The Karbhari Impact | महापालिका आयुक्त आणि महापौर बंगला स्वच्छता प्रकरण | महापालिका आयुक्तांनी प्रशासनाकडून मागवला खुलासा  | ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेच्या बातमीचा परिणाम 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका आयुक्त आणि महापौर बंगला स्वच्छता प्रकरण | महापालिका आयुक्तांनी प्रशासनाकडून मागवला खुलासा

| ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेच्या बातमीचा परिणाम

गेल्या वर्षभरापासून बंद  असलेला महापौर बंगला (Mayor Bungalow) आणि आयुक्त बंगल्याच्या (PMC Commissioner Bungalow)  स्वच्छतेसाठी 24 लाख 59 हजाराची  सामग्री खरेदी करण्यात आली आहे. घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाने शहनिशा न करताच या सामग्रीची भांडार विभागाकडून खरेदी करून घेतली आहे. असे बोलले जात होते. याबाबत ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेने सर्वप्रथम वृत्त प्रसारित केले होते. याची महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गंभीरपणे दखल घेतली आहे. आयुक्तांनी या संबंधित सर्व खात्याकडून याचा खुलासा मागवला आहे.

महापौर बंगला आणि आयुक्त बंगल्याची स्वच्छता घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाकडून केली जाते. त्यासाठी भांडार विभागाकडून विविध सामग्रीची खरेदी केली जाते. महापौर बंगला जो मागील वर्षांपासून बंद आहे आणि आयुक्त बंगल्याच्या स्वच्छतेसाठी 2022-23 या सालासाठी स्वच्छता विषयक सामग्री खरेदी करण्यात आले आहे. ज्यामध्ये विविध 30 साहित्याचा समावेश आहे. ज्यामध्ये सुगंधी तेल, ब्लॅक फिनेल, डांबर गोळी, फ्लोअर क्लिनर, कमोड घासण्याचा ब्रश, काच पुसण्याची नॅपकिन, चहाचा कप, चहा ट्रे, रूम फ्रेशनर, अशी विविध साहित्ये आहेत. ही खरेदी भांडार विभागाकडून करण्यासाठी घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाकडून प्रस्ताव प्राप्त झाला. त्यानुसार भांडार विभागाने टेंडर प्रक्रिया राबवत ही खरेदी केली. कल्पक इंटरप्रायजेस या कंपनीला हे काम देण्यात आले. ज्यासाठी 24 लाख 59 हजाराचा खर्च करण्यात आला आहे.
मात्र दोन बंगल्या साठी एवढा खर्च होऊ शकतो का, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. त्यामुळे मग या बाबीची महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनाही दखल घेतली आहे. आयुक्तांनी याबाबत संबंधित अतिरिक्त आयुक्त, घोले रोड क्षेत्रीय कार्यालय आणि आयुक्त कार्यालयातील प्रशासन अधिकारी यांच्याकडून खुलासा मागवला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार क्षेत्रीय कार्यालयाने याबाबत आयुक्त कार्यालय यांच्याकडे बोट दाखवले आहे. आता आयुक्त कार्यालयातील प्रशासन अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यानंतर सर्व गोष्टी समोर येणार आहेत.

Hoarding Action | होर्डिंग वर कारवाई होत नाही म्हणून एका क्षेत्रीय अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली! 

Categories
Breaking News PMC पुणे

होर्डिंग वर कारवाई होत नाही म्हणून एका क्षेत्रीय अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली!

| महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून कारवाईचा बडगा

पुणे | शहरातील अनधिकृत होर्डिंग वर कारवाई करण्याची बाब महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गंभीरपणे घेतली आहे. मात्र काही क्षेत्रीय कार्यालयाकडून ही कारवाई तीव्र होत नाही. नगर रोड – वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय परिसरात गेल्या काही दिवसापासून व्यवस्थित कारवाई होत नाही. यामुळे महापालिका आयुक्तांनी आकाशचिन्ह विभाग आणि संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच क्षेत्रीय अधिकारी तथा सहायक आयुक्त सोमनाथ अधिकारी सोमनाथ बनकर यांच्याकडून क्षेत्रीय अधिकारी पदाचा अधिकार काढून घेतला आणि ती जबाबदारी उपअभियंता नामदेव बजबळकर यांच्यावर सोपवली आहे. यामुळे सर्व क्षेत्रिय कार्यालये चांगलीच हादरून गेली आहेत.
आगामी काळात शहरात होर्डिंग, फ्लेक्स, बोर्ड लावायचे (Hoarding) असतील, तर आणखी ज्यादा दर मोजावे लागणार आहेत.  शहरात 222 रुपये प्रति चौरस फुट दर लागू होता. मात्र आता हे दर वाढवले  आहेत. महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून (PMC sky sign dept) याबाबतचा प्रस्ताव तयार करून  तो स्थायी समिती च्या (Standing Committee) माध्यमातून मुख्य सभेसमोर (General body) ठेवला होता. त्यानुसार २०१३-१४ ते २०२२-२३ पर्यंत दरवर्षी १०% दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यानुसार हे दर 580 प्रती चौरस फुट होणार आहेत. तसेच नवीन महापालिका हद्दी साठी देखील नवीन दर प्रस्तावित करण्यात आले आहेत. मुख्य सभेने नुकतीच या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने यावर कार्यवाही करणे सुरु केले आहे. त्यानुसार प्रस्ताव देखील घेणे सुरु झाले आहे.
दरम्यान महापालिका आयुक्त यांच्याकडून अनधिकृत होर्डिंगच्या कारवाई वर गंभीरपणे लक्ष दिले आहे. त्यानुसार प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला उद्दिष्टे देखील देण्यात आली आहेत. आकाशचिन्ह विभागाकडून क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना त्यासाठी शनिवारी आणि रविवारी देखील कामावर हजर राहण्यास सांगितले जात आहे. होर्डिंग वर कारवाई करताना समाविष्ट गावात काही कर्मचाऱ्यांना मारहाण देखील झाली आहे. कारवाईच्या वेळी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे काही क्षेत्रीय कार्यालयाकडून कारवाई करताना हयगय केली जात आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान नगर रोड – वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाकडून होर्डिंग कारवाई करण्यात हलगर्जीपणा केला म्हणून महापालिका आयुक्तांनी क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच क्षेत्रीय अधिकारी सोमनाथ बनकर यांची तडकाफडकी बदली देखील केली. त्यांच्या जागी क्षेत्रीय कार्यालयाचे उपअभियंता नामदेव बजबळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बनकर यांच्याकडे स्थानिक संस्था कर या पदाचा पदभार तसाच ठेवण्यात आला आहे. तसेच आयुक्तांनी नवीन अधिकाऱ्यांना कारवाई कडक करण्यास सांगितले आहे. आयुक्तांच्या या भूमिकेने मात्र आकाशचिन्ह विभागाकडे काम करणारे कर्मचारी मात्र हादरून गेले आहेत.

Jagdish Mulik | नगर रस्त्यावर खराडी, विश्रांतवाडी येथे उड्डाणपुल उभारणार

Categories
Breaking News PMC Political पुणे

नगर रस्त्यावर खराडी, विश्रांतवाडी येथे उड्डाणपुल उभारणार

| भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट

वडगावशेरी मतदार संघातील नगर रस्त्यावर खराडी आणि विश्रांतवाडी येथे मंजूर करण्यात आलेल्या उड्डाण पूल उभारण्याचे काम निधीची तरतूद करून लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन केली.

या वेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी सभागृह नेते गणेश बिडकर उपस्थित होते.

मुळीक म्हणाले, ‘केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत सन 2018 मध्ये शहरातील 200 किलोमीटर रस्त्यांचे रोड सेफ्टी ऑडिट करण्यात आले होते. त्यात पुणे-नगर रस्ता हा वाहतुकीसाठी सर्वात धोकादायक असल्याची बाब समोर आली होती. त्याचा विचार करून पुणे नगर रस्ता हे एक एकक मानून तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी नगर रस्ता एकात्मिक वाहतूक आराखडा तयार केला होता, त्यामध्ये मेट्रो मार्गांचे नियोजन, बीआरटी मार्गांचे सक्षमीकरण, पुरेशा बसव्यवस्था, आणि गोल्फ चौक, खराडी कल्याण नगर, येरवडा, विश्रांतवाडी येथे आवश्यकतेप्रमाणे उड्डाणपूल किंवा ग्रेड कामे अंदाजपत्रकात सुचविली होती. त्यापैकी गोल्फ चौकातील उड्डाणपुलाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले. खराडी येथे उड्डाणपुलासाठी राज्य सरकार निधी उपलब्ध करून देणार आहे. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच सूतोवाच केले. राज्य सरकार आणि महापालिकेच्या माध्यमातून लवकरच काम सुरू करण्याचे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले.’

Sports Competition | महापालिका कर्मचाऱ्यांनी खेळत राहणे आवश्यक | महापालिका आयुक्त विक्रम कुमार

Categories
Breaking News PMC Sport पुणे

महापालिका कर्मचाऱ्यांनी खेळत राहणे आवश्यक | महापालिका आयुक्त

महापालिकेच्या कामगार कल्याण निधी क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन आयुक्तांच्या हस्ते संपन्न

पुणे महानगरपालिका कामगार कल्याण निधी तर्फे अधिकारी / सेवक यांचेसाठी विविध क्रीडा स्पर्धा १ ते ५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. या क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ १ फेब्रुवारी रोजी पंडीत नेहरू स्टेडियम येथे विक्रम कुमार, प्रशासक व महापालिका आयुक्त यांचे शुभहस्ते व रविंद्र बिनवडे, कार्याध्यक्ष तथा अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज),  विकास ढाकणे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि), शांताराम जाधव, अर्जुन पुरस्कार
विजेते (कबड्डी), हेमंत किणीकर, जेष्ठ रणजी क्रिकेटपटू यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
उद्घाटन समारंभास शिवाजी दौंडकर, सह महापालिका आयुक्त (मुख्य कामगार अधिकारी),  उल्का कळसकर, सह महापालिका आयुक्त (मुख्य लेखा व वित्त
अधिकारी ),    कुणाल मंडवाले उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी  प्रदीप महाडीक, अध्यक्ष, पी. एम. सी. एम्प्लॉयईज युनियन,  प्रकाश हुरकडली, सल्लागार, पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यता प्राप्त) इ. मान्यवर उपस्थित होते.
महापालिका आयुक्त यांनी सर्व सहभागी कर्मचाऱ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच काम करताना प्रत्येक कर्मचाऱ्यास ताणतणावास सामोरे जावे लागते त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने खेळत रहाणे आवश्यक आहे असा संदेश दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन   नितीन केंजळे, कामगार अधिकारी यांनी केले.

Subways | PMC Pune | विद्यापीठ रस्त्यावर होणार तीन भुयारी मार्ग! महापालिका आयुक्तांची माहिती

Categories
Breaking News PMC पुणे

विद्यापीठ रस्त्यावर होणार तीन भुयारी मार्ग! महापालिका आयुक्तांची माहिती

पुणे : शहरातील वाहतूक कोंडी (Traffic) फोडण्यासाठी राज्यशासनाच्या निधीतून शहरात सुमारे 21 ठिकाणी उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक ते सिमला ऑफिस चौका पर्यंत तीन भुयारी मार्ग (Underground road) प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यात विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक तसेच मुख्य विद्यापीठ रस्त्यावरून महापालिका आयुक्तांच्या बंगल्याकडे वळताना हरेकृष्ण मंदीर चौकात भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. या मार्गांचा डीपीआर तयार करणे तसेच त्याची फिजिबिलीटी तपासण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार असून या निविदा काढण्यासाठी मंगळवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी मान्यता दिली आहे.

या शिवाय, संगमवाडी रस्त्यावर शहदलबाबा चौक येथे उड्डाणपूल तर सिंहगड रस्त्यावर नवशा मारूती मंदीराच्या मागील बाजूने मुठा नदीवर डीपी रस्त्याला जोडणारा पूल बांधण्यात येणार आहे.
मागील महिन्यात महापालिकेच्या गोल्फ क्‍लब चौकातील उड्डाणपूलाच्या उद्घाटनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्यशासनाकडून सर्वोत्परी मदत करण्याचे आश्‍वासन दिले होते. तसेच महापालिकेस सुमारे 2 हजार कोटींचा निधी देण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार, महापालिकेने शहरात सुमारे 21 ठिकाणी उड्डाणपूल अथवा भुयारी मार्ग उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यात, जागा ताब्यात असलेल्या 5 ठिकाणी तातडीनं डीपीआर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत. त्यामुळे सल्लागार नेमून पुढील दोन महिन्यात हे डीपीआर शासनास पाठविण्याचे पालिकेकडून नियोजन करण्यात आले असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले, तसेच त्यास शासनाने मान्यता दिल्यास पुढील चार महिन्यात या सर्व ठिकाणी कामेही सुरू होतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
—————-
विद्यापीठ रस्त्यावर पीएमआरडीएकडून मेट्रो 3 चे काम सुरू आहे. या चौकात औंध कडून सेनापती बापट रस्त्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी महापालिकेने भुयारी मार्ग प्रस्तावित केला आहे. त्यास पीएमआरडीएने मान्यताही दिलेली आहे. मात्र, त्यासाठी निधी नव्हता त्यामुळे आता हा मार्ग शासनाकडे पाठविला जाणार आहे या शिवाय, मेट्रोचे काम सुरू असतानाच शिमला ऑफिस चौक आणि आयुक्तांच्या घराकडे ज़ाणाऱ्या वाहनांसाठीही भुयारी मार्ग केला जाणार आहे.

National Clean Air Programme | पुणे शहराला प्रदूषण मुक्‍त करण्यासाठी केंद्र सरकार सरसावले

Categories
Breaking News PMC social देश/विदेश पुणे

पुणे शहराला प्रदूषण मुक्‍त करण्यासाठी केंद्र सरकार सरसावले

| महापालिकेस 135 कोटींचा निधी

पुणे : पुणे शहर आता प्रदूषणाच्या (Pollution In Pune)  बाबतीत देशात दिल्ली (Delhi) नंतर दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. शहराला प्रदूषण मुक्त करण्यासाठी आता केंद्र सरकार (Central government) सरसावले आहे.  प्रदूषण मुक्‍त पुण्यासाठी केंद्रशासनाकडून पुणे महापालिकेस 15 व्या वित्त आयोगा अंतर्गत तब्बल 135 कोटींचा निधी देण्यात आला आहे.

या निधीतून महापालिकेकडून प्रदूषण मुक्‍त पुण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार (PMC commissioner Vikram Kumar) यांनी दिल्लीत त्याचे सादरीकरण केले. केंद्र शासनाच्या नॅशनल क्‍लिन एअर प्रोग्राम उपक्रमात देशभरातील 131 शहरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील 19 शहरांचा समावेश आहे. तसेच हा उपक्रम 2025-26 पर्यंत पुढील तीन वर्षे राबविल जाणार आहे. या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांच्या कामाचा फायदा प्रदूषण कमी करण्यास झाल्यास महापालिकेस पुढील दोन वर्षात आणखी निधी मिळणार आहे.
——–
80 टक्के निधी ई-मोबिलिटीसाठी
याबाबत माहिती देताना महापालिका आयुक्‍त कुमार म्हणाले की, या निधीतील 80 टक्के निधी हा ई-मोबिलिटाला चालणा देण्यासाठी खर्च केला जाणार आहे. त्यामध्ये, प्रामुख्याने नवीन ई-बस खरेदी करणे, चार्जिंग स्टेशन उभारणे, ई- बस डेपो विकसन, शहरात चार्जिंग पॉईंट्‌सची निमिर्ती, नागरिकांना ई-बाईकची सुविधा उपलब्ध करून देणे, या कामासाठी केला जाणार आहे. तर 20 टक्के निधी शहराच्या प्रदूषणात वाढ झालेल्या पीएम 10 धूळीकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी खर्च केला जाणार आहे. रस्त्यावरची धूळ कमी करण्यासाठी मॅकेनिकल स्वीपिंग, काही चौकांत मिस्ट बेस्ड फाऊंटन, विद्युतदाहिनी धूर कमी करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसविणे अशा कामांचा समावेश असल्याचे आयुक्‍त कुमार यांनी स्पष्ट केले.

Progress Report | PMC Pune | 25 कोटींच्या वरील कामाचा दर 15 दिवसांनी आयुक्तांना अहवाल द्यावा लागणार

Categories
Breaking News PMC social पुणे

25 कोटींच्या वरील कामाचा दर 15 दिवसांनी आयुक्तांना अहवाल द्यावा लागणार

| महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे | पुणे महापालिकेच्या ज्या विभागाकडे 25 कोटीपेक्षा जास्त रकमेची विकास कामे सुरु आहेत, त्यांना दर 15 दिवसांनी महापालिका आयुक्ताकडे progress report सादर करावा लागणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश सर्व खाते प्रमुख आणि उपायुक्त यांना दिले आहेत. (PMC Pune)

महापालिकेकडून विविध विकास कामे करण्यात येतात. महापालिकेत प्रशासक असल्यापासून बरेच मोठे प्रकल्प करण्यात येत आहेत. तसेच 25 कोटीपेक्षा अधिक रकमेची कामे देखील मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहेत. महापालिका आयुक्तांच्या देखरेखीखाली ही कामे करण्यात येतात. यामुळे या कामावर आयुक्तांनी गंभीरपणे लक्ष देण्याचे ठरवले आहे. 25 कोटी पेक्षा जास्त रकमेच्या कामाचे सल्लागाराच्या माध्यमातून दर 15 दिवसांनी महापालिका आयुक्ताकडे progress report सादर करावा लागणार आहे. खाते प्रमुख आणि उपायुक्त यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation)

PMC Budget | १५ जानेवारी पूर्वी महापालिका आयुक्त अंदाजपत्रक सादर करणार नाहीत

Categories
Breaking News Commerce PMC पुणे

१५ जानेवारी पूर्वी महापालिका आयुक्त अंदाजपत्रक सादर करणार नाहीत

पुणे | महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) हे महापालिकेचे अंदाजपत्रक (PMC Budget) मुदतीत म्हणजेच १५ जानेवारी किंवा त्या पूर्वी सादर करू शकणार नाहीत. अंदाजपत्रक १५ जानेवारी नंतर (अलाहिदा) सादर करण्यात येईल. असे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्थायी समितीला (Standing Committee) सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. (PMC pune)

: 15 जानेवारी पर्यंत अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करणे आवश्यक

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ९५ नुसार महानगरपालिकेचे महसूली, भांडवली इ. उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक आराखडा (“अ” व “क’) अंदाजपत्रक १५ जानेवारी अगर तत्पूर्वी स्थायी समितीस सादर करणे आवश्यक आहे. त्यांनतर स्थायी समिती अध्यक्ष त्यात बदल करून बजेट मुख्य सभेला सादर करतात. मुख्य सभेत चर्चा होऊन हे बजेट 31 मार्च पूर्वी मंजूर होणे आवश्यक असते. त्यांनतर त्यावर अंमल करता येतो. दरम्यान महापालिका आयुक्तांनी बजेट सादर करण्याची तयारी सुरु केली होती. सर्व विभागाकडून आयुक्तांनी याबाबतची माहिती मागवली होती. मात्र सध्या पालिकेकडून शहरात G-२० ची कामे सुरु आहेत. त्यामुळे १६ जानेवारी पर्यंत आयुक्तांना इतर कामात लक्ष देता येणार नाही. त्यामुळे महापालिकेचे बजेट हे १५ जानेवारी नंतर सादर करण्यात येणार आहे.
तसेच सद्यस्थितीत महापालिका सभा अस्तित्वात नाही. प्रशासकाकडून कामकाज पहिले जात आहे. त्यामुळे सर्व अधिकार आयुक्त तथा प्रशासक यांनाच आहेत. त्यामुळे पालिकेचे अंदाजपत्रक हे उशीरच सादर होणार आहे. शिवाय महापालिका आयुक्तांनी बजेट उशिरा सादर करण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती समोर देखील सादर केला आहे. (Pune municipal corporation Budget)

PMC Commissioner | आयुक्त साहेब नागरिकांना भेटण्यासाठी वेळ द्या

Categories
Breaking News PMC social पुणे

आयुक्त साहेब नागरिकांना भेटण्यासाठी वेळ द्या

| रयत स्वाभिमानी संघटनेची मागणी

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नागरिकांना भेटण्याची वेळ द्यावी. नागरिकांचे प्रश्न समजून घ्यावेत आणि त्याचा निपटारा करावा. अशी मागणी रयत स्वाभिमानी संघटनेने केली आहे. (PMC Commissioner Vikram Kumar)

रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख संघटक ऋषिकेश पिराजी कानवटे यांनी दिलेल्या निवेदनानुसार पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी नागरिकांना भेटण्याची वेळ सोमवार व शुक्रवार 10:30 ते 11:30 अशी आहे. आठवड्यातील फक्त दोन तास नागरिकांसाठी प्रशासक म्हणून आपले मिळत आहेत. याकडे आपण गांभीर्याने लक्ष घालावे व त्यात पण जर तुम्हाला कोणती अर्जंट मिटींग असेल किंवा तुमचे काही काम असतील तर या दिवशी कोणालाही तुम्हाला भेटता येत नाही; त्यामुळे नागरिकांच्या समस्यांवर एकंदरीत चर्चा होताना पुणे महानगरपालिकेमध्ये दिसत नाही. त्याचबरोबरने नागरिकांनी आपल्या समस्या कोठे आणि कोणापाशी मांडायच्या याबाबत आजही नागरिकांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. बाकी अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर अधिकाऱ्यांचा एकच सूर दिसून आला आहे, आमच्याकडे निधी उपलब्ध नाही, मग जर महानगरपालिकेकडे निधीच उपलब्ध नसेल तर त्यांनी नवीन 23 गाव समाविष्ट करून घेण्याची भूमिका किंवा हिम्मत का दाखवली? आम्हाला प्रश्न पडतोय समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्ये विविध प्रश्न उपस्थित आहेत आणि ते प्रश्न कोणापाशी, कुठे आणि कसे मांडावेत याबाबत नागरिकांना कसलीही माहिती नाही व याबाबत महानगरपालिका आयुक्तांना भेटून प्रश्न विचारावे तर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे वेळच नाही. (PMC Pune)

महानगरपालिका प्रशासन हे प्रशासकाच्या हाताखाली चालतंय की स्थानिक व माजी नगरसेवकांच्या मर्जीनुसार चालतंय याबाबत आम्हाला प्रश्न पडत आहेत कारण कोणतीही गोष्ट अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर त्या गोष्टीची रिपोर्टिंग ही स्थानिक नगरसेवकांना केली जाते मग अधिकाऱ्यांना पगार प्रशासक किंवा शासन देतं की नगरसेवक देतात हा संशोधनाचा विषय आहे.
या सर्व बाबींवरून मला महानगरपालिकेच्या आयुक्तांना एकच नम्र विनंती करायची आहे की आपण आठवड्यातले पाचही दिवस किमान दोन तास तरी नागरिकांसाठी खुले करावेत प्रत्येक दिवशी दोन तास नागरिकांना भेटण्यासाठी राखीव करावेत किंवा पूर्ण वेळ नागरिकांसाठी काम करावे आम्ही देखील समजू शकतो की आपणास प्रशासकीय वेगवेगळी कामामध्ये व्यस्त असतात यामुळे आपल्याला पूर्ण वेळ नागरिकांना भेटता येत नसेल परंतु दिवसातला ठराविक वेळ हा नागरिकांच्या प्रश्नांसाठी द्यावा अशी विनंती मी एक सामान्य नागरिक म्हणून आपणाकडे करू इच्छितो आणि आपण या विनंतीला मान देऊन याकडे गांभीर्याने लक्ष घालून आपली नागरिकांसाठी असणारे भेटण्याचे धोरण लवकरात लवकर बदलाल व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पातळीवरती निर्णय घेण्याचे अधिकार द्यावे. (Rayat Swabhimani Sanghatana)

त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी जी मोहल्ला कॉर्नर सभा होते ती सभा दर आठवड्याच्या कोणत्याही एका दिवशी ठेवावी म्हणजे यातून किमान नागरिकांना आपले प्रश्न मांडण्यासाठी चार दिवस मिळतील,  आपण मोहल्ला कॉर्नर हे व्यासपीठ निर्माण केला आहे. त्या व्यासपीठात न्याय मिळेल व जास्तीत जास्त नागरिक यामध्ये सहभाग नोंदवतील आणि आपले प्रश्न मांडतील त्यामुळे जसे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दर सोमवार जनसभा होते. त्याचप्रमाणे आपणही आठवड्यातील एक दिवस मोहल्ला कॉर्नर घ्यावेत या सर्व बाबींवर आपण सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा आपणा विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे राहील व नागरिकांच्या रोशाला आपल्याला सामोरे जावे लागेल. असा इशारा रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख संघटक ऋषिकेश पिराजी कानवटे यांनी आयुक्तांना दिला. यावेळी  रयत स्वाभिमानी संघटनेचे सरचिटणीस रविराज काळे, रयत विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सूर्यकांत सरवदे इत्यादी उपस्थित होते

Stray Pigs | PMC Pune | मोकाट डुकरे आता पुणे महापालिकेची संपत्ती होणार!  | नागरिक किंवा व्यावसायिकांचा अधिकार राहणार नाही 

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

मोकाट डुकरे आता पुणे महापालिकेची संपत्ती होणार!

| नागरिक किंवा व्यावसायिकांचा अधिकार राहणार नाही

पुणे शहरात (Pune City) मोकाट फिरणाऱ्या डुक्करांच्या (Stray Pigs) उपद्रवामुळे नागरिकांच्या आरोग्याचे व मालमत्तेचे नुकसान होत असल्याने तसेच रहदारीस अडथळा होत असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डुक्करांमुळे संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव (Outbreak of infectious diseases) होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मोकाट डुकरे आता महापालिकेची (PMC Pune) संपत्ती होणार आहे. यापुढे पुणे मनपा हद्दीत मोकाट डुक्कर दिसून आल्यास डुक्करांवर कोणत्याही नागरिकांचा /व्यावसायीकांचा हक्क राहणार नाही व सदर डुक्कर महापालिकेची मालमत्ता म्हणून जप्त करण्यात येतील. याबाबतचे जाहीर प्रकटन महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांच्याकडून जारी करण्यात आले आहे.
जाहीर प्रकटनानुसार क्षेत्रिय कार्यालयांनी आपआपल्या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत केलेल्या पाहणी अंती असे निदर्शनास आले आहे कि, पुणे शहरातील काही व्यक्ती डुक्कराचे पालन व्यावसायिक हेतूने करीत असून त्यांनी डुक्करे मोकाट सोडलेली आहेत. अशा भटक्या व गोकाट डुक्करांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा व साथीचे रोग पसरण्याचा धोका आहे. अशा भटक्या व मोकाट डुक्करांवर व त्यांना पाळणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद खालीलप्रमाणे आहे. (Pune Municipal corporation)
महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियम मधील अनुसूची “ड” प्रकरण १४ नियम ३ मध्ये कोणतेही डुक्कर भटकताना आढळल्यास ताबडतोब मारून टाकता येईल आणि आयुक्त निर्देश देईल अशा रीतीने त्या डुक्कराच्या प्रेताची विल्हेवा लावता येईल आणि अशा रीतीने मारून टाकलेल्या कोणत्याही डुक्कराबद्दल भरपाई मिळण्यासाठी कोणताही दादा सांगता येणार नाही अशी तरतूद आहे. भारतीय दंडसंहिता मधील कलम २८९ अन्वये मानवी जीवितास धोका निर्माण करून नागरिकांना त्यापासून दुखापत होण्याची, रहदारीस अडथळा होण्याची तसेच सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टीने आरोग्य
विघातक परिस्थिती निर्माण केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे व त्याप्रमाणे संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. (PMC Pune)
क्रिमिनल प्रोसिजर कोड (CrPC) कलम क्रमांक १३३ (१) (फ) अन्वये मानवी जीवितास धोका निर्माण करणाऱ्या धोकादायक जनावराच्या मालकावर कारवाई करण्याचे अधिकार  जिल्हा दंडाधिकारी यांना आहेत व त्याप्रमाणे संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.डिझास्टर मॅनेजमेंट डॉट २००५ अन्वये मनुष्यास इजा अथवा मनुष्यहानी झाल्यास डिझास्टर मॅनेजमेंट अॅक्टं २००५ अन्वये केंद्र राज्य अथवा जिल्ह्यातील संबंधित संस्थांना कामात अडथळा निर्माण करणे यासाठी फौजदारी गुन्हा दाखल करेगाची तरतूद आहे . त्याप्रमाणे संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. (Stray pigs)
इपिडेमीक.डिसीझस अॅक्ट १८९७ आणि दुरुस्ती २०१९ (THE EPIDEMIC DISEASES ACT, 1897 ACT NO.3 OF 1897) अन्वये डुक्करांमुळे पसरणारे साथीचे आजार (स्वाईन फ्ल्यू, लेप्टोस्पायरोसिस, जे.ई.(Japanese Encephalitis) इ. पसरल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी पुणे मनपा हद्दीत डुक्कर पालन करणाऱ्या व्यवसाय धारकांची राहील व या अॅक्ट प्रमाणे संबंधितांवर कारवाई करण्याचे केंद्र व राज्य शासन यांना अधिकार आहेत.
तरी भटक्या डुक्करांचा व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना यापूर्वी दि.०८/०८/२०२२ अन्वये भटकी व मोकाट डुक्करे त्वरित मनपा हद्दीबाहेर हलविण्याबाबतचे जाहीर प्रकटन प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र डुक्करांचा व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांनी अद्याप डुक्कर पुणे मनपा हद्दीबाहेर हलविली नसल्याचे निदर्शनास आले असून यापुढे पुणे मनपा हद्दीत मोकाट डुक्कर दिसून आल्यास सदर डुक्करांवर कोणत्याही नागरिकांचा /व्यावसायीकांचा हक्क राहणार नाही व सदर डुक्कर महापालिकेची मालमत्ता म्हणून जप्त करण्यात येतील. तसेच पुणे मनपातर्फे वर उल्लेख केलेल्या कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल.