PMC Pune Recruitment | पोटनिवडणूक संपल्यानंतर पुणे महापालिकेच्या भरतीची जाहिरात!  | जवळपास 300 विविध पदांसाठी होणार भरती 

Categories
Breaking News Education PMC social पुणे

पोटनिवडणूक संपल्यानंतर पुणे महापालिकेच्या भरतीची जाहिरात!

| जवळपास 300 विविध पदांसाठी होणार भरती

पुणे | होतकरू आणि गरजू युवकांना पुणे महापालिकेत नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. महापालिकेत दुसऱ्या टप्प्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. कसबा पेठ पोटनिवडणूक संपल्यानंतर जवळपास 300 पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. (PMC pune Recruitment)
पुणे महापालिकेकडून पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. जवळपास 448 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामध्ये सहायक विधी अधिकारी, सहायक अतिक्रमण निरीक्षक, कनिष्ठ अभियंता, लिपिक अशा विविध पदांचा समावेश होता. विशेष म्हणजे खूप पारदर्शक पद्धतीने ही भरती प्रक्रिया घेण्यात आली आणि उमेदवारांना तात्काळ नियुक्त्या देखील देण्यात आल्या. यामुळे पुणे महापालिका प्रशासनाचे कौतुक देखील होत आहे. यामुळे महापालिकेवरील विश्वास देखील वाढला आहे. (Pune Municipal corproation)
दरम्यान महापालिकेत अजूनही काही पदे रिक्त आहेत. त्यामुळे इथल्या कर्मचाऱ्यावर बोजा येत आहे. म्हणून महापालिका प्रशासनाने दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया राबवण्याचे मनावर घेतले आणि त्यानुसार काम सुरु केले. या टप्प्यात जवळपास 300 पदांसाठी भरती होणार आहे. यामध्ये अग्निशमन विभागातील जास्त जागा आहेत. कारण सरकारने या विभागात भरती करण्यास नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यानुसार जवळपास 200 फायरमॅन ची भरती करण्यात येणार आहेत. तसेच आरोग्य विभाग आणि इतर विभागात देखील उमेदवार घेण्यात येणार आहेत. प्रशासनाकडून याबाबतचे रोस्टर तपासून त्याची राज्य सरकार कडून देखील मंजुरी घेतली आहे. फक्त याची जाहिरात प्रसिद्ध होणे बाकी आहे. पोटनिवडणूक संपल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.   (PMC Recruitment)