Dilip Sopal | स्पोर्ट शुज घालुन झोपणारे गिरीश बापट | माजी मंत्री दिलीप सोपल यांनी सांगितलेला किस्सा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

स्पोर्ट शुज घालुन झोपणारे गिरीश बापट |  माजी मंत्री दिलीप सोपल यांनी सांगितलेला किस्सा

स्व गिरीश बापट साहेब आणि माजी मंत्री दिलीप सोपल  यांची जिगरी मैत्री . त्यातून अनेक किस्से ऐकायला अनुभवायला मिळाले. विधिमंडळाची लॉबी  असो ,मॅजेस्टिक आमदार निवास तील खोली असो  की सार्वजनिक व्यासपीठ  दोघेही एकत्र आले की हास्य कल्लोळ ठरलेला.
असाच एक आठवणीतील किस्सा  सोपल यांच्या  भाषेत .. ” नागपूर अधिवेशन काळातील हा प्रसंग .  अधिवेशन काळात मॉर्निंग वॉक चा  गिरीश बापट आणि मी संकल्प केला. बापट म्हणले चला सोपल स्पोर्ट शुज घेऊ. दोघांनी स्पोर्ट शूज घेतला. सकाळी ६ ला नागपूर च्या थंडीत मॉर्निंग वॉक ला जायचेच असा निश्चय करून आम्ही  आपापल्या  रूम  कडे गेलो. सकाळी ठरल्याप्रमाणे मी बापटांच्या रूम वर गेलो दरवाजा ठोठावला त्यांचा पी ए डोळे चोळत बाहेर आला मी म्हटले अरे उठव तुझ्या साहेबांना . पी ए  म्हणाला साहेब वॉकिंग ला जाऊन आलेत आणि परत झोपलेत. मी पाहिले तर खरच बापट शुज  घालून झोपलेले . म्हटले आपल्याला उशीर झाला म्हणून मी  गेलो वॉकिंग  ला . परत विधिमंडळात भेट झाल्यावर बापट बोलले आरे दिलीप सकाळी उशिरा का आला ?  मी बोललो झाला उशीर  परत दुसऱ्या दिवशी  गेलो  परत तसाच प्रसंग वॉकिंग शुज घालून बापट झोपलेले . पी ए चे तेच उत्तर आताच येऊन झोपलेत. २-३ दिवस हे असेच चाललेले . जरा संशय आला काहीतरी गडबड आहे.  चौथा दिवस पुन्हा पी ए बाहेर. त्याला विश्वासात घेतले काय गडबड आहे नक्की म्हणून  विचारले त्याने त्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले अहो सोपल साहेब तुमची  लय धास्ती घेतली साहेबांनी थंडीत कुठे उठून  मॉर्निंग वॉक ला जायचे म्हणून वॉकिंग शुज घालूनच झोपतात आणि तुम्ही आले की आताच आले वॉकिंग  वरून असे मला सांगायला लावतात.  आणि मग मी विधिमंडळ लॉबी त  नाव न घेता  बापटासमोर जेंव्हा हा प्रसंग सांगितला तेंव्हा मात्र माझा पी ए फुटला काय की म्हणून या  गमती ची त्यांनी पण मजा घेतली . “

Girish Bapat | खासदार गिरीश बापट यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

खासदार गिरीश बापट यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे, दि. २९ : पुणे लोकसभा मतदार संघाचे खासदार गिरीश बापट यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रकाश जावडेकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, सुनील कांबळे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, अशोक पवार, माधुरी मिसाळ, रवींद्र धंगेकर, राहुल कुल, श्रीकांत भारतीय यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आपल्या कुटुंबातले घटक, अजातशत्रू खासदार गिरीश बापट सोडून गेले याचे सर्वांच्या मनात प्रचंड दुःख आहे. ते सर्वसामान्यांचे नेते होते. सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला आपला माणूस वाटत होते. अनेक आंदोलनातून त्यांचे नेतृत्व उभे राहिले. नगरसेवक, महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष, पाचवेळा विधानसभेवर आमदार आणि त्यानंतर लोकसभेत पुण्याचे प्रतिनिधित्व केले.

स्व. बापट यांनी २०१४ ते २०१९ दरम्यान मंत्री म्हणून काम केले. त्यांनी आपली कारकीर्द, प्रत्येक भूमिका प्रचंड यशस्वी केली. अजातशत्रू अशा व्यवहारामुळे विधानमंडळ चांगला कारभार चालवला. नागरी पुरवठा मंत्री म्हणून पहिल्यांदा राज्यात संपूर्ण रेशन कार्डांचे आधार जोडणी करून १ कोटी बोगस रेशन कार्ड शोधून काढले आणि नवीन १ कोटी गरिबांना रेशन देण्याचे काम केले. त्यांच्या जीवनाच्या पानाशिवाय पुण्याचा इतिहास पुढे जाऊ शकणार नाही. तब्येत खराब असतानाही त्यांनी लढाई कधीच सोडली नाही, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

संपूर्ण शासकीय इतमामात स्व. बापट यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. पार्थिवावर लपेटण्यात आलेला राष्ट्रध्वज स्व. बापट यांचे सुपुत्र गौरव बापट यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी पोलीस आयुक्त रितेश कुमार, मनपा आयुक्त विक्रम कुमार आणि लोकसभा अध्यक्ष यांच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. स्व. बापट यांना श्रद्धांजली देण्यासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, विजय शिवतारे, रमेश बागवे, माजी खासदार संजय काकडे, अमर साबळे, माजी आमदार मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर, चंद्रकांत मोकाटे, मोहन जोशी, उल्हास जोशी, नरेंद्र पवार, शरद ढमाले, आशिष देशमुख यांच्यासह राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते.
000

MP Girish Bapat | खासदार गिरीश बापट यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून श्रद्धांजली | शहरातील विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

खासदार गिरीश बापट यांच्या जाण्याने समाजाचे, महाराष्ट्राचे मोठे नुकसान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

खासदार गिरीश बापट यांचे काम पुणे कधी विसरू शकणार नाही- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. 29 : खासदार गिरीश बापट यांची एक दिलदार, मोकळ्या मनाचा माणूस अशी ओळख होती. अशा कणखर मनाचा नेता आपल्यातून गेल्यामुळे त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाचेच नव्हे तर समाजाचे, महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले असून न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार गिरीश बापट यांच्या शनिवार पेठेतील निवासस्थानी त्यांचे पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. त्यांनी खासदार स्व. बापट यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

मुख्यमंत्री म्हणाले, विधानसभेत सर्वांना सोबत घेऊन त्यांनी काम केले. अशी माणसे दुर्मिळ असतात. सर्वांना सोबत घेताना विरोधकांनादेखील आपलेसे करण्याची गिरीशभाऊ यांची हातोटी होती. कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता त्यांनी सर्वांनाच मदत केली. पुणे शहरात भारतीय जनता पक्ष वाढविण्यात त्यांचे फार मोठे योगदान होते. पक्षाच्या, राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी काम केले. सर्वांना हवाहवासा नेता आपण गमावला. कोणताही राजकीय अभिनिवेश मनात न ठेवता सर्व धर्मियांना मदत केली. राजकारणाच्या पलिकडे जाऊन त्यांनी काम केले. अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

गिरीश बापट यांचे काम पुणे कधी विसरू शकणार नाही- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
खासदार गिरीश बापट हे एक अनमोल रत्न होते. पुण्याच्या जडणघडणीमध्ये त्यांचा वाटा अतिशय मोठा आहे. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, सलग पाच वेळा आमदार, खासदार, पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम पुणे कधी विसरु शकणार नाही. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाची, राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.

श्री. फडणवीस म्हणाले, पुणे हे नररत्नाची खाण असल्याचे आपण म्हणतो, त्यापैकी खासदार गिरीश बापट हे एक अनमोल रत्न होते. त्यांच्यामध्ये माणसे जपण्याची कला होती. महत्वाचे म्हणजे रस्त्यावरच्या माणसालाही आपला वाटेल असा हा माणूस होता. बोलण्यामध्ये ते खूप चपखल होते. कोणालाही न दुखावता शालजोडीतून शब्द वापरुन आपला मुद्दा पटवून देण्याची हातोटी होती. पक्षाच्या भिंतीपलीकडचे त्यांचे सर्व नेत्यांशी, पक्षांशी, समाजाशी त्यांचे अतिशय चांगले संबंध होते. संसदीय कार्यमंत्री म्हणूनही त्यांचे कार्य नोंद घेण्यासारखे होते. शेतीवरही त्यांचे प्रचंड प्रेम होते. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे प्रमुख म्हणून त्यांनी सिंचनाचे केलेले काम सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्यासारखे आहे. त्यांचे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना सगळ्या क्षेत्रातील प्रचंड ज्ञान होते. असे नेते तयार होण्यासाठी चाळीस- चाळीस वर्षे लागतात, अशा शब्दात त्यांनी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून बापट कुटुंबियांचे सांत्वन
मुख्यमंत्री श्री.शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी शनिवार पेठ येथील खासदार गिरीश बापट यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी खासदार बापट यांच्या पत्नी गिरीजा बापट, मुलगा गौरव बापट, सून स्वरदा बापट, बहिण माधुरी गोखले, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, जगदिश मुळीक उपस्थित होते.


खासदार गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना शोक

 

मुंबई, दि. 29 : राज्यपाल रमेश बैस यांनी खासदार गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

“लोकप्रिय खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत गिरीश बापट यांनी संसद सदस्य, राज्य विधानसभेचे सदस्य, कॅबिनेट मंत्री, संसदीय समित्यांचे सदस्य यांसह विविध पदांवर उल्लेखनीय कार्य केले. कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात आलेले गिरीश बापट हे कुशल संघटक होते. त्यांचा जनसंपर्क अतिशय व्यापक होता. राजकारणात ते अजातशत्रू होते. त्यांच्या निधनामुळे राज्याने एक लोकप्रिय नेता व अनुभवी संसदपटू गमावला आहे”, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या शोकासंदेशामध्ये म्हटले आहे.


राजकारणातील मित्रत्व जोपासणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले | राधाकृष्ण विखे पाटील यांची श्रद्धांजली

 

मुंबई, दि. 29 : “भाजपचे नेते आणि खासदार गिरीष बापट यांच्या निधनाने राजकारणातील मित्रत्व जोपासाणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले” अशी भावना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

आपल्या शोकसंदेशात मंत्री विखे पाटील म्हणाले की, गेली अनेक वर्षे विधिमंडळात त्यांचा सहवास लाभला. विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना त्यावेळी श्री. बापट संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम पाहायचे. राजकारणात फार कटूता येऊ न देता सभागृहातील निर्माण होणाऱ्या पेचप्रसंगावर संवादाने मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती.

महानगरपालिका ते लोकसभा हा गिरीष बापट यांचा राजकीय प्रवास त्यांच्या लोकाभिमुख कार्याचा होता. पुणे आणि गिरीष बापट हे एक अतूट नाते होते. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाचे मोठे नुकसान झाले असून पक्षाच्या वाटचालीतील एक अनुभवी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची संवेदना व्यक्त करून मंत्री विखे पाटील यांनी गिरीष बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.


पुणे शहराचे खासदार आणि माझे दीर्घकाळापासूनचे मित्र गिरीश बापट यांच्या निधनाने अतीव दुःख झाले. गेला काही काळ त्यांचे आजारपण चालू होते पण त्यामुळे त्यांना मृत्यू इतका लवकर येईल हे मात्र अपेक्षित नव्हते. कार्यकर्ता, नगरसेवक, आमदार, मंत्री, पालकमंत्री आणि खासदार अशी उत्तम राजकीय वाटचाल करताना त्यांनी स्वतःचा कार्यकर्त्याचा पिंड मात्र सोडला नाही. याच बरोबर राजकीय स्पर्धा असली तरी विरोधी पक्षांशी वितुष्ट असता कामा नये, ही राजकारणातील चांगली भावना त्यांनी सदैव जपली. त्यामुळेच सर्व राजकीय पक्षामध्ये त्यांचे चांगले मित्र होते. पुण्याच्या विकासात त्यांनी निश्चितच भरीव योगदान दिले. मात्र, शहराच्या विकासात त्यांनी कधी राजकारण आणले नाही. हे त्यांचे अजून एक ठळक वैशिष्ट्य सांगता येईल. पुण्याच्या मध्यवस्तीतील कसबा विधानसभा मतदारसंघात सलग पाच वेळा म्हणजेच सलग २५ वर्षे ते आमदार म्हणून निवडून येत होते. यातूनच त्यांच्या लोकसंपर्काची प्रचीती येते. पुण्यातील गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आणि मी प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक लढविली. मात्र, तरीही आमच्या मैत्रीत खंड पडला नाही. समाजातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन पुढे जाणारा आनंदी वृत्तीचा हा उमदा मित्र आज हरपला. यामुळे कुटुंबातील व्यक्ती गेल्यासारखेच दुःख मला झाले आहे. ईश्वर इच्छेपुढे कोणाचा इलाज नाही. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना.

मोहन जोशी उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी


मागील ३ ते ४ दशकापासून पुणे शहराच्या सामाजिक राजकीय व सामाजिक क्षेत्राशी जोडलेले नाव म्हणजे गिरीशजी बापट.
अत्यंत संघर्षातून महानगरपालिका,विधानसभा व लोकसभा सदस्य या पदांवर काम करत असताना तसेच पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीचे पालकमंत्रीपद भूषाविताना त्यांनी जपलेले पुणेरीपण ही बाब चिरकाल स्मरणात राहील. पुण्यातील सर्वच राजकीय पक्षांशी त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध होते ,त्यांच्या अकाली निधनामुळे पुणे शहराच्या राजकीय व सामाजिक चळवळीचे अपरीमित नुक़सान झाले आहे .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बापट कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

| प्रशांत सुदामराव जगताप.
अध्यक्ष, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.


गिरीश बापट – कामगार नेता ते खासदार असा प्रेरणादायी राजकीय प्रवास. सर्वसामान्य व्यक्ती ज्यांच्यापर्यंत सहज पोहचू शकेल असा खासदार. दांडगा जनसंपर्क, राजकारणातील मुत्सद्दी तरीही सर्व राजकीय पक्षातील लोकांशी राजकारणापलीकडील मैत्री जपणारा दिलदार मित्र ….भावपूर्ण श्रद्धांजली!

वंदना चव्हाण खासदार, राज्यसभा


गिरिष बापटांसारखा नेता, असा खासदार पुनः होणे नाही : डॉ. नीलम गोऱ्हे

दुःखद निधनाबद्दल वाहिली आदरांजली

पुणे, ता. २८ : दीर्घ काळापासून पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांची पुण्याचा आवाज म्हणून ओळख होती ते पुण्याचे खासदार श्री. गिरिष बापट यांचे आज नुकतेच निधन झाल्याचे समजले. त्यांना सर्व प्रथम मी महाराष्ट्र विधान परिषदेची उप सभापती, शिवसेनेची उपनेता तथा स्त्री आधार केंद्राची अध्यक्षा या नात्याने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते.

त्यांचा आणि माझ्या गेल्या तीन दशकांपासून अधिक काळ परिचय होता. पुणे शहरातून कसबा विधान सभेतून आमदार म्हणून काम करीत असताना त्यांचा परिचय आमच्या कुटुंबात आमची आई कै. श्रीमती लतिका दिवाकर गोऱ्हे यांच्याशी सर्वप्रथम झाला.
त्यानंतर शिवसेना-भाजप युतीचे सरकार असतानाही सातत्याने संपर्कात असत.

२०१४ नंतर ते पुण्याचे पालकमंत्री आणि लोकसभेचे खासदार देखील झाले. या संपूर्ण कालावधीत त्यांनी पुणेकरांच्या असंख्य प्रश्न सोडवितानाच अष्टविनायक, पुणे शहरातील वाडे, संसदीय कार्यमंत्री असताना दोन्ही सभागृहांचा समन्वय त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने केला होते. ते मंत्री असतांना विधान परिषदेत नेहमीच येत होते. सर्व पक्षांच्या आमदारांचे एक चांगले स्नेही म्हणून ते परिचित होते.

स्त्री आधार केंद्राच्या कार्यक्रमाना देखील अनेकदा ते आले होते. महात्मा फुले संग्रहालयाच्या ठिकाणाहून त्यांचा सर्वांचा संपर्क होत असे. असा नेता, असा खासदार पुनः होणे नाही अशी भावना मी व्यक्त करीत आहे.


खासदार गिरीश बापट यांनी पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन आपुलकी, प्रेम आणि मैत्री जपण्याचे काम केले. मला व्यक्तिशः त्यांनी मुलाप्रमाणे वागणूक दिली. त्यांच्याकडे घेऊन गेलेले काम त्यांनी पक्ष न पाहता वैयक्तिकरित्या लक्ष घालून मार्गी लावून देण्याचे काम केले. प्रत्येक घटकाला ते नेहमी आपलेसे वाटायचे. त्यांच्या निधनाने पुण्यातील आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचा हेडमास्तर गमविला असून ही पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ताकद मिळो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

सुनिल टिंगरे, आमदार वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ

—–

MP Girish Bapat | पुणं पोरकं झालं | खासदार बापट यांच्या निधनाने व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

खा. गिरीश बापट यांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं!

-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची श्रद्धांजली

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पक्षनिष्ठ व्यक्तिमत्त्व खासदार आदरणीय गिरीशजी बापट यांचं निधन अतिशय दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने पुणे आज पोरकं झालं असल्याची भावना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, खा. गिरीश बापट यांच्या सारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने पक्षाचा आधारवड हरपला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, नगरसेवक, आमदार, खासदार आणि राज्याचे मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी उत्तमरित्या पार पाडल्या.

बापट साहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने ‘पुण्याची ताकद गिरीश बापट’ ही ओळख जनमानसात तयार केली होती. आज बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं आहे. बापट साहेबांच्या जाण्याने आमचा मार्गदर्शक हरपला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक, दिलदार नेतृत्व गमावले*

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रद्धांजली

मुंबई दि २९: भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.
दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची तेव्हा राजकारणातलेच नव्हे तर अनेक विषयांवर त्यांना असलेली माहिती पाहून चकित व्हायचो. नुकतीच पुण्यात त्यांची विचारपूस करण्यासाठी भेटही झाली होती. त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द अगदी नगरसेवकापासून सुरू केली होती. आमदार खासदार आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला. पालकमंत्री म्हणून पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी पाऊले उचलली होती.
सर्व पक्षांमध्ये त्यांची मैत्री होती. त्यांच्या उत्तम जनसंपर्काचे उदाहरण नेहमी दिले जायचे. महापालिकेत तर पक्षाची सत्ता नसतानाही ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. असा मनमिळावू आणि दिलदार नेता आज आपल्यातून गेला असेही मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात.

MP Girish Bapat | सर्वपक्षीय नेत्यांशी सुमधुर संबंध असलेला नेता गेला! | खासदार गिरीश बापट यांचे निधन

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

सर्वपक्षीय नेत्यांशी सुमधुर संबंध असलेला नेता गेला!

| खासदार गिरीश बापट यांचे निधन

पुणे | खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांचे निधन झाले असून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून गिरीश बापट यांची प्रकृती खालावली होती. सलग ५ वेळा ते कसबा विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले होते. सर्वपक्षांसोबत गिरीश बापट यांचे उत्तम संबंध होते. गिरीश बापट यांच्या निधनाने सर्वपक्षीय नेत्यांशी सुमधुर संबंध असलेला नेता गेला, अशी भावना व्यक्त होत आहे.

३ सप्टेंबर १९५० रोजी पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे गिरीश बापटांचा जन्म झाला. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. १९७३ मध्ये बापटांनी टेल्कोमध्ये नोकरी केली. कामगार संघटनेच्या माध्यमातून ते सक्रीय राजकारणात उतरले. १९८३ मध्ये गिरीश बापट पहिल्यांदा नगरसेवक म्हणून पुणे महापालिकेत निवडून आले. त्यानंतर सलग ३ वेळा ते नगरसेवक होते. १९९३ च्या विधानसभा पोटनिवडणुकीत गिरीश बापटांचा कसबा विधानसभेत पराभव झाला. १९९५ मध्ये गिरीश बापट पहिल्यांदा भाजपचे आमदार झाले. २०१९ मध्ये गिरीश बापट हे लोकसभेत निवडून गेले. त्यांनी काँग्रेस च्या मोहन जोशी यांचा पराभव केला होता.

आज सांयकाळी सात वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले. पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून ओळखले जाणारे गिरीश बापट यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना श्वसनाचा त्रास होता.

सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळींनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या होत्या.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींनी रुग्णालयात जाऊन बापट यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते.

बापट हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यानंतर ते जनसंघातून राजकारण आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली.त्यांच्या आपली राजकीय जीवनाची सुरवात नगरसेवकपदापासून झाली. नगरसेवक-आमदार-खासदार अशा त्यांचा राजकीय प्रवास आहे.

पुणे महानगरपालिकेत १९८३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात बापट नगरसेवक झाले. सलग तीन टर्म त्यांनी नगरसेवकपद राखले. याचा काळात आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर गिरीश बापट महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते.

—-

Ward no. 2 | प्रभाग 2 मध्ये ग्रंथालय, अभ्यासिकासह सुसज्ज त्रिरत्न विहार योगा हॉल होणार | खासदार गिरीश बापट यांच्या फंडातून 25 लाखांची मंजूरी

Categories
Breaking News Political social पुणे

प्रभाग 2 मध्ये ग्रंथालय, अभ्यासिकासह सुसज्ज त्रिरत्न विहार योगा हॉल होणार

| खासदार गिरीश बापट यांच्या फंडातून 25 लाखांची मंजूरी

– डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा पाठपुरावा
ग्रंथालय, अभ्यासिका, बौद्ध भिख्खुंसाठी निवासस्थान आदी विविध सुविधांनी सुसज्ज अशा योगा हॉलची इमारत पुर्णत्त्वास येणार आहे. पुणे प्रभाग क्रमांक दोन मधील त्रिरत्न विहार योगा हॉलसाठी खासदार गिरिश बापट यांच्या फंडातून 25 लाख रुपयांना मंजूरी मिळाली आहे. पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निधी मिळाला असून या हॉलचे अंतिम टप्प्यातील कामही लवकरच पुर्ण करण्यात येणार आहे. या बाबत परिसरातील नागरिकांनी खासदार गिरीश बापट यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांसाठी सुसज्ज योगा हॉलची निर्मिती व्हावी, यासाठी नागरिकांनीही वेळोवेळी मागणी केली होती. त्याची दखल घेत डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला. त्यानुसार 2018-19 मध्ये माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार फंडातून 20 लाख रुपये मंजूर झाले. त्यामधून त्रिरत्न विहार योगा हॉलच्या कामाला सुरूवात करण्यात आली. निधीचा पुर्ण वापर झाल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून देखील 20 लाख रुपयांचा निधी मिळाला. त्यामध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्याचे काम करण्यात आले आहे. दुसऱ्या मजल्याचे काम निधीअभावी रखडले होते. त्यासाठी डॉ. धेंडे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने खासदार गिरिश बापट यांनी 25 लाखांचा निधी मंजूर करून दिला आहे. योगा हॉलचे अंतिम टप्प्यातील काम त्वरीत पुर्ण करून नागरिकांसाठी हा हॉल उपलब्ध होणार आहे.
या पाठपुराव्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत दोन्ही लोकप्रतिनिधींचे आभार व्यक्त केले आहे.
या सुविधा मिळणार
प्रभाग क्रमांक 2 मधील त्रिरत्न विहार योगा हॉलमध्ये खाली विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची सुविधा देण्यात येणार आहे. पहिल्या मजल्यावर विविध विषयांवर आधारित पुस्तकांचा संग्रह असणारे ग्रंथालय तसेच बौद्ध भिख्खुंचे निवासस्थान असणार आहे. तर वरच्या मजल्यावर बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना करून योगा हॉलची सुविधा मिळणार आहे.
——
त्रिरत्न विहार योगा हॉलचे काम सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. निम्मे काम पुर्ण करण्यात आले आहे. उर्वरीत काम पुर्ण करण्यासाठी निधीची कमतरता होती. मात्र खासदार गिरिश वापट यांच्या फंडातून 25 लाख रुपये मंजूर केल्याने उर्वरीत काम पुर्ण करू.
– डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका
——————-

Hadapsar Railway Station | हडपसर रेल्वे स्थानकाचा विकास करणेसाठी तातडीने निधी उपलब्ध करावा : खासदार गिरीश बापट

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

हडपसर रेल्वे स्थानकाचा विकास करणेसाठी तातडीने निधी उपलब्ध करावा : खासदार गिरीश बापट

नवी दिल्ली : हडपसर रेल्वे स्थानकाचा विकास करणेसाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत खासदार बापट यांनी आज लोकसभेत कलम ३७७ अन्वये मुद्दा उपस्थित करून केंद्र शासनाचे लक्ष वेधले.

गेल्या काही वर्षात प्रवाशांची आणि गाड्यांची संख्या लक्षणीय वाढत असल्याने पुणे रेल्वे स्थानकावरून नवीन गाड्या धावणे शक्य होत नाही. त्यामुळे पुणे स्टेशन ऐवजी हडपसर सारख्या पर्यायी स्टेशन वरून गाड्या सुरु करणे आवश्यक आहे. पुणे जंक्शनवरून सुमारे 150 लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. यापैकी काही गाड्या हडपसर येथून सोडल्यास पुणे जंक्शनवरील भार कमी होईल.

पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे काही गाड्या हडपसरला हलवत आहे. सध्या हडपसर ते हैदराबाद ही विशेष ट्रेन हडपसर रेल्वे स्थानकावरून धावते. परंतु हडपसर रेल्वे स्थानकावर चार फलाट असून प्रवाशांसाठी एक फूट ओव्हरब्रिज आहे. स्थानकावर थांबणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांना रेल्वे स्थानकात सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे इच्छीत स्थळी पोहचण्याकरीता वैयक्तिक किंवा खाजगी प्रवाशी वाहनाचा वापर करावा लागत असल्याने त्यांचेवर आर्थिक भार पडतो. त्याचप्रमाणे स्थानकावर प्रवाशांना वाहने उभी करण्यासाठी वाहनतळाची जागा कमी असल्याने जागा उपलब्ध करून वाहनतळ विकसित करावे, मुख्य रस्त्यापासून स्थानकाकडे जाणारे रस्ते हे अरुंद असल्याने वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली असल्याने स्थानकाकडे जाणा-या रस्त्याचे रुंदीकरण करावे, प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने येथे प्रशस्त स्थानक इमारत व आरक्षण केंद्र इमारत उभारावे, सध्या स्थानकावर प्रवाशांकरिता पत्र्याच्या शेडमध्ये प्रतीक्षालय करण्यात आले आहे, ते सुसज्य इमारतीत करावे. जेष्ठ नागरिकांना साहित्य घेवून जिना चढणे शक्य नसल्याने स्वतंत्र व्यवस्था करावी, या व इतर अनेक सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांची होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी या सुविधा तातडीने उपलब्ध करण्याची गरज आहे. म्हणून हडपसर रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याकरीता केंद्र शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी कलम ३७७ अन्वये मुद्दा उपस्थित करून केल्याचे बापट यांनी सांगितले.

MP Girish Bapat | डेक्कन सहित शहरात महत्वाच्या ठिकाणी बहुमजली पार्किंग करा  | खासदार गिरीश बापट यांची महापालिकेला सूचना 

Categories
Breaking News PMC Political पुणे

डेक्कन सहित शहरात महत्वाच्या ठिकाणी बहुमजली पार्किंग करा

| खासदार गिरीश बापट यांची महापालिकेला सूचना

पुणे | शहरात पार्किंग ची समस्या वाढताना दिसत आहे. याच अनुषंगाने खासदार गिरीश बापट यांनी डेक्कन सहित शहरात महत्वाच्या ठिकाणी बहुमजली पार्किंग करा, अशी सूचना महापालिकेला केली आहे. यावर महापालिका आयुक्तांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
शहरातील विविध प्रश्नावर खासदार गिरीश बापट महापालिका  आयुक्त आणि अधिकाऱ्यासोबत बैठक घेतली. यावेळी बापट यांनी उक्त सूचना केली. याच बैठकीत बापट यांनी जायका योजनेचा आढावा घेतला. जायका योजनेचे काम लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. या बाबतच्या सगळ्या प्रक्रिया जवळपास पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे हे काम लवकर पूर्ण करण्याची अपेक्षा बापट यांनी व्यक्त केली. तसेच यावेळी मेट्रोच्या काही प्रलंबित जागांबाबत देखील चर्चा झाली.
महापालिकेने MNGL कंपनीकडे शहरातील स्मशानभूमीत कनेक्शन देण्याची मागणी केली आहे. मात्र बिबवेवाडी वगळता इतर कुठल्याही ठिकाणी हे कनेक्शन देण्यात आलेले नाही. बैठकीत हा विषय आल्यांनतर खासदार बापट यांनी MNGL च्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केली.

Dhol Tasha | MP Girish Bapat | Anurag Thakur | खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे केली ‘ही’ मागणी

Categories
Breaking News Political Sport देश/विदेश पुणे महाराष्ट्र

ढोल ताशा खेळाला इतर खेळाप्रमाणे शासन मान्यता द्या

| खासदार गिरीश बापट यांची केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडे मागणी

पुणे  : ढोल ताशा खेळाला इतर खेळाप्रमाणे शासन मान्यता द्यावी अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री  अनुराग ठाकूर हे काल पुणे दौऱ्यावर आले असता त्यांना केली.

यावेळी खासदार बापट यांनी सांगितले महाराष्ट्र राज्यामध्ये ढोल-ताशा या खेळाला आगळे महत्त्व आहे. जसा पंजाबचा भांगडा, गुजरातचा गरबा, तसा महाराष्ट्राचा ढोल-ताशा कोणताही उत्सव असो वा देवकार्य, मंगलकार्य वा मिरवणूक त्यासमोर ढोल-ताशांचे वादन हे अपरिहार्यच अगदी कुस्तीच्या मैदानात देखील पैलवान मंडळींमध्ये जोश निर्माण करण्यासाठी हलगीचे वादन केले जाते. पुरातन काळापासून ढोल-ताशा हे रणवाद्य तसेच मंगलवाद्य म्हणून अनेक ठिकाणी त्याचे वादन केले जाते. सैन्यांमध्ये जोश आणि उत्साह निर्माण करण्याची ताकद या वाद्यांमध्ये आहे. तसेच स्थानिक उत्सवामध्ये देवादिकांच्या मिरवणुकांमध्ये मंगलमय वातावरण निर्माण करण्यासाठी ढोल-ताशाचे वादन केले जाते. ढोल-ताशा या वाद्यांना पुरातन संदर्भ आहेत. ढोल, ताशा, शिंग, दुंदुभी वाद्य ऐतिहासिक कालापासून वापरात आहेत. याचा शोध घ्यायचा झाल्यास नेमका निर्मितीचा काळ निश्चित करता येत नाही.
आपल्या सर्व देवादिकांच्या हातामध्ये शस्त्रा बरोबर वाद्यांचा देखील समावेश आहे. सरस्वतीची विना, कृष्णाचा शंख, आणि बासरी, शंकराचा डमरू अशी उदाहरणे आपल्या समोर आहेत. ढोल-ताशा ही लोकवाद्य या प्रकारात मोडतात. महाराष्ट्रात घराघरात मंगलकार्य असेल तर तसा पुरणा-वरणाचा नैवद्य दाखवला जातो. तव्दत मंगल कार्यासाठी ढोल-ताशांचे वादन केले जाते. संपूर्ण महाराष्ट्रात ढोल-ताशांची माहिती असे नाही, तर आता गुजरात, गोवा, सेलवासा, आंध्र प्रदेश अशा राज्यातून देखील ढोल ताशा खेळाचा प्रकार आणि प्रसार होतो आहे. आपल्या देशाचे कर्तुत्ववान पंतप्रधान माननीय नरेंद्र जी मोदी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेले असता, त्यांचे स्वागत देखील ढोल-ताशा खेळाने झाले आणि माननीय पंतप्रधानांनी स्वतः ढोल वादनाचा आनंद घेतला.

2019 साली अमेरिकेमध्ये डल्लास येथे BMM Convocation ढोल ताशा खेळांची स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये सुमारे ६ संघातील १०० वादकांनी सहभाग घेतला होता. त्याचे परीक्षण पुण्यातून ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्रातर्फे करण्यात आले होते. आता या ढोल ताशा खेळाची व्याप्ती केवळ भारतापुरती मर्यादित राहिली नसून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या ठिकाणी देखील लोकप्रिय होत आहे. पुण्यनगरीत सुमारे २०० ढोल-ताशांचे संघ असून सुमारे 25००० वादक आपली वादन कला याद्वारे लोकांपुढे सादर करतात. नाशिक, मुंबई, ठाणे, अमरावती, नागपूर, कोल्हापूर येथील ढोल-ताशा खेळ विशेष प्रसिद्ध आहे.

ढोल-ताशां खेळाला अद्यापि खेळ म्हणून राज मान्यता मिळाली नाही ही सर्व वादकांची खंत आहे. हे संपूर्ण चराचरात मंगलमांगल्य निर्माण करण्याचे काम ही ढोल-ताशा खेळाची वादक मंडळी आपल्या वादनातून करत असतात. अनेक समारंभात जाण निर्माण करण्याची ताकद या खेळा आहे. ढोल-ताशा वादनासाठी झांजा, ध्वज, लेझीम वाचविण्यासाठी प्रचंड ताकदीची उत्साहाची आणि एनर्जीची आवश्यकता असते. ७ ते ८ तास न थांबता, न थकता आणि घामाने वादन करणे हे कुठल्याही खेळाशी म्हणजेच क्रिकेट, फुटबॉल, हॉकी खेळातील दमणुकीशी साधणारे आहे. याव्यतिरिक्त अबालवृद्धांना या ढोल-ताशा वादनाने मिळणारा आनंद अवर्णनीय आहे. काही मंडळी वादनाचा आनंद घेतात, काही मंडळी या तालावर थिरकण्याचा, नाचण्याचा आनंद घेतात, तर उर्वरित मंडळी यातून निर्माण होणाऱ्या कर्णमधुर लोकसंगीताचा आनंद घेतात. यामुळे महाराष्ट्रातील लोकप्रिय अशा लोक संगीताशी संबंधित ढोल-ताशा या खेळास खेळ म्हणून सरकार दरबारी मान्यता मिळावी, अशी विनंती खासदार बापट यांनी केली.