Dr. Siddharth Dhende | पोतराजचे काम करणाऱ्या विक्रमच्या आयुष्यात लागणार ‘शिक्षणाचा दिवा’ | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी उचलली शिक्षणाची जबाबदारी

Categories
Breaking News Political social पुणे

पोतराजचे काम करणाऱ्या विक्रमच्या आयुष्यात लागणार ‘शिक्षणाचा दिवा’

| माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी उचलली शिक्षणाची जबाबदारी

|स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त डॉ. धेंडे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

पुणे |कोवळ्या हातात चाबूक, कपाळ हळदी कुंकूने भरलेले, पाठीवर चाबकाचे फटके ओढत पोतराजचे काम करणाऱ्या विक्रमच्या आयुष्यात आता शिक्षणाचा दिवा लागणार आहे. पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत त्यासाठी पाऊल उचलले आहे. विक्रम निंबाळकर याच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी डॉ. धेंडे यांनी घेतली आहे. तसेच कोवळ्या वयात वाटेला आलेले पोतराजचे काम सोडून देण्याचे आवाहन कुटुंबियांना देखील केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त डॉ. धेंडे यांनी घेतलेल्या या जबाबदारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सामाजिक व्यवस्थेमध्ये अनेकांना पिढ्यानपिढ्या पोतराजचे काम करावे लागत आहे. हातात चाबूक, हळदी कुंकवाने भरलेले मळवट, कंबरेला अनेक कपडे जोडून तयार केलेला घागरा घालून पोतराज घरोघरी फिरत असतात. चाबकाचे फटके पाठीवर मारून पैसे आणि धान्य गोळा करण्याचे काम करतात. आजही काही प्रमाणात पोतराज दिसत आहेत.

येरवडा भागात राहणाऱ्या विक्रम रामा निंबाळकर या मुलाच्या हातात कोवळ्या वयात पुस्तके, शिक्षणाऐवजी पोतराजचा चाबूक आला. घरची परिस्थितीही बेतातीच असल्याने शाळेत जाणे कठीण झाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त प्रभाग क्रमांक दोन येथे पोतराज काम करणारा विक्रम व त्याच्या आईच्या हस्ते अनोखे ध्वजवंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पथारी संघटनेच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे प्रमुख उपस्थित होते. या वेळी विक्रमच्या घरची चौकशी डॉ. धेंडे यांनी केली. सर्व माहिती घेतल्या नंतर विक्रमच्या आईचे मतपरिवर्तन करून विक्रमला शाळेत पाठविण्याचे आवाहन डॉ. धेंडे यांनी केले. त्यासाठी येणारा खर्च उचलण्याची जबाबदारी देखील घेतली. मात्र कोवळ्या वयात शिक्षणाची कास धरू द्या, असे आवाहन केले. त्यानुसार डॉ. धेंडे हे विक्रमच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार आहेत.

सर्वसामान्य लोकांच्या घरात शिक्षणाची शिदोरी पोचली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगत आपलं सर्व आयुष्य ती चळवळ उभी करण्यात घालवली आहे. विक्रम सारखी अनेक मुले शिक्षणापासून दूर जात आहेत. ही परिस्थिती सुखावह नाही. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विक्रमची भेट झाली. या वेळी पोतराजचे काम सोडून देण्यास सांगून शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.

– डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका
———————-