Girish Gurnani | स्त्याच्या मध्ये आलेले बांधकाम हटवण्याची मागणी

Categories
Breaking News PMC Political पुणे

स्त्याच्या मध्ये आलेले बांधकाम हटवण्याची मागणी

कोथरुड मधील किनारा चौकात असलेल्या भुयारी मार्गावरील उच्छवासाचे (व्हेंटीलेशन) बांधकाम रस्त्याच्या मध्ये आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. हे बांधकाम हटवावे अशी मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे. पौडरस्त्यावर एमआयटी व जयभवानीनगर येथे असलेल्या भुयारी मार्गाला मध्यभागी कोठेही व्हेंटीलेशनसाठी सोय केलेली नाही. मात्र किनारा चौकात मध्यभागी व्हेंटीलेशनसाठी काही जागा सोडली आहे. या जागेला बंदिस्त केले असल्याने तेथून व्हँटीलेशन होत नाही. तसेच मेट्रोच्या कामानंतर हे बांधकाम नेमके रस्त्याच्या मध्ये येत असल्याने छोटेमोठे अपघात होतात. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच हे बांधकाम हटवावे व रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा अशी मागणी केली असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरुड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी सांगितले.

कोथरुड क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त केदार वझे यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. अपघाताला कारण असलेले हे बांधकाम हटवावे. या बांधकामाचा आडोसा घेवून येथे काही मालवाहू ट्रक लावले जातात. त्यामुळे आधीच अरुंद बनलेला रस्ता आणखी अरुंद बनून वाहतुक कोंडी होते. हे बांधकाम न पाडल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. खाजगी अभियंता कैलाश मारुती पारगे म्हणाले की, किनारा चौकात भुयारी मार्गावरील मधोमध असलेलं बांधकाम भुयारी मार्गातील हवा खेळती राहण्याच्या उद्देशाने केले असावे. परंतु या बांधकामाची व भुयारी मार्गाची पाहणी केली असता त्याचा तसा कोणताही उपयोग होत नसल्याचे दिसते. वातानुकूलन करण्यासाठी इतर पर्याय उपलब्ध असल्याने हे बांधकाम हटवण्यास तांत्रिक दृष्ट्या काही अडचण आहे असे वाटत नाही. कोथरुड क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त केदार वझे म्हणाले की, हे बांधकाम हटवण्यासंदर्भात मागणी आली आहे. त्यावर काय निर्णय घ्यायचा यासांठी प्रकल्प विभागाकडे सल्ला मागवला आहे. हवा खेळती राहण्यासाठी केलेले हे बांधकाम आहे. ते हटवल्यास त्याचा भुयारी मार्गावर काय परिणाम होईल, काय पर्याय असू शकतात हे पाहून प्रकल्प विभागाच्या सल्ल्यानुसार निर्णय घेण्यात येईल.

Dr Siddharth Dhende | अग्रसेन शाळा ते ई कोमरझोन रस्त्याच्या अंतिम टप्प्यातील कामाला गती – 60 लाख रुपयांच्या उर्वरीत रस्त्याच्या कामाची सुरूवात

Categories
Breaking News PMC Political पुणे

अग्रसेन शाळा ते ई कोमरझोन रस्त्याच्या अंतिम टप्प्यातील कामाला गती

– 60 लाख रुपयांच्या उर्वरीत रस्त्याच्या कामाची सुरूवात

– माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश

अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील अग्रसेन शाळा ते ई कोमरझोन रस्त्याच्या अंतिम टप्प्यातील कामाला अखेर गती मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात अर्ध्या रस्त्याचे काम पुर्ण करण्यात आले होते. महापालिकेच्या पथ विभागातर्फे सध्या उर्वरीत रस्त्याच्या 60 लाख रुपयांच्या कामाची सुरूवात झाली आहे. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

या कामाचे उद्धाटन भाजपाचे पुणे शहराध्यक्ष माजी आमदार जगदिश मुळीक, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आरपीआय आठवले गटाचे पुणे शहराध्यक्ष शैलेश चव्हाण, अल्पसंख्यांक आघाडीचे राज्य अध्यक्ष आयुब शेख, माजी नगरसेवक अशोक कांबळे, माजी नगरसेवक ऍड. भगवान जाधव, सचिन धीवार, भाजपा प्रवक्ता मंगेश गोळे, माजी नगरसेविका फरजाना शेख प्रभाग दोन मधील विविध धार्मिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, आरपीआय आठवले गट, भाजपा पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सार्वजनिक, सामाजिक मंडळांचे पदाधीकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.

या वेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले की, अग्रेसन शाळा ते ई-कॉमरझोनचा रस्ता पुर्ण झाल्यास वाहनधारकांची होणारी मोठी गैरसोय टळणार आहे. वाहनधारकांना मारावा लागणारा मोठा वळसा कमी होणार असून अंतर आणि वेळ वाचणार आहे. मधल्या काळात कोविडच्या महामारीमुळे झालेले लॉकडाऊन, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची संपलेली मुदत यासह अनेक अडचणींचा सामना करावा लागला. हा रस्ता पुर्ण करून नागरिक, नोकरदार, कामगार, वाहनधारकांची गैरसोय दुर करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होतो. अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत होतो. त्यामुळे या कामाला गती प्राप्त झाली. लवकरच हे काम पुर्ण करण्यात येईल, असे डॉ. धेंडे म्हणाले.

विश्रांतवाडी चौक सुशोभीकरणासाठी आराखडा तयार करण्यासाठी डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पाठपुरावा केला होता. त्यासाठी पुणे महापालिकेकडे सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. या कामासाठी महापालिकेकडे निधी मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी डॉ. धेंडे यांनी भाजपा शहराध्यक्ष तथा माजी आमदार जगदीश मुळीक यांच्याकडे या वेळी केली.

कॉमरझोन चौकातील वाहतूक कोंडी सुटणार –

प्रभाग दोन मधील कॉमरेझोन चौकात नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीने वाहनधारक, नागरिक त्रस्त होते. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पाठपुरावा केल्याने विद्युत पथदिवे (सिग्नल) बसविन्यात आले आहेत. तसेच डॉ. धेंडे यांच्या पुढाकाराने चौक सुशोभीकरणाचा आराखडा (डिझाईन) तयार करण्यात आला आहे. त्यानुसार चौकाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे चौक आकर्षित होऊन वाहतूक कोंडीपासून देखील सुटका होणार आहे.

SKADA system | पथ विभाग निविदा वाद | स्काडा यंत्रणेशिवाय काम केल्याचा आरोप | अधिकारी, ठेकेदार, कन्सल्टंट यांच्यावर कारवाई करण्याची अरविंद शिंदे यांची मागणी

Categories
Breaking News PMC Political पुणे

पथ विभाग निविदा वाद | स्काडा यंत्रणेशिवाय काम केल्याचा आरोप

| अधिकारी, ठेकेदार, कन्सल्टंट यांच्यावर कारवाई करण्याची अरविंद शिंदे यांची मागणी

पुणे | पुणे शहरात (Pune City) विविध ठिकाणी रस्ते दुरुस्ती तसेच पुनःडांबरीकरण करण्याबाबत पथ विभागाच्या (PMC Road Dept) वतीने काही निविदा (Tenders) मागवल्या आहेत. मात्र यावरून वादंग निर्माण झाले आहे. यामधून महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगत शहर कॉंग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे (Congress City President Arvind Shinde) यांनी पॅकेज 1,2,3,4,5 सर्व निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच आतापर्यंत  जवळपास 25% काम skada यंत्रणेशिवाय केल्याची खातरजमा झाली असल्याने याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि अधिकारी, ठेकेदार, कन्सल्टंट यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अरविंद शिंदे यांनी महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे केली आहे.

अरविंद शिंदे यांनी महापालिका आयुक्त यांना दिलेल्या निवेदनानुसार या पॅकेज संस्कृतीला काँग्रेस पक्षाने तीव्र विरोध केलेला आहे. वस्तुतः शेकडो कोटी ची कामे करणारे ठेकेदार पुणे शहरात मोजकेच आहेत . एवढी मोठी टेंडर रद्द करून स्पर्धात्मक दर काढल्यास स्पर्धात्मक दर व वेगवान काम दोन्ही गोष्टी शक्य झाल्या असत्या पर्यायाने करदात्या पुणेकरांचे कोट्यावधी रुपये वाचू शकले असते.  निविदा प्रक्रियेतील ATR इन्फ्रा व SMC इन्फ्रा या ठेकेदारांच्या पात्रते- अपात्रतेसाठी मनपाचे 2 माजी सभागृहनेते ,2 आमदार,3 माजी नगरसेवक जिवाच्या आकांताने भांडत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच लाखो कोटी रुपयांचा अर्थसंकल्प हाताळणारे राज्याचे प्रमुख व उपप्रमुख कारभाऱ्यांच्या नावाचा खरा अगर खोटा नाट्यमय वापर ठेकेदारांच्या पात्र अपात्रतेसाठी केला जात असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. सदर निविदा प्रक्रियेत ऑनलाइन पद्धतीने निविदा भरणे अंतिम दिनांक पूर्व तारखेचे नसलेले SMC इन्फ्रा यांचे अवैध कागदपत्रे पात्र करण्यासाठी एक माजी सभागृह नेते पथ विभागाच्या वरिष्ठ अधिकारी यांच्यावर प्रचंड दबाव आणत आहेत. माध्यमामधून  याबाबत मोठी वृत्ते प्रकाशित झालेली आहेत. यामुळे पर्यायाने मनपाची, पुणे शहराची प्रतिमा मलिन होत आहे.

शिंदे यांच्या निवेदनानुसार पॅकेज 1,2,3 ची कामे सदद्यस्थितीत सुरू आहेत. या कामांच्या निविदा अटी मध्ये ठेकेदारास स्काडा यंत्रणा असणे, राबविणे,मनपा सर्व्हर ला जोडणे बंधनकारक आहे. हि प्रामाणिकतेची जाचक व कामाच्या दर्जाची संबंधित बाब असणे निविदा अटींमध्ये नमूद केल्याने बहुतांशी ठेकेदारांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतला नाही. Skada यंत्रणा मनपा सर्व्हर ला जोडणे बंधनकारक केल्याने संबंधित ठेकेदारांच्या बॅच मिक्स प्लँट येथे निर्माण होणाऱ्या डांबरी मालाच्या दर्जावर थेट नियंत्रण ठेवण्यास शक्य होणार होते . मात्र आतापर्यंत जवळपास 25% काम skada यंत्रणेशिवाय केल्याची आम्ही खातरजमा केली आहे . कामावर नेमलेले कन्सल्टंट व ठेकेदार यांनी दुय्यम दर्जाचा माल G 20 कामाची घाईगडबडीचा फायदा घेऊन वापरला आहे. सायबर सिटी म्हणून गाजावाजा करून घेणाऱ्या पुणे शहरातील मनपाकडे skada यंत्रणा जोडण्या साठी स्वतः सर्व्हर उपलब्ध नाही हा अजून धक्कादायक भ्रष्टाचाराचा प्रकार आम्ही गांभीर्य पूर्वक आपल्या नजरेसमोर आणत आहोत. कामाच्या दर्जा संबंधित अत्यंत महत्वाची असलेली skada यंत्रणा ठेकेदाराने कन्सल्टंटला हाताशी धरून जाणीवपूर्वक जोडलेली नाही.  प्रकार जाणीवपूर्वक कर्तव्यात कसूर करणारी असून फौजदारी गुन्ह्यास पात्र आहे.असे शिंदे यांनी म्हटले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे कि, पुणे मनपाने ठेकेदारांच्या बॅच मिक्स प्लँट ला पथ विभागाच्या सर्व्हर ला जोडण्यासाठी कोणतीही तयारी का केली नाही, याबाबत सर्वच वरिष्ठ अधिकारी संशयास्पद मौन बाळगत आहेत. याबाबत कामावरील कनिष्ट अभियंता, उप अभियंता कार्यकारी अभियंता यांना विचारणा केली असता त्यांनी कोणतेही उत्तर देण्यास स्पष्ट नकार दिला.  अधिकारी, ठेकेदार, कन्सल्टंट यांच्या आर्थिक संगनमताने घडत असलेल्या उघड भ्रष्टाचार प्रकरणी आपण जबाबदारी निश्चित करून अधिकारी यांचेवर कारवाई करावी व कन्सल्टंट यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. स्काडा यंत्रणेशिवाय निविदा क्र. ३२९,३३०,३३१ मध्ये डांबरीकरण करणेस परवानगी कारणमीमांसचा खुलासा मला आयुक्त स्तरावरून मला तातडीने उपलब्ध करून द्यावा.  पॅकेज 1,2,3,4,5 सर्व निविदा रद्दबातल करण्यात याव्यात. या प्रकरणी प्रशासकीय यंत्रणा राजकीय दबावाखाली काम करत असल्याचे करदात्यां पुणेकरांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे प्रशासनाने निविदा रद्द करणेची ठोस कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच निविदा प्रक्रीयेची भारतीय स्पर्धा आयोगाकडे तक्रार करून योग्य ती कायदेशीर दाद मागण्यात येईन. असे ही शिंदे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Chikharde-Gormale road | चिखर्डे-गोरमाळे रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत बांधकाम विभागाकडे तक्रार  | 8 दिवसांत रस्ता नियमानुसार न केल्यास आंदोलनाचा इशारा 

Categories
Breaking News social महाराष्ट्र शेती

चिखर्डे-गोरमाळे रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत बांधकाम विभागाकडे तक्रार

| 8 दिवसांत रस्ता नियमानुसार न केल्यास आंदोलनाचा इशारा

बार्शी | तालुक्यातील ग्रामीण भागात (Barshi Rural Area) विविध ठिकाणी रस्त्यांची कामे (Road works) चालू आहेत. मात्र याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. चिखर्डे-गोरमाळे रस्त्याच्या (Chikharde-Gormale Road) कामाच्या दर्जाबाबत देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) तक्रार दाखल करण्यात आली आहे. गोरमाळेचे शेतकरी दत्तात्रय शिंदे (Farmer Dattatray Shinde) यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले आहे. 8 दिवसात नियमानुसार रस्ता न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा (Warning of Agitation) निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही याची दखल घेण्यात येत नव्हती. याने अपघाताचे देखील प्रमाण वाढले आहे. उशिरा का होईना प्रशासनाला जाग आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराकडून मात्र रस्त्यांच्या दुरुस्तीच्या नावाखाली वरवरची मलमपट्टी केली जात असल्याचे उघडकीस येत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी प्राप्त होत आहेत.
चिखर्डे-गोरमाळे रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत गोरमाळेचे शेतकरी दत्तात्रय शिंदे यांनी ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले कि, माझ्या शेताच्या जवळून चिखर्डे-गोरमाळे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु आहे. जवळपास 3 किमी पर्यंत रस्त्याची डागडुजी केली आहे. मात्र कामाचा दर्जा हा निकृष्ट प्रकारचा आहे. त्यामुळे मी काही दिवस हे काम अडवून देखील धरले होते. कारण आतापर्यंत झालेले काम व्यवस्थित करण्यात आले नाही. याबाबत संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांनी आश्वस्त केले कि इथून पुढे चांगले काम केले जाईल. मात्र माझी मागणी मागील रस्त्याबाबत देखील आहे. त्यामुळे रस्ता उकरून नियमाप्रमाणे काम करण्याची मागणी मी केली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देखील देण्यात आले आहे. यामध्ये 8 दिवसांत रस्ता व्यवस्थित न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
चिखर्डे-गोरमाळे रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे. याची तक्रार मी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. आतापर्यंत झालेला रस्ता उकरून व्यवस्थित करून देण्याची आणि या पुढील रस्ता देखील नियमानुसार करण्याची मागणी केली आहे. अन्यथा 8 दिवसांत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
दत्तात्रय शिंदे, शेतकरी, गोरमाळे 

MLA Sunil Tingre | पुणे एअरपोर्ट ते विश्रांतवाडी व फाईव्ह नाईन ते नागपूरचाळ या नव्याने बनविण्यात येणारा रोडचा शुभारंभ आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते संपन्न

Categories
Breaking News PMC Political social पुणे

पुणे एअरपोर्ट ते विश्रांतवाडी व फाईव्ह नाईन ते नागपूरचाळ या नव्याने बनविण्यात येणारा रोडचा शुभारंभ आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते संपन्न

विमानतळाकडे (Pune Airport) जाताना व येताना विमान प्रवाशांसह, वाहन चालकांना वाहतूक कोंडीला (traffic) सामोरे जावे लागत होते. आता याच विमानतळाच्या प्रवेशद्वारापासून ते येरवडा कडे जाणारा रस्ता, त्याचबरोबर फाईव्ह नाईन चौक ते विश्रांतवाडी कडे जाणारा रस्ता महापालिकेच्या वतीने नव्याने बनविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre) यांच्या हस्ते करण्यात आला. दोन्ही रस्त्यासाठी मिळून महापालिका (PMC pune) 21 कोटी रुपये खर्च करणार आहे.
       आमदार सुनील टिंगरे म्हणाले, फाइव्ह नाईन चौक ते विश्रांतवाडी  पर्यंतचा रस्ता डांबरीकरण असून तो मागील पावसाळ्यात उखडला होता. हाच रस्ता आता सिमेंट काँक्रीट चा होणार आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या दोन्ही बाजूस पदपथ देखील करण्यात येणार आहेत. याचबरोबर फाईव्ह नाईन चौकाजवळील रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होत होती, हा रस्ता देखील विमानतळापासून ते थेट जेल रोड पोलीस चौकी पर्यंत डांबरीकरणाचा बनविण्यात येणार आहे. यामध्ये रुंदीकरण ही करण्यात येणार असून फाईव्ह नाईन चौक हा मोठा चौक बनविण्यात येणार आहे. त्यामुळे या चौकातील वाहतूक कोंडी त्याच बरोबर या दोन्ही रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
     पथ विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धारव म्हणाले, दोन्ही रस्त्यासाठी 21 कोटी रुपये निधी उपलब्ध असून.  येत्या सहा महिन्यात हे दोन्ही रस्ते पूर्ण केले जातील. रस्ता करण्यासाठी बाधित होणारी झाडे देखील परवानगी घेऊन तोडण्यात येतील. (Pune Municipal corporation)
     यावेळी पथ विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता संजय धारव, अधीक्षक अभियंता मीरा सबनीस, उपअभियंता रोहिदास देवडे, प्रभारी उपअभियंता दत्तात्रय तांबारे, शाखा अभियंता सपना सहारे, यासह सुहास टिंगरे, रवी टिंगरे, श्याम आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.

Road Repair work | पहिल्या टप्प्यात 50 रस्त्यांवर दुरुस्तीची कामे केली जाणार  | 140 ठिकाणाची केली जाणार डागडुजी 

Categories
Breaking News PMC पुणे

पहिल्या टप्प्यात 50 रस्त्यांवर दुरुस्तीची कामे केली जाणार

| 140 ठिकाणाची केली जाणार डागडुजी

पुणे |. यंदा पावसाचा जोर जास्त दिवस राहिल्याने डागडुजी केलेले रस्ते नंतर खराब झाले होते. याबाबत महापालिकेच्या पथ विभागाने आता गंभीरपणे पाऊल उचलले आहे. महापालिका आता शहरभरातील दुरुस्त केलेले रस्ते सोडुन सर्व रस्ते दुरुस्त करणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच इस्टिमेट कमिटीने मान्यता दिली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 50 रस्त्यांची निवड करण्यात आली असून त्यावरील 140 ठिकाणची दुरुस्ती केली जाणार आहे. त्याबाबत पथ विभागाकडून लवकरच टेंडर प्रक्रिया केली जाणार आहे. याबाबतची पथ विभागाची तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी महापालिकेला 194 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. अशी माहिती पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी दिली.
पुणे शहरात रस्त्यांचे जाळे पसरले आहे. मात्र पावसाळ्याच्या दिवसात हे रस्ते खराब होतात. महापालिकेकडून याची तात्काळ दुरुस्ती केली जाते. यंदा मात्र रस्त्यांची अवस्था चांगलीच खराब झाली होती. कारण अतिरिक्त पावसाने डागडुजी केलेले रस्ते नंतर खराब झाले. याबाबत शहरातील नागरिकांकडून ओरड होत होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता याबाबत गंभीरपणे पाऊल उचलले आहे. महापालिका आता शहरातील सर्व रस्ते दुरुस्त करणार आहे. याबाबत पथ विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. याबाबतचा प्रस्ताव देखील महापालिका प्रशासनाकडून इस्टिमेट कमिटीसमोर ठेवण्यात आला होता. त्याला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.
याबाबत साहेबराव दांडगे यांनी सांगितले कि पहिल्या टप्यात 50 रस्त्यांवरील कामे हाती घेण्यात येतील. त्यावरील 140 ठिकाणावर दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. जवळपास 150 किमीचे हे रस्ते आहेत. हे काम करण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवण्याचे काम सुरु आहे. 3 पॅकेज मध्ये प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी 194 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. दांडगे पुढे म्हणाले, ही कामे सिमेंट, utwt आणि डांबरी अशा पद्धतीने केली जातील. डांबरी रस्त्याच्या कामासाठी 6 महिन्याची मुदत असेल तर सिमेंट रस्त्यासाठी 12 महिन्याची मुदत असेल. टेंडर प्रक्रिया लवकरच सुरु केली जाईल, असे ही दांडगे म्हणाले.

Road works in Vadgaon Sheri | विश्रांतवाडी ते विमानतळ रस्ता होणार सिमेंट काँक्रीटचा! | वडगाव शेरीतील रस्त्याच्या कामांसाठी 42 कोटींचा निधी | आमदार सुनिल टिंगरे यांची माहिती

Categories
Breaking News PMC Political पुणे

विश्रांतवाडी ते विमानतळ रस्ता होणार सिमेंट काँक्रीटचा!

| वडगाव शेरीतील रस्त्याच्या कामांसाठी 42 कोटींचा निधी

| आमदार सुनिल टिंगरे यांची माहिती

विश्रांतवाडीकडून विमानतळाकडे जाणारा संपूर्ण रस्ता आता सिमेंट कॉक्रीटचा होणार आहे. या रस्त्यासह वडगाव शेरी मतदारसंघातील रस्त्याच्या 42 कोटींच्या कामांना महापालिकेच्या सिमेंट एस्टिमेट कमिटीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी दिली. 
         पावसाळ्यात विश्रांतवाडीकडून ५०९ चौक मार्गे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून हा संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रेटचा करण्यात यावा अशी मागणी आमदार सुनील टिंगरे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होती.  तसेच वडगाव शेरी मतदारसंघातील पावसामुळे खड्डे पडलेल्या रस्त्यांचीही तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन आयुक्तांनी वडगाव शेरी मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांच्या कामासाठी 42 कोटींच्या आराखड्यास नुकतीच इस्टिमेट कमिटीच्या बैठकीत मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार टिंगरे यांनी दिली.  त्यात प्रामुख्याने विश्रांतवाडी टिंगरेनगर मार्गे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याचे महत्त्व लक्षात घेऊन हा संपूर्ण रस्ता आता सिमेंट काँक्रेटचा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.  या रस्त्याच्या कामासाठी 19 कोटींचा खर्च येणार असल्याची माहिती आमदार टिंगरे यांनी दिली.
———————–
*वडगाव शेरीतील रस्ते आणि मंजूर निधी*
– विश्रांतवाडी – 509 चौक- विमानतळ  – 19 कोटी
– पुणे नगर रोड रिसर्फेसिंग –  15 कोटी
– बिशप स्कूल ते ब्रह्मा सनसिटी वडगाव शेरी 7 कोटी 25 लाख.
– 509 चौक ते नागपूर चाळ –  1 कोटी

PMC Commissioner | महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दहा ठेकेदारांना  दिले अभय

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दहा ठेकेदारांना  दिले अभय

| सजग नागरिक मंचाचा आरोप

| रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामे करूनही  अभय दिल्याचे स्पष्ट

 

रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या दहा ठेकेदारांना महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी अभय दिल्याचे स्पष्ट झाले आहे. सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी त्याबाबत आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. दोषी ठेकेदारांना एक वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्याची शिक्षा आयुक्त विक्रम कुमार यांनी सहा महिन्यांवर आणली, तर दोषी अभियंत्याची विभागीय चौकशीची शिफारस फेटाळून त्यांना पंधरा हजार रुपये दंड आकारला आहे.

निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे यातना सहन करणाऱ्या नागरिकांबाबत आयुक्तांना कळवळा नाही. मात्र, ठेकेदारांचा पुळका असल्याचे यातून स्पष्ट झाले असून त्यासंदर्भात शहरातील स्वयंसेवी संस्थांनी आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे.शहरातील रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामे केल्याप्रकरणी दहा ठेकेदारांना एक वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्याची शिफारस पथ विभागाने आयुक्तांकडे केली होती. तसेच या प्रकाराला जबाबदार असलेल्या अभियंत्यांना दहा हजार रुपये दंड आणि विभागीय चौकशी करण्याचे शिफारशीत नमूद करण्यात आले होते. मात्र त्यावर अंतिम निर्णय घेताना आयुक्तांनी शिफारशीमध्ये बदल केल्याचे पुढे आले आहे.

देखभाल दुरुस्ती दायित्व कालावधीत (डिफेक्ट लायबिलिटी पीरियड) रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. पथ विभागाने देखभाल दुरुस्ती दायित्व कालावधीतील रस्त्यांची यादी तयार केली होती. त्यानुसार १३९ रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. ७५ ठेकेदारांना नोटीसा बजाविण्यात आल्या, तर निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या दहा ठेकेदारांना एक वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्याचे पथ विभागाने प्रस्तावित केले होते.

रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था होऊन लाखो पुणेकर खड्ड्यांमुळे हैराण झाले आहेत. त्यामुळे जबाबदार ठेकेदारांना कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकणे आवश्यक होते. कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकले असते तर त्यांना पुणे महापालिकेबरोबरच अन्य कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रस्त्यांची कामे मिळणे बंद झाले असते. मात्र ठेकेदारांचा पुळका असल्याने आयुक्तांनी शिफारशीमध्ये बदल केला आहे. सहा महिन्यानंतर हेच ठेकेदार पुन्हा पुणेकरांना खड्ड्यात घालतील, अशी टीका सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली.

MLA Sunil Tingre | आमदारांचा आक्रमक पवित्रा आणि मनपा प्रशासन ऍक्शन मोड मध्ये!

Categories
Breaking News PMC Political पुणे

आमदारांचा आक्रमक पवित्रा आणि मनपा प्रशासन ऍक्शन मोड मध्ये!

| वडगावेशरीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस चे आमदार सुनील टिंगरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला

गेल्या काही महिन्यांपासून धानोरी, लोहगांव पोरवाल रोड व फाइव-नाइन परिसरात सातत्याने होणार्‍या वाहतूक कोंडीने परिसरातील नागरीक त्रस्त आहेत. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मनपा व पोलीस अधिकार्‍यांनी अनेक वेळा परिसराचे निरीक्षण केले आहे. परंतु प्रत्यक्ष उपाययोजनांवर अंमल केला गेला नाही. यामुळे वडगावेशरीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस चे आमदार सुनील टिंगरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वाहतूक कोंडीतून नागरिकांची तत्काल सुटका करण्याचा तसेच समस्या सोडविण्यासाठी आता प्रत्यक्ष उपाययोजनांवर अंमल करण्याचा निर्देश सुनील टिंगरे यांनी प्रशासनास दिला. संबंधित पाहणी नंतर मनपा प्रशासनाने देखील तत्काल पावले उचलली.


धानोरी सीटी हॉस्पिटल ते फाइव-नाइन रस्त्याचे प्रलंबित काम, धानोरी जकातनाका ते मारथोफिलस शाळा रस्त्याकरिता भू-संपादन करणे तसेच लोहगाव पोरवाल रोड येथील कमलाई चौकातून ऑर्चिड हॉस्पिटल येथील पर्यायी रस्त्याच्या अपूर्ण कामाची पाहणी मंगलवारी करण्यात आली. यावेळी आमदार सुनील टिंगरे यांच्यासोबत मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, मनपा रस्ते विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी तसेच मनपाचे अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी परिसातील प्रलंबित रस्ते प्रश्‍नांची माहिती मनपा अधिकार्‍यांना देताना आमदार सुनील टिंगरे यांनी आक्रमण भूमिका घेतली. प्रत्यक्ष काम करून नागरिकांना लवकरात लवकर दिलासा देण्यात यावा. जे कामे अपूर्ण असतील त्यांना पूर्ण करण्यासाठी अडचणी दूर करा. परिसरातील नागरिक वाहतूक कोंडीने त्रस्त आहेत. रस्ते आणि वाहतूक कोंडी सोडविण्यास प्राथमिकता देण्यास अधिकार्‍यांना सांगितले गेले.

संबंधित पाहणी नंतर मनपा प्रशासनाने देखील तत्काल पावले उचलली. धानोरी जकातनाका ते मारथोफिलस शाळा रस्त्याकरिता भू-संपादन करण्यासाठी संबंधित मारथोफिलस शाळा प्रशासनास जागेची कागदपत्रे घेऊन भू-संपादन प्रक्रिया करण्यासाठी तत्काल मनपा कार्यालयामध्ये येण्यासाठी पत्र पाठवले आहे. तसेच या संबंधी २७ सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन देखील करण्यात आले आहे. पोरवाल रोड येथील कमलाई चौकातून ऑर्चिड हॉस्पिटल येथील पर्यायी रस्त्याचे अपूर्ण काम बुधवारी सुरू करण्यात आले. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पोरवाल रोड येथे तात्पुरता वन-वे सुरू केला जाईल, जेणे करून परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत मिळेल.

40% Tax Exemption | ४०% करसवलत | राज्य सरकार घालणार लक्ष | मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

Categories
Breaking News PMC Political पुणे

४०% करसवलत | राज्य सरकार घालणार लक्ष | मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

पुण्यातील कर संकलनासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी लक्ष घातले आहे. पाटील म्हणाले की, पुणेकरांना प्रॉपर्टी टॅक्स मध्ये मिळणारी ४० टक्के करसवलत रद्द करुन, पूर्वलक्षी प्रभावाने नियमित देयकांव्यतिरिक्त पाठविण्यात आलेल्या फरकांच्या देयकांबाबत पुढील निर्णय होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. मी स्वतः या विषयात लक्ष घालून येत्या १२ तारखेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक घेऊन यावर विषयावर दीर्घकालीन मार्ग काढू, व पुणेकरांना निश्चित दिलासा देऊ, असे यावेळी आश्वास्त केले.

महापालिका क्षेत्रातील रस्ते युद्धपातळीवर दुरुस्त करावेत, तसेच नागपूर प्रमाणे पुण्यातील रस्त्यांचे आगामी काळात सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्याच्या दृष्टीने विचार करावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिल्या. तसेच कर संकलन प्रश्नी सध्या स्थगितीच असून, दीर्घकालीन उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पुणे महापालिका क्षेत्रातील विविध समस्यांचा आढावा माननीय मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज घेतला. यात प्रामुख्याने रस्ते, समान पाणीपुरवठा, कर संकलन, नदी सुधार प्रकल्प आदींसंदर्भात सविस्तर चर्चा केली.

यावेळी खासदार गिरीश बापट, आ. भीमरावअण्णा तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपा पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, गटनेते गणेश बिडकर, शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, गणेश कळमकर, पुनीत जोशी यांच्या सह महापालिकेचे सर्व अधिकार उपस्थित होते.

पुणे महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. कोल्ड मिक्सने रस्त्यांची दुरुस्ती शक्य होत नाही. सध्या पावसाने विश्रांती घेतली असल्याने, महापालिका क्षेत्रातील रस्ते युद्धपातळीवर दुरुस्त करण्यात यावेत अशी सूचना त्यांनी यावेळी आयुक्तांना केली. तसेच, नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते सिमेंट कॉंक्रिटीकरण झाल्याने तेथील रस्ते खड्डेमुक्त झाले आहेत. पुण्यातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्याच्यादृष्टीने उपाययोजना केल्यास, किमान ३० वर्षांची समस्या सुटेल. त्यामुळे दीर्घकालीन उपाययोजना लक्षात घेऊन, पुण्यातील रस्ते सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना त्यांनी आयुक्तांना यावेळी केली.

समान पाणीपुरवठा आणि नदी सुधार योजनांबाबतही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. पुणे महापालिकेची महत्त्वाकांक्षी समान पाणीपुरवठा योजनेपैकी १३२ पैकी १२ झोनचे काम पूर्ण झाले असून, ४६ झोनचे काम प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. त्यावर ही सर्व कामे नियोजनबद्ध पूर्ण करावेत, अशी सूचना मंत्री पाटील यांनी यावेळी आयुक्तांना केली.

दरम्यान, पुणे मनपा क्षेत्रातील सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत. दर महिन्याला संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जाईल, त्यामुळे कोणत्याही कामात दिरंगाई करु नये, अन्यथा संबंधीत अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करु, अशा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी दिला.