Natural Calamities | नैसर्गिक आपत्तीतील तातडीच्या मदतीत तिपटीने वाढ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

नैसर्गिक आपत्तीतील तातडीच्या मदतीत तिपटीने वाढ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नैसर्गिक आपत्तीत तातडीची मदत म्हणून नुकसानग्रस्त कुटुंबांना पाच हजार रुपये मदत करण्यात येत होती. त्यामध्ये तिपटीने वाढ करून पंधरा हजार रुपये अर्थसाह्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासारखेच शेतकरी, कष्टकरी यांच्या हिताचे निर्णय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

कोविडच्या निर्बंधानंतर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन यशस्वीरित्या आणि पूर्णवेळ पार पडले आहे. 9 दिवसांमध्ये 6 दिवसाचे कामकाज झाले. माझ्या दृष्टीनं हे अधिवेशन खूप यशस्वी ठरले असे मुख्यमंत्र्यांनी सांगून या अधिवेशनात सर्वसामान्यांच्या दृष्टीने आम्ही महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे म्हटले आहे

पुरवणी मागण्यांच्या विधेयकांसह महत्वपूर्ण अशी विधेयके मंजूर करण्यात आली.
या अधिवेशनात एकूण 10 विधेयके मंजूर करण्यात आली असेही मुख्यमंत्री म्हणाले.

• भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबाबत अभिनंदन प्रस्ताव
• नवनियुक्त राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव.
• औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याबाबत, तसेच नवी मुंबई विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ नामकरण करण्याचा केंद्र शासनाला शिफारस करण्याचा विधान मंडळाचा ठराव.
• या अधिवेशनात विविध विभागांच्या 25 हजार 826.72 कोटी रुपयांच्या पुरवणी मागणीला मंजूरी देण्यात आली.
• थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक.
• राज्यात “एक दिवस बळीराजा” साठी ही संकल्पना राबवणार.
o सततच्या पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास नुकसानभरपाई मिळणार.एनडीआरएफ पेक्षा दुप्पट मदत
o पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर.
o शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वकष कृती आराखडा.
• आपत्तीप्रवण क्षेत्राच्या पुनर्वसनाबाबत लवकरच धोरण.
• मुंबई पालिका क्षेत्रातील रस्ते काँक्रीटचे करणार तीन वर्षात काम पूर्ण करणार.
• धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्णत्वास नेणार.
• गिरणी कामगारांना 50 हजार सदनिका देण्यासाठी उपलब्ध होत आहेत. त्या त्यांना देण्यात येतील.
• मुंबईतील कोळीवाड्यांच्या विकासाबाबत विशेष विकास नियंत्रण नियमावली.
• बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी आवश्यकतेनुसार निधी.
• बीडीडी चाळीतील पोलिसांना 15 लाख रुपयांमध्ये मालकी हक्काचे घर.
• मेट्रो मार्ग 5 चा विस्तार करण्यात येणार आहे.
• महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील 100 टक्के व कक्षेबाहेरील 50 टक्के पदभरती करणार.
• राज्यात सात हजार पोलिसांची भरती करणार.
• 29 हजार सफाई कर्मचाऱ्यांची घरे मालकी हक्काने देण्यात येईल.
• शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरणार.
• मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करणार.
• हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत वाढविणार.
• हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम युद्धपातळीवर
• आश्रमशाळांसाठी 600 कोटींची तरतूद.
• राज्यातील ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ करणार.
• कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचा कोर्स फी
• वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यातील मृतांच्या कुटूंबियांना 20 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य
• राज्यात साकवांचे रूपांतर पुलांमध्ये करण्याचा निर्णय.
• रेवस-रेड्डी महामार्गाच्या भूसंपादनासाठी सुमारे दीडशे कोटी रुपयांची पूरक मागणी.
• पुणे शहरातील रिंगरोडच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला अडीचशे कोटी रुपये वर्ग.
• स्वारगेट-कात्रज भुयारी मेट्रो मार्गाचा प्रकल्प आराखडा केंद्राला मान्यतेसाठी पाठवला.
• खडकवासला-स्वारगेट पुलगेट हडपसर-लोणी काळभोर या मार्गावर मेट्रो रेल्वे प्रकल्प.
• जलजीवन मिशन अंतर्गत रायगडमध्ये 1 हजार 70 पाणी पुरवठा योजना मंजूर.
• बहिर्जी नाईक, उमाजी नाईक यांच्या स्मारक परिसराच्या विकासासाठी निधी दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर दुर्घटनाग्रस्त गोविंदांना आर्थिक सहाय्य.

CM Eknath Shinde | राज्यात ७५ हजार पदांची भरती करणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र शेती

राज्यात ७५ हजार पदांची भरती करणार

| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ हजार रिक्त पदांची भरती केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले.

महाराष्ट्र विधानसभा नियम २९२ अन्वये उपस्थित करण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यातील विविध विभागांच्या आस्थापनेवरील रिक्त पदांचा आढावा घेतला जात आहे. या सर्व रिक्त जागा भरण्यासाठी ७५ हजार रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या पदसंख्येत आणखी काही हजारांत वाढ होण्याची शक्यता आहे.

आरे येथेच मेट्रो कारशेड होणार

मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कारशेड आरे येथेच उभारले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, आरे येथे वनजमिनींची एकूण १२८५ हेक्टर जमीन आहे. त्यामध्ये आणखी ३२६ हेक्टर जमीन वन क्षेत्रात समावेश केला आहे. कारशेडसाठी केवळ २५ हेक्टर जमीन लागणार आहे. या जागेच्या तीनही बाजूंनी रहदारीचे रस्ते आहेत. त्यामुळे आरेमधील जागा कारशेडसाठी योग्य आहे. याबाबत मदान समिती आणि सौनिक समितीनेही आरे येथील जागाच कारशेडसाठी उपयुक्त असल्याची शिफारस केली आहे.

राज्यातील गुन्हेगारीत घट

राज्यातील गुन्हेगारीत घट झाली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते म्हणाले, राज्यातील गुन्हेगारीत घट झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर गुन्हे प्रकटीकरणात वाढ होत आहे. पोलीसांनी मुस्कान अभियानामधून राज्यातील सुमारे ३७ हजार ५११ मुले आणि मुलींचा शोध घेऊन पालकांकडे सुपूर्द केली आहेत. अंमली पदार्थांच्या विरोधात पोलीसांनी कठोर कारवाई केली आहे, असे त्यांनी सांगितले.

पोलीसांना पंधरा लाखांत घर

बीडीडी चाळीचा पुनर्विकास गतीने पूर्ण केला जाईल. या पुनर्विकास इमारतींमध्ये पोलीसांना केवळ पंधरा लाख रुपयांत घर उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पोलीसांना अधिक घरे उपलब्ध व्हावीत यासाठी गृहनिर्माण धोरणात विशेष तरतूद केली जाईल. पोलीसांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. न्यायालयीन विकासासाठी दरवर्षी भरीव निधी देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुंबईतील मालमत्ता करात वाढ नाही

कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मालमत्ता करात वाढ करण्यात आली नव्हती. आणखी एक वर्ष मालमत्ता करात वाढ केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. उल्हासनगर मधील एक जानेवारी २००५ पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांना नियमित करण्यासाठी विशेष कार्यप्रणाली राबविण्यात येईल. त्यासाठी प्रशमन शुल्कातही मोठ्या प्रमाणावर कपात करण्यात आली आहे. हे शुल्क प्रति चौरस मीटरास २२०० रुपये आकारले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना भरीव मदत

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त मदत तत्काळ दिली आहे. पूर्वी ही मदत केवळ पाच हजार रुपये होती. ती मदत आता पंधरा हजार रुपये दिली जात आहे. गावांचे शहराशी दळणवळण वाढायला मदत व्हावी यासाठी रस्ते विकासासाठी प्राधान्याने काम केले जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील मुद्दे

*पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केली

*चौदा लाख शेतकऱ्यांना आर्थिक मदत

*उपसा जलसिंचन योजनेच्या वीजदरात एक रुपयांने कपात

*राज्यातील गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक प्रयत्न

*हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गचे लवकरच लोकार्पण

*सत्तावीस हजार कोटी रुपयांचे विकास प्रकल्प हाती

*एमएमआरडीएच्या साठ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना शासन हमी

*मुंबई-गोवा महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास सुरुवात

*प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार

वसई विरार मल्टीमोडल हबचा सविस्तर प्रकल्प अहवाल

पुणे रिंग रोड आणि रेवस-रेड्डी रस्त्यास निधी उपलब्ध करणार

*पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा सर्वंकष विकास आराखडा

*मंदिरे आणि गड किल्ले यांचे जतन-संवर्धन करणार

*कोल्हापूर सांगली शहरातील पुराबाबत सल्ला घेऊन उपाययोजना करणार..

Shivaji Nagar to Hinjewadi Metro | शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार |मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार

|मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधितांची व्यापक बैठक बोलावली जाईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत सांगितले. तसेच शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पूर्तता प्राधान्याने केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

मंत्री केसरकर यांनी सांगितले की, शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची २३.३ किलोमीटर लांबी आहे. संकल्पना करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वानुसार हा प्रकल्प बांधण्यात येत आहे. या कामास सुरुवात झाली असून प्रकल्प कालावधी ४० महिने आहे. या प्रकल्पातील एकात्मिक उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. या कामामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी एकेरी मार्ग करणे, नो पार्किंग, नो हॉल्टिंग झोन करणे, सायकल ट्रॅक आणि फुटपाथ काढून रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहेत.

पुणे मुंबई महामार्गावरील चांदणी चौकातील पुलाचे कामही लवकरच पूर्ण केले जाईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी सदस्य भीमराव तापकीर यांनी विचारलेल्या उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

याबाबत सदस्य सिध्दार्थ शिरोळे, राहुल कुल, भीमराव तापकीर यांनी चर्चेत सहभाग घेतला.

Monsoon Session | विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित सरकारच्या चहापान कार्यक्रमावर विरोधी पक्षांचा बहिष्कार

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित सरकारच्या चहापान कार्यक्रमावर विरोधी पक्षांचा बहिष्कार

शेतकऱ्यांच्याप्रश्नी सरकार गंभीर नाही; शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही

पावसाळी अधिवेशात सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरणार
-विरोधी पक्षनेते अजित पवार

मुंबई| “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं राज्य सरकार लोकशाही व संसदीय परंपरांच्या चिंधड्या उडवून विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेले आहे, हे सरकार अद्याप विधीमान्य नाही. सरकारकडून विकासकांना स्थगिती देऊन राज्याच्या विकासाला खीळ घालण्याचं काम सुरु आहे. शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही. विदर्भ, मराठवाडा, कोकणासह राज्यातील २८ जिल्ह्यांत अतिवृष्टी, पूरस्थितीने हाहा:कार माजला असताना, सव्वाशेहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असताना, राज्यातील शेतकरी मदतीअभावी आत्महत्या करत असताना, राज्य सरकारकडून सामान्य जनतेला कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. ‘एनडीआरएफ’चे मदतीचे निकष कालबाह्य झालेले असताना केवळ त्याच्या दुप्पट मदत देण्याची सरकारची घोषणाही जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार आहे. राज्यात महिला, बालिकांवर अत्याचारांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असताना सत्ताधारी पक्षातले सदस्य चिथावणीखोर भाषा वापरुन लोकांना भडकविण्याचा प्रयत्न करत आहेत, राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून सरकारला सत्तेचा दर्प चढला आहे. ज्या सरकारची विश्वासार्हता आणि वैधता संदिग्ध आहे, अशा सरकारच्या चहापान कार्यक्रमास उपस्थित राहणे म्हणजे लोकशाही व्यवस्था आणि राज्यातील जनतेशी प्रतारणा ठरेल,” असा घणाघाती आरोप करुन पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्यावतीने बोलविण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षाच्यावतीनं बहिष्कार घालण्यात आल्याची माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

मुंबईतील विधानभवनाच्या वार्ताहरकक्षात आयोजित पत्रकार परिषदेत सर्व विरोधी पक्षांच्यावतीने विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार एकनाथ खडसे, आमदार अनिल परब, आमदार भाई जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित होते. तत्पूर्वी विधानभवनातीव विरोधी पक्षनेत्यांच्या समिती सभागृहात विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली. बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, नाना पटोले, अनिल परब, अजय चौधरी, रईस शेख, बाळाराम पाटील, कपिल पाटील, सुनील प्रभू, सुरेश वरपूडकर, अनिल पाटील, सचिन अहिर, मनिषा कायंदे आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला व त्यासंबंधीचे पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

विरोधी पक्षाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यात अतिवृष्टीने 15 लाख हेक्टरवरील पीकांचे नुकसान झालेले असताना, अतिवृष्टीग्रस्त भागात विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबलं असताना, चहापान कार्यक्रम टाळून केवळ चर्चा करणं संयुक्तिक ठरलं असतं. परंतु ही संवेदनशीलता सरकारने दाखविलेली नाही. दि. 30 जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून तब्बल 40 दिवस सत्ताधाऱ्यांनी राज्याला मंत्रिमंडळ दिलं नाही. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देऊ शकला नाही. महाराष्ट्रासारखं देशातलं सर्वात प्रगत राज्य वाऱ्यावर सोडण्याचं काम आपण केलं.

विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ निकषांच्या दुप्पट मदत करण्याची घोषणा घाईघाईनं करुन जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रयत्न केला. एनडीआरएफचे निकष कालबाह्य झाले असून त्यात अनेक घटकांचा समावेश नाही. दुप्पट मदत जाहीर करुनही शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही. त्यामुळे ही घोषणा फसवी आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री पाच वेळा दिल्लीला जाऊन आले, परंतु महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पाठवण्याची किंवा राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत जाहीर करण्याची मागणी केंद्र सरकारकडे त्यांनी केली नाही.

दिल्ली भेटीतील ‘नीती’ आयोगाच्या बैठकीवेळचा फोटो माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाला आहे. तो फोटो महाराष्ट्राच्या सन्मानाला धक्का आहे. फोटो पाहिल्यानंतर ‘धर्मवीर’ चित्रपटातील स्वर्गीय आनंद दिघे यांनी विचारलेला ‘एकनाथ कुठे आहे…?’ हा प्रश्न महाराष्ट्राला, मराठी माणसाला पडला आहे. मा. मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत उभं केलं म्हणून सन्मान ढासळावा एवढा महाराष्ट्र निश्चितंच लेचापेचा नाही, परंतु आमचे मुख्यमंत्री दिल्लीत गेल्यानंतर महाराष्ट्राचा सन्मान राखू शकले नाहीत, याचे दु:ख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्राभेटीचा अभिमानास्पद इतिहास रचलेल्या महाराष्ट्राला हे दु:ख अधिक बोचणारं आहे. यापुढे तरी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लागणार नाही, याची काळजी आपण घ्यावी.

महाराष्ट्राच्या अभिमानाला धक्का लावण्याचं काम आपल्याकडून सातत्यानं घडत आहे. स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्या स्मारक विकासाच्या कामाला आपण स्थगिती दिली. वंचित – शोषितांच्या वेदनांना आपल्या साहित्यातून वाचा फोडणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती नुकतीच 1 ऑगस्टला साजरी झाली. महाविकास आघाडी सरकारने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने समिती स्थापन करून 7 खंड प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला होता, त्यापैकी 2 खंड प्रकाशितही झाले. परंतु, सरकारमध्ये आल्याआल्या कोणताही विचार न करता आपण ही समितीही बरखास्त केली, प्रकाशनाचे काम रखडवले. छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊं माँसाहेब महाराष्ट्राचं प्रेरणास्थान आहेत. अशा महामानवांच्या स्मारकांच्या विकासकामांना आणि समित्यांना स्थगिती देणं, पुनर्विचाराचा निर्णय करणं, हे निषेधार्ह आहे.

तत्कालिन मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. सन्माननीय ठाकरे साहेबांनी अंतिम टप्प्यात घेतलेले अनेक निर्णय शिवसेना आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांना गती देणारे होते. त्या निर्णयप्रक्रियेत आपलाही सहभाग होता. असं असूनही, मंत्री म्हणून स्वत:च घेतलेल्या निर्णयांना मुख्यमंत्री झाल्यानंतर स्थगिती देण्याचा प्रकार अनाकलनीय, राजकीय हेतूने प्रेरित व विकास कामात अडथळा निर्माण करणारा आहे. राज्याचे मा. मुख्यमंत्री कुणाच्यातरी दबावाखाली असल्याने लोकोपयोगी निर्णय, विकासयोजनांना स्थगिती देत आहेत, राज्याच्या विकासप्रक्रियेला खीळ घालत आहेत, ही लोकभावना आहे. त्याबद्दल लोकप्रतिनिधी व जनतेत आपल्याबद्दल तीव्र रोष आहे. मुंबईतील बीकेसी येथील मध्यवर्ती मोक्याची जागा बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी नाममात्र किमतीत देण्याचा आपला निर्णय अशाच प्रकारचा व राज्याच्या हितांशी प्रतारणा करणारा आहे. मुंबईतील मेट्रो-सहाच्या कारशेडसाठी आपण आता कांजूरमार्गची जागा मागितली आहे. मेट्रो-तीन साठी आरे आणि मेट्रो-सहा साठी कांजूरमार्ग हा घोळ वाढवून पर्यावरणाचं आणि आता राज्याचं हजारो कोटींचं नुकसान करण्यास आपलं सरकार जबाबदार आहे.

आपण मुख्यमंत्री असलेल्या दोन सदस्यीय मंत्रिमंडळाने 40 दिवसात 750 शासननिर्णय निर्गमित केले. मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्र्यांना बिनखात्याचे मंत्री ठेवून मुख्यमंत्री म्हणून आपण, केवळ एका व्यक्तीने महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचे सगळे निर्णय घेतलेत. राज्याचे धोरणात्मक निर्णय केवळ एका व्यक्तीने घेण्याची कृती सामुहिक निर्णयप्रक्रियेला छेद देणारी, लोकशाही व्यवस्था, नैतिकतेचे धिंडवडे काढणारी आहे. आपल्या सरकारने सत्तास्थापनेपासून शेतकरी, कष्टकरी, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, व्यापारी, उद्योजक, महिला, विद्यार्थी, युवक या समाजघटकांबद्दल असंवेदनशीलता दाखवली. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची टक्केवारी कमी झाल्यानंतरही त्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याबाबत आपल्याकडून कोणतीही पावलं उचलली गेलेली नाहीत. ही अकार्यक्षमता, असंवेदनशीलता अक्षम्य आहे.

महोदय, विधानसभेचे विरोधी पक्षनेते व अन्य नेत्यांनी राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांचे दौरे केले. या दौऱ्यात अतिवृष्टीग्रस्तांचं दाहक, वेदनादायी वास्तव समोर आलं. ते वास्तव आणि करावयाच्या उपाययोजनांबद्दलचे सविस्तर निवेदन मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री आणि मा. उपमुख्यमंत्री महोदयांना देऊनही अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. अपेक्षित निर्णय घेण्यात आले नाहीत. अतिवृष्टीने झालेले नुकसान लक्षात घेऊन विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या राज्यात इतर भागात ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार व फळपिकांसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत तत्काळ द्यावी. अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, पांरपरिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता शैक्षणिक शुल्क सरसकट माफ करावे, बुडालेल्या मजूरीपोटी शेतमजूरांना एकरकमी अनुदान द्यावे, आदीवासी बांधवांना खावटी अनुदान तत्काळ द्यावे, शेतजमीन पूर्ववत करण्यासाठी आर्थिक मदतीसह आवश्यक उपाययोजना कराव्यात, ‘एनडीआरएफ’, ‘एसडीआरएफ’च्या प्रचलित निकषांच्या पलिकडे जावून मदत करावी, अशा मागणी आपणास भेटून निवेदनाद्वारे केली होती. परंतु आपण ‘एनडीआरएफ निकषांच्या दुप्पट मदत देण्यात येईल’, अशी अवघ्या एका ओळींची घोषणा करुन आम्ही केलेल्या सर्व मागण्या दुर्लक्षित केल्या. आम्ही दिलेल्या निवेदनातील सर्व मागण्या मान्य होऊन त्यानुसार तात्काळ अतिवृष्टीग्रस्तांना, शेतकऱ्यांना, नागरिकांना मदत करण्यात यावी, अशी पुनर्मागणी करीत आहोत.

महोदय, अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. वीजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडीत आहे. शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटपाचे उद्दीष्ट निम्म्यानेही पूर्ण झालेले नाही. खरीप पिकांवरील रोगगाईचा प्रश्न गंभीर आहे. मराठवाड्यात गोगलगायींनी सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान केलं आहे. विदर्भात मिलिपिड किटकांमुळे शेतकरी संकटात आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत ई-पीकपाहणी व ऑनलाईन पद्धतीच्या वेगवेगळ्या आदेशांमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. विमायोजनेच्या लाभांपासून शेतकरी वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. नाफेडकडून कांदाखरेदी बंद झाल्याने कांद्याचे भाव पडले व त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आहे. या सर्वांना राज्य सरकारकडून अपेक्षित मदत तातडीने उपलब्ध करण्यात यावी.

नगराध्यक्ष व सरपंच यांची निवड थेट जनतेमधून करण्याचा निर्णय लोकशाहीविरोधी व अव्यवहार्य असल्यानं त्याचा पुनर्विचार होण्याची गरज आहे. राज्यातील नागरिक पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी, पीएनजी, वीजेच्या दरवाढीनं हवालदिल आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विरोधी पक्ष म्हणून आपण राज्य सरकारकडे इंधनावरील करात पन्नास टक्के कपात करण्याची मागणी करत होता, परंतु सत्तेवर आल्यानंतर अवघी दोन ते तीन टक्के करकपात करुन आपण नागरिकांना फसवलं आहे. महागाई वाढवण्याचं पाप आपल्याकडून सातत्यानं घडत आहे. तांदूळ, डाळी, पीठ, दुध, दही, पनीरसारख्या जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी आकारण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय व आपण त्याला न केलेला विरोध हा राज्य सरकारची अगतिकता, संवेदनाशून्यता अधोरेखित करणारा आहे. जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्याच्या निर्णयाला विरोध करण्याचं धाडस आपण दाखवू शकला नाही, याचा खेद आहे.

राज्यातील जनता महागाईने पोळली असताना युवकांच्या वाढत्या बेरोजगारीचा प्रश्नही तितका गंभीर आहे. राज्य सरकारमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही तातडीने व्हावी. स्थानिक स्वराज संस्थांमध्ये ओबीसी बांधवांच्या आरक्षणाचा मार्ग खुला झाला असला तरी आरक्षणाची टक्केवारी कमी झाली आहे. याचा तातडीने पुनर्विचार झाला पाहिजे. मराठा समाजबांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी दिलेला लढा ऐतिहासिक आहे. मराठा समाजाला त्यांचा न्याय्य हक्क, आरक्षणाचा लाभ पूर्वलक्षी प्रभावानं मिळावा. मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक विकासासाठीच्या योजनांना निधी देऊन त्या अधिक गतिमान करण्यात याव्यात.

टीईटी परीक्षा गैरव्यवहारात सत्तारुढ गटातील नेत्याच्या मुलांवर गंभीर आरोप होत असताना त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. एका निरपराध मुलीवर अत्याचार व तिच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा आरोप असलेली व्यक्ती पुन्हा मंत्रिमंडळात आली आहे. विरोधी पक्षात असतांना ज्या तत्कालिन मंत्र्यांवर आपण सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले अशा अनेकांना आपण मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. मंत्रिमंडळातील नव्या 18 पैकी 15 मंत्र्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. मंत्रिमंडळातील मंत्री भ्रष्ट नाहीत की आपण त्यावेळी त्यांच्यावर केलेले आरोप खोटे होते, याचा खुलासा आपल्याकडून होणे अपेक्षित आहे. राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर असलेल्या आरोपांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.

भ्रष्टाचार व भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण, प्रोत्साहन देण्याचे आपल्या सरकारचे धोरण दिसते. भ्रष्टाचार, अकार्यक्षमतेमुळे निलंबित अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा, प्रशासनात बेदिली, अनागोंदी निर्माण करणारा आहे. खुद्द राज्याचे मुख्यमंत्रीच रात्री-बेरात्री रुग्णालयांना भेट देत असतील, मध्यरात्री ध्वनीक्षेपक लावून जाहीर सभा घेत असतील, स्वत:च्याच नावाच्या अनधिकृत बागेच्या उद्घाटनाला जाणार असतील, तर या राज्यात कायदे कोण पाळणार? कायद्याची भिती कुणाला वाटणार? पोलिस कायदा-सुव्यवस्था कशी राखणार ? राज्यातलं पोलिस दल आज हतबल दिसत आहे.

गोंदिया जिल्ह्यात एका महिलेवर दोन वेळा सामुहिक बलात्कार होतो. पुण्यात अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करुन हत्या केली जाते. सत्तारुढ पक्षाच्या जिल्हाध्यक्षाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल होतो. राज्यात गुंडगिरी वाढली आहे. महिला व बालकांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. मात्र 50% लोकसंख्या असणाऱ्या महिलांना आपल्या मंत्रिमंडळात स्थानच दिलेले नाही. कायदा-सुव्यवस्था ढासळली आहे. त्याचबरोबर राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचाही बोजवारा उडालेला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच राज्यात लेप्टो, मलेरिया व स्वाईन प्लूचे रुग्ण दिवसेंगणिक वाढत आहेत. राज्यात या सारख्य महत्वाच्या खात्यांना मंत्री नव्हते. मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्याची नामुष्की सरकारवर आली होती, त्यामुळे जनतेला कुणी वाली राहिलेला नाही.

आपल्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्रविरोधी आहे. राज्याच्या हिताचे प्रकल्प, विकासयोजनांना स्थगिती दिली जात असताना गुजरातच्या हिताचे निर्णय धडाधड होत आहेत. गुजरातसाठी महत्वाच्या अशा बुलेटट्रेन प्रकल्पाला बीकेसीतील मध्यवर्ती तसंच पालघर येथील दुग्धव्यवसाय विभागाची जागा देताना आपण दाखवलेला वेग बुलेटट्रेनच्या वेगालाही लाजवणारा आहे.

महोदय, राज्याच्या मा.महामहिम राज्यपाल महोदयांकडून महाराष्ट्राबद्दल, महापुरुषांबद्दल सातत्याने अवमानास्पद वक्तव्ये केली जात आहेत. जातीवाद, भाषावाद, प्रांतवाद निर्माण करुन सामाजिक अस्थैर्य निर्माण करण्याचा, राजकीय वातावरण बिघडवण्याचा, कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मा.महामहिम राज्यपाल महोदयांची वक्तव्ये सरळसरळ महाराष्ट्रविरोधी, महाराष्ट्रवासियांच्या भावना दुखावणारी आहेत. ही वक्तव्ये सहन करणं शक्य नाही. महामहिम राज्यपाल महोदयांच्या वक्तव्यांची पाठराखण करण्याचा आपल्याकडून होत असलेला प्रयत्नही तितकाच निषेधार्ह असून अशी वक्तव्ये आणि त्यांची पाठराखण सहन केली जाणार नाहीत, असा इशारा देण्यात येत आहे.
महोदय, राज्याची सत्ता हाती घेण्याआधीपासून तसेच घेतल्यानंतरही सरकारच्या डोक्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून अपात्र ठरण्याची टांगती तलवार कायम आहे. सरकारची वैधता संदिग्ध असल्याने, आपण आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमास उपस्थित राहणे म्हणजे भारतीय संविधानाशी, महाराष्ट्र राज्याशी व राज्यातील जनतेच्या हिताशी प्रतारणा ठरणार आहे. सबब मा. मुख्यमंत्री महोदयांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर आम्ही सर्वजण बहिष्कार टाकत आहोत, असे पत्रात म्हटले आहे.

Monsoon Session | विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्ट पासून

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्ट पासून

विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई| सन २०२२ चे पावसाळी अधिवेशन बुधवार दिनांक १७ ऑगस्ट पासून विधान भवन, मुंबई येथे होणार आहे. दिनांक १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार असून विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

मुंबईत विधानभवन येथे विधान सभा आणि विधान परिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठका झाल्या. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, दादाजी भुसे, उदय सामंत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानपरिषद व विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.

दिनांक १७ ते २५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अधिवेशन होणार असून यामध्ये शुक्रवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी दहीहंडी सुट्टी आणि दिनांक २०,२१ ऑगस्ट या सार्वजनिक सुट्या आहेत. या दिवशी कामकाज होणार नाही. दिनांक २४ ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

याबैठकीत पावसाळी अधिवेशन विधानपरिषद व विधानसभा बैठकांची तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली.

Hadapsar Railway Station | हडपसर रेल्वे स्थानकाचा विकास करणेसाठी तातडीने निधी उपलब्ध करावा : खासदार गिरीश बापट

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

हडपसर रेल्वे स्थानकाचा विकास करणेसाठी तातडीने निधी उपलब्ध करावा : खासदार गिरीश बापट

नवी दिल्ली : हडपसर रेल्वे स्थानकाचा विकास करणेसाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत खासदार बापट यांनी आज लोकसभेत कलम ३७७ अन्वये मुद्दा उपस्थित करून केंद्र शासनाचे लक्ष वेधले.

गेल्या काही वर्षात प्रवाशांची आणि गाड्यांची संख्या लक्षणीय वाढत असल्याने पुणे रेल्वे स्थानकावरून नवीन गाड्या धावणे शक्य होत नाही. त्यामुळे पुणे स्टेशन ऐवजी हडपसर सारख्या पर्यायी स्टेशन वरून गाड्या सुरु करणे आवश्यक आहे. पुणे जंक्शनवरून सुमारे 150 लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. यापैकी काही गाड्या हडपसर येथून सोडल्यास पुणे जंक्शनवरील भार कमी होईल.

पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे काही गाड्या हडपसरला हलवत आहे. सध्या हडपसर ते हैदराबाद ही विशेष ट्रेन हडपसर रेल्वे स्थानकावरून धावते. परंतु हडपसर रेल्वे स्थानकावर चार फलाट असून प्रवाशांसाठी एक फूट ओव्हरब्रिज आहे. स्थानकावर थांबणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांना रेल्वे स्थानकात सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे इच्छीत स्थळी पोहचण्याकरीता वैयक्तिक किंवा खाजगी प्रवाशी वाहनाचा वापर करावा लागत असल्याने त्यांचेवर आर्थिक भार पडतो. त्याचप्रमाणे स्थानकावर प्रवाशांना वाहने उभी करण्यासाठी वाहनतळाची जागा कमी असल्याने जागा उपलब्ध करून वाहनतळ विकसित करावे, मुख्य रस्त्यापासून स्थानकाकडे जाणारे रस्ते हे अरुंद असल्याने वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली असल्याने स्थानकाकडे जाणा-या रस्त्याचे रुंदीकरण करावे, प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने येथे प्रशस्त स्थानक इमारत व आरक्षण केंद्र इमारत उभारावे, सध्या स्थानकावर प्रवाशांकरिता पत्र्याच्या शेडमध्ये प्रतीक्षालय करण्यात आले आहे, ते सुसज्य इमारतीत करावे. जेष्ठ नागरिकांना साहित्य घेवून जिना चढणे शक्य नसल्याने स्वतंत्र व्यवस्था करावी, या व इतर अनेक सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांची होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी या सुविधा तातडीने उपलब्ध करण्याची गरज आहे. म्हणून हडपसर रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याकरीता केंद्र शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी कलम ३७७ अन्वये मुद्दा उपस्थित करून केल्याचे बापट यांनी सांगितले.