Sanitation | PMC | पालखी गेल्यानंतर महापालिकेकडून तत्काळ साफसफाई 

Categories
Breaking News PMC social पुणे

पालखी गेल्यानंतर महापालिकेकडून तत्काळ साफसफाई

पुणे | संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे आगमन शहरात बुधवारी झाले. या पालख्यांचा शहरात दोन दिवस मुक्काम होता. शहरात विविध ठिकाणी महापालिकेने जागा उपलब्ध करून दिल्या होत्या. शिवाय सर्व मुलभूत सुविधा ही दिल्या होत्या. यावर्षी पालख्यांचा दोन दिवस मुक्काम होता. शुक्रवारी पालख्यांनी पंढरपूर कडे प्रयाण केले. दरम्यान पालखी गेल्यानंतर महापालिकेकडून तत्काळ साफसफाई करण्यात आले.

यामध्ये प्रभाग क्रमांक १४ रोकडोबा आरोग्य मंदिर संपर्क कार्यालय अंतर्गत शिवाजी महाराज व्यायाम मंडळ , लालबहादुर शास्त्री विद्यालय , काँग्रेस भवन येथे साफ सफाई करून लालबहादुर शास्त्री शाळेत जेट्टींग लाऊन धुवून घेतले आहे. तसेच श्रीमती आनंदीबाई कर्वे कन्याशाळा गवरी आळी
, सरदार कान्होजी आंग्रेशाळा शुक्रवार पेठ, श्री छत्रपति शिवाजी महाराज रस्ता याची सगाई करण्यात आली आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

 

Changes in transport | श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळयासाठी वाहतुकीत बदल

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळयासाठी वाहतुकीत बदल

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुणे-सासवड-लोणंद मार्गे पंढरपूर अशी जाते. तर संत तुकाराम महाराज पालखी पुणे ते सोलापूर मार्गाने रोटी घाटमार्गे बारामती इंदापूर अकलूज मार्गे पंढरपूरला जाते. या दोन्ही पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी या मार्गावरील वाहतूकीत बदल आवश्यक असल्याने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी २४ ते २८ जून या कालावधीत तर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी २४ जून ते ५ जुलै या कालावधीत पालखी मार्गावरील पालखी मुक्कामाच्या गावांमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत. तसेच या कालावधीसाठी वाहतूक नियमनाचे आदेश त्यांनी जारी केले आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गातील वाहतुकीत बदल:

पुणे ते सासवड (सासवड मुक्काम) – २३ जूनच्या रात्री ११ वाजल्यापासून ते २६ जूनच्या रात्री ८ वाजेपर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवे घाट व बोपदेव घाट मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. ही वाहतूक खडीमशीन चौक- कात्रज- कापूरव्होळमार्गे सुरू राहील. सासवड बाजूकडून येणारी सर्व वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे पुण्याकडे येईल.

सासवड ते जेजुरी (जेजुरी मुक्कम) व जेजुरी ते वाल्हे (वाल्हे मुक्काम) – २६ व २७ जून या कालावधीत पुणे येथून सासवड- जेजुरी- वाल्हे- निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी झेंडेवाडी- पारगाव मेमाणे- सुपे- मोरगांव- नीरा या मार्गाचा वापर करावा.

वाल्हे ते लोणंद (लोणंद मुक्कम)- २७ जून रोजी रात्री ११ वाजता ते २८ जून रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत पुणे येथून सासवड- जेजुरी- वाल्हे- निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी सासवड- जेजुरी- मोरगांव या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

लोणंद येथून पुढे फलटण मार्गे- २५ ते २८ जून या कालावधीत फलटण- लोणंद येथून पुणे येथे येणारी वाहतूक शिरवळ मार्गे पुण्याकडे येईल. तसेच पुणे येथून फलटण-लोणंदकडे जाणारी वाहतुक शिरवळ मार्गे जाईल.

श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील पर्यायी वाहतुकीचा मार्ग:
लोणीकाळभोर ते यवत (यवत मुक्काम)- २५ जून रोजी पहाटे २ ते रात्री १० वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने वाघोली- केसनंद- राहू- पारगांव- चौफुला या मार्गाचा वापर करतील. तसेच सोलापूर बाजूकडून पुण्याकडे येणारी वाहतूक चौफुला- पारगांव- राहू- केसनंद- वाघोली या मार्गाचा वापर करतील.

यवत ते वरवंड ( वरवंड मुक्कम)- २६ जून रोजी पहाटे २ ते रात्री १० वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने थेऊर फाटा- केसनंद- राहू- पारगांव- न्हावरे- काष्टी- दौंड- कुरकुंभ या मार्गे जातील. सोलापूर बाजूकडून येणारी वाहने कुरकुंभ- दौंड- काष्टी- न्हावरे- पारगांव- राहू- केसनंद- वाघोली या मार्गाचा वापर करतील.

वरवंड ते उंडवडी, ता. बारामती (मुक्काम उंडवडी)- २७ जून रोजी पहाटे २ ते रात्री १० वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने चौफुला- पारगांव- न्हावरे- काष्टी- दौंड- कुरकुंभ या मार्गाचा वापर करतील. तसेच सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे येणारी वाहतूक कुरकुंभ- दौंड- काष्टी- न्हावरे- पारगांव- चौफुला- वाघोली- पुणे या मार्गाचा वापर करतील.

बारामती ते पाटस आणि बारामती ते दौंड हे रस्ते बंद राहतील. सदर रस्त्यांवरील वाहतूक भिगवन मार्गे बारामतीला जाईल. व बारामतीकडून येताना भिगवन मार्गे सोलापूर- पुणे महामार्गावर येईल. बारामती पाटस जाणारी वाहने ही बारामती- लोणीपाटी- सुपा- चौफुला- पाटस या मार्गाने जातील. तसेच पाटस- बारामती जाणारी वाहने पाटस- चौफुला- सुपा- लोणीपाटी- बारामती या मार्गाने जातील.

उंडवडी ते बारामती (बारामती मुक्काम)- २८ जून रोजी पहाटे २ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत बारामती ते पाटस व बारामती ते दौंड हे रस्ते बंद राहतील. ही वाहतूक भिगवन मार्गे बारामतीला जाईल. व बारामतीकडून येताना भिगवन मार्गे सोलापूर-पुणे महामार्गावर येईल.

बारामती ते सणसर ( सणसर मुक्काम)- २९ जून रोजी पहाटे २ ते रात्री १० वोजपर्यंत जंक्शन ते बारामती हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल. वालचंदनगर व इंदापूरकडून येणारी वाहतुक जंक्शन येथून कळसमार्गे बारामती- आष्टी वळविण्यात येईल. बारामतीकडून येणारी वाहतूक भिगवण- कळसमार्गे जंक्शनकडे जाईल.

सणसर ते अंथुर्णे (अंथुर्णे मुक्काम) तसेच अंथुर्णे ते निमगांव केतकी (निमगांव केतकी मुक्काम)- ३० जून व १ जुलै रोजी पहाटे २ ते रात्री १० वाजेपर्यंत बारामतीकडून इंदापूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने बारामती- कळंब- बावडा- इंदापूर या मार्गे किंवा बारामती- भिगवण- इंदापूर या मार्गे जातील. इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने इंदापूर- बावडा-कळंब- बारामती या मार्गे किंवा इंदापूर- भिगवण- बारामती या मार्गे जातील.

निमगांव केतकी ते इंदापूर ( इंदापूर मुक्काम) २ जुलै रोजी पहाटे ते रात्री १० वाजेपर्यंत निमगांव केतकीकडून इंदापूरकडे जाणारी वाहतुक बंद राहील. इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक लोणी देवकर- कळस- जंक्शन मार्गे बारामती किंवा लोणी देवकर- भिगवण मार्गे बारामतीकडे जाईल.

इंदापूर- ३ जुलै रोजी पहाटे ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत अकलूजकडून बारामतीकडे जाणारी वाहतुक ही अकलूज- बावडा- नातेपुते- बारामती मार्गे जातील. अकलुजकडून बारामती व पुण्याकडे जाण्याकरीता इंदापूर मुख्य हायवेचा वापर करावा. इंदापूर शहरातील जुना पुणे सोलापूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल. त्यावरील वाहतुक मालोजीराजे चौक ते महात्मा फुले चौक अशी बायपासने वळविण्यात येईल.

इंदापूर ते सराटी (सराटी मुक्काम)- ४ जुलै रोजी पहाटे २ ते रात्री १० वाजेपर्यंत व ५ जुलै रोजी पहाटे २ ते दुपारी १२ वाजेपर्यंत इंदापूर ते अकलूज रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील. या मार्गावरील वाहतूक इंदापूर- हिंगणगांव- टेंभुर्णी- गणेशगाव- माळीनगर- अकलूज या मार्गे जातील. तसेच अकलूज ते इंदापूर या मार्गावरील वाहने अकलूज- नातेपुते- वालचंदनगर- जंक्शन- भिगवण या मार्गे जातील.

Palkhi | Wari | PMC | वारकऱ्यांचा मेळा पुण्यनगरीत! |  महापालिकेने केले स्वागत | महत्वाची क्षणचित्रे पाहा!

Categories
Breaking News cultural PMC social पुणे महाराष्ट्र

वारकऱ्यांचा मेळा पुण्यनगरीत! |  महापालिकेने केले स्वागत

 

: दोन वर्षांच्या खंडानंतर ज्ञानोबाराय आणि तुकोबारायांचा पालखी सोहळा मुक्कामासाठी पुण्यनगरीत दाखल झाला. पुणेकरांसह वरुणराजानेही संतांच्या स्वागतासाठी हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. बुधवारी सकाळपासून शहर व परिसरात आकाश सामान्यतः ढगाळ होते. तर दुपारनंतर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली.

दरम्यान महापालिकेच्या वतीने आयुक्त विक्रम कुमार. अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, कुणाल खेमणार आणि विलास कानडे यांनी भाविकांचे स्वागत केले. 

Nana patole Vs PM Modi | कभी कभी लगता है, अपून ही भगवान है!” |  नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला

Categories
Breaking News cultural Political देश/विदेश पुणे

कभी कभी लगता है, अपून ही भगवान है!”

 नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला

करोनाच्या दोन वर्षांच्या कठोर निर्बंधांनंतर यावर्षी पंढरीच्या वारीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सोमवारी (२० जून), तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे मंगळवारी (२१ जून) पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या पालखी मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वारकऱ्यांच्या पोशाखातील मोठा बॅनर लावण्यात आला.

या बॅनरवरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांना खोचक टोला लगावला आहे. खरंतर, भाजपाने पुण्यात पालखी मार्गावर नरेंद्र मोदी यांचा भव्य बॅनर लावला आहे. यामध्ये विठू माऊली, संत ज्ञानेश्वर किंवा संत तुकाराम महाराज असं कुणीही दिसत नाहीये. याच मुद्द्यावरून नाना पटोले यांनी ‘कभी कभी लगता है, अपुन ही भगवान है’ म्हणत मोंदीवर निशाणा साधला आहे.

त्यांनी एक ट्वीट करत म्हटलं की, “भाजपाने पुण्यात पालखी मार्गावर नरेंद्र मोदी यांचा भव्य बॅनर लावला आहे. त्यामध्ये विठू माऊली, संत ज्ञानेश्वर किंवा संत तुकोबा हे मात्र दिसणार नाहीत. कभी कभी लगता है अपुन हि भगवान है !” त्यांचं हे ट्वीट आता वेगानं व्हायरल होत आहे.

Sant Tukaram Maharaj Palkhi | टाळ-मृदंगाच्या गजरात तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

Categories
Breaking News cultural पुणे महाराष्ट्र

टाळ-मृदंगाच्या गजरात तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

पुणे | ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका… अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज पंढरपूरकडे प्रस्थान केले.

दोन वर्षानंतर पायी वारी होत असल्याने वारकऱ्यांचा अमाप उत्साह यावेळी जाणवत होता. गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारी रद्द झाली होती. यंदा कोणत्याही निर्बंधाविना वारी होत असल्याने भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

देहू मंदिरात खासदार श्रीरंग बारणे यांनी पादुकांचे पुजन आणि आरती केली. यावेळी आमदार रोहित पवार, सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार यांच्यासह बारामती हाय-टेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार पूजेला उपस्थित होते. त्यानंतर उपस्थित सर्वजण वारकऱ्यांसह टाळ-मृदुंगाच्या गजरात दंग झाले. यावेळी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. नितीन मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक मोरे, संतोष मोरे, विशाल मोरे, संस्थांचे विश्वस्त संजय मोरे, भानुदास मोरे, अजित मोरे आदी उपस्थित होते.

महापूजेनंतर पालखीने इनामदारवाड्यातील मुक्कामाकडे प्रस्थान केले.

Ashadhi Wari 2022 App | वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाचे ‘आषाढी वारी 2022’ ॲप

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाचे ‘आषाढी वारी 2022’ ॲप

पुणे :- आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना वारीबाबत माहिती होण्यासाठी व त्यांना आवश्यक त्या सोई-सुविधासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘आषाढी वारी 2022’ ॲप विकसित करण्यात आले आहे.

या ॲपमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गाचे वेळापत्रक व गावनिहाय नकाशा, पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या थेट दर्शनाची सोय, पालखीचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख यांचे संपर्क क्रमांक, वैद्यकीय सुविधा त्यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी, फिरते वैद्यकीय पथक, शासकीय रुग्णालये व वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकरी, खासगी वैद्यकीय व्यावसायिक, पाण्याच्या सुविधेच्या दृष्टीने मार्गावरील टॅकर सुविधा, अन्न पुरवठा आणि वितरणबाबत, विद्युत सेवा, पशुधन बाबत सेवेसाठी संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.

पालखी सोहळ्याशी संबंधित विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकदेखील या ॲपमध्ये देण्यात आले आहेत. भाविकांनी गुगल प्लेस्टोवरील https://play.google.com/store/apps/details?id=com.deecto.ashadhiwari या लिंकवरुन आषाढी वारी 2022 हे ॲप डाऊनलोड करुन घ्यावे. तसेच भाविकांनी वारीदरम्यान अडचणीच्या वेळी या ॲपवरील संबंधित संपर्क अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

Marathwada Janvikas Sangh | मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने वारकऱ्यांसाठी पाण्याचे मोफत चार वॉटर टॅंकर

Categories
Breaking News cultural social पुणे

मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने वारकऱ्यांसाठी पाण्याचे मोफत चार वॉटर टॅंकर

पालखीमार्गात पंढरपूरपर्यंत चार दिंड्यांना मोफत पाणी पुरवठा

संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांच्या सेवेसाठी पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने पाण्याचे चार वॉटर टॅंकर देण्यात येत आहेत. या टँकरच्या माध्यमातून संपूर्ण पालखीमार्गात पंढरपूरपर्यंत चार दिंड्यांना मोफत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने वॉटर टँकरचे पूजन करून वारकऱ्यांच्या सेवेत दाखल करण्यात आले. या टँकरद्वारे आळंदी ते पंढरपूर दिंडी क्र.११ ह.भ.प.सोपान काका कराडकर, आळंदी ते पंढरपूर दिंडी क्र.५९ मुक्ताबाई महाराज बेळगांवकर, देहू ते पंढरपूर दिंडी क्र.२२१ ह.भ.प.ललिता विठ्ठल घाडगे, देहू ते पंढरपूर दिंडी क्र.१९७ ह.भ.प.तांदळे महाराज आळंदीकर या चार दिंड्यासोबत पिण्याच्या पाण्याचे टँकर वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंढरपूरपर्यंत पाठविण्यात आले. कोरोनाचे ढग गडद होत असल्याने दोन्ही पालखी सोहळ्यात प्रत्येकी ५ हजार मास्क असे एकूण १० हजार मास्क भावीकांना वाटप करण्यात आले.

या आषाढी पायी पालखी सोहळ्यानिमित्त ह.भ.प., संत महंत आणि सन्माननीय मान्यवर यांना ५ फुट उंचीची ५०० रोपे वाटप करण्यात आली. तसेच राजमाता फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष सुरेखाताई सांळुखे यांना ४ फुट उंचीची वड, पिंपळ, कडूलिंब, तुळस, हिरडा, बेहडा, करंज, निरगुडी अशी ३०० रोपे वृक्षारोपणासाठी देण्यात आली. तसेच काही ज्येष्ठ वारकाऱ्यांना निवारा मिळावा यासाठी एका टँकरवर छोटासा निवाराही करून देण्यात आला आहे.

यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब काशीद ह.भ.प मारुती कोकाटे, भंडारा डोंगर ट्रस्टचे सदस्य ह.भ.प.जगन्नाथ पाटील, ह.भ.प वाघ महाराज, ह.भ.प.बाबुराव तांदळे महाराज आळंदीकर, ह.भ.प विजूअण्णा जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कार्याध्यक्ष सचिन भोसले, माजी नगरसेवक विनोद नढे, विक्रांत लांडे पाटील, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, माजी नगरसेवक राजू लोखंडे, माजी नगरसेविका चंदाताई लोखंडे, समाजप्रबोधनकार शारदाताई मुंडे, सा.कार्यकर्ते हुसेन मुलानी, अभिमन्यू गाडेकर, अनिस पठाण, मारुती बानेवार, सामाजिक कार्यकर्ते तानाजी जवळकर, उद्योजक शंकर तांबे, गणेश ढाकणे, सुभाष दराडे, कैलास सानप, हनुमंत घुगे, सतीश काळे, सचिन रसाळ, नितीन सोनवणे, नाना तांबारे, सुनील भोसले, प्रदीप गायकवाड, शैलेश दिवेकर संतोष मोरे, नागेश जाधव, कामगार नेते बाळासाहेब साळुंके, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघ, भीष्माचार्य ज्येष्ठ नागरिक संघ, भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ आदींचे सदस्य आदी उपस्थित होते.

अरुण पवार म्हणाले, वारकऱ्यांना वारीत पिण्यासाठी अडचण निर्माण होते. यंदा तर दुष्काळजन्य परिस्थिती आहे. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंडीतील वारकऱ्यांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून ट्रस्टतर्फे टॅंकर सुविधा उपलब्ध करून दिली जाते. हीच पांडुरंगचरणी आमची सेवा आहे.
ह.भ.प. वाघ महाराज म्हणाले, वारीसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर मोफत उपलब्ध करून देणे, ही वारीच आहे. अरुण पवार करीत असलेले कार्य अतुलनीय आहे. अशीच देशाची सेवा आपल्या हातून घडो, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू शेळके यांनी, तर आभार वामन भरगंडे यांनी मानले.

Gram Panchayats on Palkhi Marg | पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना नऊ कोटी अनुदान

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना नऊ कोटी अनुदान

| ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई | पंढरपूरला जाणाऱ्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी दोन कोटी एकोणसाठ लाख पंच्याहत्तर हजार रुपयांच्या तसेच वारकरी भाविकांना तात्पुरत्या स्वच्छता सुविधा पुरविण्यासाठी सहा कोटी त्र्याहत्तर लाख वीस हजार रुपयांच्या निधीस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली. पंढरपूरची आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी यामुळे मदत होणार आहे, असेही श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. आषाढी पालखी सोहळ्यासाठी देहू येथे १३ ठिकाणी ८०० आणि आळंदी येथे २१ ठिकाणी १००० तात्पुरत्या स्वच्छतागृहांची सुविधा करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आषाढी एकादशी निमित्त पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्याबाबत मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे, असे  मुश्रीफ यांनी सांगितले.

आषाढी एकादशीच्या निमित्त पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतून विविध संतांच्या पालख्या सोबत मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदान देण्यात येते. यानुसार पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींना अनुदान देण्यासाठी दोन कोटी एकोणसाठ लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, असे  मुश्रीफ यांनी सांगितले.

पुणे, सातारा व सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागणी केलेल्या निधीच्या पन्नास टक्के निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला आहे. उर्वरित निधी जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा अन्य निधीतून उपलब्ध करावयाचा आहे. हा निधी जिल्हा परिषदांनी ग्रामपंचायतींना मागणीनुसार उपलब्ध करून द्यायचा आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

पुणे जिल्हा परिषदेला ब्याऐंशी लाख रुपये, सातारा जिल्हा परिषदेला वीस लाख पंचवीस हजार रुपये तर सोलापूर जिल्हा परिषदेला एक कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे.

सहा कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेला मंजूर

पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्या सोबत असणाऱ्या भाविकांना स्वच्छता पुरविण्यासाठी भाडेतत्त्वावर तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यासाठी सहा कोटी त्र्याहत्तर लाख वीस हजार रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेला उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली असल्याचेही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. एकूण मंजुरीच्या वीस टक्के प्रमाणात म्हणजेच एक कोटी चौतीस लाख चौसष्ठ हजार रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बीडीएस प्रणालीद्वारे वितरित करण्यात आला असल्याची माहितीही श्री. मुश्रीफ यांनी दिली.

Sant Tukaram Maharaj | संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या प्रस्थान 

Categories
Breaking News cultural पुणे महाराष्ट्र

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्या प्रस्थान

आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्या सोमवारी (ता. २०) दुपारी अडीचला देहूतील मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

राज्याच्या कानाकोपऱ्यांतून हजारो भाविक देहूत दाखल होत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी देहूनगरीतील ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. पालखीमार्गावर जागोजागी कमानी उभारण्यात आलेल्या आहेत. मुख्य देऊळवाड्यात दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून गर्दी होत आहे. इंद्रायणी नदीचा काठ भाविकांनी फूलून गेला आहे. देहूतील विविध संस्था आणि ग्रामस्थांच्यावतीने अन्नदानासाठी मंडप उभारण्यात आलेले आहेत.

संत तुकाराम महाराज संस्थान, नगरपंचायत प्रशासन आणि देहूरोड पोलिसांनी पालखी प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ४०० पोलिस कर्मचारी तैनात आहेत.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे यांनी सांगितले, की यंदा पालखी सोहळा प्रस्थान कार्यक्रम सोमवारी दुपारी अडीचला मुख्य देऊळवाड्यातील भजनी मंडपातून सुरु होईल. संस्थानच्यावतीने संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. चांदीच्या पालखी रथाचे काम पूर्ण झाले असून, पिंपरी येथील कुशल वर्मा बंधूकडून रथाला पॅालीश करण्यात आलेली आहे. सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंड्या देहूत दाखल झालेल्या आहेत. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूत येऊन गेल्याने विविध विकास कामे पूर्ण झालेली आहेत. गावातील रस्त्यांचे रुंदीकरण केले आहे. पालखीमार्ग, वैकुंठस्थान मंदिराकडे जाणारा मार्ग नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने पाणी मारून स्वच्छ धुण्यात आले. नगरपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग, पोलिस यंत्रणा, महावितरण आदी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. सोमवारी (ता. २०) आणि मंगळवारी (ता. २१) देहूतील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करणार आहे.

…असा होईल सोहळा

  • पहाटे साडेचार – देऊळवाड्यात काकडा
  • पहाटे पाच – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संस्थानच्यावतीने महापूजा होईल.
  • साडेपाच – संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा
  • सहा – वैकुंठस्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा
  • सकाळी सात – पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्तांच्यावतीने महापूजा
  • सकाळी नऊ ते ११ – इनामदारवाड्यात संत तुकाराम महाराज पादुका पूजन
  • सकाळी १० ते १२ – रामदास महाराज मोरे (देहूकर) यांचे पालखी प्रस्थान सोहळा काल्याचे कीर्तन.
  • दुपारी अडीचला – इनामदारवाड्यातून संत तुकाराम महाराजांच्या पादुका देऊळवाड्यातील भजनी मंडपात आणण्यात येतील. अडीचला पालखी प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमास प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात होईल.
  • सायंकाळी पाच – पालखी प्रदक्षिणा होईल.
  • सायंकाळी साडेसहा – मुख्य देऊळवाड्यातून पालखी सोहळा इनामदार वाड्याकडे मार्गस्थ. इनामदारवाड्यात पालखी सोहळा मुक्कामी असेल.

Palkhi Marg | पालखी मार्गावर वारक-यांसाठी महापालिका २१ ठिकाणी मोफत औषध वाटप केंद्र उभारणार

Categories
Breaking News cultural PMC social आरोग्य पुणे महाराष्ट्र

पालखी मार्गावर वारक-यांसाठी महापालिका २१ ठिकाणी मोफत औषध वाटप केंद्र उभारणार

पुणे | पालखी मार्गावर विविध ठिकाणी व पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वारक-यांसाठी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत मोफत औषध वाटप व उपचार केंद्र व विविध आरोग्य विषयक सेवा सुविधा मोफत पुरविण्यात येणार आहे. दोन्ही पालख्यांच्या आगमना पासून ते पुणे शहरामधून होणा-या प्रस्थाना पर्यंतच्या दिवशी पुणे महानगरपालिकेच्या सर्व दवाखाने व रूग्णालयांमध्ये येणा-या सर्व वारक-यांना मोफत औषध उपचार करण्यात येणार आहे. तसेच पालखी मार्गावर वारक-यांकरीता एकुण २१ ठिकाणी मोफत औषध वाटप केंद्र उभारण्यात येणार आहेत.

पुणे शहरा मध्ये बुधवार  रोजी संत श्रेठ श्री. ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन होत आहे. सदर दोन्ही पालख्यांच्या आगमना पासून ते पुणे शहरामधून होणा-या प्रस्थाना पर्यंत पालखी मार्गावर विविध ठिकाणी व पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वारक-यांसाठी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत मोफत औषध वाटप व उपचार केंद्र व विविध आरोग्य विषयक सेवा सुविधा मोफत पुरविण्यात येणार आहे. तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी नजीकच्या रफी मुहम्मद किडवाई शाळा व पुणे मनपाचा मामासाहेब बडदे दवाखाना येथे शासकिय नियमानुसार मोफत कोविड-१९ लसीकरण सुविधा पुरविण्यात येणार आहे. तसेच दोन्ही पालख्यांच्या आगमना पासून ते पुणे शहरामधून होणा-या प्रस्थाना पर्यंतच्या दिवशी पुणे महानगरपालिकेच्या सर्व दवाखाने व रूग्णालयांमध्ये येणा-या सर्व वारक-यांना मोफत औषध उपचार करण्यात येणार आहे. तसेच पालखी मार्गावर वारक-यांकरीता एकुण २१ ठिकाणी मोफत औषध वाटप केंद्र उभारण्यात येणार आहेत.