PPP Road | पीपीपी तत्त्वावरील 6 रस्त्यांच्या 162 कोटींच्या कामांना मंजूरी | मुंढवा परिसरातील 3 आणि महंमदवाडी भागातील 3 रस्ते

Categories
Breaking News PMC पुणे

पीपीपी तत्त्वावरील 6 रस्त्यांच्या 162 कोटींच्या कामांना मंजूरी

| मुंढवा परिसरातील 3 आणि महंमदवाडी भागातील 3 रस्ते

पुणे | पुणे महानगरपालिकेने शहरातील प्रमुख रस्ते तसेच पुल पीपीपी तत्वावर खाजगी सहभागातुन डेव्हलपमेंट क्रेडिट नोटच्या मोबदल्यामध्ये विकसित करण्याचा निर्णय यापुर्वी घेतलेला आहे. त्यानुसार आणखी 6 रस्ते पीपीपी तत्वावर करण्यासाठी स्थायी समिती आणि मुख्य सभेने मंजूरी दिली आहे. यासाठी 162 कोटींचा खर्च येणार आहे. जवळपास साडेसात किलोमीटरचे हे रस्ते आहेत. यामध्ये मुंढवा परिसरातील 3 आणि महंमदवाडी भागातील 3 रस्त्यांचा समावेश आहे. दरम्यान या रस्त्यांच्या कामांसाठी शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांनी पाठपुरावा केला होता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील मागणी केली होती. या रस्त्यामुळे मुंढवा आणि महंमदवाडी परिसरातील वाहतूक सुरळीत होणार आहे. याचा परिसरातील नागरिकांना चांगलाच फायदा होणार आहे.

| पूर्व भागातील वाहतूक होणार सुरळीत

या पीपीपी तत्त्वावरील 6 रस्त्यामुळे पूर्व भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. सद्यस्थितीत नागरिकांना वाहतुकीची चांगलीच समस्या जाणवत आहे. याची गंभीर दखल घेत शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांनी हे रस्ते करण्याची मागणी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली होती. तसेच त्यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपले वजन वापरले असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत महापालिकेकडे याबाबत शिफारस केली. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून तात्काळ प्रस्ताव ठेवण्यात आला आणि याला स्थायी समिती व मुख्य सभेने मंजुरी दिली.
पुणे महानगरपालिकेने शहरातील प्रमुख रस्ते तसेच पुल पीपीपी तत्वावर खाजगी सहभागातुन डेव्हलपमेंट क्रेडिट नोटच्या मोबदल्यामध्ये विकसित करण्याचा निर्णय यापुर्वी घेतलेला आहे. त्यानुसार अंदाजपत्रकीय तरतुदीमध्ये पीपीपी तत्वावर करावयाच्या डी.पी. रस्त्याची व पुलांची नावे मान्य आहेत. यापैकी ज्या कामांना पीपीपी तत्वावर प्रतिसाद मिळु शकतो याबाबत विचार विनीमय होऊन महापालिका आयुक्त यांच्या विहित मान्यतेने तसेच स्थायी समितीच्या मान्यतेने पीपीपी तत्वावर रस्ते व पुल विकसित करण्याच्या धोरणास आणि त्यानुसार संबंधित कामास विहित मान्यता यापुर्वी प्राप्त झालेली आहे. सदयस्थितीत खराडी,महंमदवाडी, मुंढवा, कोंढवा, बिबवेवाडी, बाणेर या भागातील मिळुन सुमारे 20.35 कि.मी. इतके डी.पी रस्ते व एक नदीवरचा पुल व एक उड्डाणपुल/ग्रेड सेप्रेटर ही कामे हाती घेणेत आलेली आहेत. या सर्व कामांसाठी तज्ञ सल्लागार नेमणुकीस तसेच सर्व संबंधित कामांना  स्थायी समितीची विहित मान्यताप्राप्त आहे.
पीपीपी तत्वावरील ही कामे डेव्हलपमेंट क्रेडिट नोटच्या मोबदल्याच्या स्वरूपात असुन, एका आर्थिक वर्षात डेव्हलपमेंट क्रेडिट नोट पुणे मनपाच्या विविध खातेअंतर्गत अदा करण्यात आलेल्या देय चलनामध्ये समायोजित करण्याची मर्यादा 200 कोटी प्रतिवर्षी निश्चित करण्यात आलेली आहे. अंदाजपत्रकामध्ये मान्य असलेल्या पीपीपी कामाव्यतिरिक्त नवीन डी.पी. रस्त्याची कामे देखील हाती घ्यावयाची झाल्यास त्यासाठी मुख्य सभेची विहीत मान्यता घेऊन यथा योग्य ठरणार आहे. पीपीपी अंतर्गत कामे प्रस्तावित करताना प्रशासनामार्फत मआ/पथ/560 दि.05/01/2021 अन्वये विषयपत्र स्थायी समिती पुढे सादर करण्यात आलेले होते. यामध्ये सर्वप्रथम चार कामे पीपीपी तत्वावर करण्यास मान्यता प्राप्त झालेली होती.

त्यानुसार पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप धर्तीवर डेव्हलपमेंट क्रेडिट नोट या मोबदल्याच्या स्वरूपात डी.पी. रस्ते व पुल खाजगी सहभागातुन विकसित करणे अंतर्गत आणखी 6 रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. स्थायी समिती आणि मुख्य सभेने मंजूरी दिली आहे. यासाठी 162 कोटींचा खर्च येणार आहे. जवळपास साडेसात किलोमीटरचे हे रस्ते आहेत. यामध्ये मुंढवा परिसरातील 3 आणि महंमदवाडी भागातील 3 रस्त्यांचा समावेश आहे. यामुळे मुंढवा आणि महामंदवाडी गावठाणातील रस्ते चांगल्या प्रकारे विकसित होणार आहेत. त्यामुळे वाहतूक सुरळीत होणार आहे.

| हे आहेत रस्ते

महंमदवाडी ते रामटेकडी इंडस्ट्रीज इस्टेटपर्यत स.नं. 40 ते स.नं. 76 मधुन जाणारा 30 मी.डी.पी. रस्ता व लगत असलेले 18 मी. रस्ते विकसित करणे. – खर्च – 72 कोटी
महंमदवाडी स.नं.1,2,3,4 व 57,58,59,96 मधुन जाणारा 24 मी.डी.पी. रस्ता विकसित करणे. खर्च – 31 कोटी

महंमदवाडी स.नं.12,13,30,32 व 57 मधुन जाणारा 18 मी.डी.पी. रस्ता विकसित करणे. खर्च – 16 कोटी

मुंढवा रेल्वे स्टेशन परिसरातील स.नं. 64,66,67,68,71 मधील 12 मी.डी.पी. व 24 मी.डी.पी. असे रस्ते विकसित करणे. खर्च  -46 कोटी.

—–

Manjusha Nagpure | सनसिटी ते कर्वेनगर पुलाचे काम लवकर सुरु करा  | माजी नगरसेविका मंजूषा नागपुरे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

Categories
PMC Political पुणे

सनसिटी ते कर्वेनगर पुलाचे काम लवकर सुरु करा

| माजी नगरसेविका मंजूषा नागपुरे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

सिंहगड रस्त्यावरील वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी मुठा नदीवर सनसिटी ते कर्वेनगर प्रस्तावित असलेल्या उड्डाणपूलाचे काम तातडीनं सुरू करण्यात यावे. तसेच माणिकबाग ते सनसिटी पर्यायी रस्त्याचे काम लवकर सुरु करावे. अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेविका मंजूषा नागपुरे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

सध्या राजाराम पुल आणि पुणे-मुंबई महामार्गावरील वीर बाजी पासलकर उड्डाणपूल या दोन्ही पुलांवर रहदारीचा भार मोठा आहे. सनसिटी ते कर्वेनगर दरम्यानचा प्रस्तावित पूल झाल्यास सिंहगड रस्त्यासह, कोथरूड, कर्वेनगर भागातील नागरिकांना दोन्ही बाजूला ये-जा करणे अत्यंत सोपे होणार आहे. या पर्यायी पुलामुळे सिंहगड रस्त्यावरील कोंडी फुटण्यास मदत होणार असल्याने नागपूरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

 

महापालिकेकडून या पूलासाठी आवश्‍यक असलेली भूसंपादनाची प्रक्रीया जवळपास पूर्ण केली असून पूलासाठी सल्लागार नेमण्याचे काम सुरू आहे. हे काम तातडीनं झाल्यास सिंहगड रस्त्यावरील वाहतूकीतून दिलासा मिळणार आहे.

या शिवाय माणिकबाग येथील इंडियन ह्युम पाईप कंपनी ते सनसिटी पर्यंतही रस्ता प्रस्तावित असून या रस्त्याचे भूसंपादन वेळेत झाल्यास सिंहगड रस्त्यावरून माणिकबाग येथून थेट कर्वेनगरला जाणारा पर्यायी रस्ता उपलब्ध होईल. परिणामी वाहतूक कोंडी आणि इंधनबचत झाल्याने प्रदूषणाची समस्याही कमी होणार असल्याने ही दोन्ही कामे तातडीनं मार्गी लावावी अशी मागणी नागपूरे यांनी केली आहे.

Dr Siddharth Dhende | संगमवाडी ते टिंगरेनगर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश

Categories
Breaking News PMC पुणे

संगमवाडी ते टिंगरेनगर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात

| माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश

पूर्वीचा प्रभाग क्रमांक २ व सध्याच्या प्रभाग क्रमांक ८ मधील पुणे शहर विकास आराखड्यातील संगमवाडी ते टिंगरेनगर या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला. आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते नुकतेच रस्त्याच्या कामाचे पूजन करण्यात.

या वेळी महापालिकेच्या पथ विभागाचे अधिकारी व्ही. जी. कुलकर्णी, अमर मतीकुंड, पाडाळे, भुमी जिंदगीचे राजेंद्र मुठे, येरवडा, कळस, धानोरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त वैभव कडलक, शाळेचे ट्रस्टी विकास गुप्ता, भाजप प्रवक्ते मंगेश गोळे, माजी नगरसेवक भगवान जाधव व सुभाष चव्हाण या वेळी उपस्थित होते.

संबंधित रस्त्याचे काम करताना अग्रेसन शाळा येथिल जागा ताब्यात येणे बाकी होते. ते ही काम पुर्ण झाले असल्याची माहिती माजी उपमहापौर डॉ. धेंडे यांनी दिली. अग्रसेन शाळेने जागा ताब्यात देणे करिता रस्त्यात येणाऱ्या वर्ग खोल्या काढुन सुरक्षा भिंत बांधुन घेतली आहे. त्याची देखील पाहणी उपस्थितांनी केली.

या प्रसंगी आयुक्त विक्रम कुमार यांनी भुमीपुजन करुन या विकास आराखड्यामधील रस्ता पुढीलल पंधरा दिवसात नागरीकांना रहदारीकरीता खुला होईल असे सांगितले. रस्त्या करीता निधी कमी पडणार नाही याची ग्वाही दिली. आळंदी रस्ता तसेच गोल्फ क्लब मधील उड्डाणपुलच्या कामामुळे होणारी वाहतुक कोंडी कमी होईल, हे या प्रसंगी सांगितले.

सध्या 9 मीटर रस्ता खुला झालेला आहे. उर्वरीत रस्ता खासदार गिरिष बापट व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना सांगुन दिल्ली मधे बैठक घ्यायला सांगु. तिथे सर्वे आॅफ ईंडिया कडुन जागा हस्तांतरीत करुन घेऊ, असे माजी उपमहापौर डाॅ. धेंडे व मंगेश गोळे यांनी आश्वासित केले.

– रस्त्याच्या शेवटच्या टप्प्यातील कामाचे आयुक्त विक्रम कुमार, डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते भूमीपूजन

अग्रेसन दरम्यान असणारा संमवाडी ते टिंगरेनगर रस्ता सुरू झाल्यास नागरिकांची मोठ्या प्रमाणात होणारी गैरसोय टळणार आहे. हा रस्ता सुरू व्हावा यासाठी डाॅ. धेंडे यांनी निधीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. जागा ताब्यात घेण्याबाबत शासकीय स्तरावर प्रयत्न केले. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून लवकरच हा रस्ता नागरिकांसाठी खुला होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Pune : Road Misery : Congress : रस्त्यांची दुर्दशा आणि भाजपची तारीख पे तारीख : शहर कॉंग्रेस आक्रमक 

Categories
PMC Political पुणे

रस्त्यांची दुर्दशा आणि भाजपची तारीख पे तारीख

: शहर कॉंग्रेस आक्रमक

पुणे : मध्यवस्तीतील रस्त्यांची खोदकामाने दुर्दशा झाली असून दुरुस्तीसाठी महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी तारीख पे तारीख देत आहे. यात पुणेकरांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. भाजपच्या या निष्क्रीयतेविरोधात काँग्रेस पक्ष व्यापक आंदोलन करणार आहे, असे माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी जाहीर केले आहे.

शहराच्या मध्यवस्तीतील रस्ते खोदाईमुळे गेले ४ महिने बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता आदी रस्ते आणि त्याला जोडले जाणारे छोटे रस्ते यावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. वाहनचालकांची प्रचंड गैरसोय होते आहे, शिवाय खोदाईनंतर दुरुस्ती लांबल्याने पेठांमधील रहिवाशांना मनस्ताप सोसावा लागत आहे. रस्त्यांची दुर्दशा झाल्याने रहिवाशांमध्ये असंतोष आहे. हा असंतोष व्यक्त करण्यासाठी आंदोलन करून भाजपच्या कारभाराविरोधात निषेध नोंदविला जाईल, असे मोहन जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

मध्यवस्तीतील सदाशिव पेठ, नारायण पेठ, शुक्रवार पेठ अशा पेठांमध्ये खोदकामे होऊन रस्ते दुरुस्तीची कामे रखडली आहेत. लक्ष्मी रस्त्यावर पाईपलाईनच्या कामासाठी खोदाई केली आणि नंतर डागडुजी निकृष्ट दर्जाची केल्याने बाजारपेठेतील या रस्त्याची रया गेली आहे. रस्ते दुरुस्तीसाठी आधी डिसेंबर अखेर, त्यानंतर २० जानेवारी आणि आता आणखी १५ दिवस लागतील अशा वेगवेगळ्या तारखा रासने यांनी दिल्या आहेत. तारीख पे तारीख देण्यातच ते मश्गुल आहेत, प्रशासनावर काहीही नियंत्रण नाही. गेल्या५ वर्षात भाजपला मोठे प्रकल्प पूर्ण करण्यात यश आले नाही आणि छोटी छोटी नागरी सुविधांची कामेही करता आलेली नाहीत, शहराचा खेळखंडोबा करून टाकला,अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे.

Hemant Rasne: मध्यवर्ती पेठेतील रस्ते किमान तीन वर्ष सुस्थितीत राहतील

Categories
PMC Political पुणे

 

मध्यवर्ती पेठांतील रस्ते किमान तीन वर्षे सुस्थितीत राहतील

: स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांची ग्वाही

पुणे : मध्यवर्ती पेठांतील महत्त्वाचे रस्ते आधी दिलेल्या मुदतीत म्हणजेच २० जानेवारीपर्यंत पूर्ववत होतील आणि पुढील तीन वर्षे ते सुस्थितीत राहून कोणत्याही प्रकारची खोदाई करावी लागणार नाही अशी ग्वाही स्थायी समितीचे अध्यक्ष नगरसेवक हेमंत रासने यांनी दिली.

सदाशिव पेठ-शनिवार पेठ या प्रभागाला एक एकक मानून विविध प्रकारची विकासकामे खात्यांतर्गत समन्वयातून पूर्ण करण्यासाठी आयुक्त विक्रम कुमार यांच्या समवेत १३ नोव्हेंबरला या भागातील समस्या आणि विकासकामांची माहिती घेण्यासाठी दौरा आयोजित केला होता. प्रभागातील समस्या लक्षात घेऊन प्रभागाचा विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.

अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, अधिक्षक अभियंता संतोष तांदळे, पाणीपुरवठा विभागाचे नंदकिशोर जगताप, क्षेत्रिय अधिकारी आशिष महादलकर, पथ विभागाचे देडगे, पाटील, अर्धापुरे, ड्रेनेज विभागाचे फड, उमेश गोडगे, गांगुर्डे यांच्या सह स्मार्टसिटी विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. बैठकी नंतर रासने पत्रकारांशी बोलत होते.

मध्यवर्ती पेठांच्या भागात मुख्य बाजारपेठ असल्याने, तेथे दररोज मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्यामुळे गेली पंचेचाळीस वर्षे या भागातील पाणीपुरवठा आणि मैलापाण्याचे वहन करणार्या वाहिन्या बदलताना मर्यादा येत होत्या. कोविडमुळे निर्माण झालेल्या टाळेबंदीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बाजारपेठ बंद होती. त्या काळात समान पाणीपुरवठा, मैलापाणी वहन, एमएनजीएल पुरवठा, इंटरनेट कंपन्या यांच्या वाहिन्या आणि केबल्स टाकण्याची विकासकामे तातडीने पूर्ण करण्यात आली. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात खोदाई करावी लागल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली होती. या पूर्वी निकृष्ट कामांमुळे रस्त्यांची दुरावस्था होत होती. आता सर्व प्रमुख रस्ते पूर्ववत करण्यासाठी नियोजनबद्ध काम सुरू आहे.

रासने पुढे म्हणाले, विविध विकासकामांसाठी रस्ते खोदाईची बहुसंख्य कामे पूर्ण करण्यात आली आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत वाहतूक नियंत्रण व्यवस्थेची (ट्रॅफिक सिग्नल) या परिसरातील २४ कामे नव्याने सुरू झाली आहेत. ती १० जानेवारी पर्यंत पूर्ण होतील. त्यानंतर दहा दिवसांत रस्ते पूर्ववत होतील. पुढील काळात रस्त्यांवर वाहतुक सुरळीत होण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्या साठी आवश्यक निधीची तरतुद करण्यात आली आहे.

रासने म्हणाले, महात्मा फुले मंडईसमोरील मेट्रोचे काम, दक्षिणमुखी मारूती मंदिर चौकातील रस्त्याची कामे, शनिवारवाड्याच्या पिछाडीचा भाग, शुक्रवार पेठ, सुभाष नगर, बाजीराव रस्ता परिसरातील समान पाणीपुरवठा योजनेसंदर्भातील विकासकामे, हिराबाग चौकातील वर्षानुवर्षे पडलेली बेवारस वाहने उचलणे आदी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सदाशिव पेठ, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता परिसरातील रस्ता डांबरीकरणाची कामे टप्प्‌याटप्प्याने हाती घेण्यात आली असून, ती २० जानेवारीपर्यंत पूर्ण होतील.

 

*हिराबाग चौक ते स्वारगेट ठरणार अपवाद*

रासने म्हणाले, हिराबाग चौक ते स्वारगेट या रस्त्यावर समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी ३० जानेवारी पर्यंतची मुदत खात्याने मागितली. त्यामुळे टिळक रस्त्यावरील हिराबाग ते स्वारगेट हा अपवाद वगळता सर्व विकासकामे २० जानेवारी पर्यंत पूर्ण होतील.

*२६ जानेवारीला पादचारी दिन*

येत्या प्रजासत्ताकदिनी म्हणजेच २६ जानेवारीला पादचारी दिन साजरा केला जाणार आहे. या वेळेला लक्ष्मी रस्ता समाधान चौक, उंबऱ्या मारुती चौक, टिळक पुतळा, महात्मा फुले मंडई, तुळशीबाग, शनिपार, नगरकर तालीम असा पादचारी मार्गाचा विस्तार करण्यात आला आहे, असेही रासने यांनी सांगितले.

Baburao Chandere : Pune : बाबुराव चांदेरे यांचे सुस ग्रामस्थ यांनी मानले जाहीर आभार 

Categories
PMC Political पुणे

बाबुराव चांदेरे यांचे सुस ग्रामस्थ यांनी मानले जाहीर आभार

: प्रलंबित रस्त्याच्या  कामामुळे  नागरिकांना दिलासा

पुणे : सुस येथील वाढती लोकसंख्या आणि जपाट्याने वाढत असलेली वस्ती , गृह प्रकल्प यामुळे सुस गावातील रस्ता नेहमीच वाहतूक कोंडीचा विषय ठरलेला असतो त्यात सुस गावातील स्मशानभूमी जवळील  अरुंद रस्त्यामुळे येणाऱ्या – जाणाऱ्या नागरिकांना रहदारीच्या त्रासाला मोठ्याप्रमाणात सामोरे जावे लागत आहे , याठिकाणी अनेक वेळा अपघात होतात तसेच नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. मात्र नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या प्रयत्नाने रस्त्याची समस्या सोडवली गेली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे गावातील लोकांनी चांदेरे यांचे जाहीर आभार मानले आहेत.

: उपमुख्यमंत्र्यांनी घातले होते लक्ष

सुस गावातील स्मशानभूमी जवळील अरुंद रस्त्याची समस्या ही खुप दिवसांपासून प्रलंबित होती. त्याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री  अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार नगरसेवक बाबुराव चांदेरे, सुस गावचे माजी सरपंच नामदेवराव चांदेरे, पी.डब्लू.डी.चे अधिक्षक अभियंता- अतुल चव्हाण, कार्यकारी अभियंता – अजय भोसले, सहाय्यक अभियंता – नकुल नरसिंग, शाखा अभियंता – दीपक भोसले , पुणे महानगरपालिकेचे सुस गावच्या संपर्क अधिकारी श्रीमती अश्विनी लांडगे व इतर अधिकारी यांच्या समवेत सदर रस्त्यांची पाहणी केली. सदर ठिकाणचा कलवर्त  व नाल्याकडील रिटनिंग वॉल बांधून देण्याचे पी.डब्लू.डी.चे अधिक्षक अभियंता  अतुल चव्हाण यांनी निश्चित केले आणि त्यांच्या अखत्यारीत काम करणाऱ्या अधिकारी व ठेकेदार यांना तात्काळ काम करण्याची सुचना करण्यात आली .
वरील काम मार्गी लावल्याबद्दल सुस गावांतील नागरिकांमध्ये मोठ्याप्रमाणात आनंदाचे वातावरण दिसून आले आहे आणि या कामाबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रत्येक्ष काम करण्यास प्राधान्य देणारे, आपला हक्काचा माणूस नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचे सुस ग्रामस्थ व गृह प्रकल्पामधील नागरिकांच्या वतीने मनापासून अभिनंदन  मानले आहेत.

Ind vs Pak : पुण्याच्या रस्त्यांवर सामसूम

Categories
Sport पुणे

पुण्याच्या रस्त्यांवर सामसूम!

: भारत पाकिस्तान सामन्याचा असर

पुणे: पुणे शहरात एरवी रात्री 11 वाजेपर्यंत वर्दळ पाहायला मिळते. मात्र रविवारी रात्री मात्र 7:30 वाजलेपासूनच महत्वाच्या रस्त्यांवर देखील सामसूम पाहायला मिळाली. याचे कारण आहे भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान खेळला जाणारा t20 क्रिकेट सामना. अशी स्थिती पुण्यात जेव्हा लॉकडाऊन लागू झाला होता तेंव्हा पाहायला मिळाली होती.

: सगळे सामना पाहण्यात दंग

भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना पूर्ण जगाच्या उत्सुकतेचा विषय असतो. कारण या दोन्ही टीम पारंपारीक स्पर्धक म्हणून ओळखल्या जातात. भारताने पाकिस्तान विरोधात 2007 साली मोठा विजय मिळवत 20-20 चा विश्व चषक मिळवला होता. भारत सहजासहजी पाकिस्तान विरुद्धची मॅच हातात नाही. फक्त क्रिकेट प्रेमी नाही तर मॅच ची आवड नसणारे देखील ही मॅच मोठ्या चवीने पाहत असतात. 2021 च्या t 20 च्या विश्व चषकातील आजचा हा पहिलाच सामना आणि तो हि पाकिस्तान सोबत. त्यात आज रविवार. त्यामुळे पुणेकर नागरिक देखील 11 वाजेपर्यंत वर्दळ करणारे आज मात्र 7:30 पासूनच आपापल्या घरात सामना पाहण्यात दंग झाले होते. त्यामुळे रस्त्यावर सामसूम दिसून आली.
भारताने या सामन्यात 151 धावा जमा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली च्या खेळाचे खूप कौतुक होताना दिसून येत आहे. पाकिस्तान च्या 11 ओव्हर पूर्ण झाल्या तेंव्हा 80 धावा झाल्या होत्या. सर्वाना उत्सुकता कोण आणि कसे जिंकणार याचीच आहे.

Ganesh Bidkar : मध्यवर्ती भागालाही उपनगरा प्रमाणे ‘स्मार्ट’ करणार : गणेश बिडकर

Categories
PMC पुणे

मध्यवर्ती भागालाही उपनगरा प्रमाणे ‘स्मार्ट’ करणार

: सभागृह नेता गणेश बिडकर यांचे आश्वासन

पुणे : शहरातील मध्यवस्तीचा भाग असलेल्या सोमवार पेठ, मंगळवार पेठेत आवश्यक त्या सोयी सुविधा देत या भागाचा चेहरा मोहरा बदलणार आहे. अशी ग्वाही महनगरपालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी शुक्रवारी दिली. या भागात केला जाणारा ‘स्मार्ट प्रभाग – स्मार्ट रास्ता’ हा त्याचाच एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय उपनगराच्या धर्तीवर मध्यवर्ती भागालाही स्मार्ट करणार, असे ही बिडकर यांनी सांगितले.

: सोमवार पेठ, मंगळवार पेठ परिसरात विविध विकासकामांचा शुभारंभ

सभागृह नेते बिडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी सोमवार पेठ, मंगळवार पेठ परिसरात विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील कांबळे यांच्यासह पालिकेलेचे नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी या भागातील नागरिक विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भागातील नागरिकाच्या सोयीसाठी या परिसरात आवश्यक असलेली पावसाळी गटारांची लाईन टाकणे, ड्रेनेज लाईन टाकणे तसेच खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करणे ही कामे प्रामुख्याने केली जाणार आहेत.
मध्यवस्तीचा भाग असलेल्या सोमवार पेठ, मंगळवार पेठेतील रस्ते अरुंद आहेत. या भागातून अनेक ठिकाणी ये जा करणे सोयीचे असल्याने मोठ्या प्रमाणात वाहन चालक या रस्त्यांचा वापर करतात. हा भाग वर्दळीचा असल्याने येथे नवीन रस्ते बांधले जात नाही. या रस्त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीची कामे केवळ केली जातात. शहराची उपनगरे असलेल्या भागातील प्रशस्त आणि नागरिकांना चालण्यासाठी उपयुक्त असलेले रस्ते पाहिल्यानंतर असे रस्ते या भागात का होऊ शकत नाही, असा प्रश्न विचारला जातो. शहरातील इतर भागांमध्ये असलेले रस्ते या ठिकाणी व्हावेत यासाठी कटिबद्ध असल्याचे सभागृह नेते बिडकर यांनी सांगितले. या प्रभागातील नागरिकांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असून पुढील काही महिन्यांमध्ये या भागात नवीन बदल पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
सभागृह नेते बिडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत नागरिकांना आरोग्य कार्डचे वाटप देखील करण्यात आले. तसेच विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण कार्यक्रम देखील यावेळी करण्यात आला. बिडकर यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, शासकीय अधिकारी यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या कामाचे कौतुक केले.

पुणेकरांनी साडेचार वर्षांपूर्वी ज्या विश्वासाने भारतीय जनता पक्षाला (भाजप) महानगरपालिकेत एकहाती सत्ता दिली. त्यांचा विश्वास सार्थ करताना सत्ताधारी म्हणून भाजपने शहरात अनेक महत्वाचे प्रकल्प मार्गी लावले आहेत. सोमवार, मंगळवार पेठेसह प्रत्येक प्रभागातील रस्ता स्मार्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
गणेश बिडकर, सभागृह नेते, पुणे महानगरपालिका