10th, 12th Students Scholarship : दोन दिवसात विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा होणार 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

दोन दिवसात विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा होणार

: महापालिका प्रशासनाची माहिती

पुणे: महापालिकेतर्फे इयत्ता १०वी,१२वीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीची २० कोटी रुपयांची तरतूद संपल्याने २ हजार ७७७ विद्यार्थ्यांना  शिष्यवृत्ती मिळण्याची आस लागलेली होती. यासाठी ६ कोटी रुपयांची गरज असल्याने हा निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू होते. याबाबत ‘कारभारी’ वृत्तसंस्थेने वृत्त प्रसारित केले होते.  त्यानुसार चालू आर्थिक वर्षातील निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आगामी दोन दिवसात उर्वरित विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळेल. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या इयत्ता दहावीमधील विद्यार्थ्यांना भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थसाहाय्य योजनेतंर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी दहावी व बारावीमध्ये खुल्या गटातील विद्यार्थ्यांनी ८० टक्केपेक्षा जास्त गुण असणे आवश्‍यक आहेत आणि महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, मागासवर्गीय विद्यार्थी आणि ४० टक्के अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना ६५ टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले तर १०वीच्या विद्यार्थ्यांना १५ हजार आणि १२वीसाठी २५ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.

२०२०-२१ साठी महापालिकेकडे इयत्ता १०वीचे ७ हजार ८७८ आणि इयत्ता १२वीचे ८ हजार ९६ असे १५ हजार ९७४ विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. पडताळणीनंतर १३ हजार ३१ अर्ज पात्र ठरले आहेत. तर २ हजार ९४३ जणांचे अर्ज अपात्र ठरले.

. १०वीच्या ५ हजार ५५३ जणांच्या बँक खात्यात ८ कोटी ३२ लाख ९५ हजार रुपये तर १२वी च्या ४ हजार ७०१ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ११ कोटी ७५ लाख २५ हजार रुपये जमा केले. इयत्ता १०वीच्या ७९८ तर इयत्ता १२वीच्या १ हजार ९७९ विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती मिळालेली नव्हती. तरतूद उपलब्ध नसल्याने शिष्यवृत्ती मिळालेली नव्हती. मात्र आता प्रशासनाने चालू आर्थिक वर्षातून या निधीचे वर्गीकरण केले आहे. त्यानुसार सगळी प्रक्रिया पूर्ण केली गेली आहे. आगामी दोन दिवसात ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. असा विश्वास महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला.

 

Leave a Reply