GPA Megagypicon Conference | फॅमिली डॉक्टर संकल्पना अधिकाधिक वृद्धिंगत व्हावी. : पद्मविभूषण डॉ. सुरेश अडवाणी | जीपीए मेगाजिपीकॉन परिषदेचे उद्घाटन

Categories
Breaking News आरोग्य पुणे महाराष्ट्र
Spread the love

फॅमिली डॉक्टर संकल्पना अधिकाधिक वृद्धिंगत व्हावी. : पद्मविभूषण डॉ. सुरेश अडवाणी

| जीपीए मेगाजिपीकॉन परिषदेचे उद्घाटन

समाजाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फॅमिली डॉक्टरची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपल्याकडे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाच्या आजाराचे योग्य निदान, त्यावर पूरक उपचार तसेच त्यांना आवश्यक असलेले मार्गदर्शन करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर असते. करोनाच्या काळात रुग्णसेवेमध्ये फॅमिली डॉक्टरने दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. फॅमिली डॉक्टरची संकल्पना येणाऱ्या काळात अधिकाधिक वृद्धिंगत व्हावी, अशी अपेक्षा प्रसिद्ध कर्करोग तज्ञ पद्मविभूषण डॉ. सुरेश अडवाणी यांनी रविवारी व्यक्त केली.

जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने (जीपीए) ‘मेगाजिपीकॉन’ षरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन तसेच संघटनेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘ जीपी लाईफ टाईम अचीव्हमेंट अवॉर्ड ‘ (जीवनगौरव पुरस्कार) चे वितरण डॉ. अडवाणी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. रुबी हॉल क्लिनिक चे प्रमुख आणि प्रसिद्ध ह्रदय रोग तज्ञ डॉ. परवेझ ग्रॉंड, जीपीएच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. हरीभाऊ सोनावणे, उपाध्यक्ष डॉ. श्रीराम जोशी, खजिनदार डॉ. शुभदा जोशी, सचिव डॉ. सुनील भुजबळ, डॉ. अप्पासाहेब काकडे, सहसचिव डॉ. संदीप निकम, डॉ. भाग्यश्री मूनोत-मेहता, डॉ. शिवाजी कोल्हे आदी यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमात जीपीएच्या माजी अध्यक्ष डॉ. सौ. संगीता खेनट यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बाणेर येथील बंटारा भवन येथे हा कार्यक्रम पार पडला.

पद्मविभूषण डॉ. अडवाणी म्हणाले की, परदेशात प्रत्येक विषयात तज्ज्ञ असलेल्या डॉक्टरची संख्या वाढत आहे. परिणामी तेथील फॅमिली डॉक्टरची संख्या घटत चालली आहे, त्यांचे गंभीर परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. आपल्याकडे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. फॅमिली डॉक्टर हा समाजाचा मुख्य पाया आहे, त्याच्याकडे उपचारासाठी आलेल्या रुग्णाला होत असलेल्या त्रासाचे योग्य ते निदान करून आवश्यकता वाटल्यास कोणत्या तज्ज्ञाकडे उपचार घ्यावेत, याचे योग्य ते मार्गदर्शन हे डॉक्टर करू शकतात. गेल्या काही वर्षात भारतात महिलांमध्ये ‘ ब्रेस्ट कॅन्सर’ चे प्रमाण वाढत असून यासाठी महिलांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. महिलांनी मेमोग्राफी सारख्या चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्याची गरज असल्याचेही डॉ. अडवाणी यांनी सांगितले.

हॉस्पिटल उभारणे सोपे असते, मात्र ते चालविणे अवघड असून डॉक्टरांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत असल्याचे डॉ. परवेझ ग्रॉंड यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले. ‘मेगाजिपीकॉन’ ही दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यामागची भूमिका जीपीएचे अध्यक्ष डॉ. हरिभाऊ सोनावणे यांनी सांगितली. या कार्यक्रमात संघटनेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘ समग्र आरोग्यम् ‘ या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

 

विविध विषयांवर तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन

दोन दिवसांच्या या परिषदेमध्ये ‘यूरोलॉजीमध्ये रोबोटिक सर्जरी’, ‘मधुमेहाचे व्यवस्थापन’, ‘आहार आणि रक्तविज्ञान’, ‘मधुमेह व्यवस्थापन’, गुडघे बदलण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर का करावा’, ‘मणक्याच्या रुग्णांमध्ये अलीकडील प्रगती, दैनंदिन ओपीडीमध्ये व्यवस्थापन’, ‘ऑन्कोलॉजी’मध्ये प्रगती’, ‘ टाईप-२ डायबिटीज रिव्हर्स करणे शक्य आहे का?’ अशा विविध विषयांवर चर्चासत्रे झाली.