Transfers | Nana Bhangire | महापालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्या अतिरिक्त आयुक्त यांच्या ऐवजी आयुक्तांच्या नियंत्रणाखाली आणा | शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांची मागणी

Categories
Breaking News PMC Political पुणे

महापालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्या अतिरिक्त आयुक्त यांच्या ऐवजी आयुक्तांच्या नियंत्रणाखाली आणा

| शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांची मागणी

| बदल्या न झाल्यास आंदोलनाचा इशारा

पुणे | महापालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्या अतिरिक्त आयुक्त यांच्या ऐवजी आयुक्तांच्या नियंत्रणाखाली आणा, अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. तसेच इंजिनियर, कर विभाग, क्लार्क यांच्या नियमानुसार तातडीने बदल्या कराव्यात अन्यथा शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा भानगिरे यांनी दिला आहे. (Pmc Pune)
भानगिरे यांच्या निवेदनानुसार नुकतेच मनपा वर्तुळात तसेच शहरभरात चर्चेचा असलेला मुद्दा म्हणजे पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या हा आहे.  पुणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बादल्या दर तीन वर्षांनी करणे, असे धोरण असून या धोरणास हरताळ फासला जात आहेअभियंत्यांच्या बदल्यांमध्ये लाखोंची उलाढाल होत आहे. अशी चर्चा असली तरी लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लिपिक, उप अधीक्षक, अधिक्षक, प्रशासन अधिकारी या पदांवर काम करणारे अधिकारी यांच्या सन 2012 पासून दर तीन वर्षांनी होणाऱ्या बदल्या झालेल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. (Pune municipal corporation)

भानगिरे यांनी पुढे म्हटले आहे कि, 2012 नंतर बदल्या झाल्या. परंतु ज्या कर्मचाऱ्यांचा वशिला नाही अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. कर आकारणी कर संकलन विभागात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचा आढावा घेतल्यास सन 2010 पासून तेच तेच अधिकारी त्याच त्याच परिसरात काम करीत आहेत. परिणामी अशा अधिकाऱ्यांची त्या त्या परिसरात मक्तेदारी झालेली आहे.  तसेच हाच प्रकार बदल्या करणारे खाते म्हणजेच सामान्य प्रशासन विभाग, मालमत्ता व्यवस्थापन, मुख्य लेखापाल, दक्षता विभाग अशी अत्यंत महत्वाचे विभाग याठिकाणी काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या 10 वर्षांहून अधिक काळ झाला तरी झालेल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

या बाबी निदर्शनास आणून देण्याचे महत्वाचे कारण म्हणजे या पदांवर काम करणारे अधिकारी देखील आमच्या शिवाय मनपाला पर्याय नाही. अशा वल्गना खाते प्रमुखांसमोर करतात व खाते प्रमुख देखील वेळ मारून नेण्यासाठी गप्प बसतात. मनपाच्या कडे प्रतिनियुक्ती वर आलेल्या अधिकारी यांनी स्वतःचे महत्त्व वाढवण्याच्या उद्देशाने व काही गूढ हेतूने अकारण नैसर्गिकरित्या पात्र बदल्याही अडवून ठेवल्या आहेत सेवकवर्ग विभाग संपुर्ण आयुक्त यांच्या अख्यतारीत घेण्यात यावा जेणेकरून कोणताही भ्रष्टाचार न होता पारदर्शक विना वशिलेबाजी ने बदल्या होतील.  इंजिनियर, कर विभाग, क्लार्क यांच्या नियमानुसार तातडीने बदल्या कराव्यात अन्यथा शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल. असे भानगिरे यांनी म्हटले आहे.

PMC Budget | प्रशासक विक्रम कुमारांनी सादर केलेल्या बजेटबाबत शिवसेना आणि काँग्रेस शहर अध्यक्षांना काय वाटते?

Categories
Breaking News PMC Political पुणे

प्रशासक विक्रम कुमारांनी सादर केलेल्या बजेटबाबत शिवसेना आणि काँग्रेस शहर अध्यक्षांना काय वाटते?

रखडलेल्या प्रकल्पांना चालना देणारे संतुलित बजेट | नाना भानगिरे

शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे म्हणाले, शहराच्या विकासाला चालना देणारे अतिशय चांगले बजेट महापालिका आयुक्तांनी सादर केले आहे. समाविष्ट गावासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. कुठलीही कर वाढ करू नये म्हणून भाजप आणि शिवसेनेने आयुक्ताकडे मागणी केली होती. त्याला यश आले, असे म्हणावे लागेल. या बजेटमुळे रखडलेल्या प्रकल्प पुरे होतील. पाणी योजनेसाठी चांगल्या निधीची तरतूद केली आहे. त्यामुळे समान पाणीपुरवठा योजना, नदी सुधार योजना मार्गी लागण्यास मदत मिळेल. एकंदरीत हे शहरासाठी अगदी योग्य आणि चांगले बजेट आहे.
—-

भाजपच्या नेत्यांना सोबत घेऊन केलेले नियोजनशून्य बजेट – अरविंद शिंदे

बजेटवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, या बजेटमधून शहरासाठी कुठलेही शाश्वत आश्वासन देण्यात आलेले नाही. आयुक्तांना संतुलित बजेट करता आलेलं नाही. कारण चालू बजेटमध्येच 2000 कोटीची वित्तीय तूट दिसून आलेली आहे. तरीही आयुक्तांनी साडेनऊ हजार कोटींचे बजेट सादर केले आहे. भाजपच्या नेत्यांना सोबत घेऊन बजेट करण्यापेक्षा नागरिकांना सोबत घेऊन केले असते तर चांगले झाले असते. या बजेटमध्ये उत्पन्नाचा कुठलाही नवीन स्रोत नाही. समाविष्ट गावांसाठी कुठलेही ठोस नियोजन नाही. समान पाणीपुरवठा योजनेसाठी घेतलेल्या बॉन्डवर किती व्याज दिले, त्याचा कसा विनियोग केला, याबाबत कुठलेही तारतम्य दिसून आलेलं नाही. या बजेटमधून करदात्याला कसलाही उलगडा होत नाही. शहरात नवीन उद्याने कुठे होणार, त्याचे आरक्षण कुठे आहे, नवीन शाळा कुठे उभ्या राहणार, याबाबत काही उलगडा केलेला नाही. फक्त नवीन फ्लॅट कसे उभे राहतील हे दिसते आहे. एकंदरीत बजेटमधून तोंडाला पाने पुसण्याचे काम करण्यात आले आहे. एकूणच दूरदृष्टी नसणाऱ्या आणि नियोजनशून्य भाजप नेत्यांना सोबत घेऊन केलेले हे बजेट आहे.

Shivsena | पुणे शहर शिवसेना सदैव नागरिकांच्या सेवेत |शहर संपर्क प्रमुख अजय बापू भोसले आणि शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांनी दिला विश्वास

Categories
Breaking News Political social पुणे

पुणे शहर शिवसेना सदैव नागरिकांच्या सेवेत

|शहर संपर्क प्रमुख अजय बापू भोसले आणि शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांनी दिला विश्वास

 पुणे | पुणे शहर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पुणे शहराचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेऊन शहरातील नागरिकांच्या  समस्या बाबत भेट घेतली. तसेच  त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी आयुक्तांकडे केली. आयुक्तांनी देखील यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. अशी माहिती शहर संपर्क प्रमुख अजय बापू भोसले आणि शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांनी दिली.
भानगिरे म्हणाले, नागरिकांच्या समस्यांमध्ये प्रामुख्याने पुणे शहरात मोठ्या प्रमाणात होत असलेली जड वाहनांची वाहतूक, महाविद्यालय परिसरामध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी दामिनी सक्रिय करण्यात यावे. तसेच दहानंतर चालणारे आउटडोर हॉटेल्स वर कारवाई करण्यात यावी. आदी समस्यांच्या संदर्भात पोलीस आयुक्त यांना निवेदन देत त्यावर सकारात्मक चर्चा केली. यावर पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी तुमच्या तक्रारींवर लवकरात लवकर कारवाई करू असे आश्वासन दिले.
यावेळी पुणे शहराचे संपर्कप्रमुख अजय बापू भोसले, पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, महिला आघाडी शहर प्रमुख लीनाताई पानसरे, माजी नगरसेवक श्रीकांत पुजारी, युवासेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य कु. शर्मिला येवले, पुणे उपशहर प्रमुख राजाभाऊ भिलारे व सुधीर कुरुमकर, प्रसिद्धी प्रमुख संजय अग्रवाल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Nana Bhangire | पुणे शहराला गतिमान करणारा अर्थसंकल्प | शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे | शिवसेना भवन येथे पेढे वाटून आनंद केला साजरा

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

पुणे शहराला गतिमान करणारा अर्थसंकल्प | शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे

| शिवसेना भवन येथे पेढे वाटून आनंद केला साजरा

पुणे | राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा पुणे शहराला गतिमान करणारा आहे. यातून सर्वच घटकाला न्याय मिळणार आहे. अशा भावना शिवसेनना शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी व्यक्त केल्या. दरम्यान बजेट मधून दिलेल्या योजनेमधून लोकांचे हित पाहिले गेले आहे. त्यामुळे शिवसेना भवन येथे जल्लोष करण्यात आला. तसेच नागरिकांना पेढे देखील वाटण्यात आले.

नाना भानगिरे म्हणाले, मेट्रोच्या कामाला वेग देण्याबरोबर स्वारगेट-कात्रज आणि पिंपरी-निगडी मेट्रो या मार्गिकांवर मेट्रो विस्तारणार आहे. मेट्रोअंतर्गत ८ हजार ३१३ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. पुणे रिंगरोड, पुणे-मुंबई मिसिंग लिंकसाठी भरीव निधी देण्यात आला आहे. नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे, पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुण्यात सर्क्युलर इकॉनॉमी पार्क उभारण्यात येणार आहे. पुण्यातील भिडेवाडा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे.

भानगिरे पुढे म्हणाले, पुणे मेट्रोचा विस्तार, पुणे रिंगरोड, पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ, नाशिक-पुणे रेल्वे या प्रकल्पांमुळे शहराच्या विकासाला गती मिळेल, तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्‍वास वाटतो. समाजातील सर्व घटकांच्या प्रगतीसाठी अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. भानगिरे म्हणाले यातील बऱ्याच गोष्टी साठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करत होतो. आमच्या मागण्याची दखल घेतल्याबद्दल आम्ही अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो.

पुणेकरांच्या 40% कर सवलतीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार | शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे

Categories
Breaking News PMC Political social पुणे महाराष्ट्र

पुणेकरांच्या 40% कर सवलतीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार | शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे

पुणे महापालिका हद्दीत मिळकत करात पुणेकरांना देण्यात येणारी ४० टक्के सवलत कायम ठेवावी अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी आज केली आहे. लवकरच ते मुख्यमंत्र्यांची व नगर विकास सचिवांची भेट घेऊन तसे पत्र देणार आहेत

याबाबत भानगिरे यांनी सांगितले कि, मिळकत करातील ४० टक्के सवलत १/८/२०१९ पासून स्व:वापर करीत असलेल्या निवासी मिळकतीची काढण्यात येऊ नये आणि देखभाल दुरुस्ती खर्च १/४/२०१० पासून १५ टक्क्यांहून १० टक्के फरकाची रक्कम मिळकतींकडून वसूल करण्यात येऊ नये, अशा प्रमुख मागण्या यावेळी  केल्या जातील. या दोन्ही मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात येणार आहे.  या दोन्ही मागण्या मान्य झाल्या तर पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. असे ही भानगिरे म्हणाले.

Thackeray Group | Pune| निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या निषेधार्थ पुण्यात ठाकरे गटाची निदर्शने

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या निषेधार्थ पुण्यात  ठाकरे गटाची निदर्शने

पुणे | सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना देखील रात्रीत निवडणूक आयोगाच्या मार्फत मिंधे सरकारने शिवसेनेचे धनुष्यबाणावर घाला घातला. मिंधे सरकारने धनुष्य जरी चोरून नेले असले तरी सच्चा शिवसैनिक शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मातोश्री बरोबर एकनिष्ठ आहे. भविष्यात मिंधे सरकारला त्यांची जागा दाखवल्या शिवाय सच्चा शिवसैनिक गप्प बसणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रीय शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली. 

निवडणूक आयोगाने काल (दि. १७) शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह असलेले धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयामुळे शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये संतापाची लाट उसळळी असून, निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ  पुणे शहर  (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी नगरसेवक प्रशांत बधे, अशोक हरणावळ, विशाल धनवडे, उपशहरप्रमुख प्रशांत राणे, महिला शहर संघटिका पल्लवी जावळे, राजेंद्र शिंदे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, युवासेना शहर अधिकारी सनी गवते, राम थरकुडे, युवा शहर अधिकारी निकिता मारतकर ,युवराज पारीख, छाया भोसले, नंदू येवले, गजानन पंडित, परेश खंडके, तानाजी लोहकरे, मकरंद पेठकर, तेजस मर्चंट, विलास सोनवणे, राजेश मोरे, चंदन साळुंके, सुरज लोखंडे, युवराज शिंगाडे, करूणा घाडगे, वैजयंती फाटे, दिपाली राऊत, गायत्री गरुड, किरण शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. 

मोरे म्हणाले, आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या विरुद्ध लागू शकतो या भीतीपोटीच मिंधे सरकारने निवडणूक आयोगाला हाताशी धरून धनुष्यबाणावर घाला घातला आहे. कालच्या निर्णयानंतर प्रत्येक शिवसैनिक पटून उठला असून तो मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहे. चिन्ह चोरणारे ४० चोर आणि भाजप यांना जमिनीत गाडल्या शिवाय सामान्य शिवसैनिक गप्प बसणार नाही. याची सुरूवात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकी पासून करणार आहे. या पोटनिवडणुकीत मिंधे सरकार आणि भाजपला चारीमुंड्या चित केल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही.

थरकुडे म्हणाले, चिन्ह गेले म्हणून गळून जाणारे आम्ही लेचेपेचे शिवसैनिक नाही. आम्ही हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक आहोत. आगामी काळात या मिंधे सरकार आणि भाजपला त्यांची जागा दाखवून दिल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही.

यावेळी ‘शिवसेना आमच्या ठाकरेंची नाही गद्दारांच्या बापाची’, ‘उद्धव साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘चिन्ह आणि नाव चोरणार्‍या गद्दारांचा धिक्कार असो’, ‘५० खोके एकदम ओके, ५० खोके माजले बोके’ अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या.

Shivsena | Pune | बाळासाहेबांच्या विचाराचा आणि भगव्याचा विजय | नाना भानगिरे | जल्लोषाने भारावून गेले पुण्याचे शिवसेना भवन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

बाळासाहेबांच्या विचाराचा आणि भगव्याचा विजय | नाना भानगिरे

| जल्लोषाने भारावून गेले पुण्याचे शिवसेना भवन

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे साहेब यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह देऊन निवडणूक आयोगाचा निर्णय दिला. या निर्णयाची बातमी येताच पुणे शहरातील असंख्य शिवसैनिकांनी सारसबाग येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कडे कुच करत एकच जल्लोष केला.

ढोल-ताशांच्या निनादात फटाक्यांच्या आतिषबाजीत बेधुंद होवून आणि तितक्याच आनंदात मिरवणूक काढत पुणे शहराचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, सहसंपर्कप्रमुख अजय बापू भोसले, युवा सेना राज्य सचिव किरण साळी ल,शर्मिला येवले शहरातील सर्व उपशहर प्रमुख पदाधिकारी यांनी महालक्ष्मी मंदिरात जावून या निर्णयाचे स्वागत करीत महाआरती केली. असंख्य शिवसैनिकांनी दिलेल्या आत्तापर्यंतच्या खंबीर साथीचा हा विजय असून सामान्य शिवसैनिकांना बळ देण्याचं काम एकनाथजी शिंदे यांनी केलेला असून हा भगव्याचा आणि बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे. असे उदगार पुणे शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी काढले.

याच जल्लोषात मिरवणूक सारसबाग जवळील बाळासाहेब ठाकरे सभागृहातील तैलचित्रांना नमन करून असंख्य शिवसैनिकांनी या जल्लोषात सहभाग घेतला.

Breaking News | उद्धव ठाकरेंना मोठा धक्का | ‘शिवसेना’ हे नाव अन् ‘धनुष्यबाण’ शिंदे गटाला!

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘शिवसेना’ हे नाव अन् ‘धनुष्यबाण’ शिंदे गटाला!

 महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा काय निकाल लागतो, याकडे देशाचं लक्ष लागलेलं असताना आज केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचं नाव एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) गटाकडे राहील, असं आज निवडणूक आयोगाने जाहीर केलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी  हा मोठा धक्काच आहे.

शिवेसेनेत (Shiv Sena) बंड झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले शिंदे गट आणि उद्धव ठाकरे  यांचा एक गट. या दोन्ही गटांनी धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे दावा केला होता. यावर निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू होती.  या सुनावणीवर आयोगाने आज अखेर निकाल दिला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्यात आले आहे.शिवसेनेच धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने शिवसेनेची सध्याची घटना लोकशाहीविरोधी असल्याचे निरीक्षण नोंदवले.

ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पहिल्यापासून धनुष्यबाण चिन्हासाठी मागणी केली होती. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून महेश जेठमलानी यांनी निवडणूक आयोगात युक्तिवाद केला. तर शिंदे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांनी बाजु मांडली.  यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे.

सुनावणी दरम्यान, दोन्ही गटाकडून कागदपत्र सादर करण्यात आली होती. दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने हा निकाल राखून ठेवला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज हा निकाल दिला आहे.  काही महिन्यातच मुंबई महापालिकेसाठी निवडणूक जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवरच आज आयोगाने चिन्हावर निर्णय दिला आहे.

Reaction | Union Budget | केंद्रीय बजेट बाबत राजकीय पक्षांच्या काय आहेत प्रतिक्रिया? | वाचा सविस्तर

Categories
Breaking News Commerce Political पुणे

केंद्रीय बजेट बाबत राजकीय पक्षांच्या काय आहेत प्रतिक्रिया? | वाचा सविस्तर

 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज केंद्रीय बजेट सादर केले. याबाबत शहरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपकडून याचे स्वागत करण्यात आले आहे. तर विरोधी पक्षाकडून मात्र याला निवडणूक बजेट असे संबोधण्यात आले आहे.

 

1. मध्यम वर्गीय लोकांना अपेक्षित असलेली आयकरात सवलत मिळालेली नाही. आयकरा मध्ये जी काहो थोडी सवलत मिळाली आहे ती नवीन आयकर प्रणाली प्रमाणे ( sec. 115BAC) जे लोक आयकर पत्रक भारतात त्यांना देण्यात आली आहे. जुन्या आयकर प्रणाली प्रमाणे जे लोक आयकर पत्रक भरतात त्यांना सवलत नाही.
नवीन आयकर प्रणाली चे तोटे हे आहेत की भारतातील मध्यम वर्गाची बचतीची सवय संपुष्टात येईल कारण जुन्या करप्रणाली प्रमाणे नवीन करप्रणाली बचतीसाठी प्रोत्साहन देत नाही म्हणजे बचती वर कर सवलत देत नाही. आणि त्याचे दूरगामी परिणाम काही वर्षानी मध्यम वर्गीय लोकाना भोगावे लागतील.
2. मध्यम वर्गीय लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुधा अंदाज पत्रकात कोणतीही भरीव अशी वाढ केलेली नाही. आरोग्य क्षेत्राची काय परिस्थिती आहे हे आपण मागील दोन वर्षांत अनुभवले आहे.
सरकारने कमीत कमी आरोग्य विमा वरील GST तरी कमी करावा.
3. अंदाज पत्रक हे ज्या राज्यामध्ये निवडणुका होणार आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून सादर केले आहे. उदा. अंदाजपत्रकात कर्नाटक चा केलेला उल्लेख.

गजानन थरकुडे
शिवसेना शहर प्रमुख पुणे


“मोदी सरकारचा अर्थसंकल्प २०२४च्या निवडणुका डोळ्यांसमोर केवळ लॉलीपॉप देणारा अर्थसंकल्प” – शहराध्यक्ष प्रशांत जगताप.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज २०२३-२४ वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. एकूणच हा अर्थसंकल्प आहे की २०२४ च्या निवडणुकांसाठीचा जाहीरनामा असा प्रश्न यातून पडतो. सर्वच वर्गांना चुचकारण्याचा प्रयत्न करताना अर्थमंत्र्यांनी गेल्या ९ वर्षातील अपयशच समोर उघड केले. सप्तर्षी अर्थसंकल्पात अनेक जुन्याच योजनांसाठी निधीची तरतूद वा त्यांना नवे आवरण चढवून अर्थमंत्र्यांनी सादर केले. याचाच अर्थ अनेक वर्षे या योजनांवर काम सुरू असूनही प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नसल्याचे दिसते.

देशाच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक १५% जी.डी.पी चा वाटा देणाऱ्या
महाराष्ट्राला अर्थसंकल्पात वेळोवेळी डावलले जात आहे. आजच्या अर्थसंकल्पातही अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी विशेष घोषणा केल्या नाहीत. केंद्राकडून जीएसटीचे १३ हजार कोटी २१५ थकीत आहेत. महाराष्ट्राला दोन वर्षांचा परतावा मिळालेला नाही. सर्वाधिक जीएसटी संकलन देशाला देणाऱ्या महाराष्ट्राला प्रत्येक वेळी अर्थसंकल्पात डावलणे योग्य नाही. कर्नाटकच्या दुष्काळासाठी ५ हजार ३०० कोटी मंजूर करण्यात आले, पण महाराष्ट्रातील ओला दुष्काळ अर्थमंत्र्यांना दिसलेला नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंकडे अर्थमंत्र्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे.

देशात बेरोजगारी ही अत्यंत गंभीर समस्या आहे. अर्थमंत्र्यांनी पीएम कौशल्य विकास योजना पुढील तीन वर्षांसाठी राबवली जाणार असल्याचे तसेच ४७ लाख युवकांना ३ वर्षांसाठी भत्ता देणार असल्याची घोषणा केली. आयटी क्षेत्र तसेच स्टार्ट अप मधील सुमारे २० हजार नोकऱ्या पुढील सहा महिन्यात जाणार असल्याची भीती आहे. असे असताना नवीन प्रशिक्षीत बेरोजगार निर्माण होण्याची भीती आहे. आहेत तेच रोजगार जात असताना बेरोजगारीला आळा कसा घालणार, रोजगारनिर्मितीसाठी काय करणार याकडे अर्थमंत्र्यांनी लक्ष देणे अपेक्षित आहे.

स्मार्ट सिटीसारख्या योजनेऐवजी आता सस्टेनेबल सिटीजची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.पुण्यासह देशात सर्व स्मार्ट सिटी बनवण्यात केंद्र सरकारला आलेले अपयश आपण पाहिले आहे. त्यामुळे आता केंद्राने यातून हात झटकून घेतले असून योजनेला नव्या आवरणात गुंडाळून त्याची जबाबदारी आता राज्यांवर ढकलली असल्याचे दिसते.


मुंगेरीलाल के हसिन सपने

केंद्र सरकारचा हा अर्थसंकल्प सन २०२४ ची सार्वत्रिक निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केला गेला आहे. प्रत्यक्षात कोणाच्याही पदरी काहीच पडलेले नाही. पुण्यासारख्या एका वेगाने वाढणाऱ्या शहराकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. वास्तविक पुणे शहराने भारतीय जनता पक्षाला सत्तेचे भरभरून दान दिले, मात्र पुण्याला त्यांच्याकडून कधीही काहीच मिळालेले नाही. फक्त घोषणा करण्यात येत आहेत. स्थनिक स्वराज्य संस्थांना कर्जरोखे जाहीर करण्याची परवानगी त्यांनी देण्याआधीच पुणे महापालिकेने २०० कोटी रूपयांचे कर्ज काढून पुणेकरांच्या माथी त्याचा बोजा टाकला आहे. ठोस असे काहीच या अर्थसंकल्पात दिसत नाही. प्रत्येकाला खूश करणाऱ्या घोषणा मात्र भरमसाठ आहेत. ही सगळी मुंगेरीलालची गोडगोड स्वप्न आहेत, त्याने बेरोजगारी, महागाई दूर होणारी नाही. सगळीच निराशा आहे.

मोहन जोशी- प्रदेश उपाध्यक्ष, काँग्रेस.


प्रगती आणि विकासाच्या मार्गावर नेणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प | भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाला प्रगती आणि विकासाच्या मार्गावर नेणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल असा विश्वास भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला.

मुळीक म्हणाले, आयकरात मोठी सवलत दिल्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांसाठी गुंतवणूक केली जाणार असल्यामुळे पुण्यासारख्या शहरात मूलभूत सुविधांसाठी मोठा निधी उपलब्ध होईल. त्यामुळे उद्योग निर्मितीला चालना मिळेलउद्योग निर्मितीला चालना मिळेल.

मुळीक म्हणाले, युवकांसाठी स्टार्टअपच्या विविध योजना मांडण्यात आल्या आहेत. त्याबरोबर लघु उद्योगातून रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.

मुळीक पुढे म्हणाले, महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली आहे. एससी, एसटी आणि ओबीसी समाजाच्या योजनांना भरपूर निधी दिला आहे. त्यामुळे सर्व समाज घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प आहे. मी त्याचे मनापासून स्वागत करतो.


सहकारातून समृद्धीकडे जाणारा हा अर्थसंकल्पीय बजेट सादर…

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी सलग पाचवा अर्थसंकल्प सादर करत असताना वेगवेगळ्या वर्गांना खुश करणारा यात सर्व घटकांचा विचार करणारा आत्मनिर्भर भारत बनवण्याचा व स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा बजेट अत्यंत महत्त्वपूर्ण असं बजेट आहे या बजेटमध्ये भरड धान्यसाठी व लागवडीसाठी विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे नवीन उद्योगधंद्यांना आर्थिक मदत करणार व त्याचप्रमाणे बॅटरीवर चालणाऱ्या सर्व गाड्या स्वस्त होणार तसेच मध्यमवर्गीय लोकांना अत्यंत महत्त्वपूर्ण की त्यात ७ लाख उत्पन्न असणारे आयकारातून सूट व त्याप्रमाणे डाळी साठवणुकीसाठी विशेष हब उभारणार व त्याप्रमाणे कोल्ड स्टोरेज साठी विशेष योजना असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आले दिसले म्हणून हा बजेट देशाच्या विकासासाठी प्रगती कडे नेणारा हा बजेट आहे
———
प्रवीण माणिकचंद चोरबेले
मा अध्यक्ष दी पुना मर्चंट चेंबर
संपादक वाणिज्य विश्व

Prithviraj Sutar | Water Meter | शहरात बसविण्यात येत असलेल्या पाणी मीटरच्या बील आकारणीला विरोध | समान पाणी पुरवठा योजना झालीय कधी कधी पाणीपुरवठा योजना | शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार यांचा आरोप

Categories
Breaking News PMC Political पुणे

 शहरात बसविण्यात येत असलेल्या पाणी मीटरच्या बील आकारणीला विरोध

| समान पाणी पुरवठा योजना झालीय कधी कधी पाणीपुरवठा योजना | शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार यांचा आरोप

पुणे मनपाने (PMC Pune) पालकमंत्री यांच्याकडे पुणे शहरामध्ये घरा-घरांमध्ये बसविण्यात आलेल्या पाणी मीटरच्या (Water Meter) रिडींगनुसार पाण्याचे बील अकारण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केल्याचे समजले.  आमच्या ” शिवसेना” (उध्दव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena) या पक्षाचा या बील अकारणीला तीव्र विरोध आहे. असे शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार (Prithviraj Sutar) यांनी म्हटले आहे. जोपर्यंत पुणे शहरातील सर्व भागातील सर्व नागरिकांना २४x७ या मूळ योजनेप्रमाणे २४ तास पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत मीटर प्रमाणे पाण्याचे बील देऊ नये. जर प्रशासनाने पुणेकरांना वेठीस धरले तर “शिवसेना” (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ही आपल्या पध्दतीने पुणेकरांसह तीव्र आंदोलन करील व त्याची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर राहील याची नोंद घ्यावी. असा इशारा ही सुतार यांनी दिला आहे. (Pune Municipal corporation)

सुतार यांनी दिलेल्या निवेदनानुसार २४x७ ही पाणीपुरवठयाची फसवी योजना पुणे शहरामध्ये मनपाने राबविली आहे. याचा डीपीआर मुख्य सभेने जो मान्य केला त्याप्रमाणे या योजनेचे लाभ प्रत्यक्षात सुरू नाही. मनपाच्या व अधिकाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे मनपाला आर्थिक भुर्दड बसला असून, सदरचे पैसे हे पुणेकरांच्या कररूपी पैशातून दिले जात आहेत.

२४x७ या पाणीपुरवठा योजनेचा अर्थ होता बाराही महिने, चौवीस तास पाणीपुरवठा पुणेकरांना मिळणार काही दिवसानी योजनेचे नाव झाले समान पाणी पुरवठा आणि आता ही योजना आहे कधी-कधी पाणी पुरवठा.

ही पाणीपुरवठा योजना संपूर्ण फसवी असून पुणेकरांना फसवणारी योजना आहे ही योजना फक्त काही लोकाच्या फायदयासाठी राबविण्यात येत आहे. योजना ही सुरूवातीपासुन वादात अडकली आहे. त्याच्या इस्टिमेटपासुन ते टेंडर प्रक्रियेपर्यंत ही योजना वेगवेगळ्या कारणांमुळे लांबली गेली. या योजनेमध्ये काही तात्रिक बदल करणे आवश्यक आहे. ज्यामुळे या प्रकल्प खर्चामध्ये बचत होऊन मनपाची आर्थिक बचत होणार आहे तसेच जर हे तांत्रिक बदल केले नाहीत तर या योजनेचा पुणेकरांना हवा तसा फायदा होणार नाही आणि पाण्याची समस्या संपूर्णपणे सुटणार नाही, अशा चुकीच्या योजनेमुळे मनपाचे आर्थिक नुकसान होत आहे. असे सागून मनपाचे हित सांभाळणाऱ्या काही प्रामाणिक अधिकाऱ्यांना या कामातून मुक्त करून त्यांची बदली करण्यात आली.

या योजनेमुळे पुणेकर नागरिकांना काहीही फायदा होत नाही, अजूनही पुणे शहरामध्ये पाण्याचे प्रश्न प्रलबित आहेत. पाणी पुरवठयाचे काम पूर्ण झाले नसताना सुध्दा मीटर बसविण्याचे काम घाई-घाईत करण्यात आले हे फक्त कंपनीच्या फायदयाचा व काही लोकांचा फायदयाचा विचार करून, वेळ कोणती निवडली तर लोकप्रतिनिधी मनपामध्ये नसताना यामुळेच या योजनेबाबत अजून संशय वाढत चाललेला आहे.

जोपर्यंत पुणे शहरातील सर्व भागातील सर्व नागरिकांना २४x७ या मूळ योजनेप्रमाणे २४ तास पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत मीटर प्रमाणे पाण्याचे बील देऊ नये. जर प्रशासनाने पुणेकरांना वेठीस धरले तर “शिवसेना” (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ही आपल्या पध्दतीने पुणेकरांसह तीव्र आंदोलन करील व त्याची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर राहील याची नोंद घ्यावी. असे सुतार यांनी म्हटले आहे. (24*7 water project)