PMC Financial Situation | मिळकत कराची वसूली होईना; जीएसटीचे अनुदान मिळेना | महापालिकेने आर्थिक डोलारा सांभाळायचा कसा?

Categories
Breaking News Commerce PMC social पुणे महाराष्ट्र

मिळकत कराची वसूली होईना; जीएसटीचे अनुदान मिळेना

| महापालिकेने आर्थिक डोलारा सांभाळायचा कसा?

पुणे | नवीन आर्थिक वर्षात पुणे महापालिकेचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण महापालिकेचे जे हक्काचे आणि महत्वाचे उत्पन्नाचे स्रोत आहेत, त्यांनीच हाय खाल्ली आहे. 40% कर सवलत कायम ठेवण्याचा निर्णय सरकारकडे प्रलंबित असल्याने मिळकत कराची वसूली थांबली आहे. तर प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला राज्य सरकारकडून मिळणारे जीएसटीचे अनुदान देखील महापालिकेला अजून मिळाले नाही. त्यामुळे आता महापालिका विकासकामे आणि आपल्या कर्मचाऱ्याचे वेतन यांची सांगड कशी घालणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महापालिकेने (PMC Pune) आर्थिक  वर्ष (२०२३-२४) मिळकतकराच्या बिलांचे वाटप १ एप्रिल ऐवजी १ मे पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ४० टक्के सवलतकाढण्यात आल्यानंतर आकारणी झालेल्या मिळकतींची बिले भरण्यासही ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे एप्रिल महिन्यात या थकबाकीदारांवर कुठल्याही दंडाची आकारणी केली जाणार नाही. ही रक्कम मे महिन्यापासून आकारली जाईल. सरकारकडे 40% सवलत कायम ठेवण्याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित असल्याने महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. प्रति वर्षी महापालिकेला टॅक्स वसुलीतून एप्रिल आणि मे अशा दोन महिन्यात 650 कोटींचे उत्पन्न मिळते. यावर्षी मात्र अजूनपर्यंत 20 कोटी देखील मिळाले नाहीत. यामुळे सर्व नजरा राज्य सरकारच्या निर्णयावर लागून राहिल्या आहेत.
सरकारने वस्तू आणि सेवा कर लागू केला आहे. त्याबदल्यात महापालिकेला राज्य सरकार कडून अनुदान दिले जाते. प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला हे अनुदान जमा होत असते. त्यामुळे महापालिका सेवकांचे वेतन आरामात करू शकते. आतापर्यंत 176 कोटींची रक्कम होत होती. नवीन आर्थिक वर्षात 8% वाढ गृहीत धरून हे अनुदान 191 कोटी इतके येणे अपेक्षित आहे. मात्र 18 तारीख उलटून गेले तरी हे अनुदान अजूनही आलेले नाही. असे लेखा व वित्त विभागाकडून सांगण्यात आले. यामुळे महापालिका आपले आर्थिक नियोजन कसे करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

Property Tax | पुणेकरांना शिंदे फडणवीस सरकारचा दिलासा | ४० टक्के मिळकतकराची सवलत कायम राहणार | येत्या कॅबिनेट मीटींग मध्ये प्रस्ताव आणून मान्यता देणार

Categories
Breaking News PMC Political social पुणे महाराष्ट्र

पुणेकरांना शिंदे फडणवीस सरकारचा दिलासा | ४० टक्के मिळकतकराची सवलत कायम राहणार

|  येत्या कॅबिनेट मीटींग मध्ये प्रस्ताव आणून मान्यता देणार

| मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत निर्णय

पुणे महापालिका हद्दीत मिळकत करात पुणेकरांना देण्यात येणारी ४० टक्के सवलत कायम ठेवावी, अशी मागणी राज्य सरकारकडे सातत्याने करण्यात येत आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे आज बैठक झाली. यामध्ये पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आली आहे. पुणेकरांची 40% सवलत कायम ठेवण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव येणाऱ्या कॅबिनेट मध्ये आणून त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. पुणेकरांसाठी दिलासा देणारी ही बाब आहे.

मिळकत करातील ४०% सवलत दि. १/८/२०१९ पासून स्व: वापर करीत असलेल्या निवासी मिळकतीची काढण्यात येऊ नये आणि देखभाल दुरुस्ती खर्च दि. १/४/२०१० पासून १५% हून १०% फरकाची रक्कम मिळकतींकडून वसूल करण्यात येऊ नये, अशा दोन मागण्या  करण्यात येत होत्या.

‘निवासी मिळकतींना देण्यात येणारी ४०% सवलत आणि १५% हून १०% देखभाल दुरुस्ती खर्च नवीन आकारणी होत असलेल्या मिळकतीना दिनांक १/४/२०१९ पासून बंद करण्यात आली आहे. यासंदर्भात २०१९ आणि २०२२ ला महापालिकेच्या मुख्य सभेचा पुन्हा ठराव केला होता. त्याद्वारे हीसवलत रद्द न करता सुरू रहावी, असा ठराव राज्य सरकारकडे पाठवण्याला होता. मात्र  सरकारने कोणाताही निर्णय घेतला नाही’. त्यामुळे महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात आले होते. तसेच पुणेकर नागरिकांकडून देखील मागणी करण्यात येत होती.

त्यानुसार मुख्यमंत्री दालनात बैठक आज आयोजित करण्यात आली होती. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, कर आकारणी विभागाचे प्रमुख अजित देशमुख, आमदार सुनील टिंगरे, शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत 40% सवलत कायम ठेवण्याबाबत शिक्कामोर्तब झाले. 1970 सालापासून दिली जाणारी सवलत अचानक कशी काढता येईल, असा मुद्दा बैठकीत मांडण्यात आला. त्यामुळे सवलत कायम ठेवली जाणार आहे. येत्या कॅबिनेट मध्ये याबाबतचा प्रस्ताव आणून त्यावर अंतिम निर्णय घेण्याचा निर्णय या बैठकीत झाला.

मिळकत करातील 40% सवलत कायम ठेवण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार येत्या कॅबिनेट मध्ये प्रस्ताव आणला जाणार आहे.

– सुनिल टिंगरे, आमदार, वडगावशेरी

—-

पुणेकरांच्या मिळकत करातील 40% सवलत कायम ठेवण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. त्यानुसार येत्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

– नाना भानगिरे, शहर अध्यक्ष, शिवसेना.