Traffic in pune | PMC Pune | वाहतूक कोंडीबाबत नियोजन करण्याबाबत महापालिकेची पोलिसांकडे मागणी |अति वृष्टीमुळे वाहतूक कोंडी वाढली

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

वाहतूक कोंडीबाबत नियोजन करण्याबाबत महापालिकेची पोलिसांकडे मागणी

|अति वृष्टीमुळे वाहतूक कोंडी वाढली

शहरात गेले काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने पुणेकर नागरिक अडकून पडत आहेतच. यामुळे पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालक, शहरात घुसणारे अवजड वाहने, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जावी अशी मागणी होत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने थेट वाहतूक उपायुक्तांना पत्र पाठवून वाहतूक कोंडीच्या अशा वाहनांवर कारवाई करा अशी मागणी केली आहे.

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांना पत्र पाठवले आहे.  अतिवृष्टीमुळे शहराच्या विविध भागात पूरस्थिती निर्माण होत आहे. पावसामुळे वाहतूक कोंडी होत असताना गर्दीच्या ठिकाणी अवजड वाहतूक बंदी असणारे वाहने फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच रिक्षा, बसेस हे त्यांच्या थांब्या व्यतिरिक्त थांबून कोंडीत भर घालत आहेत. कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना शहरात प्रवेश देऊ नये, बस, रिक्षा योग्य त्या ठिकाणी थांबतील याचे नियोजन करावे अशी विनंती महापालिकेने वाहतूक पोलिसांना केली आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून पुणे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मध्यवर्ती भागातून मिक्सर, डंपर, मोठे ट्रक बिनधास्त फिरत आहेत. खरे तर शहरात अवजड वाहनांना बंदी असताना ही वाहने थेट शहरात येत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे.