PMPML | गुन्हे दाखल करूनही पीएमपीच्या बस थांब्यावरील जाहिराती थांबेनात | पीएमपी घेणार आक्रमक पवित्रा

Categories
Breaking News पुणे

गुन्हे दाखल करूनही पीएमपीच्या बस थांब्यावरील जाहिराती थांबेनात

| पीएमपी घेणार आक्रमक पवित्रा

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (PMPML) शहरात प्रवाशांच्या सोईसाठी उभारण्यात आलेले अनेक बस थांबे (Bus Stop) बेकायदा जाहिरातींनी (Illegal Advertisement) गजबजून गेले आहेत. त्यामुळे बस थांब्यांवर प्रवाशांना वेळापत्रक व मार्गाची माहिती मिळत नाही. तसेच, थांब्यांचे विद्रुपीकरण देखील होत आहे. याआधी अशा जाहिराती करणाऱ्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. तरी देखील जाहिराती थांबेनात. त्यामुळे पीएमपीने आता थांब्यांवर बेकायदा जाहिराती करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. (PMPML Pune)

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात पीएमपीकडून 1600 ते 1700 बसच्या माध्यमातून सेवा दिली जाते. बस थांब्यावरील शेडच्या ठिकाणी मार्गाची माहिती, वेळापत्रक लावले आहे. पण, अनेक जण वाढदिवसाच्या जाहिराती थांब्यांवर लावतात. तर, काही स्थानिक राजकीय व्यक्तींच्या जाहिराती बेकायदा थांब्यांवर लागल्या जातात. त्याबरोबर काही कंपन्या, संस्था पत्रके थांब्यांवर लावतात. यामुळे प्रवाशांच्या सोईसाठी थांब्यांवर लावलेली माहिती झाकाळली जाते. तसेच, बस थांब्यांचे विद्रुपीकरण होते. त्यामुळे अशा जाहिराती करणाऱ्यांवर पीएमपीबरोबरच पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कारवाई केली जाते.

पीएमपीच्या थांब्यांवर अशा जाहिराती वाढू लागल्यामुळे आता पीएमपीने त्या लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी पीएमपीच्या थांब्यांवर बेकायदा जाहिराती लावू नयेत, अशा जाहिराती लावणाऱ्यांवर महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियमनुसार कारवाई करण्याचा इशारा पीएमपीने दिला आहे.