RMS | देश गंभीर संकटात असताना कामगारांनी राजकीय भूमिका घेत सत्ता परिवर्तन करणे गरजेचे | उदित राज

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र
Spread the love

देश गंभीर संकटात असताना कामगारांनी राजकीय भूमिका घेत सत्ता परिवर्तन करणे गरजेचे – उदित राज

पुणे| – देशांमधील अनेक मोठ्या संघटना कमजोर झाल्या असताना राष्ट्रीय मजदूर संघासारखी संघटना कामगारांसाठीचा लढा ताकदीने देतेय, वाढतेय हे कौतुकास्पद आहे. हा लढा अजून वाढावा अशा शुभेच्छा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या असंघटित कामगारांचे नेतृत्व करणार्‍या असंघटित कामगार कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार उदित राज यांनी दिल्या. मागील २२ वर्षे अविरतपणे कार्यरत असणार्‍या राष्ट्रीय मजदूर कॉंग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, ‘असंघटित कामगारांची एकूण संख्या देशभरात ४५ कोटींच्या आसपास आहे. नोटबंदी, जीएसटी य़ासारख्या केंद्र सरकारच्या देशविघातक निर्णयांमुळे हा वर्ग पुर्णपणे उध्वस्त झाला आहे. यासोबतच महागाई मुळे या वर्गाचे जगणे अधिकच मुश्किल झाले आहे. हा वर्ग गंभीर संकटात असताना दुसरीकडे या देशातील भांडवलदारांच्या संपत्तीमध्ये लॉकडाऊनच्या काळात प्रचंड वाढ झाली आहे. कामगारांना काहीही सुविधा किंवा मदत न देणारे सरकारने या भांडवलदारांचे मात्र लाखो करोडो रूपयांचे कर्ज माफ केलेले आहे. शेतकर्‍यांनी केलेल्या आंदोलनामुळे कामगार कायदे लागू करण्यात आलेले नाहीत कारण सरकार एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढू इच्छित नव्हते. पण हे नवीन कामगार कायदे आल्यानंतर कामगारांचे जे काही हक्क आहेत ते सर्व हक्क संपतील.
देशातील कामगार आणि इतर जनतेला त्यांच्या या मूळ समस्यांवरून भरकटविण्यासाठी हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण केल्या जात आहेत, देशामध्ये धर्मांध वातावरण तयार केल्या जात आहेत. आपल्या हक्कांसाठी लढत असताना कामगारांनी या धर्मांधतेच्या हल्ल्याला वेळीच ओळखून याविरोधात लढा दिला पाहिजे. देशामध्ये हे धर्मांध वातावरण तयार करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रत्येक घरामध्ये दोन कार्यकर्ते आहेत – एक न्यूज चॅनेल आणि दुसरे वर्तमानपत्र. या दोन्हींपासून दूर राहत कामगारांनी आपले प्रश्न सोशल मिडिया मार्फत जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे.

देश हा विपक्ष मुक्त व्हावा असा प्रयत्न केला जात आहेत. महाराष्ट्रामध्ये जे सरकार पाडल्या गेले ते त्याचेच उदाहरण आहेत. विपक्ष मुक्त झाला तर या देशातील जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी, त्यांच्यासाठी लढण्यासाठी कुणीही शिल्लक राहणार नाही. मुळातच केंद्र सरकार हे लोकशाहीच्या विरोधात आहेत. याचे अजून एक उदाहरण म्हणजे आता मंत्री, खासदार यांना काहीही अधिकार राहिलेले नाहीत. सर्व कारभार हुकूमशाही पद्धतीने फक्त प्रधानमंत्री कार्यालयातून चालत असल्याने मंत्र्यांना निवेदन देऊन आता काहीही फायदा हो नाही. कॉंग्रेसच्या काळात विविध मंत्र्यांना त्यांचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होते. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. सर्व सामाजिक संस्था, कामगार संघटना संपविण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहेत. यासोबतचं कामगारांच्या मूलभूत बाबी जसे शिक्षण, पेंशन इ. वरचा खर्च केंद्र सरकार दरवर्षी कमी करत आहेत. अश्या परिस्थितीत जर भाजप सत्तेवर राहिला तर कामगारांना काहीही मिळणार नाहीत. हे सरकार भांडवलदारांना सोडून कुणालाही काहीही देत नाही. अश्या परिस्थितीत कामगारांना त्यांच्या हक्कांसाठी, त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी केंद्रात सत्ता परिवर्तन हाच एक पर्याय आहे. कामगार संघटनांना सुध्दा जिवंत राहायचे असेल तर यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कामगरांचा फक्त आर्थिक स्वार्थ न बघता कामगारांनी व्यापक राजकीय भूमिका घ्यावी यासाठी संघटनांना प्रयत्न करावा लागेल. यामध्येच कामगार वर्गाचे आणि देशाचे ही हित आहे.

राष्ट्रीय मजदूर संघाचा 22 व्या वर्धापन दिनानिमित्त संघटित व असंघटित कामगारांचा मेळावा, कामगार नेते व राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांचे अध्यक्षतेखाली बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन अखिल भारतीय असंघटित कामगार काँग्रेसचे अध्यक्ष डॉ उदित राज यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून आमदार संग्राम थोपटे, कामगार राज्य विमा महामंडळ पुणे प्रदेशाचे उपनिदेशक हेमंत पांडे, प्रदेश काँग्रेस समन्वयक प्रज्ञा वाघमारे, एडवोकेट अभय छाजेड, दीप्ती चौधरी, कमलताई व्यवहारे हे उपस्थित होते.

यावेळी झालेल्या सभेत घरेलू कामगार, बांधकाम मजूर, सुरक्षारक्षक, मनपा मधील कंत्राटी चालक, पाणीपुरवठा कर्मचारी, स्मशानभूमीतील कर्मचारी, कंत्राटी सुरक्षा रक्षक, त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉस्पिटल, कंपन्या, कारखाने येथील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यापूर्वी काँग्रेस भवन ते बालगंधर्व रंगमंदिर, अशी पदयात्रा संघटनांचे बॅनर हातामध्ये घेऊन काढण्यात आली.

या कार्यक्रमात राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी कामगारांच्या व्यथा मांडल्या. पुणे महानगर पालिकेतील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबाबत पुणे महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे बैठक घेण्याची मागणी संग्राम थोपटे यांच्याकडे करण्यात आली. त्याच बरोबर बदलेले कामगार कायदे महाराष्ट्रात लागू करू नये त्यामध्ये कामगार विरोधी निर्णय रद्द करावे अशी मागणी यावेळी केली. कंत्राटी कामगारांना कायम कामगारां एवढे वेतन द्यावे, माथाडी कामगारांना कामगार राज्य विमा महामंडळ चे सर्व फायदे द्यावे अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. पुणे महानगर पालिकेतील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नासंदर्भात तात्काळ आपण पुणे महापालिकेच्या आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे बैठक घेऊ व इतरही कामगारांच्या प्रश्नांबाबत आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करू असे आश्वासन आमदार संग्राम थोपटे यांनी यावेळी बोलताना दिले ते पुढे म्हणाले राष्ट्रीय मजदूर संघाने विविध क्षेत्रातील कामगारांना न्याय देण्याचे काम केले आहे यापुढेही त्यांनी असेच काम चालू ठेवावे त्यासाठी लागणारी राजकीय शक्ती पूर्णपणे सुनील शिंदे यांच्या पाठीशी उभे करण्याचे काम आमच्याकडून केले जाईल व त्यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्न हे सोडवण्यासाठी आम्ही अग्रेसर राहू असेही त्यांनी सांगितले व संघटनेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या कामगार मेळाव्यात हेमंत पांडे यांनीही आपले विचार व्यक्त केले व कामगार राज्य विमा महामंडळ मार्फत देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत यावेळी माहिती दिली.
मेळाव्याचे प्रास्ताविक संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण यांनी केले, सूत्रसंचालन निता परदेशी यांनी केले व आभार प्रदर्शन एस के पळसे यांनी केले.