Prohibitory order | जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश

पुणे | पेरणे फाटा येथे १ जानेवारी होणाऱ्या जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत ३० डिसेंबर रोजी मध्यरात्री पासून २ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

त्यानुसार कोणतीही व्यक्ती इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक आदी समाजमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे खोटे संदेश, खोटी माहिती पोस्ट करणार नाहीत किंवा फॉरवर्ड करणार नाही याची जबाबदारी संबंधित पोस्ट करणारी व्यक्ती आणि ग्रुप ॲडमिनची असेल. पुणे ग्रामीण हद्दीमधील गावांमध्ये स्थानिक प्रशासन व पोलीसांच्या लेखी परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास प्रतिबंध राहील. यात शासकीय विभाग आणि यंत्रणांना सवलत राहील.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात नमूद केले आहे.