Ward Structure Changes | प्रभाग रचना बदल | राष्ट्रवादी जाणार सर्वोच्च न्यायालयात

Categories
Breaking News PMC Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र
Spread the love

प्रभाग रचना बदल | राष्ट्रवादी जाणार सर्वोच्च न्यायालयात

पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकीसंदर्भात मोठा निर्णय घेत शिंदे- फडणवीस सरकारने आज मोठा निर्णय घेत महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेत पुन्हा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा झाली त्यानंतर 2017 मध्ये जी प्रभागरचना होती तीच कायम ठेवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाने 2017 प्रमाणे प्रभाग रचना असेल असे जाहीर केले आहे. दरम्यान या निर्णयावर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला आहे. या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे.

2017 च्या धर्तीवर चार सदस्यीय प्रभागरचना करणं हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे. सहा महिने लोकप्रतीनिधी नसताना हाल होत असताना, पुण्यासह राज्यातील इतरही महापालिकांमध्ये वाईट परिस्थीती असतान शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रीमंडळाच्या सदस्याविना घेतलेल्या या निर्णयाचा निषेध राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून व्यक्त करण्यात आला. पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून येणाऱ्या तीन-चार दिवसात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. या निवडणूका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने होत असताना निवडूकात पुन्हा प्रभागरचना बदलणे, चार सदस्यीय प्रभागरचना करणे हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असल्याचे पुण्याचे माजी महापौर व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे शहरप्रमुख प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठीची सर्व तयारी झाली, आता केवळ राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याचीच प्रतिक्षा होती. मात्र, राज्य सरकारने आज घेतलेल्या निर्णयामुळे पुण्यासह राज्यातील सर्व महापालिकेची प्रभाग रचना बदलणार आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानेही ओबीसी आरक्षणाचा निकाल देताना ज्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांची प्रक्रिया जेथे थांबली आहे, तेथून पुढे प्रक्रिया सुरू करा, दोन आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करा असे सांगितले होते. त्यामुळे पुणे महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होतील असा अंदाज वर्तविला जात होता. पण आजच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा निवडणूका कधी होणार असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.