Patrkar Bhavan : नागरी जीवन सुरळीत ठेवण्यासाठी माध्यमांना प्रयत्न करावे लागतील – सुधीर मेहता : पुणे श्रमिक पत्रकार संघाचा वर्धापन दिन साजरा

Categories
cultural पुणे महाराष्ट्र

नागरी जीवन सुरळीत ठेवण्यासाठी माध्यमांना प्रयत्न करावे लागतील – सुधीर मेहता

: पुणे श्रमिक पत्रकार संघाचा वर्धापन दिन साजरा

पुणे : ‘करोनाच्या काळात सर्वांनी एकत्र काम केले. मग शहराच्या विकासासाठी आपण एकत्र का येत नाही? यामध्ये माध्यमे महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. करोनाची तिसरी लाट आल्यास लॉकडाउन हा पर्याय नसेल. त्यावेळी नागरी जीवन सुरळीत ठेवण्यासाठी माध्यमांना प्रयत्न करावे लागतील,’ असे मत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज\ॲड ॲग्रीकल्चरचे (एमसीसीआयए) अध्यक्ष सुधीर मेहता यांनी व्यक्त केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ८२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विशेष नैपुण्य मिळवलेले पत्रकार संघाचे सदस्य आणि वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रमातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मेहता यांच्या हस्ते करण्यात आला. पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, सरचिटणीस डॉ. सुजित तांबडे, खजिनदार नीलेश राऊत, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर, कार्यवाह गजेंद्र बडे यावेळी उपस्थित होते.

मेहता म्हणाले, ‘शहराच्या विकासासाठी सर्व घटकांकडून मिशन मोडवर काम झाले पाहिजे. करोनानंतर देशापुढे मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. आपल्याकडे तरुणांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या संधी आपण सोडता कामा नयेत. ही संधी साधली नाही, तर आपण पुढील पिढीवर अन्याय करू’ ‘देशाच्या जडणघडणीत पुण्याचे स्थान जगात वेगळे आहे. मात्र, आपल्याकडे २४ तास सुरू राहणारे एकही विमानतळ नाही. पुण्याला तीन विमानतळाची गरज आहे. देशात पुण्यातून सर्वात जास्त मालाची निर्यात होते; परंतु येथे कार्गो सुविधा नाही. २० वर्षांत आपण विमानतळ करू शकलो नाही. कारण आपल्या व्यवस्थेत काही तरी गोंधळ आहे.’ असेही ते म्हणाले.

मेट्रोसाठी विद्यापीठ चौकातील पूल पाडण्यात आला. मात्र, त्याचे काम कधी सुरू होईल व कधी पूर्ण याची काही माहिती नाही. याचे उत्तरदायित्व कोण घेणार? असा प्रश्न मेहता यांनी उपस्थित केला. सार्वजनिक स्वच्छतेस पुण्याला बक्षीस मिळते; पण खरंच आपले शहर स्वच्छ आहे का? प्रत्येक बाबींसाठी केवळ राजकारण्यांकडून अपेक्षा करून उपयोग नाही. प्रत्येक नागरिकांनी त्यासाठी पुढे आले पाहिजे, असे मेहता यांनी नमूद केले.

कोळपकर यांनी प्रास्ताविक केले. सुदीप डांगे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. तांबडे आणि प्रशांत चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. अस्मिता चितळे यांनी आभार मानले.