Shivsena Pune | शिवसेना (UBT) गटाच्या पुण्यातील प्रवक्त्या विद्या होडे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश..!!

Categories
Breaking News Political पुणे

Shivsena Pune | शिवसेना (UBT) गटाच्या पुण्यातील प्रवक्त्या विद्या होडे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश..!!

 

Shivsena Pune – (The Karbhari News Service) – शिवसेना (UBT) गटाच्या महिला आघाडीच्या उपशहर प्रमुख व शहर प्रवक्त्या विद्या होडे (Vidya Hode) यांनी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री  उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना भवन (Shivsena Bhavan pune) येथे जाहीर प्रवेश केला.

पुण्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवसेना भवन येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी ना.उदय सामंत पुण्यात आले असतांना हा प्रवेश करण्यात आला, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री लोकनेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मी शिवसेनेत प्रवेश केला असून पुण्यात शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणावर पक्ष संघटन बळकट झाले असून येत्या काळात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शिवसेनेची ताकद व पक्ष बांधणी मजबूत करून महिला आघाडीच्या माध्यमातून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती प्रत्येक तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू असे विद्या होडे म्हणाल्या.

यावेळी विद्या होडे यांच्या समवेत असंख्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी शिवसेना पक्षाचे विभागीय संपर्क नेते संजय मशिलकर शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे ,अजय भोसले, किरण साळी रमेश बाप्पू कोंडे ,उल्हास तुपे ,लक्ष्मण अरडे ,श्रीकांत पुजारी, निलेश माझिरे,सारिका पवार,शैला पाचपुते, पूजा रावेतकर, व असंख्य शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

34 Villages Committee | समाविष्ट 34 गावांसाठी 18 लोकप्रतिनिधींची समिती | जाणून घ्या 18 सदस्यांची यादी 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

34 Villages Committee | समाविष्ट 34 गावांसाठी 18 लोकप्रतिनिधींची समिती | जाणून घ्या 18 सदस्यांची यादी

34 Villages Committee – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत ( Pune Municipal Corporation (PMC) समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये मूलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे. हा प्रश्न मागील काही दिवसांपासून गंभीर होत चालला आहे.  आता यावर तोडगा काढण्यात आला असून यासाठी विभागीय आयुक्तांच्या (Pune Divisional Commissioner) अध्यक्षतेखाली १८ लोकप्रतिनिधींची समिती स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. दरम्यान यासाठी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी पाठपुरावा केला होता.

पुणे महापालिका (PMC Pune) हद्दीत 34 गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहराच्या हद्दीत वाढ झाली आहे. तसेच या गावांना महापालिकेचे सर्व नियम लागू झाले आहेत. मिळकत कराची (PMC Pune property Tax) वसुली देखील सुरु झाली आहे. मात्र या गावांमध्ये मूलभूत सुविधाचा अभाव आहे.  यावर  नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget session) देखील चर्चा झाली होती.  मंत्री उदय सामंत यांनी ह्या विषयाबाबत दखल घेतली होती. शासनाकडून 34 गावातील लोकप्रतिनिधी मिळून विभागीय आयुक्त व पुणे महानगरपालिका आयुक्तांकडून समिती ताबडतोब नेमली जाईल व त्या समितीमार्फत निधी देऊन कामे होतील असे अधिवेशनात सांगितले होते. (PMC Pune village news)

आता या समाविष्ट ३४ गावांतील मूलभूत सोयी सुविधा आणि विकास कामे या समितीद्वारे केली जातील. यामुळे ३४ गावांचा खोळंबलेला विकास मार्गी लागण्याची शक्यता आहे. १८ लोकप्रतिनिधींची समिती स्थापन करण्यासंबंधीचे आदेश नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी (Priyanka Kulkarni) यांनी जारी केले आहेत.

 

२०१७ मध्ये ११ तसेच २०२१ मध्ये २३ अशा एकूण ३४ गावांचा समावेश पुणे महापालिकेच्या हद्दीत करण्यात आला. मात्र, या समावेशानंतर ताबडतोब म्हणजेच मार्च २०२२ मध्ये नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आणि त्यानंतर महापालिका निवडणुकाच झालेल्या नाहीत. त्यामुळे सर्वाधिक फटका या ३४ गावांना बसत आहे.

या गावांचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर त्यांची महापालिकेनुसार त्यांची प्रभाग रचना आणि अन्य गोष्टी वादात सापडल्या. या सर्वाचा परिणाम म्हणजे ३४ गावांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी लोकप्रतिनिधीच नाही अशी स्थिती आहे. मात्र, आता शासनाने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याने मूलभूत सोयीसुविधांचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.

प्रमोद नाना भानगिरे यांनी लावून धरला होता विषय

पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) नव्याने समाविष्ट 34 गावांच्या (Merged 34 villages) समस्या सोडवण्यासाठी “लोकप्रतिनिधी समिती” (Representative Committee) नियुक्त करण्याचे आश्वासन राज्य सरकारकडून (State Government) देण्यात आले होते. मात्र अद्याप त्याचा कुठलाही अध्यादेश नव्हता. याकडे शिवसेना शहर अध्यक्ष प्रमोद (नाना) भानगिरे (Shivsena City President Pramod Bhangire) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे लक्ष वेधले होते. तसेच समाविष्ट गावांना न्याय देण्याची मागणी भानगिरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार आता ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 34 गावांचा रचनाबद्ध विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी समिती गठीत होणे आवश्यक होते. यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा करत होतो. त्यानुसार समिती स्थापन करण्यात आली असून गावांचा विकास होण्यास मदत होणार आहे. 

प्रमोद नाना भानगिरे, शिवसेना शहर प्रमुख, पुणे 

: गाव आणि लोकप्रतिनिधी यादी 

1. मांजरी बुद्रुक  – अमर राजू घुले 

2. साडे सतरा नळी – उल्हास दत्तात्रय तुपे 

3. केशवनगर मुंढवा – विकी शिवाजी माने 

4. सुसगाव – बाळासाहेब रामदास चांदेरे 

5. लोहगाव – सुनील बबन खांदवे 

6. शिवणे गाव – सचिन विष्णू दांगट 

7. धायरी गाव – अश्विनी किशोर पोकळे 

8. बावधन – स्वाती अनंता टकळे 

9. उंडरी – पीयुषा किरण दगडे 

10. होळकरवाडी – राकेश मारुती झाम्बरे 

11. आंबेगाव खुर्द – श्रीकांत मारुती लिपार्ने 

12. पिसोळी – मछिंद्र काळुराम दगडे 

13. वाघोली – संदीप सोमनाथ सातव 

14. मांजरी बु – बाळासाहेब वसंत घुले 

15. साडेसतरा नळी – भूषण माउली तुपे 

16. केशवनगर – वंदना महादेव कोद्रे 

17. उंड्री – राजेंद्र काशिनाथ भिंताडे 

18. पिसोळी – स्नेहल गणपत दगडे 

100th Natya Sammelan | नाट्य रसिकांनी पुढच्या पिढीला नाटकाची गोडी लागावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे | प्रशांत दामले 

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

100th Natya Sammelan | नाट्य रसिकांनी पुढच्या पिढीला नाटकाची गोडी लागावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे | प्रशांत दामले

 

100th Natya Sammelan |शासनाने मराठी नाट्यसृष्टीला पायाभूत सुविधा दिल्या असताना कलाकारांनी उत्तम कलाकृती सादर करण्याचा प्रयत्न करावा. नाट्यकलेसाठी सराव फार गरजेचा असून त्याकडे कलाकारांनी विशेष लक्ष देणे आणि नाट्य रसिकांनी पुढच्या पिढीला नाटकाची गोडी लागावी यासाठी प्रयत्न करणे या तीन गोष्टी नाट्यसृष्टीसाठी महत्वाच्या आहेत, असे त्यांनी सांगितले. सर्वांच्या सहकार्याने नाट्य संमेलन यशस्वी होईल असा विश्वास प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी व्यक्त केला. (100th Natya Sammelan)

सांस्कृतिक चळवळीचा भाग म्हणून नाटकाकडे बघताना सर्वांनी नाट्य चळवळीच्या विकासासाठी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा अध्यक्ष ज्येष्ठ कलाकारांमधून एकमताने ठरविला जावा, अशी अपेक्षाही श्री.सामंत यांनी यावेळी व्यक्त केली.

गणेश कला क्रीडा संकुल येथे आयोजित १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. नाटकाच्या घंटेचे पूजन करून आणि संमेलनाध्यक्षांच्या हस्ते घंटा वाजवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाला खासदार श्रीनिवास पाटील, ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सुरेश खरे, दत्ता भगत, गंगाराम गवाणकर, नाट्यपरिषदेचे विश्वस्त शशी प्रभू, अशोक हांडे, मोहन जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदी उपस्थित होते.

उद्योगमंत्री श्री.सामंत म्हणाले, अनेक देणगीदारदेखील नाट्य चवळवळीला प्रोत्साहन देत आहेत. शासनाकडून मिळणारा निधी नाट्य चवळवळ पुढे नेण्यासाठी पडद्यामागील कलावंतांच्या मदतीसाठी वापरला जावा असा प्रयत्न आहे. स्व. विक्रम गोखले यांचे स्वप्न साकार करण्यासाठी रत्नागिरीचे नाट्य संमेलन होण्यासाठी, वृद्ध कलाकारांसाठी वृद्धाश्रमाचे काम सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

हिंदी आणि मराठी रंगभूमीत मोठी तफावत दिसून येते. मराठी माणसाने हिंदीतही पुढे जावे यासाठी त्याच्यामागे पाठबळ उभारण्याची गरज आहे. नाट्य निर्मात्यांनी आणि कलाकारांनी नाट्य संमलेनाचे तीन दिवस आपल्या मातृसंस्थेसाठी आहे हे लक्षात घ्यावे आणि प्रेक्षकांच्या इच्छेचाही विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

श्री. गज्वी म्हणाले, कलावंत स्वत: एकटा मोठा होत नसतो तो विविध ठिकाणाहून चांगले गुण घेऊन संपन्न होत असतो. जब्बार पटेल हे मराठी रंगभूमीवरचे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांच्या हातून चांगले कार्य घडेल. शंभराव्या संमेलनाच्या निमित्ताने पाच महिने रंगकर्मी कार्यरत राहतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुढच्या काळात मराठी रंगभूमी भारतीय रंगभूमीचे नेतृत्व करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

श्री.राजेभोसले यांनी प्रास्ताविकात १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाविषयी माहिती दिली. शासनाने ९ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी नाट्य संमेलनासाठी उपलब्ध करून दिला आहे. यातील काही निधी नाट्य कलावंताच्या कल्याणासाठी उपयोगात आणला जाईल. पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीतून २० लाखाचा निधी मंजूर केला, असे ते म्हणाले.

यावेळी प्रशांत दामले , ज्येष्ठ कलावंत सरुप कुमार, लीला गांधी, सुहासिनी देशपांडे, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमापूर्वी प्रियांका बर्वे, राहुल देशपांडे आणि आर्या आंबेकर यांनी ‘नाट्यधारा’ हा नाट्यगीतांचा कार्यक्रम सादर केला.

Pune Nagar Road Traffic  | एनएचआयचा दुमजली उड्डाणपूल थेट रामवाडीपर्यंत | नगर रस्त्यावर येरवडा ते वाघोली आता जा सुसाट

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune Nagar Road Traffic  | एनएचआयचा दुमजली उड्डाणपूल थेट रामवाडीपर्यंत | नगर रस्त्यावर येरवडा ते वाघोली आता जा सुसाट

| शास्त्रीनगर चौकात उड्डाणपुल आणि ग्रेड सेपरेटर होणार

| पालकमंत्री अजित पवार अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय

Pune Nagar Road Traffic | नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार सुनिल टिंगरे (MLA Suil Tingre ) यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. नगर रस्त्यावर एनएचआयच्या (NHAI) माध्यमातून होणारा दुमजली उड्डाणपूल (Double Decker Flyover) आता वाघोलीऐवजी थेट रामवाडीपर्यंत करण्याचा आणि त्यापुढे शास्त्रीनगर चौकात महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) माध्यमातून उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर करण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. (Pune News)

नागपुर हिवाळी अधिवेशनात पुण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावरील लक्षवेधीत वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी नगर रस्ता सिग्नल फ्री करण्यासाठी बैठक घेण्याची मागणी केली होती. मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात ही बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शनिवार पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सुनिल टिंगरे, आयुक्त विक्रम कुमार, पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, एनएचआयचे वरिष्ठ अधिकारी अभिजित आवटे, वाहतूक पोलिस सहआयुक्त श्री संखे उपस्थित होते. या बैठकीत नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी एनएच आयच्या माध्यमातून शिरूर ते वाघोलीपर्यंत जो दुमजली उड्डाणपुल प्रस्तावित आहे. तो थेट विमाननगर- रामवाडीपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात आलाय अशा सूचना एनएच आयला करण्यात आले. तसेच शास्त्रीनगर चौकातील कोंडी सोडविण्यासाठी याठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग ( ग्रेड सेपरेटर) उभारण्यात येणार असून त्यासंबंधीची निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी असे आदेश पालकमंत्री पवार यांनी महापालिका आयुक्तांना दिले.

यावेळी रखडलेल्या शिवणे- खराडी रस्ताबाबतही चर्चा झाली. हा रस्ता तातडीने मार्गी लावण्यासाठी तातडीने भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण करावी आणि या रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी सुचना पवार यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्याना दिल्या. तसेच वडगाव शेरी विधान सभा मतदार संघातील धानोरी, संतनगर, फाईव्ह नाईन चौक ते धानोरी, विश्रांतवाडी येथील पर्यायी रस्ते मार्गी लावण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी जागेवर जाऊन पाहणी करावी आणि त्यासंदर्भात कार्यवाही करावी अशा सूचनाही पवार यांनी बैठकीत केल्या.
————————————————
मेट्रो मार्गिका विमानतळापर्यंत करा – पवारांच्या सूचना

नगर रस्त्यावर रामवाडीपर्यंत असलेला मेट्रो मार्ग थेट पुणे विमानतळापर्यंत जोडा असे आदेश पालकमंत्री पवार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्याना दिले. याबाबत तातडीने कार्यवाही करावी असेही त्यांनी सांगितले.
————————————

DCM Ajit Pawar | सावित्रीबाई फुले स्मारक आणि जलतरण तलावासाठी विद्यापीठाला १० कोटी रुपयांचा निधी-उपमुख्यमंत्री अजित पवार

Categories
Breaking News Education Political Sport पुणे महाराष्ट्र

सावित्रीबाई फुले स्मारक आणि जलतरण तलावासाठी विद्यापीठाला १० कोटी रुपयांचा निधी-उपमुख्यमंत्री अजित पवार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इनडोअर हॉल आणि सिंथेटीक ट्रॅकचे उद्घाटन

पुणे -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी आणि जलतरण तलावासाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील पै. खाशाबा जाधव क्रीडा संकुलातील पॅव्हेलिअन इमारत, इनडोबर हॉल आणि अद्ययावत सिंथेटीक ट्रॅकच्या उद्घानप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ.कारभारी काळे, प्र-कुलगुरु डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ, विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षणाचे संचालक डॉ. दीपक माने, क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष राजेश पांडे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, बालेवाडी परिसरात उत्तम क्रीडा सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठातदेखील अद्ययावत क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. राज्यातल्या कुठल्याही भागात समाजाच्या हितासाठी आणि शैक्षणिक प्रगतीसाठी शासन भक्कमपणे पाठीशी उभे राहील. डेक्कन कॉलेज आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्माकरकासाठीदेखील सहकार्य करण्यात येईल.

खेळाडूंना पायाभूत सुविधा आणि प्रोत्साहन देण्याची गरज

पुढच्या पिढीला अभिमान वाटेल असे विद्यापीठ घडविण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून करावा. आपल्या युवा पिढीत मोठी क्षमता आहे. खेळाडुंच्या क्षमतेला वाव देताना पायाभूत सुविधा निर्माण करून देत प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे. विद्यापीठाला कुठलीही समस्या असल्यास ती सोडविण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. खेळाडुंवर भार न टाकता क्रीडा संकुलाची देखभाल करण्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. विद्यापीठाच्या बाबतीत आपलेपणाच्या भावनेने सर्वांनी जबाबदारीचे भान ठेवून काम करावे, प्रत्येक विद्यार्थी आपला असल्याची भावना अधिकारी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी दाखवावी, असे आवाहन पवार यांनी केले.

ते पुढे म्हणाले , पै.खाशाबा जाधव यांनी प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन करून यशाची प्रेरणा सर्वांना दिली. देशाला कुस्तीतले पहिले कांस्य पदक मिळवून दिले. स्वामी विवेकानंदांनी आपल्या विचार आणि कार्याने जगाला प्रभावीत केले. त्यांचे विद्यापीठात उभारण्यात आलेले पुतळे मानवतेसाठी कार्य करण्याची आणि यशाची प्रेरणा विद्यार्थ्यांना देतील असे त्यांनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग काही शहरात वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पवार यांनी केले.

पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा देताना ते म्हणाले, जागतिक तापमान वाढीमुळे जगावर परिणाम होत असताना पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, ही काळाची गरज आहे. एक दिवस पर्यावरणाचा विचार न करता ३६५ दिवस आपल्यापरिने पर्यावरण रक्षणासाठी योगदान द्यायला हवे.

सामंत म्हणाले, पुण्याच्या शैक्षणिक पंढरीत अपूर्ण शिक्षण प्रकल्प पूर्ण करून पुण्याला देशपातळीवर लौकीक वाढविण्याचा प्रयत्न आहे. राज्याच्या विद्यार्थ्याला सक्षम करणारे शिक्षण विद्यापीठात मिळायला हवे यासाठी विद्यापीठ आणि शासनाला मिळून काम करावे लागेल. काश्मिरी पंडीतांच्या मुलांना शिक्षणासाठी राखीव जागा ठेवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानासाठी १३ कोटी ३३ लाख रुपये मंजूर करण्याात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. क्रीडा संकुलाच्या जलतरण तलाव आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक उभारण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

कुलगुरू डॉ.काळे म्हणाले, सावित्रीबाई फुले विद्यापीठाने शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करीत अनेक बहुमान प्राप्त केले. विद्यापीठाने अनेक आंतरराष्ट्रीय सामंज्यस्य करार करून आपला विस्तार केला आहे. देशपातळीवर विद्यापीठ १८ व्या स्थानी आहे. २७ एकर मध्ये उभारलेल्या क्रीडा संकुलामुळे क्रीडा क्षेत्रात विद्यापीठाचा नावलौकीक देशपातळीवर पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. क्रीडा संकुलाचा परिपूर्ण वापर करण्यासाठी विद्यापीठ लवकरच धोरण ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमापूर्वी श्री.पवार आणि श्री.सामंत यांनी स्वामी विवेकानंद आणि खाशाबा जाधव यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. त्यांनी यावेळी सिंथेटिक पथ, व्यायामशाळा आणि शुटींग रेंजची पाहणी करुन माहिती घेतली. शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या युवक-युवतींनी मर्दानी खेळ दांडपट्टा, लाठीकाठी आणि तलवारबाजीचे प्रात्यक्षिक सादर केले. खेलो इंडिया स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मल्लखांबच्या खेळाडूंनी मल्लखांबचे प्रात्यक्षिक सादर केले. मंत्रीद्वयांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

अशा आहेत विद्यापीठातील नव्या क्रीडा सुविधा

क्रीडा संकुलामध्ये बहुउद्देशीय क्रीडा प्रकारांसाठी इनडोअर सभागृह तयार करण्यात आला आहे. यामध्ये बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल, ज्युदो, कराटे, नेटबॉल, टेबल टेनिस, कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक्स असे विविध क्रीडा प्रकार खेळता येणार आहेत.

क्रीडा संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक व पॅव्हेलियन इमारत तयार करण्यात आली आहे. त्याच्या मध्यभागी फुटबॉल क्रीडांगण तयार करण्यात आले असून यासाठी राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियान (रुसा) अंतर्गत रुपये ४ कोटीचे अनुदान प्राप्त झाले व उर्वरित खर्च विद्यापीठाने केला आहे. या अद्ययावत सिंथेटिक पथचा खेळाडूंना लाभ होणार आहे.

Uday Samant : नवीन शैक्षणिक धोरणात समान संधी मंडळ प्रत्येक ठिकाणी असावे!

Categories
Education पुणे महाराष्ट्र

नवीन शैक्षणिक धोरणात समान संधी मंडळ प्रत्येक ठिकाणी असावे

: उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत

पुणे : समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळाले पाहिजे ही शासनाची भूमिका आहे आणि त्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येत आहेत, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्षिक दीक्षांत समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव(दूरदृश्य प्रणालीद्वारे)तर कार्यक्रमस्थळी संस्थेचे अध्यक्ष रविंद देव, विद्या कुलकर्णी आदी उपस्थित होते.

सामंत म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणात समान संधी मंडळ प्रत्येक ठिकाणी असावे, ही शासनाची भूमिका आहे. समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. उच्च शिक्षण सर्वांना उपलब्ध करून देण्यासोबत शैक्षणिक गुणवत्तेकडेही लक्ष देण्यात येत आहे.

राज्यातील आदर्श शिक्षण संस्थेत महर्षी कर्वे शिक्षण संस्थेचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.संस्थेने केलेले कार्य गौरवास्पद आहे. यापुढेही शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीसाठी संस्थेचे योगदान राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सर्व क्षेत्रात महिलांनी वेगळा ठसा उमटवला आहे. शिक्षण क्षेत्रातही महिलांनी चांगले यश संपादन केले असल्याचेही ते म्हणाले.

संस्थेचे अध्यक्ष रवींद्र देव यांनी यावेळी विचार व्यक्त केले. त्यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. तसेच कोरोना कालावधीत केलेल्या वैद्यकिय सेवा कार्याबाबत माहिती दिली.

शिक्षणमंत्री  सामंत यांच्या हस्ते स्नातकाना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी संस्थचे प्रमुख पदाधिकारी, पालक, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.

Uday Samant : Savitribai fule pune university : बारामतीला मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु होणार : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा 

Categories
Breaking News Education Political पुणे

  बारामतीला मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु होणार

:  तर पुणे येथे प्राध्यापक प्रशिक्षण प्रबोधिनी

: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

पुणे: पुणे ही शिक्षणाची पंढरी असून ही ओळख आणखी ठळकपणे जगासमोर आणण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच पुणे येथे प्राध्यापक प्रशिक्षण प्रबोधिनी आणि बारामती येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११९ व्या पदवी प्रदान समारंभ प्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला ऑस्ट्रेलियाचे मुंबई येथील महावाणिज्यदूत पिटर ट्रसवेल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

सामंत म्हणाले, प्राध्यापक प्रशिक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढीला चालना मिळणार आहे. यशदाच्या माध्यमातून प्राध्यापकांना आवश्यक प्रशिक्षण देण्याबाबत विचार करण्यात येत आहे. पुणे येथे मुक्त विद्यापीठाचे विभागीय कार्यालय असून लवकरच बारामती येथे उपकेंद्र सुरू करण्यात येईल. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी आणि त्यांना त्यासाठी आवश्यक संधी मिळावी असे शासनाचे प्रयत्न आहेत.

गरीब कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी ‘कमवा व शिका’ योजना अधिक व्यापक आणि नव्या स्वरूपात राबविण्याचा विचार करण्यात येत आहे. अधिकाधिक मुलांना या योजनेचा लाभ होण्यासाठी प्रत्येक विद्यापीठातून या योजनेचा प्रसार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जागतिक स्पर्धेला यशस्वीपणे सामोरे जाणारे विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यापीठातून नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकविण्याची गरज असल्याचे मतही सामंत यांनी व्यक्त केले.

पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून ते म्हणाले विद्यापीठाला जगात अग्रेसर ठेवण्याचे कार्य विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केले आहे. मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्याच्या उद्देशाने विद्यापीठाची स्थापना झाली. आज विद्यापीठाने देशाच्या सीमा ओलांडल्या असून कतारसारख्या देशातही विद्यापीठाने अभ्यासक्रम सुरू करणे ही गौरवास्पद बाब आहे. पुण्याचा ऐतिहासिक वारसा चित्ररूपाने पुणेकरांसमोर यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पद्धतीवर चर्चा होणे गरजेचे असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी अहवाल सादर करताना विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पदवी प्रदान समारंभात सन ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२० या वर्षात व त्यापूर्वी उत्तीर्ण झालेल्या विविध विद्याशाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील एकूण ३ हजार ८०६ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. त्यापैकी ४३ स्नातकांना पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे आदींसह व्यवस्थापन परिषद सदस्य, शैक्षणिक परीषद सदस्य, अधिसभा सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक आणि पदवी प्राप्त विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीक्षांत मिरवणुकीने झाली. मंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वार्ताच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.