Theatre in Maharashtra | राज्यात 75 ठिकाणी नाट्यगृह उभारणार | 386 कोटी रुपये निधी देणार

Categories
Breaking News cultural Political social महाराष्ट्र

Theatre in Maharashtra | राज्यात 75 ठिकाणी नाट्यगृह उभारणार

| 386 कोटी रुपये निधी देणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

Theatre in Maharashtra | मुंबई : कलेच्या क्षेत्रातील संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून जे कलावंत प्रयत्न करत आहेत त्यांना प्रोत्साहन आणि संधी उपलब्ध व्हावी म्हणून तालुकास्तरावर 75 ठिकाणी नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी 386 कोटी रुपये निधी देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज येथे सांगितले. (Maharashtra News)

मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील नोंदणीकृत 41 संस्थांना सहाय्यक अनुदान धनादेश वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री मुनगंटीवार म्हणाले, शासन प्रयोगात्मक कलेचे जतन व संवर्धन करणाऱ्या संस्थांच्या पाठीशी आहे. नोंदणीकृत संस्थेच्या माध्यमातून जे कलावंत प्रयत्न करत आहेत त्यांना मदतीचा हात शासनाकडून दिला जात आहे. आज विज्ञान युगात माहिती तंत्रज्ञानाचा प्रभाव आहे पण सुख समृद्धीचा अभाव दिसत आहे, समाधान लोप पावत आहे. कलावंतांनी राज्याचा सांस्कृतिक जपत आपले काम सुरू ठेवावे.

प्रधान सचिव विकास खारगे म्हणाले, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याचे काम कलेच्या क्षेत्रातील या संस्था करतात आपले कौतुक करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव जपण्याचे काम शासनासोबत आपणही करत आहात.

कार्यक्रमाची सुरुवात राज्य गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी केले. कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत तसेच प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

धनादेश वाटप संस्थेची यादी खालील प्रमाणे

पटेल कल्चर फाउंडेशन मुंबई, वैभव सांस्कृतिक कला मंडळ नागपूर, अजित बालक मंडळ नागपूर, जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती रामटेक नागपूर या संस्थांना (प्रत्येकी 2 लाख रुपये.), अय्यर फाउंडेशन मुंबई, संक्रीता फाउंडेशन मुंबई, प्रारंभ कला अकादमी ठाणे, तक्षशिला नृत्य कला मंदिर ठाणे, शाहीर शामराव खडके सांस्कृतिक लोककला मंडळ सावर्डी सोलापूर, जय भवानी कलापथक सांस्कृतिक मंडळ जवळा सोलापूर,सुंदरी सम्राट कै. सिद्राम जाधव सांस्कृतिक कला मंडळ सोलापूर, सप्तरंग थिएटर्स अहमदनगर, स्वानंद सांस्कृतिक मंडळ नागपूर, आदित्य बहुउद्देशीय संस्था रामटेक नागपूर, पिराजी बहुउद्देशीय संस्था नागपूर, ऑरेंजसिटी बहुउद्देशीय संस्था नागपूर, प्रेरणा अल्पसंख्यांक महिला बाल व युवक कल्याण सांस्कृतिक कला बहुउद्देशीय संस्था वाशिम या संस्थांना (प्रत्येकी एक लाख रुपये).

बोधी नाट्य परिषद मुंबई, श्री. वल्लभ संगीतालय मुंबई, विश्राम ठाकर आदिवासी कला अंगण चारीटेबल ट्रस्ट पिंगळी गुढीपूर सिंधुदुर्ग, मराठी साहित्य सांस्कृतिक व कला मंडळ नवी मुंबई, स्वप्निल सपना लोककला विकास मंडळ मानेगाव सोलापूर, स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान जळगाव, चंदन युवक शिक्षण व्यायाम विकास क्रीडा मंडळ छत्रपती संभाजीनगर, श्रीकृष्ण सांस्कृतिक व ग्रामीण विकास संस्था नादरपूर छत्रपती संभाजीनगर , जय साई नटराज नाट्य चित्रपट कला व सांस्कृतिक संस्था छत्रपती संभाजीनगर , सामाजिक जनजागृती कला विकास छत्रपती संभाजीनगर, बालगंधर्व सांस्कृतिक कला क्रीडा व युवक मंडळ परभणी, स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था सिने स्टार अकादमी नांदेड, मानवसेवा सामाजिक प्रतिष्ठान बीड, प्रगती सेवाभावी संस्था पाडळी बीड,

नटराज क्रीडा मंडळ नागपूर, रखुमाई सेवा मंडळ नागपूर, पंचरंगी निशाण खडीगंमत मंडळ नागपूर, जनजागृती कलंगी शाहीर मंडळ नागपूर, नागरी सांस्कृतिक व बहुसंस्था गोंदिया,स्व. विनायक राखोंडे प्रतिष्ठान पातुर, साने गुरुजी कला व सांस्कृतिक कार्य क्रीडा बहु मंडळ अकोला, शाहू फुले आंबेडकर फाउंडेशन बुलढाणा, लोकसेवा राष्ट्रीय सांस्कृतिक नाट्य मंडळ वाशिम, जय तुळजाई ग्रामीण बहु संस्था उमरसा यवतमाळ या संस्थांना (प्रत्येकी 50 हजार) रुपयांचा धनादेश देऊन अनुदान वाटप करण्यात आले.

*****

Lata Mangeshkar Award 2023 | 2023 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जेष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर

Categories
Breaking News cultural Political social महाराष्ट्र

Lata Mangeshkar Award 2023 | 2023 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जेष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर

| सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रतिष्ठेच्या विविध पुरस्कारांची घोषणा

| पुरस्काराच्या क्षेत्रात विस्तार आणि रकमेतही मोठी वाढ करीत असल्याचे समाधान | सुधीर मुनगंटीवार

 

Lata Mangeshkar Award 2023 | मुंबई | राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून सन 2023 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर (Singer Suresh Wadkar) यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)?यांनी आज ही घोषणा केली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, राज्य सांस्कृतिक पुरस्कार इत्यादी पुरस्कार सांस्कृतिक कार्य संचालनालय मार्फत दरवर्षी देण्यात येतात. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली असून राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आली आहे तसेच पुरस्कारांच्या क्षेत्रांमध्येही विस्तार करण्यात आल्याचे समाधान असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

 

2023 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झालेला आहे. संगीत व गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारास हा पुरस्कार देण्यात येतो.

 

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार 2022 पुरस्कारासाठी पं. उल्हास कशाळकर यांचे नाव घोषित झाले असुन, 2023 च्या पुरस्कारासाठी पं. शशिकांत (नाना)श्रीधर मुळ्ये यांची घोषणा करण्यात आली आहे. शास्त्रीय संगीतासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पण केले आणि शास्त्रीय संगीत क्षेत्राची सेवा केली, त्या कलाकारांच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

 

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्काराच्या 2022 साठी सुहासिनी देशपांडे यांच्या नावाची घोषणा झाली आहे तर 2023 साठी अशोक समेळ यांना पुरस्कार घोषित झाला आहे. मराठी रंगभूमीवर ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे, अशा कलाकारांना या पुरस्काराने गौरविण्यात येते.

 

संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव 2022 चा पुरस्कार नयना आपटे यांना जाहीर झाला असून, 2023 च्या पुरस्कारासाठी पं. मकरंद कुंडले यांची निवड झाली आहे. ज्या कलाकारांनी संगीत रंगभूमीसाठी विशेष योगदान दिले आहे त्या कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

 

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार 2022 व 2023 ची ही घोषणा केली आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये एकूण बारा वर्गवारी असून, यामधील प्रत्येक वर्गवारी मध्ये दोन वर्षाचे दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत. नाटक या विभागासाठी 2022 चा पुरस्कार वंदना गुप्ते यांना तर 2023 चा पुरस्कार ज्योती सुभाष यांना जाहीर झाला आहे. उपशास्त्रीय संगीत वर्गवारीमध्ये 2022 चा पुरस्कार मोरेश्वर निस्ताने यांना जाहीर झालेला असून, 2023 चा पुरस्कार ऋषिकेश बोडस यांना जाहीर झाला आहे. कंठ संगीत प्रकारातील 2022 चा पुरस्कार अपर्णा मयेकर यांना घोषित झाला असून, 2023 चा पुरस्कार रघुनंदन पणशीकर यांना मिळाला आहे. लोककला क्षेत्रातील 2022 चा पुरस्कार हिरालाल रामचंद्र सहारे यांना जाहीर झाला असून, 2023 चा पुरस्कार कीर्तनकार भाऊराव थुटे महाराज यांना जाहीर झाला आहे. शाहीरी क्षेत्रातील 2022 चा पुरस्कार जयंत अभंगा रणदिवे यांना तर, 2023 चा पुरस्कार राजू राऊत यांना घोषित झाला आहे. नृत्य वर्गवारीतील 2022 चा पुरस्कार लता सुरेंद्र यांना जाहीर झाला असून, 2023 साठी सदानंद राणे यांची निवड झाली आहे. चित्रपट क्षेत्रासाठी 2022 चा पुरस्कार चेतन दळवी यांना तर, 2023 चा पुरस्कार निशिगंधा वाड यांना घोषित झाला आहे. कीर्तन प्रबोधन क्षेत्रातील 2022 चा पुरस्कार संत साहित्यिक व लेखिका प्राची गडकरी यांना जाहीर झाला असून, 2023 चा पुरस्कार अमृत महाराज जोशी यांना घोषित झाला आहे. वाद्य संगीत क्षेत्रातील 2022 चा पुरस्कार पं. अनंत केमकर यांना मिळाला असून, 2023 साठी शशिकांत सुरेश भोसले यांची घोषणा झाली आहे. कलादान या प्रकारासाठी 2022 साठी संगीता राजेंद्र टेकाडे यांचे नाव घोषित झाले आहे तर, 2023 साठी यशवंत रघुनाथ तेंडोलकर यांच्या नावाची घोषणा झाली आहे. तमाशा वर्गवारीतील राज्य सांस्कृतिक पुरस्कार बुढ्ढणभाई बेपारी (वेल्हेकर) यांना तर, 2023 चा पुरस्कार उमा खुडे यांना घोषित झाला आहे. आदिवासी गिरीजन वर्गवारी मध्ये 2022 साठी भिकल्या धाकल्या धिंडा तर, 2023 साठी सुरेश नाना रणसिंग यांची निवड करण्यात आली आहे.

 

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केलेले आहे. या पुरस्कार प्राप्त कलाकारांकडून अजून मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक क्षेत्राची सेवा होईल अशी अपेक्षा मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

 

पुरस्कारांच्या रकमेत मोठी वाढ:

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विविध पुरस्कारांच्या रकमेत मोठी वाढ करत असल्याची घोषणा केली आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पंणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार या पुरस्कारांची रक्कम पाच लक्ष रुपये होती, ती यापुढे दहा लक्ष रुपये होईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. तसेच राज्य सांस्कृतिक पुरस्काराची जी एक लाखाची रक्कम होती ती रक्कम तीन लाखाची करण्यात येत आहे अशीही घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

 

राज्य सांस्कृतिक पुरस्काराच्या क्षेत्रामधील व पुरस्कारांमधील वाढ:

सध्या 50 वर्षे वयावरील पुरुष कलाकारांना व 40 वर्षावरील महीला कलाकारांना राज्य सांस्कृतिक पुरस्कारा अंतर्गत 12 विविध क्षेत्रातील पुरस्कार दिले जातात. यापुढे पन्नास वर्षावरील पुरुष आणि महिला कलाकारांना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्काराच्या सध्याच्या क्षेत्रामध्ये वाढ करण्यात येत असून, ही क्षेत्रे 24 करण्यात आलेली आहेत. वाढ करण्यात आलेल्या क्षेत्रांमध्ये प्रामुख्याने; प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार, लोकनृत्य, लावणी /संगीतबारी, भारुड/गवळण /विधेनाट्य, वाद्यनिर्मिती करणारे कलाकार, झाडीपट्टी/खडीगंमत /दंडार, दशावतार /नमन खेळे / वही गायन, दुर्मिळ प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणाऱ्या व त्यांचे जतन वहन संवर्धन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था, प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्था, ध्वनी तंत्रज्ञ /संकलक, संगीत संयोजक, वाईस ओवर आर्टिस्ट / निवेदक अशा विविध बारा क्षेत्राची वाढ राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये करण्यात आली आहे. या पुरस्काराची रक्कमही तीन लक्ष रुपये असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

युवा पुरस्कार:

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत युवक कलाकारांसाठी विशेष पुरस्कारांची घोषणा करण्यात यावी अशी अनेक संघटनांची फार पूर्वीपासूनची मागणी होती. या मागणीचा विचार करून राज्य सांस्कृतिक पुरस्कारातील संग्रहालय वगळता इतर सर्व 23 क्षेत्रांमध्ये युवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार घोषित करण्यात येणार आहेत. युवा राज्य सांस्कृतिक पुरस्कारासाठी वयाची मर्यादा 25 ते 50 एवढी राहणार असून, या पुरस्कारांची रक्कम एक लक्ष एवढी असेल.

 

राज्यातील कलाकारांना विविध माध्यमातून प्रोत्साहन मिळण्याबाबत, सांस्कृतिक कार्य विभाग नेहमीच प्रयत्नशील राहत असून, भविष्यात कलाकारांसाठीच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली आहे.

 

निवड प्रक्रियेसाठी समिती

उपरोक्त सर्व प्रकारच्या पुरस्कारासाठी निवड समितीची निवड समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या निवड समितीचे अध्यक्ष सांस्कृतिक कार्यमंत्री ना. श्री. सुधीर मुंनगंटीवार हे असून त्यामध्ये प्रधान सचिव विकास खारगे व इतर नामवंत अशासकीय सदस्यांचा समावेश आहे. या समितीचे सचिव संचालक सांस्कृतिक कार्य हे आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाकडे आलेल्या शिफारसी व सदस्यांनी सुचवलेल्या शिफारसी यामधून पुरस्कारर्थीची निवड करण्यात आली आहे.

00000

Chitraratha | महाराष्ट्राची साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथाचे दुसरे पारितोषिक

Categories
Breaking News Political social देश/विदेश महाराष्ट्र

महाराष्ट्राची साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथाचे दुसरे पारितोषिक

| सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले अभिनंदन

 

प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर झालेल्या पथ संचलनात ‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सहभागी झाला होता. संरक्षण मंत्रालयाच्यावतीने महाराष्ट्राच्या या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथाचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा पुरस्कार महाराष्ट्रातील समस्त महिला शक्तीला समर्पित केला आहे.

यावर्षी सहभागी झालेल्या चित्ररथामध्ये उत्तराखंडच्या चित्ररथाला पहिल्या क्रंमाकाचे आणि उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. उद्या मंगळवार 31 जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचालक हे पारितोषिक स्वीकारतील.

​दरवर्षी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या पथसंचलनात विविध राज्यांच्या संस्कृतीचे प्रदर्शन करणारे चित्ररथ संचलित होत असतात. यावर्षी महाराष्ट्राने नारीशक्ती या आशयाखाली “महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे व नारीशक्ती” हा विषय निवडला होता. त्याबरोबरच महाराष्ट्राच्या लोककला आणि मंदिर शैलींचा वारसा दाखवण्याचाही यातून प्रयत्न करण्यात आला होता. दिमाखदार व आकर्षक पद्धतीने हा चित्ररथ कर्तव्य पथावर संचलित झाला होता. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची आई भवानी, माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी माता यांच्या प्रतिकृती चित्ररथावर सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. संबळ वाजवणारा गोंधळी हा देवीशी निगडित असणारा लोककलाकार स्वरूपात दर्शवण्यात आला होता. चित्ररथासोबत निषाद गडकरी व सुमित यांच्या पथकाने शानदार नृत्य सादरीकरण केले होते. या चित्ररथासाठी प्रसिद्ध कवयित्री, लेखिका व निवेदिका प्राची गडकरी यांनी चार कडव्यांचे गीत लिहिलेले होते. कौशल इनामदार यांनी यापैकी तीन कडवी घेऊन गीत तयार केले होते. सिद्धेश व नंदेश उमप यांनी हे गीत लोककलेच्या ढंगाने गायल्यामुळे कर्तव्यपथावर हे गीत एकदम उठावदार झाले.

या चित्ररथाची मूळ संकल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यांची होती, तर या संकल्पनेचे विस्तारीकरण प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक विभीषण चवरे यांनी केले होते. शुभ आर्ट या नागपूर येथील संस्थेने चित्ररथावरील शिल्पाचे काम साकार केले होते.

१९७१ पासून महाराष्ट्राला १४ वेळा पारितोषिक

दरवर्षी २६ जानेवारीला नवी दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होत आहे. आतापर्यंत म्हणजे १९७१ पासून ते २०२३ पर्यंत महाराष्ट्राला १४ वेळा उत्कृष्ट चित्ररथासाठी पारितोषिक मिळाले आहे. सर्वप्रथम १९८१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाच्या चित्ररथास प्रथम पारितोषिक मिळाले. १९८३ मध्ये बैलपोळा या चित्ररथासही प्रथम पारितोषिक मिळाले. यानंतर १९८६ मध्ये भारतीय स्वातंत्र्य संग्रामात महाराष्ट्राचे योगदान या संकल्पनेवर आधारित चित्ररथास दुसरे पारितोषिक, तर १९८८ मध्ये लोकमान्य टिळकांचा ऐतिहासिक खटला या संकल्पनेवर आधारित चित्ररथास दुसरे पारितोषिक मिळाले. यानंतर १९९३ मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुरु केलल्या सार्वजनिक गणेश उत्सवाचे शताब्दी वर्ष या चित्ररथास पहिले पारितोषिक, तर १९९४ मध्ये हापूस आंबा या चित्ररथासही पहिले पारितोषिक मिळाले. १९९५ मध्ये बापू स्मृती या चित्ररथासही पहिले पारितोषिक मिळाले आणि सलग तीन वर्षे चित्ररथास पुरस्कार मिळवून महाराष्ट्राने पारितोषिकांवर आपली आघाडी सिध्द केली आहे.

२००७ मध्ये जेजुरीचा खंडेराया या चित्ररथास तिसरे पारितोषिक, तर २००९ मध्ये धनगर या चित्ररथास दुसरे पारितोषिक मिळाले. २०१५ मध्ये “पंढरीची वारी” या चित्ररथास पहिले पारितोषिक, तर २०१७ मध्ये लोकमान्य गंगाधर टिळक यांनी दिलेल्या ‘स्वराज्य माझा जन्मसिध्द हक्क आहे’ या घोषणेचा शताब्दी महोत्सव तसेच सार्वजनिक गणेशोत्सव अभियानाची १२५ वर्षे या चित्ररथास तृतीय पारितोषिक मिळाले. २०१८ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा या चित्ररथास प्रथम पारितोषिक मिळाले, तर २०२२ मध्ये महाराष्ट्राची जैवविविधता व राज्य मानके या चित्ररथास सर्वात लोकप्रिय चित्ररथाचे पहिले पारितोषिक मिळाले. आता २०२३ मध्ये “महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती” या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथाचे दुसरे पारितोषिक मिळाले आहे.

यावर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या आंतरराज्य सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेतही महाराष्ट्राच्या चमूला द्वितीय पारितोषिक मिळाले आहे, हे विशेष. व्हिजनरी परफॉर्मिंग आर्ट या पथकाने हे अप्रतिम सादरीकरण केले होते. सांस्कृतिक संचालनालयाने हा सांस्कृतिक कार्यक्रम आणि चित्ररथ या दोन्हीवर खूप मेहनत घेतली होती.

आतापर्यंत एकूण ७ वेळा महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिले पारितोषिक, तर ४ वेळेस दुसरे पारितोषिक आणि २ वेळेस तृतीय पारितोषिक मिळाले आहे. एकदा लोकप्रिय चित्ररथ यामध्ये पहिले पारितोषिक मिळाले आहे. सलग तीन वर्षी सर्वोत्तम चित्ररथाचे पहिले पारितोषिक पटकविण्याचा विक्रमही (हॅटट्रिक) राज्याच्या नावावर जमा आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी मानले आभार

१९७० पासून दिल्लीतील राजपथावर महाराष्ट्र चित्ररथ सादर करीत आहे. मात्र, दरवर्षी काही राज्यांनाच चित्ररथ सादर करण्याची संधी मिळत असल्याने आतापर्यंत ११ वेळा महाराष्ट्राला चित्ररथ सादर करण्याची संधी मिळालेली नाही. तशी ती यावर्षीही नाकारण्यात आली होती. मात्र, नागपूर अधिवेशनादरम्यान सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना दूरध्वनी करून महाराष्ट्राला यावर्षी चित्ररथ सादर करण्याची संधी द्यावी, अशी विनंती केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत श्री. सिंह यांनी महाराष्ट्राला संधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे श्री. मुनगंटीवार यांनी श्री. सिंह यांचे विशेष आभार मानले आहेत.

००००