Khadakwasla | Ujani Dam | खडकवासला आणि उजनी धरणातील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपयोजना करा | खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांची भेट

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

खडकवासला आणि उजनी धरणातील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपयोजना करा

| खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांची भेट

दिल्ली : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. इतकेच नाही, तर उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्रही प्रदूषित होत आहे. यावर तातडीने उपाय योजना करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे केली.

केंद्रीय वने, पर्यावरण व कामगार मंत्री भूपिंदर यादव यांची भेट घेऊन खासदार सुळे यांनी खडकवासला धरणाबरोबरच राम नदी आणि उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राबाबतही चर्चा केली. बारामती लोकसभा मतदारसंघातील जलस्रोतांच्या प्रदूषणाची माहिती देऊन यावर उपायोजना करण्याबाबत लवकरात लवकर ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पुणे शहर आणि पुढील काही तालुक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. यात रासायनिक घटकांचाही समावेश असून पिण्यासाठी खास राखुन असलेल्या या जलस्रोतांतील प्रदूषित पाणी पिऊन रोगराई पसरण्याचा धोका नाकारता येणार नाही. याशिवाय उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्र देखील प्रदूषित झाले आहे, असे खासदार सुळे यांनी यादव यांना सांगितले

उजनी धरणात मिसळत असलेल्या प्रदूषित पाण्यामुळे येथील खास ओळख असणाऱ्या स्थलांतरीत पक्षांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याबरोबरच बावधन परिसरातील राम नदीचाही प्रश्न त्यांनी यावेळी उपास्थित केला. वाढत्या नागरिकीकरणामुळे राम नदीचे पाझर अडले असून त्याचा परिणाम नदीच्या जलसंकलनावर होत आहे. हे सर्व मुद्दे केंद्रीय मंत्र्यांना समजावून सांगून येथील जलस्रोतांचे संवर्धन, प्रदूषण आणि इतर मुद्यांबाबत सहकार्य करण्याची मागणी त्यांनी केली. पर्यावरणाचे संवर्धन आणि जलस्रोतांचे बळकटीकरण आदी मुद्यांसाठी त्यांचे सहकार्य मिळेल हा विश्वास आहे, असे त्या म्हणाल्या.

चालू वर्षाच्या सुरुवातीलाच बारामती येथे शंभर खाटांचे इएसआयसी रुग्णालय उभे करण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे. याशिवाय पालखी महामार्गावरील दिवे घाटाच्या रुंदीकरणास वन खात्याच्या परवानगी अभावी अडथळे येत होते. तो अडथळाही भुपेंद्र यादव यांच्याकडून दूर झाला असून आवश्यक परवानग्या मिळाल्या असल्याने रुंदीकारणाचा मार्ग सोपा झाला आहे. या दोन्ही कामांसाठी खासदार सुळे यांनी यादव यांचे यावेळी आभार मानले.

Ujani Dam | Solapur Municipal corporation | उजनीचे रब्बीचे आवर्तन १५ जानेवारीपासून | सोलापूर महापालिकेला थेट पाणी देण्यासाठी नवीन पाईपलाईनच्या कामास गती देण्यासाठी लवकरच बैठक

Categories
Breaking News Political महाराष्ट्र शेती

उजनीचे रब्बीचे आवर्तन १५ जानेवारीपासून | सोलापूर महापालिकेला थेट पाणी देण्यासाठी नवीन पाईपलाईनच्या कामास गती देण्यासाठी लवकरच बैठक

| पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठक संपन्न

पुणे| उजनी प्रकल्पाची कालवा सल्लागार समिती (Ujani Dam Canal Advisory Committee)  बैठक सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (solapur Guardian minister Radhakrishna vikhe patil)  यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे संपन्न झाली. रब्बी हंगामातील कालवा प्रवाही सिंचनाचे आवर्तन १५ जानेवारी २०२३ पासून सोडण्याचे बैठकीत ठरले.

बैठकीस पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार सुभाष देशमुख, संजय शिंदे, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, माजी आमदार कल्याणराव काळे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता (वि. प्र.) हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता धीरज साळे आदी उपस्थित होते.

प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजना आणि कोल्हापूर पद्धतीचे बंधारे यांच्यावरील पाणी पट्टी वसुली तसेच त्याबाबतचे व्यवस्थापन करणे वाढत्या सिंचन क्षेत्रामुळे व मनुष्यबळाच्या मर्यादेमुळे पाटबंधारे विभागाला कठीण जात आहे. त्यामुळे ते व्यवस्थापनासाठी साखर कारखान्यांकडे हस्तांतरित करण्याचा पर्याय अवलंबवावा, असे निर्देश मंत्री श्री. विखे पाटील यांनी दिले. त्यानुसार दहिगाव उपसा सिंचन योजना आणि सीना माढा उपसा सिंचन योजना या दोन योजना तसेच भीमा, सीना आणि माण नदीवरील ५० कोल्हापूर पद्धतीचे बंधारे संपूर्ण व्यवस्थापनासाठी साखर कारखान्यांकडे हस्तांतरित करण्याबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्यात येईल असे मुख्य अभियंता श्री. धुमाळ यांनी सांगितले.

सोलापूर महानगरपालिकेला (Solapur Municipal Corporation) पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात नदीत पाणी सोडावे लागते. महापालिकेला थेट पाणी देण्यासाठी नवीन पाईपलाईनच्या कामास गती देण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, असेही श्री. विखे पाटील यांनी सांगितले.

३० जून २०२३ पर्यंत ४ अवर्तने सोडण्याचे नियोजन केले असल्याचे यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर विभागाने योग्य नियोजन करून कालव्याची ४ ऐवजी ५ आवर्तने द्यावीत अशा सूचना पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी दिल्या. नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाच्या वेळी काही दिवसांसाठी नदीकाठच्या गावांचा कृषीपंपांचा वीजपुरवठा बंद करावा जेणेकरून अवैध पाणी उपसा बंद होऊन पाणी बचत होईल, असेही ते म्हणाले.

पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा तसेच सिंचनासाठी अधिक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जलाशयातील बाष्पीभवन कमी करण्याच्यादृष्टीने शास्त्रीय पद्धतीने उपाययोजना करण्याच्या सूचना मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या.

उजनी (भीमा) प्रकल्प उजवा कालवा आणि डावा कालवा या दोन्ही कालव्याचे रब्बीचे पहिले आवर्तन १५ जानेवारी २०२३ पासून सुरू करण्याचे बैठकीत ठरले. तसेच भीमा सीना जोड कालव्यातून २० डिसेंबर २०२२ ते २० जानेवारी २०२३ दरम्यान पहिले आवर्तन सोडण्यात यावे, धरणातून भीमा नदीत १० जानेवारी २०२३ रोजी पाणी सोडण्यात यावे. हे पाणी सोलापूर महानगरपालिका, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला नगरपालिका व भीमा नदी तीरावरील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी हेळ्ळी बंधाऱ्यापर्यंत सोडण्यात यावे. सीना माढा उपसा सिंचन योजना तसेच दहिगाव उपसा सिंचन योजनेतून ५ जानेवारी २०२३ रोजी पाणी सोडण्यात यावे असे या बैठकीत निश्चित झाले.