MLC | Pune News | विधान परिषदेवर आमदार म्हणून नाना भानगिरेंना मिळणार संधी!

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

MLC | Pune News | विधान परिषदेवर आमदार म्हणून नाना भानगिरेंना मिळणार संधी!

| पुण्याला मिळू शकतो अजून एक आमदार

| नाना भानगिरे यांचे जोरदार प्रयत्न

MLC | Pune News | पुणे शहराला आणखी एक आमदार (MLA for Pune) मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. पुणे शहर शिवसेना प्रमुख नाना भागगिरे (Nana Bhangire) यांना विधान परिषदेची (MLC) संधी मिळण्याची शक्‍यता असून मागील बऱ्याच दिवसांपासून भानगिरे यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहेत.  याला कारणही तसेच आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नेमणूकीवरील स्थगिती नुकतीच उठविली आहे. भानगिरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या विशेष मर्जीतले असल्याने त्यांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्‍यता असल्याची जोरदार चर्चा आहे. (MLC | Pune News)
शहर शिवसेनेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक नाना भानगिरे हे 2007 पासून शिवसेनेकडून महापालिकेत नगरसेवक होते. तर, 2014 मध्ये त्यांनी कात्रज विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. मात्र, नंतर पुन्हा त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत 2017 मध्ये महापालिकेत निवडून आले. तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील होते. त्यामुळे, शिंदे गटाचे आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर भानगिरे हे शिवसेनेचे एकमेव नगरसेवक त्यांच्या सोबत सेनेतून बाहेर पडले. तर मुख्यमंत्री शिंदे यांनीही त्यांच्याकडे पुणे शहराची जबाबदारी दिली आहे. (Pune Shivsena)
भानगिरे यांच्या जवळपास सर्व कार्यक्रमांना मुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहिले असून भानगिरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्‍वासू म्हणून ओळखले जातात. शिवसेनेच्या शहर प्रमुख निवड झाल्यानंतर नव्याने समाविष्ट गावांसाठी विशेष समिती नेमणे, हडपसर मतदारसंघातील रस्ते, निवासी मिळकतींना 40 टक्के कर सवलत कायम ठेवणे, पीएमपी कामगारांना सातवा वेतन आयोग मिळवून देण्यासाठी भानगिरे यांनी सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे भानगिरे यांनी देखील जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र निर्णय हा वरिष्ठांच्याच हातात असणार आहे.
——
News Title | MLC | Pune News | Nana Bhangire will get a chance as an MLA on the Legislative Council!

MLC Election | महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर,शिक्षक मतदार संघ द्वैवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर,शिक्षक मतदार संघ द्वैवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

भारत निवडणूक आयोगाने  महाराष्ट्र विधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघ आणि तीन शिक्षक मतदारसंघ अशा एकूण पाच मतदार संघांसाठी द्वैवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नाशिक व अमरावती विभाग पदवीधर तसेच कोकण, औरंगाबाद आणि नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी 30 जानेवारी 2023 रोजी निवडणुक होणार आहे. आजपासून या निवडणूकीची आचारसंहिता संबंधित पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात लागू करण्यात आली आहे.

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :

गुरुवार दि. 5 जानेवारी 2023 रोजी या निवडणूकीची अधिसूचना जारी करण्यात येईल. गुरुवार दि. 12 जानेवारी 2023 ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. शुक्रवार दि. 13 जानेवारी 2023 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल्, सोमवार दि. 16 जानेवारी 2023 ही नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अतिम तारीख असेल. सोमवार दि. 30 जानेवारी 2023 रोजी सकाळी 08:00 ते दुपारी 04:00 वाजेपर्यंत मतदान होणार असून गुरुवार दि. 2 फेब्रुवारी 2023 रोजी मतमोजणी होईल.

सर्वश्री डॉ. सुधीर तांबे (नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ), डॉ. रणजित पाटील (अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ), श्री.विक्रम काळे (औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ), श्री.नागोराव गाणार (नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ), श्री. बाळाराम पाटील (कोकण विभाग शिक्षक मतदार संघ) हे विधानपरिषद सदस्य 7 फेब्रुवारी 2023 रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे रिक्त होणाऱ्या या पाच जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

12 MLAs appointed to Legislative Council | राज्यपालांच्या निर्णयाविरोधात याचिका

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

राज्यपालांच्या निर्णयाविरोधात याचिका

विधान परिषदेवर नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न

महाविकास आघाडी सरकारने दिलेली राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नावे रद्दबातल करण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी बारा जणांच्या नावाची शिफारस राज्यपालांना केली होती. यामध्ये साहित्य, शैक्षणिक, संशोधन, कलाकार अशा विविध क्षेत्रांतील गुणी व्यक्तींचा समावेश होता. मात्र राज्यपालांनी वर्ष होऊनही यावर निर्णय घेतला नाही. तसेच संबंधित यादी प्रलंबित ठेवली. आता राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. अशा वेळी पुन्हा नव्याने ही यादी तयार करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेला ॲड. नितीन सातपुते यांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले आहे.

राज्यपालांनी पहिल्या बारा जणांची यादी पूर्ववत ठेवावी, नवीन यादी करण्यासाठी शिंदे सरकारला मनाई करावी, इत्यादी मागण्या याचिकेत करण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबाबत याचिका प्रलंबित आहेत, तसेच घटनापीठाकडे संबंधित मुद्यांवर सुनावणी प्रलंबित आहे. अशावेळी अन्य कोणतेही निर्णय घेण्यासाठी शिंदे सरकारला मनाई करावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. याचिकेवर नियमित न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

MLC Election | जे २६ चा आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

जे २६ चा आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल

: विधान परिषद निवडणूक अजित पवारांनी घेतलीय मनावर

राज्याची विधानपरिषद निवडणुकीस अवघे दोन दिवस शिल्लक असून, २० जून रोजी मतदान आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारपरिषद घेत, महाविकास आघाडीच्या तयारीबाबत माहिती दिली. तसेच, चमत्कार कुणाच्याबाबत घडतोय हे उभा महाराष्ट्र सोमवारी बघेल, असं विधानही यावेळी त्यांनी केलं. शिवाय महाविकास आघाडीचे सर्व सहा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं.

उपमुख्यंत्री अजित पवार म्हणाले, “विधानपरिषद निवडणूक लागली आहे, ११ उमेदवार उभे आहेत. साधारण चार पक्षाचे उमदेवार निवडणुकीसाठी उभे आहेत. महाविकासआघाडी म्हणून आम्ही सहा उमेदवार उभा केलेले आहेत. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन उमेदवार आहेत. मागील दोन दिवस मी विविध बातम्या पाहतोय, मी स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की आम्ही सगळेजणं हे उमेदवार निवडून आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करतोय.”

तसेच, “एक गोष्ट खरी आहे की शिवसेनेकडे दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे मतं आहेत. आमच्या दोन सदस्यांना अजूनही मतदान करण्याची परवानगी न्यायालयाने न दिल्याने आमची संख्या ही ५१ आहे. कोटा साधारण २६ चा आहे. अगदी काठावर धरून चालत नाही, कारण कालच्या राज्यसभा निवडणुकीत काय घडलं हे अवघ्या महाराष्ट्राने पाहीलेलं आहे. त्यामुळे यदाकदाचित एखादं मतं दिलेलं बाद झालं, काही तिथे अडचण आली, सभागृहात मतदान करत असताना कधी काय होईल सांगता येत नाही. कधी नजरचुकीने देखील एखादी गोष्ट घडून जाते आणि त्याची किंमत शेवटी मोजावी लागते. जसं मागील वेळेस एका शिवसेनेच्या सदस्यांस आमदार म्हणून दिलेलं मत हे बाद ठरवण्यात आलं. म्हणून आम्ही सगळेजण काळजी घेतोय, कोटा जास्त कसा देता येईल याबद्दलचा प्रयत्न करतोय.” असं यावेळी अजित पवारांनी सांगितलं.

याचबरोबर, “चमत्कार होईल की आणखी काय होईल ते सगळं दिसेलचं. ११ पैकी १० निवडून येणार आहे एक जण पराभूत होणार आहे, त्यामुळे तो चमत्कार तर घडणारच आहे. आता चमत्कार कुणाच्याबाबतीत घडतोय ते उभा महाराष्ट्र सोमवारी बघेल. सर्व जागा निवडून आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करते आहे. जे २६ चा आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल.” असंही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलून दाखवलं.

तर “अपक्षांकडे सन्मानाने मतं मागितली पाहिजेत. अपक्षांना काहींनी फोन केलं हे खरं आहे. मी स्वत: अनेकांना फोन केले. अशोकराव, बाळासाहेबांनी अनेकांना फोन केले. पहिलं आणि दुसरंच मत महत्वाचं नाही, तर तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांकही महत्वाचा असतो त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. एक आणि दोन एकमेकांना दिल्यानंतर तीन आणि चार बद्दल आम्ही ठरवू. आम्हाला थोड्या मतांची गरज आहे. मी, जयंत पाटील, भुजबळ आम्ही सर्व चर्चा करत आहोत.” अशी देखील माहिती अजित पवारांनी यावेळी दिली.

MLC : विधान परिषदेच्या दहा सदस्यांना निरोप!

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

विधान परिषदेच्या दहा सदस्यांना निरोप

 

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेतून दहा सदस्य लवकरच निवृत्त होत असून या सर्व सदस्यांना निरोगी व दीर्घायुष्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

विधानपरिषदेतून सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सदस्य सर्वश्री दिवाकर रावते, सदाशिव खोत, सुजितसिंह ठाकूर, विनायक मेटे, प्रसाद लाड, संजय दौंड, रवींद्र फाटक हे दहा सदस्य निवृत होणार आहेत. या सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व दहा सदस्यांच्या कारकीर्दीविषयी व त्यांच्या सभागृहातील कामगिरीविषयी आपले विचार व्यक्त केले.

सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं अभ्यासू, सुसंस्कृत, उच्चशिक्षित व्यक्तिमत्वं म्हणून ओळखले जाते. फलटण राजघराण्याचे २९ वे वंशज म्हणूनही त्यांचं जनमानसात वेगळे स्थान आहे. प्राध्यापक, फलटणचे नगराध्यक्ष, विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे आमदार, राज्याचे मंत्री, विधान परिषदचे सभापती अशा जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यातून विधिमंडळ सभागृहाची उंची वाढवण्यासाठी योगदान दिले आहे. त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी उपस्थित सदस्यांच्या मनात कायम राहतील, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सभागृहात निश्चितच चांगलं काम केले आहे. ते सहकारी बँकिंग क्षेत्रातून पुढं आलेलं नेतृत्व असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्रासारख्या औद्योगिक, व्यापारी, आर्थिकदृष्ट्या प्रगत राज्याचे उद्योगमंत्री म्हणून काम करताना, या राज्यात औद्योगिक गुंतवणूक वाढावी, उद्योगधंद्यांचा विकास व्हावा, उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

सदस्य दिवाकर रावते यांनी मराठी भाषेसाठी आणि मराठी बांधवांच्या हक्काच्या लढ्याचा वसा आणि वारसा पुढे नेला आहे. या सभागृहातली त्यांची भाषणे, विचार पुढे नेणारी होती, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

सदाभाऊ खोत हे शेतकरी संघटनेच्या चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व आहे. शेतकरी संघटनेचे नेते, दिवंगत शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदाभाऊंनी चळवळीच्या कामाला सुरुवात केली. सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या मरळनाथपूर सारख्या छोट्याशा गावातला, सामान्य शेतकऱ्याच्या घरी जन्‍मलेला युवक या सभागृहाचा सदस्य होतो, राज्याच्या मंत्रीमंडळात काम करतो, ही मोठी गोष्ट असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

सुजितसिंह ठाकूर हे विधीमंडळात मराठवाड्याचं प्रतिनिधीत्वं करतात. त्यांनी राजकीय, सामाजिक जीवनाची सुरुवात, परांड्यांतून केली. राजकारण, समाजकारण, सहकाराच्या बरोबरीनं शिक्षण क्षेत्रात योगदान दिलं. त्यांच्या तिथल्या ज्ञानाचा, अनुभवाचा उपयोग त्यांना सभागृहात निश्चितपणे झाला.

विनायक मेटे यांचे संघटन कौशल्य चांगलं आहे. त्यांच्याकडे वक्तृत्वं, वकूब आहे. त्यांच्या या गुणांचा फायदा समाजाला झाला पाहिजे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा देत असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

सदस्य प्रसाद लाड हे राजकारण, समाजकारण, उद्योग, सेवा अशा अनेक क्षेत्रात एकाच वेळी काम करणारं नेतृत्व आहे. राज्यातल्या एका उद्योगशील प्रतिनिधीला या सभागृहाच्या माध्यमातून आपण निरोप देत असल्याची भावना आपल्या सगळ्यांच्या मनात असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यात जन्मलेल्या आमदार संजय दौंड यांना त्यांचे वडील माजी मंत्री पंडीतराव दौंड यांचा राजकीय, सामाजिक वारसा लाभला आहे. तो वारसा ते समर्थपणे पुढे चालवत आहेत. बीड जिल्हा परिषद सदस्य म्हणून संजय दौंड यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रदीर्घ काळ काम केल्यामुळं त्यांना जनतेच्या प्रश्नाची चांगली जाण आहे. त्याचा उपयोग त्यांना या सभागृहात झाला असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

रविंद्र फाटक हे संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करतात. त्यांनाही शुभेच्छा देत असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, यावेळी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती नीलम गोऱ्हे, परिवहन मंत्री अनिल परब, सदस्य सुरेश धस, दिवाकर रावते, विनायक मेटे, भाई गिरकर, सदाशिव खोत, निलय नाईक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.