National Clean Air Programme | पुणे शहराला प्रदूषण मुक्‍त करण्यासाठी केंद्र सरकार सरसावले

Categories
Breaking News PMC social देश/विदेश पुणे
Spread the love

पुणे शहराला प्रदूषण मुक्‍त करण्यासाठी केंद्र सरकार सरसावले

| महापालिकेस 135 कोटींचा निधी

पुणे : पुणे शहर आता प्रदूषणाच्या (Pollution In Pune)  बाबतीत देशात दिल्ली (Delhi) नंतर दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. शहराला प्रदूषण मुक्त करण्यासाठी आता केंद्र सरकार (Central government) सरसावले आहे.  प्रदूषण मुक्‍त पुण्यासाठी केंद्रशासनाकडून पुणे महापालिकेस 15 व्या वित्त आयोगा अंतर्गत तब्बल 135 कोटींचा निधी देण्यात आला आहे.

या निधीतून महापालिकेकडून प्रदूषण मुक्‍त पुण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार (PMC commissioner Vikram Kumar) यांनी दिल्लीत त्याचे सादरीकरण केले. केंद्र शासनाच्या नॅशनल क्‍लिन एअर प्रोग्राम उपक्रमात देशभरातील 131 शहरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील 19 शहरांचा समावेश आहे. तसेच हा उपक्रम 2025-26 पर्यंत पुढील तीन वर्षे राबविल जाणार आहे. या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांच्या कामाचा फायदा प्रदूषण कमी करण्यास झाल्यास महापालिकेस पुढील दोन वर्षात आणखी निधी मिळणार आहे.
——–
80 टक्के निधी ई-मोबिलिटीसाठी
याबाबत माहिती देताना महापालिका आयुक्‍त कुमार म्हणाले की, या निधीतील 80 टक्के निधी हा ई-मोबिलिटाला चालणा देण्यासाठी खर्च केला जाणार आहे. त्यामध्ये, प्रामुख्याने नवीन ई-बस खरेदी करणे, चार्जिंग स्टेशन उभारणे, ई- बस डेपो विकसन, शहरात चार्जिंग पॉईंट्‌सची निमिर्ती, नागरिकांना ई-बाईकची सुविधा उपलब्ध करून देणे, या कामासाठी केला जाणार आहे. तर 20 टक्के निधी शहराच्या प्रदूषणात वाढ झालेल्या पीएम 10 धूळीकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी खर्च केला जाणार आहे. रस्त्यावरची धूळ कमी करण्यासाठी मॅकेनिकल स्वीपिंग, काही चौकांत मिस्ट बेस्ड फाऊंटन, विद्युतदाहिनी धूर कमी करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसविणे अशा कामांचा समावेश असल्याचे आयुक्‍त कुमार यांनी स्पष्ट केले.