यालरी सब स्टेशनद्वारा उद्वाहक (लिफ्ट), सरकते जिने (एस्किलेटर), वातानुकूलित यंत्रणा (AC) आणि स्थानकातील विद्युत यंत्रणा यासाठी हा विद्युत पुरवठा करण्यात येतो.

पुणे मेट्रोने मोठ्या प्रमाणावर सोलर वीजनिर्मीती करण्याचे नियोजित केले आहे. प्रत्येक स्थानकाच्या छतावर आणि इमारतींच्या छतावर सोलर वीजनिर्मिती संच बसविण्यात आले आहेत. याद्वारे ११ मेगा वॅट इतकी सौर वीजनिर्मिती करणे शक्य होणार आहे. सौर निर्मित ऊर्जेचे इंटिग्रेशन पावर सप्लाय सिस्टमशी करण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची बचत होणार आहे.

सर्व रिसीव्हींग सब स्टेशन, ऑग्झ्यालरी सब स्टेशन आणि OHE यांच्या नियंत्रणासाठी SCADA प्रणाली बसविण्यात आली आहे. या SCADA प्रणालीद्वारे संपूर्ण ट्रकशन आणि पॉवर सप्लाय प्रणालीचे नियंत्रण करता येते. SCADA प्रणालीचा मुख्य संगणक हा रेंजहील येथील OCC येथे स्थापित करण्यात आला आहे. OCC येथील डिस्प्ले वर संपूर्ण ट्रकशन आणि पॉवर सप्लायच्या संबंधीची माहिती ऑनलाईन दिसत असते. त्यामुळे त्याचे नियंत्रण करणे सहज शक्य होते.

 

CM Eknath Shinde | राज्यात ७५ हजार पदांची भरती करणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र शेती

राज्यात ७५ हजार पदांची भरती करणार

| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ हजार रिक्त पदांची भरती केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले.

महाराष्ट्र विधानसभा नियम २९२ अन्वये उपस्थित करण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यातील विविध विभागांच्या आस्थापनेवरील रिक्त पदांचा आढावा घेतला जात आहे. या सर्व रिक्त जागा भरण्यासाठी ७५ हजार रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या पदसंख्येत आणखी काही हजारांत वाढ होण्याची शक्यता आहे.

आरे येथेच मेट्रो कारशेड होणार

मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कारशेड आरे येथेच उभारले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, आरे येथे वनजमिनींची एकूण १२८५ हेक्टर जमीन आहे. त्यामध्ये आणखी ३२६ हेक्टर जमीन वन क्षेत्रात समावेश केला आहे. कारशेडसाठी केवळ २५ हेक्टर जमीन लागणार आहे. या जागेच्या तीनही बाजूंनी रहदारीचे रस्ते आहेत. त्यामुळे आरेमधील जागा कारशेडसाठी योग्य आहे. याबाबत मदान समिती आणि सौनिक समितीनेही आरे येथील जागाच कारशेडसाठी उपयुक्त असल्याची शिफारस केली आहे.

राज्यातील गुन्हेगारीत घट

राज्यातील गुन्हेगारीत घट झाली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, राज्यातील गुन्हेगारीत घट झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर गुन्हे प्रकटीकरणात वाढ होत आहे. पोलीसांनी मुस्कान अभियानामधून राज्यातील सुमारे ३७ हजार ५११ मुले आणि मुलींचा शोध घेऊन पालकांकडे सुपूर्द केली आहेत. अंमली पदार्थांच्या विरोधात पोलीसांनी कठोर कारवाई केली आहे, असे त्यांनी सांगितले.

पोलीसांना पंधरा लाखांत घर

बीडीडी चाळीचा पुनर्विकास गतीने पूर्ण केला जाईल. या पुनर्विकास इमारतींमध्ये पोलीसांना केवळ पंधरा लाख रुपयांत घर उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पोलीसांना अधिक घरे उपलब्ध व्हावीत यासाठी गृहनिर्माण धोरणात विशेष तरतूद केली जाईल. पोलीसांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. न्यायालयीन विकासासाठी दरवर्षी भरीव निधी देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबईतील मालमत्ता करात वाढ नाही

कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मालमत्ता करात वाढ करण्यात आली नव्हती. आणखी एक वर्ष मालमत्ता करात वाढ केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. उल्हासनगर मधील एक जानेवारी २००५ पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांना नियमित करण्यासाठी विशेष कार्यप्रणाली राबविण्यात येईल. त्यासाठी प्रशमन शुल्कातही मोठ्या प्रमाणावर कपात करण्यात आली आहे. हे शुल्क प्रति चौरस मीटरास २२०० रुपये आकारले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना भरीव मदत

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त मदत तत्काळ दिली आहे. पूर्वी ही मदत केवळ पाच हजार रुपये होती. ती मदत आता पंधरा हजार रुपये दिली जात आहे. गावांचे शहराशी दळणवळण वाढायला मदत व्हावी यासाठी रस्ते विकासासाठी प्राधान्याने काम केले जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील मुद्दे

*पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केली

*चौदा लाख शेतकऱ्यांना आर्थिक मदत

*उपसा जलसिंचन योजनेच्या वीजदरात एक रुपयांने कपात

*राज्यातील गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक प्रयत्न

*हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गचे लवकरच लोकार्पण

*सत्तावीस हजार कोटी रुपयांचे विकास प्रकल्प हाती

*एमएमआरडीएच्या साठ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना शासन हमी

*मुंबई-गोवा महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास सुरुवात

*प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार

वसई विरार मल्टीमोडल हबचा सविस्तर प्रकल्प अहवाल

पुणे रिंग रोड आणि रेवस-रेड्डी रस्त्यास निधी उपलब्ध करणार

*पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा सर्वंकष विकास आराखडा

*मंदिरे आणि गड किल्ले यांचे जतन-संवर्धन करणार

*कोल्हापूर सांगली शहरातील पुराबाबत सल्ला घेऊन उपाययोजना करणार..

Shivaji Nagar to Hinjewadi Metro | शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार |मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार

|मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधितांची व्यापक बैठक बोलावली जाईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत सांगितले. तसेच शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पूर्तता प्राधान्याने केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

मंत्री केसरकर यांनी सांगितले की, शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची २३.३ किलोमीटर लांबी आहे. संकल्पना करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वानुसार हा प्रकल्प बांधण्यात येत आहे. या कामास सुरुवात झाली असून प्रकल्प कालावधी ४० महिने आहे. या प्रकल्पातील एकात्मिक उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. या कामामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी एकेरी मार्ग करणे, नो पार्किंग, नो हॉल्टिंग झोन करणे, सायकल ट्रॅक आणि फुटपाथ काढून रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहेत.

पुणे मुंबई महामार्गावरील चांदणी चौकातील पुलाचे कामही लवकरच पूर्ण केले जाईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी सदस्य भीमराव तापकीर यांनी विचारलेल्या उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

याबाबत सदस्य सिध्दार्थ शिरोळे, राहुल कुल, भीमराव तापकीर यांनी चर्चेत सहभाग घेतला.

MP Girish Bapat | डेक्कन सहित शहरात महत्वाच्या ठिकाणी बहुमजली पार्किंग करा  | खासदार गिरीश बापट यांची महापालिकेला सूचना 

Categories
Breaking News PMC Political पुणे

डेक्कन सहित शहरात महत्वाच्या ठिकाणी बहुमजली पार्किंग करा

| खासदार गिरीश बापट यांची महापालिकेला सूचना

पुणे | शहरात पार्किंग ची समस्या वाढताना दिसत आहे. याच अनुषंगाने खासदार गिरीश बापट यांनी डेक्कन सहित शहरात महत्वाच्या ठिकाणी बहुमजली पार्किंग करा, अशी सूचना महापालिकेला केली आहे. यावर महापालिका आयुक्तांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
शहरातील विविध प्रश्नावर खासदार गिरीश बापट महापालिका  आयुक्त आणि अधिकाऱ्यासोबत बैठक घेतली. यावेळी बापट यांनी उक्त सूचना केली. याच बैठकीत बापट यांनी जायका योजनेचा आढावा घेतला. जायका योजनेचे काम लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. या बाबतच्या सगळ्या प्रक्रिया जवळपास पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे हे काम लवकर पूर्ण करण्याची अपेक्षा बापट यांनी व्यक्त केली. तसेच यावेळी मेट्रोच्या काही प्रलंबित जागांबाबत देखील चर्चा झाली.
महापालिकेने MNGL कंपनीकडे शहरातील स्मशानभूमीत कनेक्शन देण्याची मागणी केली आहे. मात्र बिबवेवाडी वगळता इतर कुठल्याही ठिकाणी हे कनेक्शन देण्यात आलेले नाही. बैठकीत हा विषय आल्यांनतर खासदार बापट यांनी MNGL च्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केली.

Traffic congestion at Nalastop Chowk : नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडी सोडवा! : पुणे मनपा, मेट्रो, वाहतूक पोलीस व अन्य अधिकाऱ्यांसह नळस्टॉप चौकाचा पहाणी दौरा

Categories
Breaking News PMC Political social पुणे

 नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडी सोडवा!

:  चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचना

: पुणे मनपा, मेट्रो, वाहतूक पोलीस व अन्य अधिकाऱ्यांसह नळस्टॉप चौकाचा पहाणी दौरा

कोणत्याही परिस्थितीत कोथरुड मतदारसंघातील नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवा, अशा सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. नव्या उड्डाणपूलामुळे नळस्टॉप चौकातील ७५ टक्के वाहतूक सुरळीत झाली असून, केवळ संध्याकाळी ६ ते ९ यावेळेत कोथरुडकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यासाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज नळस्टॉप चौकाचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला.

यावेळी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपा पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्रबुद्धे, मनपा वाहतूक नियोजन विभागाचे श्रीनिवास बोनाला, मेट्रोचे गौतम बिऱ्हाडे, मनपा पथविभागाचे अभिजीत डोंबे, वाहतूक पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, कर्वे रोड व्यापारी संघाचे ओमप्रकाश रांका, राजू भटेवरा कोथरुड भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ व इतर नागरीक उपस्थित होते.

दीर्घकालीन उपाययोजनेत बालभारती पौंड फाटा रस्ता झाल्यावर, कोथरूडकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे. हे काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी प्रशासनाशी सतत संपर्कात आहोतच, मात्र तोपर्यंत नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी आज सर्व बाजूने विचार करुन अनेक उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. असे आ. चंद्रकांतदादा पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले.

यात प्रामुख्याने मेट्रोचे सर्वत्र पडलेले सामान व राडारोडा तातडीने उचलून रस्ता मोकळा करणे, पदपथ सुस्थितीत करणे, शक्य तिथे रस्त्याचे रुंदीकरण करणे, तसेच बस आणि अवजड वाहने उड्डाणपुलावरुनच जातील अशी व्यवस्था करणे, वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या बस स्टॉपच्या जागा तातडीने बदलणे, नळस्टॉप चौकातील सिग्नलच्या वेळेचे नियोजन करणे, आदी उपाययोजना आगामी दहा दिवसांत करण्याच्या सूचना आ. पाटील यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

Ganesh Mandal : Metro Bridge : मेट्रो पुलाला आमचा विरोध नाही!

Categories
Breaking News cultural PMC Political पुणे

मेट्रो पुलाला आमचा विरोध नाही!

: मानाच्या गणपतीसह प्रमुख गणेश मंडळांनी जाहीर केली भूमिका

पुणे – संभाजी पूल (लकडी पूल) येथील मेट्रोच्या मार्गिकेला (Metro Route) शहरातील काही गणेश मंडळांनी (Ganesh Mandal) विरोध केल्याने गेल्या तीन महिन्यांपासून हे काम ठप्प आहे. अखेर शहरातील मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी प्रथमच भूमिका जाहीर केली आहे. मेट्रोच्या कामामुळे पुलाच्या उंचीचा (Bridge Height) मुद्दा कोणीही निदर्शनास आणून दिला नाही, पण आता हे काम अंतिम टप्प्यात असल्याने या कामाला आमचा विरोध नाही. मेट्रोमुळे पुण्याच्या विकासात भरच पडणार आहे, असे आज (बुधवारी) स्पष्ट केले.

अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब थोरात, मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, मानाचा दुसरा गणपती श्री.तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, मानाचा पाचवा गणपती श्री केसरी वाडा गणेशोत्सव मंडळआचे अध्यक्ष रोहित टिळक, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख पुनीत बालन, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी यासंदर्भात संयुक्त निवेदन काढले आहे. उद्या (गुरुवारी) महापालिकेची मुख्यसभा होत असताना प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्याने यावादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

महापौरांनी मेट्रोचे अधिकारी व गणेशोत्सव मंडळ कार्यकर्त्यांशी बैठक घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न जवळपास चार महिने केले. परंतु तज्ज्ञ समितीने सुचविलेले पर्याय अव्यवहार्य असल्याने महापौरांनी काम सुरु करण्यास सांगितले. आम्ही सगळे गणपती मंडळ कार्यकर्ते असलो तरी जबाबदार पुणेकर नागरिक आहोत. १२५ वर्षाहून अधिक पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाची परंपरा असून, समाज प्रबोधन,समाजहिताला प्राधान्य दिले आहे. संभाजी पुलावरील मेट्रो पुलाच्या उंची बाबत आमचा कधीही विरोध नव्हता. कोरोनाच्या काळात साधेपणाने उत्सव साजरा केला. प्रशासनाला सहकार्य केले. अशी परंपरा असलेल्या गणेशोत्सवामुळे यावेळी संभाजी पुलावरील पुलास कामास आम्ही विरोध करत नाही. गणेशोत्सव कार्यकर्त्यांची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिलेली आहे, असे प्रमुख मंडळांनी निवेदनात नमूद केले आहे.