Aditi Tatkare | sports university | पुण्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील  क्रीडा विद्यापीठ उभारणार

Categories
Breaking News Education Political Sport पुणे महाराष्ट्र

पुण्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील  क्रीडा विद्यापीठ उभारणार

– क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे

पुणे : – महाराष्ट्र शासन खेळाला महत्व देत असून शहरी आणि ग्रामीण भागात खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाच्या पायाभूत सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडविण्यासाठी पुण्यामध्ये लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात येत आहे. यामुळे खेळाडूंना पायाभूत सुविधा उपलब्ध होतील आणि आपले क्रीडाकौशल्य विकसीत करण्याची संधी मिळेल, या माध्यमातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील, असे प्रतिपादन क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले.

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातर्फे आयोजित आंतर महाविद्यालयीन स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आर्मी स्पोर्टस् इन्स्टिट्यूट पुणेचे कमांडंट कर्नल देवराज गील, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, मिटकॉम् च्या संचालिका डॉ. सुनिता कराड, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, एमआयटी स्कूल ऑफ इंजीनिअरिंगचे प्राचार्य डॉ. किशोर रवांदे, विद्यार्थी विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र पुजेरी, एमआयटी क्रीडा विभागाचे संचालक प्रा. पद्माकर फड आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री  तटकरे म्हणाल्या, गेल्या दोन वर्षात कोरोना संकटामुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीही खेळाडूंनी आपला सराव सुरू ठेवत यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळालाही महत्व देण्याची गरज आहे. खेळात संघभावनेच्या साहाय्याने यश संपादन करता येते. खेळामुळे निकोप स्पर्धा करण्याची सवय लागते आणि व्यक्तिमत्त्व विकसित होते. खेळाची आवड असल्याने खेळाडूंमध्ये येऊन शाळा आणि महाविद्यालयाचे दिवस आठवल्याचे त्यांनी सांगितले.

कर्नल गिल म्हणाले, जीवनात खेळाला महत्व आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकता. मेहनत आणि सतत प्रयत्न ही यशाची गुरुकिल्ली आहे. खेळाच्या माध्यमातून शिक्षण आणि शिक्षणातून करिअर घडवायची संधी सर्वांना मिळाली आहे. या संधीचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्वाला आकार द्यावा.

प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, खेळासाठी विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय स्तरावरील पायाभूत सुविधा उभ्या केल्या आहेत. खेळातून राष्ट्र निर्माण ही व्यवस्थापनाची इच्छा आहे. त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रिडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री  आदिती तटकरे आणि कर्नल देवराज गील यांच्या हस्ते विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थांना पारितोषिक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

शिवछत्रपती पुरस्कार विजेते श पद्माकर फड यांनी प्रास्ताविक केले. एमआयटी एडीटी विद्यापीठातर्फे पुरुष आणि महिलांसाठी घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालय स्पर्धेत क्रिकेट, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कबड्डी, रोईंग, टेनिस, जलतरण, वॉटरपोलो, ॲथलेटिक, क्रॉस कंट्री, बॉक्सिंग, धनुर्विद्या या एकूण १६ खेळ प्रकारात सामने खेळविण्यात आले होते. यात एकूण ११२५ खेळाडूंनी सहभाग घेतला अशी माहिती यावेळी देण्यात आली.