MHADA Pune | Shivajirao Adhalrao Patil | शिवाजीराव आढळराव पाटील यांची पुणे म्हाडा अध्यक्ष पदावर नियुक्ती 

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

MHADA Pune | Shivajirao Adhalrao Patil | शिवाजीराव आढळराव पाटील यांची पुणे म्हाडा अध्यक्ष पदावर नियुक्ती

 

MHADA Pune | Shivajirao Adhalrao Patil | पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या (Pune Mhada) अध्यक्षपदी शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पदाचा कार्यभार महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्या उपस्थितीत श्री.आढळराव पाटील यांनी आज पदभार स्वीकारला.

म्हाडाच्या माध्यमातून गोरगरिबांना स्वस्तात घरे मिळवून देणे, म्हाडा वसाहतींमधील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्य करून त्यांना न्याय देण्याचे कार्य नवनिर्वाचित अध्यक्षांद्वारे केलं जाईल याचा विश्वास आहे असे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

MP Girish Bapat | खासदार गिरीश बापट यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून श्रद्धांजली | शहरातील विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

खासदार गिरीश बापट यांच्या जाण्याने समाजाचे, महाराष्ट्राचे मोठे नुकसान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

खासदार गिरीश बापट यांचे काम पुणे कधी विसरू शकणार नाही- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. 29 : खासदार गिरीश बापट यांची एक दिलदार, मोकळ्या मनाचा माणूस अशी ओळख होती. अशा कणखर मनाचा नेता आपल्यातून गेल्यामुळे त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाचेच नव्हे तर समाजाचे, महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले असून न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार गिरीश बापट यांच्या शनिवार पेठेतील निवासस्थानी त्यांचे पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. त्यांनी खासदार स्व. बापट यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

मुख्यमंत्री म्हणाले, विधानसभेत सर्वांना सोबत घेऊन त्यांनी काम केले. अशी माणसे दुर्मिळ असतात. सर्वांना सोबत घेताना विरोधकांनादेखील आपलेसे करण्याची गिरीशभाऊ यांची हातोटी होती. कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता त्यांनी सर्वांनाच मदत केली. पुणे शहरात भारतीय जनता पक्ष वाढविण्यात त्यांचे फार मोठे योगदान होते. पक्षाच्या, राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी काम केले. सर्वांना हवाहवासा नेता आपण गमावला. कोणताही राजकीय अभिनिवेश मनात न ठेवता सर्व धर्मियांना मदत केली. राजकारणाच्या पलिकडे जाऊन त्यांनी काम केले. अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

गिरीश बापट यांचे काम पुणे कधी विसरू शकणार नाही- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
खासदार गिरीश बापट हे एक अनमोल रत्न होते. पुण्याच्या जडणघडणीमध्ये त्यांचा वाटा अतिशय मोठा आहे. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, सलग पाच वेळा आमदार, खासदार, पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेले काम पुणे कधी विसरु शकणार नाही. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाची, राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.

श्री. फडणवीस म्हणाले, पुणे हे नररत्नाची खाण असल्याचे आपण म्हणतो, त्यापैकी खासदार गिरीश बापट हे एक अनमोल रत्न होते. त्यांच्यामध्ये माणसे जपण्याची कला होती. महत्वाचे म्हणजे रस्त्यावरच्या माणसालाही आपला वाटेल असा हा माणूस होता. बोलण्यामध्ये ते खूप चपखल होते. कोणालाही न दुखावता शालजोडीतून शब्द वापरुन आपला मुद्दा पटवून देण्याची हातोटी होती. पक्षाच्या भिंतीपलीकडचे त्यांचे सर्व नेत्यांशी, पक्षांशी, समाजाशी त्यांचे अतिशय चांगले संबंध होते. संसदीय कार्यमंत्री म्हणूनही त्यांचे कार्य नोंद घेण्यासारखे होते. शेतीवरही त्यांचे प्रचंड प्रेम होते. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे प्रमुख म्हणून त्यांनी सिंचनाचे केलेले काम सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्यासारखे आहे. त्यांचे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना सगळ्या क्षेत्रातील प्रचंड ज्ञान होते. असे नेते तयार होण्यासाठी चाळीस- चाळीस वर्षे लागतात, अशा शब्दात त्यांनी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून बापट कुटुंबियांचे सांत्वन
मुख्यमंत्री श्री.शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी शनिवार पेठ येथील खासदार गिरीश बापट यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी खासदार बापट यांच्या पत्नी गिरीजा बापट, मुलगा गौरव बापट, सून स्वरदा बापट, बहिण माधुरी गोखले, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, जगदिश मुळीक उपस्थित होते.


खासदार गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना शोक

 

मुंबई, दि. 29 : राज्यपाल रमेश बैस यांनी खासदार गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

“लोकप्रिय खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत गिरीश बापट यांनी संसद सदस्य, राज्य विधानसभेचे सदस्य, कॅबिनेट मंत्री, संसदीय समित्यांचे सदस्य यांसह विविध पदांवर उल्लेखनीय कार्य केले. कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात आलेले गिरीश बापट हे कुशल संघटक होते. त्यांचा जनसंपर्क अतिशय व्यापक होता. राजकारणात ते अजातशत्रू होते. त्यांच्या निधनामुळे राज्याने एक लोकप्रिय नेता व अनुभवी संसदपटू गमावला आहे”, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या शोकासंदेशामध्ये म्हटले आहे.


राजकारणातील मित्रत्व जोपासणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले | राधाकृष्ण विखे पाटील यांची श्रद्धांजली

 

मुंबई, दि. 29 : “भाजपचे नेते आणि खासदार गिरीष बापट यांच्या निधनाने राजकारणातील मित्रत्व जोपासाणारे लोकाभिमुख नेतृत्व गमावले” अशी भावना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

आपल्या शोकसंदेशात मंत्री विखे पाटील म्हणाले की, गेली अनेक वर्षे विधिमंडळात त्यांचा सहवास लाभला. विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना त्यावेळी श्री. बापट संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम पाहायचे. राजकारणात फार कटूता येऊ न देता सभागृहातील निर्माण होणाऱ्या पेचप्रसंगावर संवादाने मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती.

महानगरपालिका ते लोकसभा हा गिरीष बापट यांचा राजकीय प्रवास त्यांच्या लोकाभिमुख कार्याचा होता. पुणे आणि गिरीष बापट हे एक अतूट नाते होते. त्यांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाचे मोठे नुकसान झाले असून पक्षाच्या वाटचालीतील एक अनुभवी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची संवेदना व्यक्त करून मंत्री विखे पाटील यांनी गिरीष बापट यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.


पुणे शहराचे खासदार आणि माझे दीर्घकाळापासूनचे मित्र गिरीश बापट यांच्या निधनाने अतीव दुःख झाले. गेला काही काळ त्यांचे आजारपण चालू होते पण त्यामुळे त्यांना मृत्यू इतका लवकर येईल हे मात्र अपेक्षित नव्हते. कार्यकर्ता, नगरसेवक, आमदार, मंत्री, पालकमंत्री आणि खासदार अशी उत्तम राजकीय वाटचाल करताना त्यांनी स्वतःचा कार्यकर्त्याचा पिंड मात्र सोडला नाही. याच बरोबर राजकीय स्पर्धा असली तरी विरोधी पक्षांशी वितुष्ट असता कामा नये, ही राजकारणातील चांगली भावना त्यांनी सदैव जपली. त्यामुळेच सर्व राजकीय पक्षामध्ये त्यांचे चांगले मित्र होते. पुण्याच्या विकासात त्यांनी निश्चितच भरीव योगदान दिले. मात्र, शहराच्या विकासात त्यांनी कधी राजकारण आणले नाही. हे त्यांचे अजून एक ठळक वैशिष्ट्य सांगता येईल. पुण्याच्या मध्यवस्तीतील कसबा विधानसभा मतदारसंघात सलग पाच वेळा म्हणजेच सलग २५ वर्षे ते आमदार म्हणून निवडून येत होते. यातूनच त्यांच्या लोकसंपर्काची प्रचीती येते. पुण्यातील गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आणि मी प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक लढविली. मात्र, तरीही आमच्या मैत्रीत खंड पडला नाही. समाजातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन पुढे जाणारा आनंदी वृत्तीचा हा उमदा मित्र आज हरपला. यामुळे कुटुंबातील व्यक्ती गेल्यासारखेच दुःख मला झाले आहे. ईश्वर इच्छेपुढे कोणाचा इलाज नाही. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना.

मोहन जोशी उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी


मागील ३ ते ४ दशकापासून पुणे शहराच्या सामाजिक राजकीय व सामाजिक क्षेत्राशी जोडलेले नाव म्हणजे गिरीशजी बापट.
अत्यंत संघर्षातून महानगरपालिका,विधानसभा व लोकसभा सदस्य या पदांवर काम करत असताना तसेच पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीचे पालकमंत्रीपद भूषाविताना त्यांनी जपलेले पुणेरीपण ही बाब चिरकाल स्मरणात राहील. पुण्यातील सर्वच राजकीय पक्षांशी त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध होते ,त्यांच्या अकाली निधनामुळे पुणे शहराच्या राजकीय व सामाजिक चळवळीचे अपरीमित नुक़सान झाले आहे .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बापट कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

| प्रशांत सुदामराव जगताप.
अध्यक्ष, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.


गिरीश बापट – कामगार नेता ते खासदार असा प्रेरणादायी राजकीय प्रवास. सर्वसामान्य व्यक्ती ज्यांच्यापर्यंत सहज पोहचू शकेल असा खासदार. दांडगा जनसंपर्क, राजकारणातील मुत्सद्दी तरीही सर्व राजकीय पक्षातील लोकांशी राजकारणापलीकडील मैत्री जपणारा दिलदार मित्र ….भावपूर्ण श्रद्धांजली!

वंदना चव्हाण खासदार, राज्यसभा


गिरिष बापटांसारखा नेता, असा खासदार पुनः होणे नाही : डॉ. नीलम गोऱ्हे

दुःखद निधनाबद्दल वाहिली आदरांजली

पुणे, ता. २८ : दीर्घ काळापासून पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांची पुण्याचा आवाज म्हणून ओळख होती ते पुण्याचे खासदार श्री. गिरिष बापट यांचे आज नुकतेच निधन झाल्याचे समजले. त्यांना सर्व प्रथम मी महाराष्ट्र विधान परिषदेची उप सभापती, शिवसेनेची उपनेता तथा स्त्री आधार केंद्राची अध्यक्षा या नात्याने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते.

त्यांचा आणि माझ्या गेल्या तीन दशकांपासून अधिक काळ परिचय होता. पुणे शहरातून कसबा विधान सभेतून आमदार म्हणून काम करीत असताना त्यांचा परिचय आमच्या कुटुंबात आमची आई कै. श्रीमती लतिका दिवाकर गोऱ्हे यांच्याशी सर्वप्रथम झाला.
त्यानंतर शिवसेना-भाजप युतीचे सरकार असतानाही सातत्याने संपर्कात असत.

२०१४ नंतर ते पुण्याचे पालकमंत्री आणि लोकसभेचे खासदार देखील झाले. या संपूर्ण कालावधीत त्यांनी पुणेकरांच्या असंख्य प्रश्न सोडवितानाच अष्टविनायक, पुणे शहरातील वाडे, संसदीय कार्यमंत्री असताना दोन्ही सभागृहांचा समन्वय त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने केला होते. ते मंत्री असतांना विधान परिषदेत नेहमीच येत होते. सर्व पक्षांच्या आमदारांचे एक चांगले स्नेही म्हणून ते परिचित होते.

स्त्री आधार केंद्राच्या कार्यक्रमाना देखील अनेकदा ते आले होते. महात्मा फुले संग्रहालयाच्या ठिकाणाहून त्यांचा सर्वांचा संपर्क होत असे. असा नेता, असा खासदार पुनः होणे नाही अशी भावना मी व्यक्त करीत आहे.


खासदार गिरीश बापट यांनी पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन आपुलकी, प्रेम आणि मैत्री जपण्याचे काम केले. मला व्यक्तिशः त्यांनी मुलाप्रमाणे वागणूक दिली. त्यांच्याकडे घेऊन गेलेले काम त्यांनी पक्ष न पाहता वैयक्तिकरित्या लक्ष घालून मार्गी लावून देण्याचे काम केले. प्रत्येक घटकाला ते नेहमी आपलेसे वाटायचे. त्यांच्या निधनाने पुण्यातील आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचा हेडमास्तर गमविला असून ही पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ताकद मिळो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

सुनिल टिंगरे, आमदार वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ

—–

Shiv sainiks Pune | Uddhav Thackeray | पुण्यातील शिवसैनिकांना काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पुण्यातील शिवसैनिकांना काय म्हणाले उद्धव ठाकरे?

पुण्यातील शिवसैनिकांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी भारतीय जनता पार्टीला शिवसेना संपवायची आहे, त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी मला तुमची ताकद हवी आहे, हा प्रवास विनातिकीट करायचा आहे.  सोबत रहा अशा भावनिक शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दुपारी पुण्यातील शिवसैनिकांना साद घातली.

मातोश्री या निवासस्थानी ठाकरे यांनी पुण्यातील शिवसैनिकांची भेट घेतली. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांच्यासह शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महापालिकेतील माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, माजी नगरसेवक विशाल धनवडे व अन्य माजी नगरसेवक, उपशहरप्रमुख रुपेश पवार, विजय देशमूख, अनंत गोयल तसेच बरेच शिवसैनिक उपस्थित होते.

ठाकरे यांनी त्यांना सांगितले की, भाजपाने शिवसेनेला संपवण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठीच हे सगळे सुरू आहे. यापुढचा प्रवास विनातिकीट आहे. माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही, मात्र ताकदीने माझ्यासमोर उभे रहा, आपण शिवसेना पुन्हा उभी करू, त्यांचा डाव हाणून पाडू. फुटून बाहेर पडलेल्या आमदारांनी हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्यावा व पुन्हा निवडून येऊन दाखवावे असे आव्हानही त्यांनी दिले.

Ashtvinayak : अष्टविनायक तीर्थक्षेत्रांचा प्राधान्याने विकास करण्यासाठी प्रयत्नशील : विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

Categories
cultural Political महाराष्ट्र

अष्टविनायक तीर्थक्षेत्रांचा प्राधान्याने विकास करण्यासाठी प्रयत्नशील

: विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

अलिबाग :- तमाम महाराष्ट्राच्या जनतेचे अष्टविनायक क्षेत्र हे श्रद्धेचे ठिकाण आहे. या सर्व अष्टविनायक तीर्थक्षेत्रांचा तसेच इतर तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज पाली येथे केले.

सुधागड पाली येथील सुप्रसिद्ध बल्लाळेश्वर अष्टविनायक तीर्थक्षेत्रास त्या भेट देण्यास आल्या होत्या, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य  किशोर जैन, रवींद्र देशमुख, पंचायत समिती सदस्य रमेश सुतार, तहसिलदार दिलीप रायन्नावार, गटविकास अधिकारी विजय यादव, उपसरपंच. विनय मराठे, देवस्थान ट्रस्टी उपेंद्र कानडे, सचिन साठे आदी उपस्थित होते.
उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी पाली बल्लाळेश्वर मंदिराच्या विकास कामांसंबंधीचा सविस्तर आढावा घेतला व लवकरच ही विकास कामे मार्गी लावण्यासाठी टप्प्याटप्प्याने मंत्रालय स्तरावर बैठका घेऊन कामे पूर्ण केली जातील, असे सांगितले.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा योजना, तीर्थक्षेत्र विकास आराखडयानुसारची कामे, बायपास रस्ता इत्यादी प्रलंबित विषयांबाबत पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे सांगितले.